आजोळची शिदोरी..
आपल्या आयुष्यातील सगळयात मोठे दुःख कोणते ? असा प्रश्न कोणालाही सहज केला,तर मोठी गंमत पाहायला मिळते. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील दुःखाचा शोध घेण्यासाठी भूतकाळाच्या डोहात सूर मारू लागतो. जगातील इतर लोकांपेक्षा मी जे भोगलं ते सगळयात वेदनादायक-कष्टप्रद होते,हे समोरच्याला पटवून देण्यासाठी तो आपले सगळे शब्द सामर्थ्य पणाला लावतांना दिसतो. त्याच्या कथनातून वा वर्णनातून समोरचा कधीच दुःखी होत नसतो,हे मानसशास्त्रीय सत्य कोणी कबूल करत नाही. कारण माणसाने आपल्या जीवनाचा सारा डोलाराच असत्याच्या पायावर उभा केलेला आहे. खरं सांगायचे झाल्यास माणसाच्या दुःखाचे सगळयात मोठं कारण एखादी व्यक्ती,मानवी प्रवृत्ती,परिस्थिती,घटना,प्रसंग इत्यादी पेक्षा अत्यंत भीन्न असलेले दिसते. हे कारण असते त्याचे भूतकाळात रमणे आणि भविषकाळासाठी झुरणे. माणूस वर्तमानात जगण्यास तयारच नाही. त्यामुळे तो सुखी होऊ शकत नाही. भगवान बुद्धांनी यासाठीच वर्तमानात जगण्याचा संदेश दिला होता. मात्र भूतकाळाला कवटाळून बसणा-या आणि भविष्यासाठी तळमळणा-या माणसाला आजही वर्तमानात जगण्यात अर्थ वाटत नाही. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळात जमा होत असतो. मात्र आपण आधीच भूतकाळात जगत असल्याने प्रत्येक वर्तमान क्षण घेऊन येत असलेल्या बहुतेक संधी आपण गमावतो. त्यातल्या जेवढया संधींचे सोनं आपल्याला करता येते,तो आपल्या जीवनातील यशाचा आलेख असतो. ज्याला वर्तमानाने आणलेल्या हया संधी जास्तीत जास्त पकडता आल्या,तो तेवढा यशस्वी ठरतो. कन्फ्यूशियसच्या जीवनाचे अवलोकन करतांना आपल्याला याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पिता शूलियांग याने तान्हया कन्फ्यूशियसला त्याची माता झेंगझाईसह आपल्या घरातून बेदखल केले. अवघ्या सोळा-सतराव्या वर्षी मातृत्वाचे ओझं खांदयावर पडलेली झेंगझाई हया संकटाने डगमगली नाही. प्राप्त वर्तमानाचा तिने अत्यंत खंभीरपणे स्वीकार केला. आपल्या बाळाला घेऊन ती आपल्या माहेरी गेली. जीवनाला एका नव्या उमेदीने सामोरे जाण्याचे तिने ठरवले. झेंगझोईचे माहेर असलेला यान परिवार त्यावेळी 'कूफू' शहराजवळ राहत होता. हलाखीच्या परिस्थिती असली तरी झेंगझोईच्या माहेरच्या लोकांनी तिचा अत्यंत प्रेमाने स्वीकार केला. तत्कालीन परिस्थितीत एकटया मातेला आपल्या बाळाचे पालन-पोषण करता येणे शक्यच नव्हते. अशावेळी माहेरच्या छोटं आंगन असलेल्या मातीच्या घराने आपल्या लाकडी छताखाली झेंगझाई आणि तिच्या बाळाला प्रेमाचा ओलावा दिला. चारी बाजूने लाकडाच्या खांबावर आधारावर उभ्या हया मातीच्या घरातील माणसांनी आपल्या परीने हया माय-लेकांना आधार दिला. घरात लौकिक अर्थानं दारिद्रय नांदत असले तरी ज्ञान,विद्या आणि संस्कृती यांची अपार समृद्धी भरलेली होती. अंगनात पळत असलेल्या कोंबडयांचा आवाज,घराजवळच्या तलावात विहार करणारा बदकांचा थवा. हया सगळया नैसर्गिक गोंगाटात घरातील गीत-संगीताचे ध्वनी विरघळत होते. मातीच्या हया घरात एक खोली विपुल ग्रंथसंपदेने बहरलेली होती. विद्या,ज्ञान,गीत-संगीत,निसर्ग आणि जगण्याचा संघर्ष असे एका तत्त्ववेत्याच्या जडण-घडणीसाठी अत्यंत अनुकुल वातावरण कन्फ्यूशियला मिळाले. म्हणजे त्याच्या बालपणातील वर्तमान त्याला महानतेकडे घेऊन जाण्याची संधी घेऊन आला. ज्याचा स्वीकार त्याच्या आईने आणि त्याने अतिशय सकारात्मक दृष्टीने केला. 'यान' परिवार गरीब होता,तरी असे वातावरण घरात होते. याचा अर्थ हे लोक नक्कीच उपाशी मरत नव्हते. जगाचा विचार करता अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत माणसं उपासमारीने मरत असतात. अनकेजण जीवनात यशस्वी झाल्यावर मोजक्या काही प्रसंगी झालेली उपासमार अथवा काही काळ कमी अन्न मिळणे. याचे वर्णन करून लोकांना दीपवत असतात. कन्फ्यूशियच्या भाषेत सांगायचे झाल्यास, "भूतकाळातील गोष्टींची चर्चा अथवा तक्रार करण्याऐवढी निरर्थक गोष्ट जगात कोणतीच नाही." त्यामुळे कन्फ्यूशियने देखील वर्तमानात जगण्याला प्राधान्य दिले. त्याने आजोळच्या अध्ययनाच्या दृष्टीने संपन्न वातावरणाचा पुरेपुर लाभ उठवला. त्याच्या आईने त्याच्यामध्ये विद्या,ज्ञान,संगीत इत्यादी विषयी गोडी निर्माण केली. अध्ययन,ज्ञानार्जन आणि पारंपारिक अनुष्ठानं याविषयी जिज्ञासा उत्पन्न केली. जणू काही त्याला याविषयीचे बाळकडूच आईकडून प्राप्त झाले. शूलिंयानने आपल्या पत्नीला आणि मुलाला आपल्या जीवनातून आणि घरातून बहिष्कृत केले नसते, तर कदाचित जग एका तत्त्ववेत्याला मुकले असते. शूलियानच्या सैनिकी पेशात रस असणा-या 'कोंग' परिवारात कन्फ्यूशियला विद्यार्जनासाठी अनुकुल पर्यावरण लाभणे अवघड होते. कन्फ्यूशियस तीन वर्षांचा असातांना त्याच्या पित्याचे निधन झाले. त्याला पित्याचा सहवास अधिक काळ लाभला असता,तर शूलियानने आपल्याला मुलाला नक्कीच सैन्यात भरती करण्याचा प्रयत्न केला असता. कन्फ्यूशियस आणि त्याच्या मातेवर आलेले संकट खरे तर त्याच्यासाठी ईष्टापत्ती ठरली. कारण त्यामुळे त्याला आपल्या आजोळी म्हणजे यान परिवारात लहानचे मोठे होता आले. हे एका अर्थाने त्याचे सौभाग्य ठरले. यान परिवार तत्कालीन चिनच्या पारंपरिक जीवनात पौरोहित्य करणारा असावा. त्यामुळे घरात कायम विविध अनुष्ठानांचे आयोजन केले जात असे. कन्फ्यूशियसला यामुळे अनुष्ठानाच्यासंदर्भातील विविध कार्यांमध्ये रुची निर्माण होऊ लागली. त्याचबरोबर त्याच्या कलात्मक गुणांचा देखील विकास होऊ लागला. यासदंर्भात कन्फ्यूशियच्या अनेक चरित्रकारांनी उल्लेख केलेला दिसतो. अनुष्ठानांमध्ये वापरण्यात येणा-या मातीच्या अथवा पितळाच्या पात्रांवर चित्र काढण्यात कन्फ्यूशियस कुशल होता. असे मत चरित्रकारांनी नोंदवलेले दिसते. आपले आजोबा आणि माता यांच्याकडून हा वारसा कन्फ्यूशियला मिळाला होता. लाओत्से आणि कन्फ्यूशियच्या काळात चीनमध्ये कोणताही संस्थात्मक अथवा संघटीत धर्म अस्तित्वात नव्हता. विविध स्थानांना पवित्र मानून त्याठिकाणी असणा-या मंदिरांमध्ये लोक आराधना करत असत. मात्र त्याकाळातील ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये यासंदर्भात आणि हया मंदिरांमधील देवतांच्या शक्तींसंदर्भात कोणतेही उल्लेख आढळत नाहीत. साधारणपणे तत्कालीन चीनमध्ये जपानच्या 'शिंतो' परंपरेनुसार निसर्ग शक्तींचेच पूजन केले जात असावे. कन्फ्यूशियच्या जन्माच्या वेळी त्याच्या वडिलांनी एका पवित्र पर्वताकडे नवस केला होता. तसेच कन्फ्यूशियस शब्दाचा अर्थ देखील पवित्र पर्वत असा होतो. यावरून इसवी सन पूर्व ६ व्या शतकापर्यंत निसर्ग शक्तींची आराधनाच चीनमध्ये प्रचलित असावी असा अंदाज करता येतो. त्याचबरोबर मृत्यू पश्चात जीवन अथवा पुर्नजन्म ही कल्पनासुद्धा तत्कालीन चीनमध्ये अस्तित्वात होती. भविष्यात कन्फ्यूशियने हया कल्पनेची खिल्ली उडवली आणि ही अंधश्रद्धा म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे. असे देखील सांगितले. त्याचा परमशिष्य 'जी लू' याने एकदा त्याला प्रश्न केला की,"आत्मांची आराधना करण्याविषयी आपले मतं काय ?" यावर कन्फ्यूशियने प्रतिकिया देतांना सांगितले," आपण जीवनाचा अर्थ व्यस्थितपणे समजू शकत नाही,तर मृत्यूचा अर्थ कसा शोधणार?" यान परिवारातील पारंपरिक वातावरणामुळे बालपणी कन्फ्यूशियस धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्याचबरोबर त्याचे आजोबा आणि मामा पूजाविधी करण्यासाठी जे पात्र वापरत त्यासंदर्भातील त्याचे आकर्षण आध्यात्मिकतेपेक्षा सांस्कृतिक व सामाजिक अनुभवांमधून निर्माण झालेले होते. कन्फ्यूशियस समरसून हे सर्व शिकत असला अथवा अनुभवत असला तरी घरात उपलब्ध विपुल ग्रंथ संपदा नकळतपणे एका वेगळयाच कन्फ्यूशियला घडवत होती. पुस्तकांनी त्याला आपल्या जीवनातील प्रतिकुलतेवर मात करत एक यशस्वी व्यक्ती म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा दिली होती. त्याची आई आणि मामा यांनी त्याला वर्णमालेचा परिचय करून दिल्यानंतर ग्रंथवाचन करण्याचे देखील शिकवले. त्याने हया ग्रंथांचे अतिशय गंभीरपणे वाचन केले. वाचनामुळे चिंतन व मननाची सवय त्याला नकळतपणे लागली. तत्कालीन चीनमध्ये ५ ग्रंथ महान समजले जात होते. हे पाच ही ग्रंथ म्हणजे अनुष्ठानांचे पुस्तक,इतिहासाचे पुस्तक,परिवाराचे पुस्तक,संगीताचे पुस्तक आणि गीतांचे पुस्तक. अनुष्ठानांच्या पुस्तकांमध्ये विविध धार्मिक विधींसोबतच सदाचाराचे नियम देण्यात आलेले होते. भविष्यात त्यामुळेच कन्फ्यूशियचे तत्त्वज्ञान सामाजिक सदाचारांच्या पायावर उभे राहिलेले दिसते. इतिहासाच्या पुस्तकात चिनचा झाऊ राजवंशाचा इतिहास होता कन्फ्यूशियस इतिहासाचा अत्यंत मोठा जाणकार होता. आपल्या तर्कांच्या समर्थनार्थ तो कायम ऐतिहासिक दाखले देत असे. परिवाराचे पुस्तक ज्योतिषशास्त्राशी संबंधित होते. ज्याच्या आधारे भविष्यवाणी केली जात असे. ज्याला आपण पंचाग असे देखील म्हणू शकतो. कन्फ्यूशियने यामध्ये कधीही रुची दाखवली नाही. एकप्रकारे त्याचा यावर विश्वास नव्हता. संगीताच्या पुस्तकामुळे त्याची संगीताची आवड आणि ज्ञान वाढले. कन्फ्यूशियस चिनी सितार वाजवण्यात अत्यंत निपूण होता. रवींद्रनाथ टागोरांच्या संगीत प्रेमाने बंगालमध्ये ज्याप्रमाणे रवींद्र संगीताची परंपरा निर्माण झाली. त्याचप्रमाणे चीनमध्ये कन्फ्यूशियमुळे एका नवीन संगीत परंपरेचा जन्म झाला. काळाच्या ओघात संगीताचे पुस्तक नष्ट झाले तरी कन्फ्यूशियसमुळे ते संगीत प्रत्यक्षात अक्षय राहिले. कन्फ्यूशियसला गीतांचे पुस्तक सर्वात प्रिय व महत्वपूर्ण वाटत होते. झाऊ वंशाचा संपूर्ण सांस्कृतिक इतिहास काव्य आणि लोकगीतांच्या स्वरŠपात हया पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आला होता. त्यामुळे चिनचा सांस्कृतिक वारसाच कन्फ्यूशियसपर्यंत पोहचला होता. आजोळी मिळालेली ही शिदोरी कन्फ्यूशियसला आजन्म पुरली. भविष्यात हयाच वारस्याला कन्फ्यूशियसने आपल्या योगदानाने महान व व्यापक बनवले.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Great 👌 Mind-blowing
ReplyDeleteछान माहिती
ReplyDelete