अखेरचा हा तुला दंडवत !
तांबड फुटण्याच्या बेतात असतांना चीनच्या सीमेजवळील नाक्यावरच्या शेकोटीजवळ रात्रभर वेडया म्हाता-याच्या गोष्टी ऐकत बसलेल्या प्रत्येकाचे कान प्रचंड उत्सुकतेने टवकारले होते. बुद्धीला ताण देऊन आणि अनेक युक्त्या लढवून एखादे कोडं वा रहस्य उलगडल्यानंतर होणारा आनंद चित्काराच्या रूपात आपले अस्तित्व इतरांना जाणवून देत असतो. अगदी त्याचप्रमाणे नाक्यावरील मुख्य अधिकारी म्हाता-याकडे बघत चित्कारला. हा म्हातारा नेमका काय प्रकरण आहे. हे आता आपल्याला समजणार याचा आश्चर्ययुक्त आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर तरळला. नाक्याचा अधिकारी चित्कारत होता," तू..तू..लाओत्से आहेस. मी तूला ओळखले." लाओत्से यावर हसून म्हणाला," अहो ! आपण काही तरीच बोलत आहात. मी एक साधा खेडूत म्हातारा आहे. उर्वरित आयुष्य मानवी वस्तीपासून आणि मानवी सहवासापासून एकांतात घालवण्याच्या हेतूने चीनबाहेर जाण्याची परवानगी आपणाकडे मागत असलेला एक याचक आहे." लाओत्सेचे उत्तर ऐकून नाका अधिकारी म्हणाला," लाओत्से,आपण काल संध्याकाळपासून करत असलेले नाटक आता बंद करा. वर्तमानकाळातील हया चीनमध्ये एवढा शहाणपणा एकाच माणसाकडे शिल्लक आहे,तो म्हणजे लाओत्से. आपल्याला मी याआधी कधीच पाहिले नसले, तरी असे ज्ञान आजच्या चीनमध्ये आपणच देऊ शकतात. हे मात्र मला पक्कं माहित आहे. त्यामुळे आता आपण आपली ओळख लपवण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका. हया नाक्यावरील प्रदिर्घ नोकरीत मी देखील माणसांचेच निरिक्षण करत आलो आहे. हर त-हेचे माणसं येथून येतांना-जातांना मी पाहिले व अनुभवले; परंतु तुमच्यासारखा माणूस आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. हा असा ऐकच माणूस आज चीनमध्ये आहे. हे मला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमची ओळख लपवू शकत नाही." एव्हाना सूर्याच्या धरतीवर पोहचलेल्या किरणांनी लाओत्सेच्या चेह-यावरील सुरकुत्यांमध्ये प्रवेश केला होता. त्यांचामधून आता प्रकाश धावू लागला होता. स्वतःच्या ज्ञानाचा आणि सूर्याचा प्रकाश यांच्या मिलाफामुळे लाओत्सेच्या चेह-यावर एक दैवी आभा प्रकटली होती. शेकोटीजवळील प्रत्येकाचा चेहरा लाओत्से आपल्याला प्रत्यक्ष भेटला आणि त्याचे ज्ञानामृत आपल्या दोन्ही कानांनी प्राशन करता आले. या भाग्याने फुलून आला होता. आपण लाओत्से आहोत. हे लाओत्सेने मान्य करून एका त्रिकालाबाधित महापुरूषाच्या भेटीचे संचित गौरवाने आपल्या पुढच्या पिढयांना सांगण्याचा मान मिळवण्याच्या भावनेने यासर्वांना अधिर केले होते. नाक्यावरील प्रत्येकाची आपल्या ओळखीची अधिरता आणि आपल्याला चीन बाहेर जाण्याची असेलेली अधिरता लक्षात आल्याने, अखेर लाओत्सेचा नाईलाज झाला. तो म्हणाला," हो ! मीच लाओत्से आहे माझ्याकडे देशसोडून जाण्याचे पारपत्र नाही. त्यामुळे निदान त्यासाठी तरी मला माझी ओळख देणे भागच आहे." त्याच्या कबूली जबाबाने नाक्यावरील प्रत्येक जण जीवनाचे सार्थक झाल्याच्या अलौकिक आनंदानं न्हाऊन निघाला होता. लाओत्सेने पुन्हा एकवार नाका अधिका-याकडे याचना केली. तो म्हणाला," माझ्याकडे देशाच्या सीमेबाहेर जाण्याचे परवानगी पत्र नाही. अशा परिस्थितीत आपण मला देशाबाहेर जाऊ द्याल का?" लाओत्सेसारख्या महर्षीला अशी याचना करतांना पाहून नाका अधिका-याचे मन घायाळ झाले होते. आपल्यासारखा कःपदार्थ माणूस नाका अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याने आजवर मकडत होता. ज्याने चीनी समाजाला व संस्कृतीला आपल्या महान तत्त्वज्ञानाचा चिरंतन ठेवा देऊन गौरवले. भविष्यात प्रत्येक काळात व प्रत्येक देशात लाओत्से आणि त्याचे तत्त्वज्ञान चीनचे संचित म्हणून निखळपणे स्वीकारली जाणारी एकमेव गोष्ट असणार आहे. तो लाओत्से आपल्याकडे देशाबाहेर जाऊ देण्याची याचना करतो. हया जाणीवेने नाका अधिका-याचे काळीज शरमेने पाणी-पाणी झाले. त्याने लाओत्सेला अत्यंत विनम्रतेने हात जोडले. लाओत्सेसारख्या महर्षीसमोर काय बोलावे ? आणि त्याच्यासाठी कोणते शब्द वापरावे? हया विचाराने तो हतबल झाला होता. अखेर बराच विचार करून आणि धैर्य एकवटून तो म्हणाला," मला क्षमा करा ! आपल्या जवळ काही नाही असे म्हणून हया चीनला स्वतःच्याच नजरेतून अजून उतरवू नका. आजच्या चीनने आपले मोठेपण मान्य केले असले तरी आपल्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केलेला नाही. हे शहाणपण देशाच्या भावी पिढयांकडे तरी येवो,एवढीच प्रार्थना मी परमेश्वराकडे हया घडीला करू शकतो. आपल्याकडे जेवढे आहे तेवढे या देशातील कोणाजवळच नाही. आपल्याला येथून जाण्यास माझ्यासारखा किरकोळ माणूस सोडा चीनचा सम्राट देखील रोखू शकत नाही. आपले तत्त्वज्ञान म्हणजे केवळ कोरडे शब्दं नाहीत,तर हे शब्द म्हणजे आपल्या प्रत्येक श्वासाच्या उच्छ्वासातील आपल्या जीवन तत्त्वज्ञानाचे साकार रुपं आहेत. हया देशावर आणि त्याच्या येणा-या पिढयांवर आता एकच कृपा करा. आपले ज्ञानामृत आम्हांला अक्षय स्वरूपात देऊन जा." यावर लाओत्से म्हणाला,"म्हणजे मी नेमकं काय करावे? असे आपले म्हणणे आहे." नाका अधिकारी लाओत्सेला म्हणाला," आपले तत्त्वज्ञान आपण लिखित स्वरूपात आमच्यासाठी ठेवून जावे. असे मी विनवित आहे." लाओत्सेसाठी हे धर्मसंकटच होते. त्याने आजवर आपले तत्त्वज्ञान शब्दबद्ध केले नव्हते. कारण त्याचे तत्त्वज्ञानात सृष्टी निर्मात्याची संकल्पनाच मुळी शब्दातीत होती. त्याला शब्दातबद्ध करणेच शक्य नाही किंवा करताच येत नाही. या पायावर त्याचे तत्त्वज्ञान उभे होते. त्याने आयुष्यभर हया निर्मिकापर्यंत पोहचण्याचा मार्ग शोधला आणि त्याच्यावर अखंड चालण्याचा प्रयत्न केला. आज देखील आपण त्याच्यापर्यंत पोहचलो नाही. असे लाओत्सेला प्रामाणिकपणे वाटत होते. मात्र आता कायमचा देशत्याग करण्याच्या विचारावर तो ठाम असल्याने, हया अधिका-याचे काही तरी समाधान करणे भाग होते. कारण आजवर त्याने कुणाला दुखावलं नव्हते. त्यामुळे मानवी सहवासाच्या अखेरच्या क्षणी त्याच्याकडून हा अपराध होणे शक्य नव्हते. लाओत्सेला चीनमधून लवकरात लवकर बाहेर जायचे होते. त्याने काही क्षण विचार केला आणि अधिका-याची विनंती मान्य केली. नाका अधिका-याने लाओत्सेला लेखन सामग्री आणि बसण्याची आरामदायी व्यवस्था करून दिली. लेखन सामग्री घेत लाओत्से त्याला म्हणाला," आपण दिलेल्या आरामदायी जागी बसून मी लिहिणार नाही. मी बाहेर खुल्या हवेत दगडावर बसून माझे लेखन करेल. कारण आजवर मी जीवनासंदर्भात जे काही शिकलो ते या निसर्गाकडून शिकलो आहे. त्यानेच माझ्यातील लहान मुलाचे,त्याच्या निरागसतेचे,निर्मळतेचे आणि सतत नवीन जाणून घेण्याची वृत्तीचे संगोपन केले आहे. त्यामुळे माझ्याकडून माझ्या मायभूमीवर लिहिले जाणारे अखेरचे शब्द देखील त्याच्या कुशीत बसूनच मी लिहिणार." आपले विचारधन चिरंतन काळासाठी देऊन जाणा-या लाओत्सेच्या मर्जीपुढे जाण्याचे धैर्य कोणात नव्हते. त्यांनी त्याला आग्रह केला नाही. नाक्याच्या परिसरातील एका पाषाणावर बसलेला लाओत्से एका छोटेखानी; परंतु महान व कालजयी ग्रंथाची निर्मिती करत होता. आकाराने मोठा ग्रंथ लिहिण्याची त्याला आवश्यकताच नव्हती. आजन्म निसर्गाशी सुसंवाद वाढवत गेलेल्या लाओत्सेला वाचाळपणातील व्यर्थताच उमजली होती. आपल्या मनाला निसर्गसन्मुख करून त्याची शुद्धता जेंव्हा आपण करत जातो तेंव्हा आपल्याला जाणवलेले इतरांना सांगणे देखील व्यर्थ वाटू लागते. तसेच जे जाणवले त्याला शब्दांमध्ये साकार करणे म्हणजे त्याची शुद्धता व अलौकिकतेला बाधा आणण्यासारखे आहे. हेच लाओत्सेचे खरे तत्त्वज्ञान होते. याठिकाणी भगवान बुद्ध आणि लाओत्से यांच्यात कमालीचे साम्य दिसून येते. बुद्धांना बोधीसत्वाची प्राप्ती झाल्यानंतर आठ दिवस त्यांनी मौन धारण केले होते. कारण त्यांना जगात बोलण्यासारखे काहीच नाही. हे प्रकर्षाने जाणवले होते. अखेर आपल्याला दिसलेल्या प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग तरी लोकांना दाखवावा. केवळ या भावनेतून त्यांनी बोलण्याचे ठरवले आणि सारनाथला येऊन आपल्या पहिल्या पाच शिष्यांना सर्वप्रथम मार्गदर्शन केले. त्यामुळेच बुद्ध असो की लाओत्से यांनी सिद्धांत वा शास्त्र अशा शाब्दिक जंजाळात आपल्या विचारधनाला गुरफटवले नाही. लाओत्सेचे लेखन पूर्ण होईपर्यंत सूर्य माथ्यावर आला होता. त्याचे लेखन पूर्ण करून तो उठला. लिहिलेली चोपडी नाका अधिका-याकडे सोपवली आणि हात जोडून त्याच्याकडे देशाच्या सीमेबाहेर जाण्याची परवानगी मागितली. नाक्यावरील प्रत्येक व्यक्तीचं मन यामुळे हेलावलं. निरोपासाठी लाओत्सेने सर्वांना हात जोडले. या महात्म्याची देहबोली आणि सुरकुत्यांची नक्षी झालेल्या चेह-यावरील भाव शब्दांपेक्षा अनंत पटीने हृदयसंवाद साधण्याचे सामर्थ्य ठेवणारे होते. नाक्यावर मुक्कामी थांबलेले व्यापारी आणि प्रवासी देखील आपला मुक्काम लांबवून महात्म्याला निरोप देण्यासाठी थांबले होते. तेथे उपस्थित प्रत्येकाचे डोळे लाओत्सेला अखेरचा आपल्यात साठवून घेण्यासाठी धडपडत होते. लाओत्सेने आपल्या मायभूमीला अखेरचा दंडवत केला. उपस्थितांना अभिवादन केले. मायभूमी आणि उपस्थितांकडे पाठ करून तो अज्ञाताच्या प्रवासाला काठी टेकवत निघाला. निरोप देणा-या डोळयांमध्ये साकळलेल्या पाण्यामुळे त्याचे पाठमोरे पार्थिव शरीर लवकरच धुसर-धुसर होत गेले. पार्थिवाकडून अपार्थिवाकडे गेलेल्या हया प्रवाशाच्या रस्त्यावर उमटलेल्या पाऊलखुणा त्याच्या पृथ्वीवरील अस्तित्वाचे अखेरचे पुरावे ठरले.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
साध्या पण महान विचारांचे शाश्वत सौंदर्य.... तेवढ्याच अलवारपणे लेखातही उतरले आहे....
ReplyDeleteआपल्या शब्दातून लावोत्से कळलाच. पण बुद्ध असोत वा लावोत्से यांनी मौखिक ज्ञान लिखित स्वरुपात आणणे म्हणजे त्यातील शुद्धता आणि अलौकिकता यांना बाधा आणणे होय हा विचार भावला. आपण केलेली रचना आणि वर्णन केवळ सुंदर आहे. 🙏
ReplyDelete