अखेर नदीचे पाणी पेटले..

नदयांनी माणसाला माणूस केल्यामुळे जगातील प्रत्येक नदी काठ हा कायम तिच्या काठी वसलेल्या मानवी समूहांच्या अस्मितेचा प्रश्न ठरला आहे.  ख-या अर्थाने नदया म्हणजे संस्कृती आणि तिच्यात सामावलेल्या उपसंस्कृतींच्या अलिखित सीमा रेषाच म्हणता येतात.  भूगोलाच्या भाषेत एखादी मुख्य नदी आणि तिच्या उपनदया यांना मिळून एक खोरे संबोधले जाते.  हया मुख्य नदीच्या काठावर वसलेल्या व फुललेल्या सामाजिक जीवनाच्या अलिखित नियमांना त्या नदीची संस्कृती म्हणून ओळखले जाते.  तिच्या उपनदयांच्या काठावर या मुख्य संस्कृतीच्या उपशाखा विस्तारलेल्या असतात.  त्यामुळेच प्राचीन काळापासून या नदयांना जगाच्या राजकीय नकाक्षात अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झालेले दिसते.  राज्यांची सीमा नदयांवरून करण्याचा अट्टाहास मानव करत आलेला आहे.  यामागे त्याच्या जन्मापूर्वीपासून आणि जन्मानंतर ही सोबत करणा-या नदीरूपी नैसर्गिक जलस्त्रोताबद्दल त्याची असलेली एक विलक्षण ओढ,तीव्र आणि गूढ आसक्ती.  नदीच्या पाण्यावर उमटलेल्या त्याच्या पूर्वजांच्या आणि त्याच्या जीवनाच्या प्रतिमा  त्यामुळे जणू काही त्या नदीचे पाणीच त्याला आणि त्याच्या पूर्वजांना रक्ताच्या नात्यत बांधून ठेवते.  कदाचित तिचे पाणीच त्याच्यात पूर्वजांचे रक्त म्हणून वाहत असते.  पोटापाण्यासाठी गावापासून तुटलेला माणूस गावी येता तेंव्हा काहीही कारण काढून अथवा विनाकारण त्याच्या नदीला डोळे भरून पाहिल्याशिवाय राहत नाही.  अमेरिका व मेक्सिको यांच्यातील निर्णायक संघर्षात रिओ ग्रँड आणि न्यूएसस हया नदया केंद्रस्थानी होत्या.  अमेरिकेला जो टेक्सास प्रांत हवा होता आणि ज्या टेक्सासवासीयांना अमेरिकेत विसर्जित होण्याची तीव्र ईच्छा होती.  तसेच मेक्सिकोला आपला भाग असलेल्या टेक्सासचे स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मान्य असले, तरी अमेरिकेत विलिन होणे कदापि मान्य नव्हते.  त्यामुळे टेक्सासचा भूभाग म्हणजे रिओ ग्रँड नदीपर्यंतचा प्रदेश की न्यूएसस नदीपर्यंतचा प्रदेश मान्य करायचा यासाठी  अमेरिका व मेस्किको आमने-सामने उभे ठाकले.  अखेर या नदयांचे पाणी पेटवूनच दोघांना ही आपली सत्तेची तृष्णा भागवायची होती.  टेक्सासवासीयांच्या मते टेक्सास प्रांताची सीमा रिओ ग्रँड नदीपर्यंत होती, तर मेक्सिकोच्या दाव्यानुसार टेक्सासची हद्द न्यूएसस नदीपर्यंत होती.  १८३६ मध्ये मेक्सिकोपासून विलग होण्यासाठी टेक्सासवासीयांनी उठाव केला.  कारण टेक्सास आता नावालाच मेक्सिकन राज्य राहिले होते.  मेक्सिकोच्या टेक्सासमध्ये अमेरिकन लोकांनी प्रचंड घुसखोरी करून मुळच्या मेक्सिन्सला तेथे अल्पसंख्याक करून टाकले असल्यामुळे मेक्सिेकन सरकारला अखेर त्यांच्याशी तह करावा लागला.  मेक्सिकन जनरल व राष्ट्रपती ॲटोनियो लोपेझ डी सांता अण्णा आणि रिपब्लिक ऑफ टेक्सास यांच्यात १४ मे १८३६ रोजी टेक्सासच्या 'वेलास्को' शहरात तहनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली.  हा तह अमेरिकेत 'वेलास्को तह' म्हणून ओळखला जातो.  आज वेलास्को शहर 'सफर्साइड बीच' या नावाने ओळखले जाते.  राष्ट्रपती ॲटोनियो लोपेझ डी सांता अण्णा यांना टेक्सासच्या विद्रोही सैन्याने बंदी केल्यामुळे त्यांना हा तह मान्य करावा लागला.  त्यानुसार मेक्सिकोने टेक्सासला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली.  तसेच रिओ ग्रँड नदीपर्यंत टेक्सासची हद्द मान्य केली.  खरे तर मेक्सिकोला हे मान्य नव्हते. कारण त्याच्या मते न्यूएसस नदीपर्यंतच टेक्सासची हद्द होती.  राष्ट्रपती ॲटोनियो लोपेझ डी सांता अण्णा यांनी हा करार मान्य करण्याचे आणखी एक कारण होते ते म्हणजे त्यांना पकडल्यानंतर टेक्सासमधील अनेकांना त्यांना फासावर लटकवावे असे वाटत होते; परंतु अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ॲड्रयू जॅक्सन यांचे विश्वासू सहकारी व टेक्सासमधील प्रतिनिधी सॅम हयूस्टन यांनी त्यांचे प्राण वाचवले.  बदल्यात त्यांच्याकडून टेक्सासमधून मेक्सिकन सैन्य हटवणे आणि टेक्सासच्या स्वातंत्र्यासाठी मेस्किन संसदेत युक्तिवाद करण्याचे वचन घेतले.  त्यामुळे त्यांना मेक्सिकोची राजधानी मेक्सिकन सिटीला परत जाण्याची परवानगी मिळाली.  यावेळी एक गुप्त आणि एक सार्वजनिक अशा दोन करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.  या करारामुळे राष्ट्रपती ॲटोनियो लोपेझ डी सांता अण्णा यांचे प्राण वाचले. मात्र मेक्सिकन जनता त्यांनी केलेल्या निदंनीय कृतीमुळे त्यांच्या विरोधात गेली.  अखेर त्यांना पदत्याग करावा लागला.  त्यांनी नंतर मान्य केली की त्यांनी संकटसमयी दिलेले वचन मान्य करणे मेक्सिकन सरकारला बंधनकारक नव्हते.  असे असले तरी मेक्सिकन काँग्रेसने सांता अण्णांची कृती निदंनीय मानली आणि दोन्ही करार रद्द केले.  टेक्सास आता 'रिपब्लिक ऑफ टेक्सास' म्हणून स्वतंत्र देश झाला होता.  असे असले तरी टेक्सासवासीयांना स्वतंत्र देश म्हणून न राहता स्वतःला संयुक्त राज्य अमेरिकत समाविष्ट करून घेण्याची घाई झाली होती.  अमेरिकेची देखील हीच ईच्छा असली तरी आर्थिक संकटामुळे जवळपास ९ वर्षे त्याने हया प्रकरणात फारसे लक्ष घातले नाही.  दरम्यान १८४२ साली अमेरिकेचे मेक्सिकोमधील प्रतिनिधी वॅडी थॉमसन यांनी अमेरिकन सरकारला अहवाल सादर केला.  त्यानुसार अमेरिकेच्या कर्जाच्या बोजाखाली असाणारा मॅक्सिको टेक्सासच्या ऐवजी त्याचा कॅलिफोर्निया हा भाग कर्ज माफीच्या बदल्यात अमेरिकेला देऊ शकतो.  कॅलिफोर्नियाचा सौदा टेक्सासच्या तुलनेत किती तरी पट लाभदायक आहे.  अत्यंत सुपीक जमीन,सधन नैसर्गिक संपत्ती आणि हवामान यांचा अतिशय सुरेख मेळ म्हणजे कॅलिफोर्निया.  उत्तर कॅलिफोर्नियावर ताबा मिळाल्यास प्रशांत महासागराच्या किना-यावरील कॅलिफोर्नियावर हक्क प्रस्थापित करता येऊ शकेल.  फ्रांस आणि इंग्लंड यांचा देखील कॅलिफोर्नियावर डोळा होता.  वॅडी थॉमसन यांनी आपल्या अहवालात नोंदवलेले निरिक्षण आणि तथ्य अत्यंत महत्वाचे होते.  हे आज आपल्याला अमेरिकेचे भूषण ठरलेल्या कॅलिफोर्नियावरून लक्षात येते.  १८२१ साली स्पॅनिश राजवाटीतून मुक्त झालेला मेक्सिको अद्यापही स्थिरस्थावर होऊ शकला नव्हता.  त्याची लष्करी क्षमता अधिकाधिक क्षीण होत गेली होती.  १८४५ च्या सुमारास अमेरिकेची बिघडलेली आथिक परिस्थिती आता सुधारात होती.  तसेच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स के पोलाक टेक्सासला संयुक्त राज्य अमेरिकेत समाविष्ट करण्यासाठी आग्रही होते.  त्यांनी रिओ ग्रँड नदीपर्यंत टेक्सासची हद्द मानावी याचाही आग्रह धरला होता.  जो यापूर्वीच मेक्सिकन काँग्रेसने फेटाळला होता.  पोलाक यांच्या धोरणामुळे अमेरिका आणि मेक्सिको यांच्यात वादाची ठिणगी पडली होती.  असे असले तरी टेक्सासला अमेरिकेत विलिन करून घेण्यास अमेरिकन काँग्रेसच्या अनेक सद्स्यांचा विरोध होता.  पोलाक यांनी उत्तर अमेरिकेच्या प्रश्नांना प्राधान्या दयावे आणि दक्षिण अमेरिकेत जरूरी नसलेले युद्ध उकरून काढून अमेरिकन सरकारच्या पैसाचा अपव्यय करू नये.  असे त्यांचे मत होते.  नियतीला मात्र अमेरिका-मेक्सिको युद्धच मान्य होते.  १९४५ साली टेक्सासने स्वतःला अमेरिकेत विलिन करून करण्याची घोषणा केली.  हे मेक्सिकोला खूपच झोंबले.  डोक्यात राख घालून ताकद नसतांना एखादे आव्हान स्वीकारणे केवढे महागात पडू शकते.  याची प्रचीती पुढे मेक्सिकोला आली.  १८४६ साली त्याने अमेरिकेशी युद्ध छेडले  १८४८ पर्यंत हे युद्ध लांबले.  यामधील एप्रिल १८४६ ते सप्टेंबर १८४७ काळात झालेल्या लढाया महत्वाच्या ठरल्या. हे युद्ध प्रामुख्याने उत्तर पूर्व आणि मध्य मेक्सिकोच्या भूमीवर लढले गेले.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स के पोलाक यांनी १८४५ साली टेक्सासला संयुक्त राज्य अमेरिकेचे एक राज्य म्हणून मान्यता दिली.  त्याबरोबरच लढाईची ठिणगी पडली.  जेम्स के पोलाक यांनी रिओ ग्रँड नदीपर्यंत टेक्सास,अल्टा कॅलिफोर्निया आणि सांता फे न्वेवो मेक्सिको यांच्या बदल्यात ३० मिलियन डॉलर्स देण्याची तयारी दाखवली होती.  मेक्सिकोने हा सौदा नाकारला  अखेर युद्धात अमेरिकन सैन्यासमोर मेक्सिकोला मान टाकावी लागली.  २ ऑक्टोबर १९४८ रोजी ग्वाडालूपे हिल्दागे येथे झालेल्या तहानुसार कॅलिफोर्निया आणि न्यू मेक्सिको अमेरिकेची संघराज्य बनली व त्याबदल्यात अमेरिकेने मेक्सिकन प्रशासनाला दीड कोटी डॉलर्स दिले,शिवाय ३२ ५ लाख डॉलर्सच्या अमेरिकन जनतेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे वचन मॅक्सिकोला दयावे लागले.  तसेच रिओ ग्रँड नदी दोन्ही देशांची सीमारेषा म्हणून मान्य करावी लागली.  अशा त-हेने रिओ ग्रँड नदीचे पेटलेले पाणी अखेर शांत झाले.  अमेरिका-मेक्सिको युद्धात अमेरिकेच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले सेनानी मेजर जनरल जैचेरी टेलर हे भविष्यात अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष झाले.  अमेरिका-मेक्सिको यांच्यात झालेल्या हया एकमेव युद्धाची अखेर नदीची सीमारेषा मान्य करून झाली. 
  प्रा.डॉ.राहुल हांडे,
  भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
    
 
 

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !