शब्दातीत 'ताओ'

चीनच्या सीमानाक्यावर लाओत्सेने ८१ अध्यायांची लिहिलेली चोपडी आज 'ताओ ते चिंग' ग्रंथ म्हणून जगात प्रसिद्ध आहे'  हया छोटयाशा चोपडीला आज जगात महान व गंभीर धर्मग्रंथाचा दर्जा दिला जातो'  धम्मपद,भगवद्गीता,वेद,उपनिषद,अवेस्ता,बायबल,कुराण,गुरु ग्रंथ साहिब आदि धर्मग्रंथांच्या कोटीतील 'ताओ ते चिंग' ग्रंथ मानला जातो.  अनेक अभ्यासकांच्या मते भारतीय मातीतील 'धम्मपद' आणि 'उपनिषदं' यांच्याशी 'ताओ ते चिंग' ग्रंथाचे अनुबंध अत्यंत ठळकपणे जाणवतात.  वेदांमधील ऋचांप्रमाणे लाओत्सेची सूत्रे आशयपूर्ण आहेत.  असे मत काही अभ्यासकांनी नोंदवले आहे.  आज लाओत्से प्रणित तत्त्वज्ञानाला 'ताओ धर्म' संबोधण्याचा प्रघात पडलेला दिसून येतो.  असे असले तरी भगवान बुद्धांप्रमाणे लाओत्सेचे तत्त्वज्ञान धर्माच्या पारंपरिक चौकटीत बसवता येत नाही.  बुद्ध आणि लाओत्से यांनी जगाला कोणताही धर्म दिला नाही. तर जीवन जगण्याची दृष्टी व शैली दिली.  असे म्हणणे अधिक योग्य ठरते.  हया दोघांच्या तत्त्वज्ञानाला धर्मरूपी आचारधर्माच्या व कर्मकांडांच्या तटबंदीत बद्ध करणे म्हणजे त्यांच्या अखिल विश्वाला कवेत घेऊ पाहणा-या विशाल जीवनदृष्टीला मर्यादा घालण्यासारखे आहे.  माणसाला माणूस बनवून त्याला अखिल विश्वाकडे माणूस म्हणून पाहण्याची सम्यक दृष्टी प्राप्त करून देणारा मार्ग म्हणजे बुद्ध आणि लाओत्से. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.  हयासाठी बुद्धांच्या धर्माची किंवा लाओत्सेच्या धर्माची दिक्षा घेण्याची देखील आवश्यकता नाही.  ज्याला प्राप्त झालेले जीवन खरोखर माणूस म्हणून जगण्याची ईच्छा आहे.  असा कोणताही माणूस मग तो कोणत्याही धर्माचा किंवा पंथाचा असो तो बुद्ध व लाओत्सेच्या मार्गावर सहजपणे चालू शकतो.  कारण त्यासाठी त्याला कोणतेही बाहय अवडंबर करण्याची आवश्यकता नाही.  कोणत्या ही उपासना पद्धतीवरून,उपासना स्थळावरून,प्रतिमांवरून आणि प्रतिकांवरून इतरांचा द्वेष करण्याचा ज्याने सोडले असा कोणताही माणूस बुद्ध व लाओत्से यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यास समर्थ असतो.  हया मार्गावर चालल्याने तुला अमुक-तमुक गोष्टींची प्राप्ती होईल.  असा दावा ना बुद्धांनी केला ना लाओत्सेनी केला.  आम्ही या मार्गावर चाललो आणि आम्हाला जे प्राप्त झाले ते शब्दात व्यक्त करता येत नाही.  म्हणजेच ते शब्दातीत आहे.  तुला ते जाणून घेण्याची ईच्छा असेल, तर तू देखील या मार्गावर चालू शकतो.  ऐवढेच बुद्धांनी आणि लाओत्सेने सांगितले.  हया दोघांनी धर्मसंकल्पनेला दिलेला हा सर्वात मोठा छेद म्हणता येतो.  आज प्रत्येक धर्माने सामान्य माणसाला कर्मकांडांच्या भुलभलैयात गुंतवून कर्मकांड म्हणजेच धर्म असे शिकवलेले आहे.  त्यामुळे स्वतःला एखादया धर्माचा पाईक मानून दुस-या धर्मातील उपासना पद्धतीवरून,उपासना स्थळावरून,प्रतिमांवरून आणि प्रतिकांवरून एकमेकांशी लढणारे धर्मयोद्धे प्रत्येक धर्मात पाहायला मिळतात.  एवढेच नाही तर जगातील प्रत्येक धर्मात 'ईश्वर' एकच आहे.  ही संकल्पना मान्य करण्यात आली आहे.  त्या-त्या धर्माच्या धर्मसंस्थापकांनी आपल्या संकल्पनेनुसार आणि भाषेनुसार ईश्वराचे नामकरण केले.  असे असतांनाही इतर धर्मात ईश्वराला ज्या नावाने संबोधले आहे.  त्यावरून गलिच्छ भाषा वापरणा-या प्रत्येकाचा राग येण्याऐवजी कीव करणे योग्य वाटते.  कारण खरा धर्म आणि ईश्वर या संकल्पनाच हया सगळया भरकटवल्या गेलेल्या लोकांना माहित नसतात.  बुद्धाप्रमाणे लाओत्सेचे तत्त्वज्ञान समजण्यासाठी शब्दातीत आत्मसंवाद हा प्रधान निकष आहे.  लाओत्सला आपल्या तत्त्वज्ञानाला सुद्धा शब्दबद्ध करण्याची आवश्यकता वाटत नव्हती.  अखेर त्याने चिनी भाषेतील एक अत्यंत प्राचीन व सारगर्भित असा शब्द 'ताओ' आपल्या तत्त्वज्ञानासाठी वापरला.  ताओ शब्दाचा मुळ आणि मुख्य अर्थ म्हणजे 'मार्ग'.  लाओत्सेने हा शब्द परमसत्ता अथवा परमतत्त्व या अर्थाने वापरला आहे.  हे परमतत्त्व अव्यक्त आणि निराकार म्हणजे र्निगुण-निराकार आहे.  मानवी जगातील कोणत्याच भाषेतील कोणत्याच शब्दाने त्याचे वर्णन वा निरूपण करता येत नाही.  बौद्ध दर्शनातील 'शून्य' आणि वेदान्त दर्शनातील 'ब्रहम' या शब्दाप्रमाणेच लाओत्सेचा 'ताओ' शब्द आहे.  तसेच 'ताओ ते चिंग' ग्रंथनामातील 'ते' हा शब्द चिनी भाषेत 'तेह' असा उच्चारला जातो.  तेह शब्दाचा अर्थ गुण अथवा शक्ती असा होतो.  लाओत्सेच्या प्रतिपादनानुसार तेह म्हणजे गुणांचा प्रादुर्भाव ताओ पासूनच होतो.  अधिक सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ब्रहम म्हणजे ताओ आणि त्याचा इंद्रियगोचर(इंद्रियांना जाणवणारा) आविष्कार म्हणजे तेह.  ताओ म्हणजे सर्वोच्च अथवा सार्वभौम सत्ता असे लाओत्सेला अभिप्रेत होते.  यासाठी त्याच्या ग्रंथातील २५ व्या अध्ययातील पहिल्या वचनाचा अनुवाद पाहणे आवश्यक आहे.  लाओत्से म्हणतो," एक वस्तू जन्मजात आणि स्वाभाविक आहे.  जी स्वर्ग आणि मृत्यू लोकाच्या आधीपासून अस्तित्वात आहे.  ती स्थिर आणि अगम्य आहे.  ती एकमात्र आणि अपरिवर्तनीय तशीच चराचरात व्यापलेली अक्षय अशी आहे.  ही हया ब्रम्हांडाची माता आहे.  मला तिचे नाव माहित नाही.  मात्र मला ते सांगण्यास भाग पाडले तर मी तिला 'ताओ' या नावाने आवाज देईल."  लाओत्सेचे हे वचन ऋग्वेदातील नासदीय सूक्ताशी मिळतेजुळते असे आहे.  नासदीय सूक्तात परमसत्तेच्या संदर्भात करण्यात आलेल्या विवेचनानुसार सृष्टी अथवा ब्रम्हांडाच्या निर्मितीविषयी व्यक्त करण्यात आलेली गूढता अथवा रहस्यमयता आपल्याला येथे जाणवते.  नासदीय सूक्तात वर्णन केल्याप्रमाणे," सृष्टीच्या पूर्वी सत् अथवा असत् नव्हते.  अंतरिक्ष आणि आकाश ही नव्हते. अगम्य आणि ज्याचा तळ शोधता येत नाही असे जल ही नव्हते. त्यावेळी मृत्यू नव्हता तशीच अमरता देखील नव्हती.  दिवस-रात्र नव्हते हवा आणि श्वास ही नव्हते.  त्यावेळी वर्तमान म्हणून अंधःकारच कायम अस्तित्वात होता.  परमतत्त्वाहून वेगळे असे काहीच नव्हते."  ऋग्वेदातील याच ऋचेचा वापर (हिंदी अनुवाद) पं जवाहरलाल नेहरु यांच्या 'डिसकव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथावर आधारित 'भारत एक खोज' या मालिकेचे शीर्षक गीत म्हणून करण्यात आला होता.  लाओत्से ताओबद्दल सांगताना पुढे म्हणतो की," ज्याने ताओ अभिव्यक्त होऊ शकतो. असे कोणतेही नेमके आणि शाश्वत नाम जगात नाही.  जर कोणी त्याला एखाद्या नामात परिभाषित करण्याचा प्रयत्न केला, तर तो अपरिवर्तनीय ताओ असूच शकत नाही.  ज्याचे अस्तित्व सिद्ध करता येईल असा ताओ नाही.  कारण तो स्वर्ग आणि मर्त्य लोकाच्या निर्मितीपूर्वीपासूनचा अनादी-अनंत असा आहे.  हया सृष्टीतील प्रत्येक घटकाची जननी म्हणजे ताओ.  अशा अनादी-अनस्तित्व असलेल्या ताओचे शाश्वत अस्तित्व आपण सृष्टीतील विविध घटकांमध्ये पाहू शकतो.  खरे तर ताओ आणि त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांच्यात भेदच असू शकत नाही.  हा भेद आपण करतो.  विश्वातील सर्व घटकांचा प्रारंभ म्हणजे ताओ."  एका अर्थाने लाओत्सेची  ताओ संकल्पना अद्वैतवादापासून ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादापर्यंत पोहचलेली दिसते.  'ताओ ते चिंग' ग्रंथाच्या २० व्या अध्यायात लाओत्सेने स्वतःची तुलना सांसारिक सुखं उपभोगात रमलेल्या सामान्य माणसाशी केली आहे.  असे असले तरी तो कायम त्याग वृत्तीनेच जगात वावरला.  आपल्या मातेने स्तनपान करून पाजलेल्या दूधालाच त्याने जीवनातील सर्वात मोठे सुख मानले.  यामागे ताओ म्हणजे जगातील सर्व सजिवांची माता आणि ज्या मातेमुळे आपण ताओने निर्माण केलेल्या जगात आलो.  तिचे दूध आपल्याला मिळाले. त्यामुळे आपला आणि ताओचा म्हणजेच त्या परमसत्तेचा संबंध अधोरेखित झाला. अशी लाओत्सेची भूमिका आहे.  अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास या जगात येऊन आपल्या मातेचे दूध मिळणे यापुढे जगातील कोणतेही सुख म्हणजे कःपदार्थ आहे.  त्यामुळे मातेच्या माध्यमातून मिळालेला हा अमूल्य व पवित्र जन्म पैसा,पद,पुरस्कार,प्रतिष्ठा असल्या क्षणभंगूर गोष्टींपायी भ्रष्ट करण्यासारखा मूर्खपणा कोणताही नाही.   असेच लाओत्से सांगत आहे.  यावरच न थांबता लाओत्से म्हणतो," मातेच्या दूधामुळे माझा ताओशी असलेला संबंध मला स्पष्ट झाला.  त्यामुळे मी माझ्यासाठी आवश्यक शारीरिक आणि आध्यात्मिक उर्जा थेट ताओकडून म्हणजेच त्या जगत नियंत्या शक्तीकडूनच प्राप्त करत आलो आहे."  आपल्या मातेच्या दूधाविषयी असली कृतज्ञता आणि त्यातच संपूर्ण जीवनाची संतुष्टता शोधलेला लाओत्से कोणालाही विराळाच वाटावा असा आहे.  त्यामुळेच लाओत्सेला आपल्याला जे जाणवले वा उमगले ते शब्दात सांगणे नकासे झाले होते.  त्याने अवघ्या पाच हजार शब्दात ते मांडले असले तरी ते समजण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी कोणत्याही समृद्ध समजल्या जाणा-या भाषेची शब्दसंपदा कमी पडते.  जणू काही ताओप्रमाणेच लाओत्से देखील शब्दात आकळता येऊ शकत नाही.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,             भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                                                         



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !