जगण्याच्या संघर्षातील विद्यार्जन
आयुष्याच्या भावी वाटचालीसाठी आवश्यक मूलभूत ज्ञानाची शिदोरी कन्फ्यूशियसला आपल्या आजोळात प्राप्त झाली होती. हया मूलभूत ज्ञानप्राप्तीमुळे अमर्याद ज्ञानाच्या क्षितीजाकडे जाणा-या वाटा आता त्याला खूणवू लागल्या होत्या. तो आता एक उंच व सुदृढ किशोर झाला होता. आपल्या मामांसोबत तो शेतीमध्ये राबत होता. 'यान' परिवार अल्पभूधारक असल्याने वराह पालनाच्या पूरक व्यवसायावर त्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने अवलंबून होती. कुटुंबासाठी आवश्यक धान्य,भाज्या,कापूस इत्यादींचे उत्पादन शेतीतून घेतले जात असे. शेतात पिकलेल्या कापसातून परिवारासाठी आवश्यक वस्त्र घरीच विणले जाई. कन्फ्यूशियस हया प्रत्येक कामात समरसून भाग घेत होता. सतत कामात राहणे त्याला आवडत असे. त्याने आपल्याला कराव्या लागणा-या परिश्रमासाठी गरीबीला कधीच जबाबदार धरले नाही. हया कामांमधून सतत क्रियाशील राहण्याचे संस्कार त्याने आजीवन स्वीकारले. असे असले तरी त्याची माता झेंगझोईला किशोरावस्थेत प्रवेश केलेल्या आपल्या मुलाची चिंता वाटू लागली. ज्ञानाची महती ज्ञात असल्याने ज्ञानाच्या बळावरच आपला मुलगा द्रारिद्रयाच्या तटबंदया तोडून एक उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो,असा ठाम विश्वास हया मातेला होता. असे ज्ञानलालसेचे संस्कार करणारी आई लाभल्यामुळे कन्फ्यूशियस भविष्यात कन्फ्यूशियस म्हणून ओळखला गेला. भारताप्रमाणेच तत्कालीन चीनमध्ये शिक्षणाची सुविधा राजपरिवार आणि सामंत परिवारातील मुलांसाठी उपलब्ध होती. राजपरिवारातील व सामंत परिवारातील मुलांना राज्यकारभार करण्यासाठी आवश्यक शिक्षण दिले जात असे. त्याच बरोबर युद्धकौशल शिकवले जाई. त्यांचा राज्यकारभार चालवण्यासाठी आवश्यक कर्मचारी निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना त्यांच्यासोबत शिकण्याची संधी मिळत असे. हयासाठी निवडलेले गेलेले विद्यार्थी ज्या सामाजिक स्तरातील असत त्याला 'शी' असे संबोधले जाई. हया 'शी' वर्गातील घराण्यांना विद्यार्जनाचा वारसा परंपरेने लाभलेला असे. शिक्षण घेऊन आजीवन राज दरबाराची सेवा करण्याचा करार हया मुलांना करावा लागे. तसेच त्यांना लष्करी शिक्षण देण्यात येत नव्हते. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर हे विद्यार्थी राजकर्मचारी,भंडार गृह निरीक्षक,मंदिर निरीक्षक,पशुसंपत्ती निरीक्षक इत्यादी पदांवर नोकरी करण्यास पात्र होत. राजपरिवारातील ही शिक्षण प्रणाली अशा प्रकारे दोन स्तरांमध्ये विभागलेली होती. कन्फ्यूशियसच्या बाबतीत त्याची आई व मामा यांच्यासमोर हयामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली. कन्फ्यूशियस ज्या 'कोंग' घराण्यातील होता, ते घराणे प्रतिष्ठित व विद्यार्जनाची परंपरा असलेल नव्हते. त्यामुळे आपल्या पित्याच्या घराण्याच्या भरोशावर त्याला सैन्यात एखादी किरकोळ नोकरी मिळू शकत होती. आईचे 'यान' घराणे प्रतिष्ठित व विद्यार्जनाची परंपरा असलेले असले, तरी कन्फ्यूशियस त्या घराण्यातील नव्हता. अखेर कन्फ्यूशियसच्या मामाने या समस्येतून मार्ग काढला. राजाचा एक अत्यंत जवळचा आणि महत्वाचा कर्मचारी 'यांग हुओ' होता. तो यान परिवारातील होता. तो राजाच्या अत्यंत विश्वासू सेवक होता. तसा तो अत्यंत क्रुर होता. कन्प‹यूशियस आणि यांग हुओ यांच्या व्यक्तिमत्वात कमालीचे साम्य देखील होते. कन्फ्यूशियसच्या मामाच्या आग्रहावरून यांग हुओनच राजपरिवारातील मुलांसोबत कन्फ्यूशियसच्या शिक्षणाची परवानगी राजाकडून मिळवली असावी. असा दावा सीमा कयान यांनी 'रेकॉर्डस ऑफ द ग्रांड हिस्टोरियन' या कन्फ्यूशियसच्या चरित्र ग्रंथात केला आहे. त्यांचा हा ग्रंथ कन्फ्यूशियसच्या चरित्राचा प्रथम व सर्वात विश्वसनीय स्त्रोत मानला जातो. त्याच्या मृत्यूनंतर सुमारे ४५० वर्षांनंतर हा ग्रंथ लिहिण्यात आला. इसवी सन पूर्व दुस-या शतकात सीमा टॅन नावाचा ज्योतिषी चिनच्या 'हान' राजवंशाच्या दरबारात होता. त्यानं कन्फ्यूशियसचे जीवन चरित्र लिहिण्याचा महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. यासाठी त्याने सर्व पुरावे आणि दस्ताऐवज संकलित केले. मात्र तो त्याच्या हयातीत हे काम पूर्ण करू शकला नाही. इसवी सन पूर्व ११० मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आणि उत्तराधिकारी सीमा कियान याने आपल्या पित्याचा हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निश्चय केला. अखेर इसवी सन पूर्व ८६ साली त्याने 'रेकॉर्डस ऑफ द ग्रांड हिस्टोरियन' हा कन्फ्यूशियसचा चरित्र ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्यामुळे सीमा कियान यालाच हया ग्रंथाचा लेखक मानले जाते. हया ग्रंथाच्या दोन प्रती बनवण्यात आल्या होत्या. एक शाही प्रत होती जी हान राजघराण्याची राजधानी 'चांगआन' ज्याला आता 'शिआन' संबोधले जाते येथे ठेवण्यात आली आणि दुसरी प्रत सीमा कियानकडे होती. हया ग्रंथात कन्फ्यूशियसच्या जीवन प्रसंगांना दंतकथांचे स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे वास्तव आणि कल्पित यांच्यात भेद करणे कठिण जाते. असे असले तरी हा ग्रंथ कन्फ्यूशियसच्या जीवनासंदर्भातील सर्वात महत्वाचा पुरावा मानला जातो. असो ! अखेर कन्फ्यूशियसच्या शिक्षणाची सोय झाली एवढे महत्वाचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने राजदरबारत कर्मचारी म्हणून सेवा देण्याचे वचन त्याच्या मामाने दिले. शिक्षणाच्या तीन वर्षाच्या कालखंडात समाजातील वर्गव्यवस्थेचा चांगलाच अनुभव त्याला आला. त्याच्या साधारण कपडे राजवैभवाच्या वातावरणात त्याची गरिबी सिद्ध करण्यासाठी पुरेसे होते. त्यामुळे राजकुमार व सामंतपुत्र यांच्याकडून त्याचा उपहास होणे अथवा मजा घेणे आलेच. कारण तेथे विद्यार्जन करणारे अनेक विद्यार्थी कन्फ्यूशियसच्याच आर्थिक स्तरातील होते. असे असले तरी गरीबीत सुद्धा कन्फ्यूशियस सर्वश्रेष्ठ होता. प्रारंभी उपहास व थट्टा हया गोष्टी त्याला यातनादायक वाटल्या नंतर त्याने हे हलाहल पचवले. भविष्यात तेच त्याचे सामर्थ्य ठरले. यासंदर्भात कन्फ्यूशियस एका ठिकाणी म्हणतो," कोणताही रत्न रगडून निघाल्याशिवाय चमकत नसतो,त्याचप्रमाणे संघर्षाशिवाय माणसाचे व्यक्तित्व चमकत नसते." त्याची गरीबी त्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच्या दिक्षांत समारंभापर्यंत पुरली. कन्फ्यूशियस आणि त्याच्या सहअध्यायींचा अध्ययन काळ पूर्ण झाल्यानंतर राजदरबारात दिक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. कन्फ्यूशियस हया समारंभात सहभागी होण्यासाठी आला, तेंव्हा त्याला राजदरबाराच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्याला रोखणा-या अधिका-याने सांगितले की,"क्षमा करा महोद्य,आतमध्ये केवळ राजपरिवारातील सद्स्यच प्रवेश करू शकतात." यावर कन्फ्यूशियसने मान हलवली आणि स्मित करून तो तेथून मागे फिरला. त्याला आत प्रवेश नाकरणारा त्याचा नातेवाईक यांग हुओच होता. गरीब केवढया निष्ठेने सत्ताधारी अथवा भांडवलदार यांची सेवा करतो. हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकालाच येत असतो. कन्फ्यूशियसला देखील तो आला. त्याने विद्यार्थी दशेत असे अनेक अपमान पचवले. मात्र त्याचा परिणाम असा झाला की एक तत्त्ववेत्ता म्हणून त्याच्यातील संधीच्या समानतेसंदर्भातील आस्था अधिक दृढ होत गेली. त्याच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना नोकर म्हणून काम करण्यासाठी वाचन,लेखन आणि गणित एवढेच शिक्षण देण्यात येत असे. काही प्रमाणात धार्मिक विधी,इतिहास,काव्य,अध्यात्म इत्यादींचे शिक्षण घेण्याची मुभा होती. मात्र लष्करी शिक्षण केवळ राजपरिवार आणि सामंत परिवारातील विद्यार्थ्यांना देण्यात येत असे. तत्कालीन चीनमध्ये धनुर्विद्या व रथ चालवता येणे हे प्रतिष्ठित लोकांचे लक्षण होते. भविष्यात तत्त्ववेत्ता म्हणून कन्फ्यूशियस महान झाला, तरी तो धनुर्विद्या व रथ चालवणे यासंदर्भात अडाणी समजला जात होता. त्याने देखील विद्यार्थी दशेत असतांना आणि पुढे संपूर्ण जीवनात हया गोष्टींना महत्व दिले नाही. त्याने आपल्या अध्ययन काळात तेथील समृद्ध ग्रंथालायाचा पुरेपुर वापर करून घेतला. इतर विद्यार्थी धनुर्विद्या व रथ चालवणे यांचा सराव करत असतांना कन्फ्यूशियस ग्रंथालयात ग्रंथ वाचनात गढून गेलेला असे. याचा अर्थ असा ही नव्हता की तो एकलकोंडा व अलिप्त राहणारा होता. आर्थिकदृष्टया गरीब असलेल्या अनेकांना श्रीमंत मित्रांच्या मागे-मागे फिरून त्यांच्या टोळीचा भाग होण्यात धन्यता वाटत असते. कन्फ्यूशियस आर्थिकदृष्टया गरीब असला तरी बौद्धिकदृष्टया त्याच्या इतका श्रीमंत तेथे कोणीच नव्हता. याची त्याला नेमकी जाणीव होती. त्याने आपल्यासारखी आवड असणारे मित्र तेथे जोडले. मात्र राजपरिवारातील अथवा सामंत परिवारातील पोरांचा 'चमचा' म्हणून त्यांच्या झुंडीत तो सामिल झाला नाही. भविष्यात मैत्रीविषयी विधान करतांना तो म्हणतो," श्रेष्ठ व्यक्तींना मित्र असतात;परंतु श्रेष्ठ व्यक्ती कोणत्या झुंडीचा हिस्सा होऊ शकत नाही." सारे गरीब चांगलेच असतात आणि सारे श्रीमंत वाईटच असतात. हया लोकप्रिय धारणेला देखील कन्फ्यूशियसचे जीवन अपवाद होते. त्याचा सहअध्यायी असलेला आणि 'लू' राज्यातील अत्यंत सामर्थ्यशाली 'मेंग' या सामंत घरण्याचा सर्वात लहान मुलगा 'नांगोंग जिंग्सू' हा त्याचा मित्रच नाही, तर आयुष्यभर त्याच्यावर निखळ प्रेम करणारा,त्याला जपणारा,कोणत्याही आपत्तीत त्याच्यासोबत उभा राहणारा मैत्र जीवाचा त्याला लाभला. कार्ल मार्क्सच्या जीवनात फ्रेडरिक एंगल्सचे जे स्थान होते,तसेच कन्प‹यूशियसच्या जीवनात नांगोंग जिंग्सूचे होते. राजश्रयाने करता आलेले विद्यार्जन आणि जिंग्सूच्या मैत्रीचे धन घेऊन कन्फ्यूशियस जीवनाच्या संघर्षाला सामोरा जाण्यास आता सज्ज झाला होता.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
छान, प्रेरणादायक माहिती.
ReplyDeleteआपण स्फूर्तिदायक लेखन करतात. त्यातून प्रेरणा मिळते. अभ्यास हाच विचार सर्वात महत्वाचा आहे. 🙏
ReplyDeleteम.फुलेंनीही विद्येची महती कधीच सांगितली आहे.आज याची जाणीव खरोखर कितींना....या जाणिवेसाठीचा आपला प्रयत्न स्तुत्य ....👍💐
ReplyDelete