तत्त्वज्ञाची जन्म कथा

इसवी सन पूर्व ५१० च्या आसपासचा काळ असावा.  चीनमधील 'लू' राज्यामधील 'वियांग' नावाच्या शहरावर एका बंडखोर सेनानायकाने कब्जा केला होता.  त्याच्या तावडीतून हे शहर परत मिळवण्याची जबाबदार लू राज्याची सैन्यातील एका तुकडीला देण्यात आली.  बंडखोरांच्या नेत्याने हया तुकडीला शहरात बंदिस्त करून तिचा खातमा करण्याची योजना आखली.  त्याने वियांग शहराचा मुख्य दरवाजा जाणीवपूर्वक उघडा ठेवून राजाच्या सैन्य तुकडीला आत येऊ दिले.  सैन्याची तुकडी शहरात दाखल झाल्यानंतर शहराचा मुख्या दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न त्याचे साथीदार करू लागले.  राजाच्या सैन्यातील एका पराक्रमी सैनिकाने बंडखोरांची ही चाल ओळखली.  तो शहराच्या मुख्य दरवाजाजवळ पोहचला आणि एकटयाने लढून आपल्या तुकडीतील सैनिकांना त्याने शहराच्या बाहेर काढले.  त्याच्या या पराक्रमामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले.  हया सैनिकाचे नाव 'शू०२३.लियांग हे' असे होते.  शूलियांग हे चीनमधील 'कोंग' घराण्यातील होता.  तेंव्हा घराण्याच्या अथवा कुळाच्या नावावरुनच गावाचे नाव असे.  त्यामुळे शूलियांगच्या गावाचे नाव देखील 'कोंग' असेच होते.  कारण ते गाव म्हणजे त्या कुळाची वस्ती होती.  हे कोंग गाव 'लू' प्रातांच्या दिक्षणेला असलेल्या 'सोंग' प्रांतात होते.  कोंग कुळ हे सोंग प्रांतातील राजघराण्याशी संबंधीत असलेले प्रतिष्ठित कुळ होते.  शूंलियांगचे आजोबा सोंग राजघराण्याशी झालेल्या एका विवादात मारले गेले.  राजघराण्याशी वितुष्ट आल्यामुळे कोंग घराण्यातील लोकांना आपल्या राज्याचा त्याग करावा लागला.  त्यामुळे त्यांनी उत्तरेकडील लू राज्यात आश्रय घे.तला  आपले गाव आणि राज्य सोडल्यामुळे कोंग परिवारासमोर उपजिविकेचा प्रश्न उभा राहिला.  लू राज्यात हा परिवार उपरा व आश्रित असल्यामुळे राज्यातील अभिजन अथवा सत्ताधारी वर्गात त्याचा समावेश होणे कठिण झाले.  अशावेळी एका छोटया शहरात त्यांनी आपले बस्तान बसवले.  आपल्या सोंग राज्यात घरदांज व प्रतिष्ठित असलेल्या कोंग परिवाराला लू राज्यात प्रतिष्ठा मिळवण्याची चिंता पडली.  त्याचबरोबर जगणे देखील महत्वाचे होते.  शूलियांग मोठा होईपर्यंत त्यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही.  जन्मजात शूर असलेल्या तरुण शूलियांगने लू राज्याच्या सैन्यात भरती होण्याचे ठरवले.  आपण सैन्यात पराक्रम केल्यास आपल्याला नोकरीत कायम केले जाईल.  आपल्या परिवाराला लू राज्यात प्रतिष्ठा प्राप्त करता येईल.  असा विचार त्याच्या मनात होता.  त्याला भाडोत्री सैनिक म्हणून लू राज्याच्या सैन्यात भरती करण्यात आले.  जर तो लू राजघराण्याशी संबंधीत असता तर त्याला सैन्यात कायम करून पद देण्यात आले असते.  शूलियांगला वाटत होते की आपला पराक्रामातून आपण स्वतःला सिद्ध करू म्हणजे आपल्याला सैन्यात कायम करून एखादे पद देण्यात येईल.  त्याने अनेक लढायांमध्ये शौर्य दाखवलं तरी त्याची दखल घेण्यात आली नाही.  वियांग शहराच्या लढाईत त्याने जे साहस व पराक्रमाचे दर्शन घडवले त्यावरून आता आपल्याला निश्चितच कायम नियुक्ती मिळेल अशी आशा त्याच्या मनात निर्माण झाली.  त्याच्या याही पराक्रमाच्या बदल्यात त्याच्या पदरात निराशाच पडली.  राजाकडून त्याला कोणतेही पारितोषिक मिळाले नाही.  तो कायमच एक भाडोत्री सैनिक राहिला.  त्याला आणि त्याच्या कुटुंबाला एक छोटेसे सरकारी घर राहण्यासाठी देण्यात आले होते.  आपल्यानंतर पुढील पिढीला देण्यासारखे त्याच्याकडे काहीच नव्हते.  तत्कालीन चीनमध्ये भारताप्रमाणेच वंशाचा दिवा असणे महत्वाचे होते.  पुत्र प्राप्तीसाठी शूलियांगने दोन विवाह केले.  त्याला एक पुत्र आणि नऊ मुली अशी दहा अपत्ये झाली.  एक पुत्र झाला तरी शूलियांगचा प्रश्न सुटलेला नव्हता.  कारण त्याचा पुत्र जन्मतः अपंग होता.  चिनी समाजाच्या तत्कालीन नियामांनुसार अपंग व्यक्तींना विवाह करण्याचा आणि अपत्यांना जन्म देण्याचा अधिकार नव्हता.  त्यामुळे आपल्यासोबतच आपला वंश संपणार हया चिंतेने शूलियांग व्यथित झाला होता.  तो स्वतः ६० वर्षांचा झाला होता आणि दुस-या पत्नीचे देखील वय झाले होते.  पुत्रप्राप्ती करता आता त्याच्यासमोर एकच मार्ग उरला होता. तो म्हणजे तिसरा विवाह करणे अथवा एखादया तरुण स्त्रीकडून पुत्र प्राप्ती करुन घेणे.  तत्कालीन चिनी परंपरेनुसार वंश पुढे नेण्याची जबाबदारी सगळयात मोठया पुत्राची असते.  हा पुत्र पत्नीपासूनच झालेला असावा असे बंधनकारक नव्हते.  तो एखादया पर स्त्रीकडून झालेला असला तरी चालत होते.  त्यामुळे विवाहित पत्नीकडून पुत्र प्राप्ती झाली नाही, तर कोणत्याही अविवाहित स्त्रीकडून पुत्र प्राप्ती करून घेण्याची चाल समाजमान्य होती.  २० व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत चीनमध्ये ही प्रथा अस्तित्वात होती.  शूलियांगने आता हा मार्ग वापरून आपल्याला वंशाला वारस मिळवण्याचे निश्चित केले.  त्याच्या या प्रयत्नांना वयाचा ७० व्या वर्षी यश आले.  त्याने 'झेंगझाई' नावाची एक पंधरा वर्षांची युवती शोधली.  झेंगझाई लू राज्यातील एका प्रतिष्ठित घराण्यातील सुसंस्कृत मुलगी होती.  तिचे घराणे विद्वानांचे घराणे म्हणून प्रख्यात होते.  झेंगझाईच्या घराण्याचे नाव 'यान' असे होते.  यान घराणे शूलियांगच्या कोंग घराण्याप्रमाणेच दुस-या राज्यातून लू राज्यात आलेले होते.  त्यामुळे यान घराण्यातील लोकांनाही कोंग घरण्यातील लोकांप्रमाणे जगण्यासाठी संघर्ष करावा लागत होता.  याचा अर्थ लू राज्यात हे दोन्ही घराणे आर्थिक अडचणींचा सारखाच सामना करत होते.  कदाचित यान घराण्याची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट असल्या कारणामुळेच ही केवळ १५ वर्षांची मुलगी ७० वर्षांच्या म्हाता-याशी विवाह करण्यास तयार झाली असावी.  तसेच शूलियांगने तिच्या घरच्यांना यासाठी आर्थिक मदत केली असावी.  शूलियांगची तीसरी पत्नी म्हणून झेंगझाईचा प्रवेश कोंग घराण्यात झाला.  अशाप्रकारे जेंव्हा केवळ पुत्रप्राप्तीसाठी एखादया कुटुंबात उपपत्नी आणली जात असे तेंव्हा त्या माणसाच्या आधीच्या बायका तिच्याशी अत्यंत कठोर व्यवहार करत.  दुस-या शब्दात तिचा छळ करत.  शूलियांगच्या आधीच्या दोन्ही बायकाच नव्हे,तर त्यांच्या मुलीसुद्धा  झेंगझाईसोबत द्वेषपूर्ण आणि शत्रुत्वाने वागत होत्या.  शुष्क सैनिकी वातावरण असलेल्या शूलियांगच्या घरात झेंगझाईची कुचंबना होऊ लागली.  त्याच्या घरात वाचण्यासाठी ना पुस्तकं होती ना संगीतासाठी वातावरण वा उपकरणं होती.  सत्तर वर्षांच्या पतीसाठी तिची उपयुक्तता केवळ पुत्रप्राप्ती एवढीच होती.  अशा सर्व वातावरणात झेंगझाईला दिवसं गेले.  इसवी सन पूर्व ५७१ साली तिने एका पुत्राला जन्म दिला.  त्यामुळे शूलियांग अत्यंत प्रसन्न झाला.  अखेर त्याला त्याच्या घराण्याचा वारस मिळाला होता.  बालकाचे नाव 'क्यू' असे ठेवण्यात आले.  चिनी भाषेत क्यू चा अर्थ 'पवित्र पहाड' असा होतो.  'नी' नावाच्या पवित्र पर्वताकडे केलेल्या प्रार्थनेमुळे आपल्याला पुत्र प्राप्त झाला.  असे शूलियांगचे मत होते.  त्यामुळेच त्याने त्याचे नामकरण 'क्यू' म्हणजे पवित्र पहाड असे केले.  त्याच्या घराच्या कोंग हया नावाचा अर्थ प्रार्थनेचा प्रतिसाद अथवा उत्तर असे होते.  त्यामुळे मुलाचे संपूर्ण नाव 'कोंग क्यू 'असे झाले  ज्याचा अर्थ 'पवित्र पर्वतावर करण्यात आलेल्या प्रार्थनेच ‹फळ' असा होतो.  आपला वारस मिळाला म्हणून शूलियांगला अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने पुलकीत झाला असला, तरी हे बालक कुरूप असल्याने संपूर्ण कुटुंबात एक प्रकारची उदासी पसरली होती.  शूलियांगच्या नऊ मुली बालकाच्या कुरुपतेची थट्टा करत होत्या.  तसेच त्याच्या दोन्ही बायकांच्या मनात असुया उत्पन्न झाली.  कारण झेंगझाईचा पुत्र आता कोंगू घराण्याचा उत्तराधिकारी आणि प्रमुख बनणार होता.  त्यांच्या अपंग मुलाला कुटुंबाच्या संपत्तीत कोणताही अधिकार व हिस्सा मिळणार नव्हता  अशा कुविचारांनी झपाटलेल्या हया स्त्रियांनी  आपल्या नऊ मुलींच्या सहकार्याने झेंगझाई विरोधात षडयंत्र रचण्यास सुरवात केली.  तिला घरातूनच कायमचे हद्दपार करण्याचा कट त्यांनी र.चला  त्यांनी आपला पती शूलियांग याला झेंगझाई विरोधात भडकवण्यास आणि त्याचा गैरसमज करण्यास प्रारंभ केला.  अखेर तो मुर्ख म्हातारा त्यांच्या जाळयात अडकला आणि त्याने झेंगझोईला तिच्या पुत्रासह कोंग परिवाराला सोडून जाण्यास विवश केले.  झेंगझोई मुलाला घेऊन आपल्या माहेरी निघून गेली आणि तिने कोंग परिवाराशी सर्व संबंध तोडून टाकले.  आपल्या बायकांच्या द्वेषपूर्ण कटाला बळ पडलेला शूलियांग एका चिरंतन सन्मानाचा धनी होता होता राहिला.  आयुष्यात अभागी ठरलेला हा माणूस मेला तरी अभागीच राहिला.  त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा जगाच्या इतिहासात अजरामर होणार होता.  तो जगाच्या क्षितीजावर आपल्या तत्त्वज्ञानाने एक सूर्य म्हणून तळपणार होता.  त्याला ' कन्फ्यूशियस' म्हणून जगात चिरंतन ओळखले जाणार होते.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,             भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                                                        

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !