गो-यांच्या इतिहासातील काळा अध्याय
कल्पना करा की सायन्स फिक्शननी लोकप्रिय केलेली 'टाईम मशिन' ही कल्पना वैज्ञानिकांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. त्यानुसार प्रत्येकाला त्याच्या स्वप्नातील नगरीच्या भूतकाळात जाण्याची संधी मिळणार आहे. अशावेळी आपल्यातील अनेकांना भूतकाळातील पॅरिस नगरी पाहण्याची ईच्छा होऊ शकते. आजचा माणसाला 'स्वप्न नगरी' ते 'फॅशन पंढरी' अशा विविध कारणांनी पॅरिसचे आकर्षण असलेले दिसते. टाईम मशिनमधून एखादा पॅरिसप्रेमी माणूस १६३० सालच्या पॅरिसमध्ये पोहचला, तर त्याच्या स्वप्नातील पॅरिसच्या झगमगाटाने भरलेल्या रस्त्यांवरून मजेत भटकंती करण्याऐवजी त्याला भिका-यांच्या गर्दीतून वाट काढत फिरावे लागेल. कारण १६३० साली पॅरिसमधील लोकसंख्येच्या एकचतुर्थांश लोक भिकारी होते आणि फ्रांसच्या ग्रामीण भागातही हीच अवस्था होती. सोळाव्या-सतराव्या शतकात सगळा युरोपच भिका-यांनी भरलेला होता. असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. इंग्लंड असो वा हॉलंड. सर्वत्र भिका-यांचा महापूर लोटला होता. अनेकांचे स्वप्न असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये सोळाव्या शतकात कंगाल बेघर लोकांच्या टोळया राहत्या घरांना घेरून लुटण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्यापासून आपल्या घरांचे रक्षण करण्याच्या समस्येने तेथील श्रीमंतांना हैराण केले होते. अखेर स्वित्झर्लंडमधील श्रीमंतांना यावर संघटीत उपाय योजना करणे भाग पडले. युरोपची अशी अवस्था होण्यास दोन प्रमुख कारणं होती. एक म्हणजे 'धर्मसत्ता' आणि दुसरे म्हणजे 'युद्ध'. चर्चच्या हातात युरोपातील जवळपास ६०% भूमी व संपत्ती एकवटलेली हो.ती याकाळात युरोपातील विविध देशात अथवा भागात असलेले राजघराणे हे नामधारीच होते. खरे तर अखिल युरोपचा सम्राट होता 'पोप'. धर्मगुरु,राजे,सरंजामदार,व्यापारी हे मुठभर लोक सोडल्यास उरलेला सारा युरोप भिकारीच म्हणावा लागेल. कारण यांच्या मालकीच्या जमिनीवर भूदास म्हणून राबणा-या युरोपियन लोकांमध्ये व भिका-यांमध्ये कोणतेच अंतर नव्हते. सततच्या युद्धांनी युरोपला भिकेस लावण्यात मोठे योगदान दिले. जगाला दोन महायुद्धांच्या खाईत लोटणा-या जर्मनीत १६१८ ते १६४८ असे तीन दशकं अखंड युद्ध सुरू होते. या युद्धामध्ये जर्मनीची जवळजवळ दोन तृतीयांश लोकसंख्या नष्ट झाली आणि जगल्यावाचल्यांचे हाल कुत्रा खाणार नाही अशी अवस्था होती. जर्मनीच्या पॅलॅटिनटमधील एक गाव दोन वर्षात २८ वेळा लुटल्याची नोंद इतिहासात आहे. तसेच जर्मन साम्राज्यातील पाच षष्ठांश गावे उद्ध्वस्त करण्यात आली होती. अवस्था अशी झालेली होती की जर्मनीच्या सॅक्सनीमध्ये कोल्हयांचे कळप इतस्ततः भटकत होते,कारण उत्तरेकडील जमिनीचा एकतृतीयांश भाग लागवडीस अयोग्य झाला होता. युरोपातील लोकांच्या अशा भयानक आणि दुःख यांमागील महत्वाच्या कारणांमध्ये युद्धांप्रमाणेच अमेरिका खंडाच्या शोधाचाही समावेश होता. युरोपियन धनदांडग्यांना अधिक श्रीमंत होण्यासाठी आणि भूदासांना चांगले जीवन मिळण्यासाठी निर्माण झालेल्या गरजेतून युरोपच्या बाहेर पडण्याची ईच्छा झाली. भारतीय उपखंड शोधण्याच्या नादात त्यांना अमेरिका खंडाचा शोध लागला. अमेरिका खंडावर सर्वप्रथम वसाहत स्थापन करणा-या स्पेनला त्याच्या खनिज संपत्तीची लूट सर्वप्रथम करण्याची संधी मिळाली. इंग्लड,हॉलंड आणि फ्रांसमधील व्यापारी धनसंचय करण्यात मशगुल असतांना स्पेनवासी उत्तर व दक्षिण अमेरिका खंडात पोहचले. मेक्सिको व पेरुमधील मौल्यवान खाणी लूटण्यसाठी जणू काह त्यांचीच वाट पाहत होत्या. स्पॅनिशांना देखील हया खाणींना लूटणे आपला जन्मसिद्ध अधिकार वाटायला लागला होता. मेक्सिको व पेरुमधून स्पॅनिश जहाजे नफा मिळवण्यासाठी आता विकाऊ माल भरून युरोपकडे जात नव्हते, तर सोनं-चांदी घेऊन जात होते. १५४५ ते १६०० या कालखंडात प्रत्येक वर्षी अमेरिकन खाणींमधून २० लाख पौंड किंमतीची संपत्ती स्पेनच्या खजिन्यात जमा होत होती. यापूर्वी युरोपची चांदीची गरज सॅक्सनी आणि ऑस्ट्रियातील खाणींमधून मोठया प्रमाणात भागवली जात होती. नव्या जगातून येणा-या चांदीसमोर सॅक्सनी आणि ऑस्ट्रियातील चांदी अत्यल्प ठरू लागली. अमेरिकेत एका खाणीतील चांदी संपत आली असे वाटावे,तोच नवी खाण दृष्टिपथात येत होती. अमेरिकेतील चांदीने काही काळ स्पेनची व युरोपची चांदी झाली. मात्र लवकरच ही चांदी युरोपला भिकेला लावणार होती. स्पेनची चांदी युरोपात पसरली स्पेनच्या राजांनी अनेक निष्फळ युद्धांमध्ये,सैन्य आणि सामग्री यावर ही चांदी उधळून टाकली. चांदी अत्यंत मौल्यावान धातू असला तरी अन्न म्हणून खात येत नाही. स्पॅनिश लोकांनी भरमसाठ चांदी खरेदी केली,मात्र जीवनावश्यक माल विकणा-या व्यापा-यांना अन्नासाठी ती दयावी लागली. म्हणजे अखेर जीवनावश्यक माल ज्यांच्याकडे होता, ते व्यापारी ख-या अर्थाने श्रीमंत झाले. चांदीमुळे युरोपात सर्व वस्तूंच्या किंमतीत जबरदस्त भाव वाढ झाली. गेल्या हजार वर्षांमध्ये जागतिक इतिहासात अशी अफाट भाववाढ फक्त तीन-चारदाच झाली आहे. १६०० साली किमतीची पातळी १५०० सालच्या किमतीच्या दुप्पट झाली आणि १७०० साती तर ती पातळी साडेतीनपट झाली होती. अमेरिकेची चांदी सर्वप्रथम स्पेनमध्ये आली. त्यामुळे ही भाववाढ सर्वप्रथम स्पेन व पोर्तुगालमध्ये अनुभवण्यास मिळाली. १५३६ साली निकोलास क्लेनार्ट्स नावाचा फ्लॅण्डर्स शहराचा रहिवासाी असेलेला एक डच माणूस स्पेनमधून प्रवास करत असातांना, त्याने आपल्या घरी एक गमतीदार निरोप पाठवला :"दाढीसाठी सालामान्कामध्ये एक डेमी-रिअल मोजावा लागतो.त्यामुळे फ्लॅण्डर्सपेक्षा स्पेनमध्ये दाढी वाढलेली अधिक माणसे सापडली,तर नवल वाटायला नको." फ्लॅण्डर्सच्या माणसाचे हे नवल हळूहळू संपुष्टात आले,कारण आता सारा युरोप त्याचा अनुभव घेऊ लागला होता. हया भाववाढीचा परिणाम शेतीवर दिसू लागला. सरंजामदार आपल्या खंडक-यांकडून बेसुमार खंड वसूल करू लागले. 'पाप-पुण्य' हया धार्मिक खुळांमुळे मध्ययुगीन युरोप ग्रस्त होता. असे असले तरी धार्मिक खुळांपेक्षा मुठभर माणसांची लोभी वृत्ती इतर सर्व माणसांच्या दुःखाला कारणीभूत ठरते. ही आर्थिक जाणीव व्यक्त करणारे काही विचारवंत यावेळी युरोपात होते. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात जां बोडिन यांनी लिहिले,"आज आपल्याला भेडसावणारी महागाई,माझ्या मते तीन कारणांमुळे अस्तित्वात आली आहे, गेल्या चारशे वर्षात कधीही नव्हता,एवढा सोन्या-चांदीचा पुरवठा हे त्यामागील जवळपास एकमेव आणि सर्वात महत्वाचे कारण आहे." त्याचवेळी जेरार्ड द मेलिनेस या व्यापा-याने १६०१ साली लिहिलेल्या 'ए ट्रीटिज ऑफ कॅन्कर ऑफ इंग्लंड्स कॉमनवेल्थ' (इंग्लंडच्या साम्राज्याला लागेलेल्या किडीविषयीचा प्रबंध) हया पुस्तकात लिहितो," सर्वसाधारणपणे पैशाची मुबलकता वस्तू महाग करते,तर कमतरता वस्तू स्वस्त करते. वेस्ट इंडीजमधून ख्रिश्चन जगतामध्ये मोठया प्रमाणात आलेल्या पैशामुळे सर्व वस्तू महाग झाल्या आहेत." एकूणच अमेरिका खंडामुळे खुरापोत एकाच वेळी श्रीमंती व दारिद्रय सोबत नांदले. त्याचबरोबर युरोपातील शेतीचे स्वरूप बदलण्यास सुरवात झाली. शेती बंदिस्ती आणि भरमसाट खंड आकरणी यामुळे काही शेतकरी उजरले तर काही देशोधडीला लागले. शेती बंदिस्तीमुळे अनेक शेतक-यांनी आपले तुकडे एकत्र करून एकाच ठिकाणी मोठे क्षेत्र निर्माण केले. तसेच शेती सुधारणा करण्यास संधी मिळाली दुस-या बाजूला अनेक शेतकरी संपले. अधिकाधिक सरंजामदारांनी पशुपालनासाठी कुरणे वाढवण्यासाठी शेती बंदिस्ती करायला सुरवात केली. यामुळे अमीर-उमरावांना अधिक पैसा मिळाला; परंतु त्या जमिनीवर राबणा-या शेतक-यांचा कामधंदा बुडाला आणि उत्पन्नही गेले. शेती करण्यासाठी जेवढे लोक लागतात,त्यापेक्षा मेंढपाळीसाठी कमी लोक लागत असल्यामुळे, हे अतिरिक्त लोक देशोधडीला लागले. सरंजामदारांनी कुरणांसाठी गरीब शेतक-यांना तेथून हाकलून लावण्यास सुरवात केली. त्यामुळे हया गरीब शेतक-यांचे जगण्याचे साधन नष्ट झाले. सोनं-चांदीची प्रचंड आवक आणि शेती बंदिस्ती यामुळे युरोपातील मूठभर लोक अमाप श्रीमंत झाले आणि उर्वरित युरोप भिकारी. अशी अवस्था होण्यास अमेरिका खंडाचा शोध कारणीभूत ठरला. युरोपातील काही श्रीमंत अधिक श्रीमंत होण्यासाठी आणि बहुसंख्य गरीब केवळ जगता येण्यासाठी अमेरिकेच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे धावत सुटले. तेथे पोहचल्यावर जमिन मुबलक होती,पाणी होते,खनिज संपत्ती होती,नैसर्गिक संपत्ती होती, सारे काही होते; परंतु हयाचा उपभोग घेण्यासाठी कराव्या लागणा-या श्रमांसाठी माणसांची कमी होती. तसेच अमेरिकेच्या भूमीला जास्तीत-जास्त ओरबडायचे असेल, तर ढोरांप्रमाणे राबणा-या गुलामांची गरज होती. युरोपात भूदास असलेला अमेरिकेत येऊन भूस्वामी झाला होता. जगण्याच्या पुढे जाऊन त्याला आता श्रीमंत व्हायचे होते. त्यामुळे अमेरिकेला गुलामांची सक्त गरज होती. ही गरज भागवली जाणार होती, नागर-व्यवहारी जगाचा गंध नसलेल्या; परंतु स्वतःची निसर्गोन्मुख, समृद्ध, बाळबोध संस्कृती असलेल्या नीग्रो वंशीयांकडून. ही रानाची पाखरं गुलामीच्या बेडयात आणि वर्णवादाच्या पिंज-यात गो-यांच्या अमानुषतेची परिसीमा भोगणार होती. ३१ ऑगस्ट १६१९ रोजी २० नीग्रो गुलामांना विकण्यासाठी व्हर्जिनियाच्या किना-यावर एक जहाज आले. इथूनच गो-यांच्या इतिहासातील एका क्रुर काळया अध्यायाचा प्रारंभ झाला.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment