कॅलिफोर्निया गोल्ड रश

कॅलिफोर्नियात एक हजार लोकसंख्या असलेले एक छोटेसे गाव होते.  गावाजवळ दोनशे लोकसंख्या असलेली एक वाडी होती. अमेरिकन-मेक्सिकन युद्धाचा निकाल लागलेला होता.  दोन्ही देशांमध्ये झालेल्या तहानुसार कॅलिफोर्निया आता अमेरिकेचा भाग होता.  त्यामुळे हे छोटेसे गाव देखील आता अमेरिकेत होते.  असे असले तरी हया सर्व घडामोडींचा परिणाम व्हावा असे काही हया गावात आणि त्याच्या लागून असलेल्या अवघ्या २०० लोकसंखेच्या वाडीत असण्याचे कारण नव्हते.  गावाप्रमाणेच वाडीवरचे जनजीवन नेहमीप्रमाणेच चालू होते.  २४ जानेवारी १९४८ रोजी मात्र हया वाडीत असं काही घडले की त्यामुळे हया वाडीतच नाही, तर अवघ्या अमेरिकेत खळबळ उडाली.  सारा अमेरिका या वाडीकडे धावू लागला.  २४ जानेवारीचा दिवस हया वाडीत नेहमीप्रमाणेच उगवला होता.  वाडीत जॉन सुत्तर यांची एक लाकडाची वखार होती.  त्यांच्या हया सॉमिल मध्ये फोरमन म्हणून काम करणारा जेम्स डब्ल्यू मार्शल,आपले  काम संपवून घराकडे चालला होता.  त्याच्या सॉमिलला लागून एक पवनचक्की होती.  पवनचक्की जवळून पुढे जातांना त्याला पायवाटेच्या कडेला काही तरी चमकणारी वस्तू दिसली.  कुतुहलाने तो त्या वस्तूजवळ पोहचला.  त्याच्या लक्षात आले की हा एक दगड दिसतो.  चमकणारा दगड म्हंटल्यावर क्षणार्धात जेम्सच्या मनात भीती-कुतुहल-आश्चर्य असे अनेक संमिश्र भाव उमटले.  त्याने अखेर हा दगड उचलण्याचा निर्णय घेतला.  चमकणारा दगड म्हणजे सोनं आहे का ? असा संशय त्याला आला.  आयुष्यभर ज्याने गुंजभर सोनं कधी मन भरून पाहिलं नसलेल्या एका साध्या कामगाराला सोन्याची पारख करणे अशक्यच.  हा काही तरी वेगळा प्रकार आहे,हे मात्र त्याला पक्के समजले.  तो घरी जायचे सोडून सापडलेला दगड हातात घेऊन परत सॉमिलकडे धावत सुटला.  सॉमिलचा मालक जॉन सुत्तर तेंव्हा सॉमिलमध्येच कामगारांवर देखरेख करत फिरत होता.  जेम्स धापा टाकत त्याच्या जवळ पोहचला आणि त्याला आपल्या हातातील दगड दाखवू लागला.  त्याने एका दमात घडलेली गोष्ट मालकाला सांगितली.  जॉन सुत्तर देखील आश्चर्याने तो दगड हातात घेऊन बघू लागला.  जॉन श्रीमंत माणूस असल्याने हा दगड म्हणजे सोनंच आहे.  याबद्दल त्याला खात्री झाली.  असे असले तरी त्याचे परिक्षण करूनच निष्कर्षापर्यंत पोहचावे असे त्याने ठरवले.  तोपर्यंत जॉनने हयाबद्दल कोणालाच सांगू नको असे जेम्सला बजावले.  गावाला लागून असलेल्या वाडीत घडलेली दुसरी कोणती घटना चर्चेचा अथवा बातमीचा विषय होण्याची शक्यताच नव्हती.  मात्र जेम्स डब्ल्यू मार्शल नावाच्या कामगाराला सापडलेल्या दगडाने वाडीला त्या भागातील स्थानिक वृत्तपत्रात झळकावले.  वाडीत एखादा विद्वान किंवा संशोधक जन्माला आला असता तरी त्याला लवकर प्रसिद्धी मिळाली नसती.  वाडीत सापडलेला दगड मात्र लगेच स्थानिक वृत्तपत्रात चमकला.  जॉन सुत्तरने करŠन घेतलेल्या परिक्षणात तो दगड सोन्याचा होता,हे सिद्ध झाले.  दगडाची सत्यता समजल्यावर हे रहस्य असेच ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला.  त्याचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.  कारण स्थानिक वृत्तपत्राचा मालक एका अफवेची बातमी देऊन शांत बसला नाही, तर त्याने तेथे सापडणारे सोनं विकण्यासाठी एक दुकान देखील थाटले.   ज्या एक हजार वस्तीच्या गावाजवळील छोटयशा वाडीत ही घटना घडली होती,ते गाव म्हणजे अमेरिकेतील आणि जगातील प्रसिद्ध महानगर सॅन फ्रान्सिस्को.  त्याच्या जवळील वाडीत सोनं सापडल्याच्या वृत्ताला कॅलिफोर्नियातील एका मोठया वृत्तपत्राने १९ ऑगस्ट १८४८ रोजी प्रसिद्धी दिली.  त्यामुळे ही बातमी अमेरिकेतच नव्हे तर सा-या जगात वणव्यासारखी पसरली.  सॅन फ्रान्सिस्को जवळ असलेल्या प्रचंड मोठ्या सोन्याच्या खजिन्याचा नेमका पत्ताच आता जगाला मिळाला होता.  अमेरिकेतील सारे रस्ते सॅन फ्रान्सिस्कोला जाऊन थांबू लागले.  उभ्या अमेरिकेतून लोकांची अलोट गर्दी सॅन फ्रान्सिस्कोच्या दिशेने वाहू लागली.  सगळया रस्त्यांवरून घोडे आणि घोडागाडया सॅन फ्रान्सिस्कोकडे धावू लागल्या.  अनेक जण जलमार्गाने तेथे पोहचत होते.  सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात रेटारेटी करून आपल्या जहाजांसाठी जागा करण्याचा प्रयत्न केला जात होता.  काही दिवसातच एक हजार लोकसंख्या असलेले हया गावाची लोकसंख्या २५००० झाली.  एक छोटे गाव काही महिन्यात शहरात परावर्तित होण्याचे कदाचित हे एकमेव उदाहरण असू शकेल.  सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अमर्याद सोन्याचा साठा सापडला होता.  तेथे येणा-या प्रत्येकाला आपल्या परीने हे सोने लूटायचे होते.  यासाठीच आपल्या गावाचे सिमोल्लंघन करून तो सॅन फ्रान्सिस्कोच्या सीमेत पोहचला होता.  मुळात एक हजार लोकसंख्या असलेल्या गावात राहण्यासाठी घरं तरी किती असणार. अखेर सोनं लुटण्यासाठी आलेल्या आगंतुक पाहुण्यांनी तंबू ठोकून अथवा लाकडी फळयांची घर तयार करून तात्पुरत्या स्वरूपात स्वतःच्या राहण्याची सोय केली.  सोनं लुटायला आलेल्यांची सोन्याची भूक जरी क्षमत असली तरी पोटाच्या भूकेचा प्रश्न मोठा झाला.  अचानक वाढलेल्या लोकसंख्येमुळे निवा-याची समस्या जशी निर्माण झाली. तशीच जीवनावश्यक गोष्टींची टंचाई निर्माण झाली.  या परस्थितीचा लाभ काही गरीब लोकांनी वेगळया पद्धतीने करून घेतला.  त्यांनी सोन्यासाठी त्यांच्या भागात आलेल्या पाहुण्यांना अन्न-धान्य आणि इतर जीवनावश्यक गोष्टींची विक्री करण्यास सुरवात केली.  पिठाच्या मोबदल्यात सोनं दिले जात होते.  सॅन फ्रान्सिस्को परिसरात त्यावेळी सोनं आणि पिठ यांचे मूल्यं सारखे झाले.  यावरुन सोन्यासारखा जगातील सर्वात मौल्यवान धातू अन्नासमोर कःपदार्थ ठरतो.  हेच सिद्ध होते.  यामुळेच शेतक-याला जगाचा पोशिंदा वा अन्नदाता मानले जाते.  तो आपल्या घामाचे व रक्ताचे सिंचन करŠन जे पिकवतो,त्याच्यापेक्षा जगातील कोणतीच गोष्ट श्रेष्ठ असूच शकत नाही.  शेतीत पिकलेल्या सोन्यानं जग आबादानी होते, तर खाणीत सापडलेल्या सोन्यानं केवळ बरबादी.  हे लवकरच कॅलिफोर्नियावासीयांच्या लक्षात आले.  सोनं सापडल्यानंतर सुरवातीचे दोन वर्षे खाणीतील सोनं मिळवणं प्रत्येकासाठी सहज-सुलभ होते.  नंतर याच पिवळया धमक सोन्यानं कॅलिफोर्नियाची भूमी लालभडक करण्यास सुरवात केली.  सोन्यासाठी आलेले उपरे आणि स्थानिक लोक यांच्यात आता सोन्यासाठी संघर्ष सुरु झाला.  हया उप-यांनी १६ हजारांपेक्षा अधिक स्थानिक लोकांची सोन्यासाठी हत्या केली.  सॅन फ्रान्सिस्कोजवळ सापडलेल्या सोन्याचा लाभ सर्वप्रथम सॅम्युअल ब्रॅनन याने उठवला.  हा तोच पत्रकार होता. ज्याने आपल्या 'कॅलिफोर्निया स्टार' या वृत्तपत्रात सोनं सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध केलं होतं.  त्याने सोन्यामुळे बदलणा-या काळाची पाऊलं ओळखली.  सॅन फ्रान्सिस्को जवळील सॅक्रामेंटो येथील सटरच्या किल्ल्यावर जे दुकान थाटले.  तेथून तो सोन्याची खरेदी-विक्री तर करूच लागला होता.  मात्र त्यासोबत त्याने  सोनं काढण्यासाठी फावडे,कुदळ,घमेले इत्यादींची मोठया प्रमाणात गरज पडेल हे ओळखले आणि संपूर्ण कॅलिफोर्नियातून या वस्तूंची मोठया प्रमाणात खरेदी केली,  त्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोच्या रस्त्यांवर त्याने 'गोल्ड ! अमेरिकन नदीवर सोने !' अशी जाहिरात सुरु केली. सोनं काढण्यासाठी फावडे,कुदळ,घमेले इत्यादींची गरज पडेल याचे भान डोक्यात-डोळ्यात सोने उतरलेल्या बहुतेकांना राहिले नव्हते. अशा परिस्थितीत सॅन फ्रान्सिस्कोच्या सोन्याच्या शेतामध्ये खोदण्यासाठी आवश्यक अवजारे उपलब्ध असणारे एकमेव दुकान ब्रॅननचेच होते.  तसेच ही अवजारे आता इतर कोठेही उपलब्ध नव्हती.  त्याने सुरवातीला एक घमेले २० सेंटला विकले.  त्यानंतर त्याची मागणी वाढत गेली  आणि उपलब्धता अत्यंत कमी झाली.  याचा लाभ उठवत ब्रॅनने तेच घमेले २० डॉलर्सला विकण्यास सुरवात केली.  अवघ्या नऊ आठवडयात केवळ घमेल्यांच्या विक्रीतून त्याने त्यावेळचे ३६००० डॉलर्स कमावले.  सॅन फ्रान्सिस्कोच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मालाचा पुरवठा करणारी जी जहाजे तेथील बंदरात आली.  सोन्याचा मोहाने या जहाजांच्या कर्मचारी वर्गाला (क्रू) देखील भूरळ घातली.  हे लोक जहाज सोडून सोन्याच्या शेतांकडे पळून गेले.  तेंव्हा काही लोकांनी त्या जहाजांचा उपयोग गोदामे,स्टोअर्स,टेव्हर्न,हॉटेल्स इत्यादी स्वरूपात करण्यास सुरवात केली.  एवढेच नाही तर अशाच एका जहाजाचा वापर स्थानिक प्रशासनाने तुरुंग म्हणून केला. सॅन फ्रान्सिस्कोच्या परिसरात सापडलेल्या सोन्याने त्याचा,कॅलिफोर्नियाचा,अमेरिकेचा आणि जगाचा इतिहास बदलवला.  जेम्स डब्ल्यू मार्शल हया कामगाराला सोन्याचा एक दगड सापडणे आणि त्यानंतर सोन्यामुळे हया प्रदेशात झालेले महाभारत हा सर्व इतिहास अनेक रोचक घटना-प्रसंगांनी ठासून भरलेला आहे.  हा सर्व काळ इतिहासात 'कॅलिफोर्निया गोल्ड रश' म्हणून ओळखला जातो.  कॅलिफोर्नियात बहरलेल्या हॉलिवूडला हया गोल्ड रशच्या इतिहासातील अनेक घटना-प्रसंग-व्यक्ती यांच्यावर आधारित चित्रपटांद्वारे बॉक्स ऑफिसवर सोनं लुटता आले आहे. सोन्यामुळे एक हजार लोकवस्ती असणारे सॅन फ्रान्सिस्को आज लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील १७ व्या क्रमांकाचे महानगर बनले आहे. अशा सॅन फ्रान्सिस्कोचे वर्णन ख-या अर्थाने 'सिटी ऑफ गोल्ड' असे करता येते.  
  प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
     
 

Comments

  1. खुपच रंजक लिखाण आणि माहिती.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !