'ताओ ते चिंग' चे अंतरंग

लाओत्से आपले तत्त्वज्ञान एका चोपडीच्या रुपात चीनच्या सीमेवरील नाका अधिका-याच्या हवाली करून निघून गेला.  त्यानंतर लाओत्सेचे काय झाले? यासंदर्भात जगाला काहीच समजले नाही.  नाका अधिका-याच्या समयसूचकतेमुळे लाओत्सेच्या तत्त्वज्ञानरूपी जागतिक वारस्याला शब्दरुप मिळून ते अक्षय झाले. त्यामुळे जगाच्या येणा-या भावी पिढयांना लाओत्से शब्दरुपात भेटू शकला आहे आणि भेटत राहणार आहे.  लाओत्सची पाठमोरी आकृती पूर्णपणे दृष्टीआड झाल्यानंतर नाका अधिका-याने त्याने लिहून दिलेली चोपडी उलगडून पाहिली.  लाओत्सेने आपल्या तत्वज्ञानाची मांडणी ८१ भागात केली होती.  नाका अधिका-याने ही चोपडी चीनच्या सम्राटाकडे पोहचवली.  आज आपण त्याला 'लाओत्सेचे पुस्तक' अशा सर्वसाधारण नामाने संबोधतो.  प्राचीन तत्त्वज्ञांच्या परंपरेत हया पुस्तकाचे नामकरण 'लाओत्से' असे करण्यात आले होते.  दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास प्राचीन काळात लाओत्सेचे तत्त्वज्ञान आणि त्याची मांडणी केलेले पुस्तक 'लाओत्से' म्हणून ओळखले जात होते.  कालांतराने चीनच्या दार्शनिक परंपरेत कन्प‹युशियसच्या तत्त्वज्ञानाच्या बरोबरीने लाओत्सेच्या तत्त्वज्ञानाला महत्व देण्यासाठी त्याच्या पुस्तकाला 'ताओ ते चिंग' असे संबोधण्यात येऊ लागले.  कारण कन्प‹यूशियसचे तत्त्वज्ञान चीनमध्ये 'चिंग' नावाने ओळखले जात होते.  चीनी भाषेची लिपी एका अर्थाने चित्रलिपी आहे.  त्यानुसार 'चिंग' या चिन्हाचा म्हणजेच आपल्या साध्या भाषेत शब्दाचा मूळ अर्थ घडी पडलेला कपडा किंवा दोरी असा होतो.  चिंग या शब्दाचा हा मूळ अर्थ मागे पडून चिंग शब्द चिनी तत्त्वज्ञानाच्या भाषेत 'नैतिक सिद्धांत' अशा अर्थाने वापरला जाऊ लागला.  महात्म्यांनी अथवा महापुरुषांनी आपले तत्त्वज्ञान सांगण्यासाठी उच्चारले शब्द म्हणजे 'चिंग' असा ही अर्थ या शब्दाचा घेतला जातो.  तसेच हया महात्म्यांकडून देण्यात आलेले नैतिक सिद्धांताचे संस्कार हा अर्थ देखील चिंगमध्ये समाविष्ट आहे.  लाओत्सेने चीनला कायमस्वरूपी सोडून जातांना रेशमाच्या धाग्यांनी बांधलेल्या बांबूच्या पट्टयांवर चिटकवण्यात आलेल्या चमडयावर आपले तत्त्वज्ञान शब्दबद्ध केले होते.  इसवी सन सहाव्या शतकातील लाओत्सेचे हे शब्द एका पिढीकडून दुस-या पिढीकडे हस्तांतरीत होत राहिले.  त्यामुळे त्यांच्या मूळ स्वरूपात अनेक बदल होत गेले.  हस्तलिखित तयार करणा-यांकडून हा ग्रंथ प्रक्षिप्त झाला.  म्हणजेच त्याच्यात भेसळ होत गेली. एवढेच नाही तर लाओत्सेचे अनेक मूळ शब्द देखील बदलले गेले.  त्यामुळे हया ग्रंथाची शुद्धप्रत तयार करतांना अनेक अडचणी व विसंगती निर्माण झाल्या.  १८ व्या शतकापासून ताओ ते चिंग ग्रंथाची शुद्ध प्रत निर्माण करण्याचे प्रयत्न अनेक संपादकांनी केले.  ग्रंथाच्या शुद्धिकरणाची ही प्रक्रिया सुमारे दोनशे वर्ष सुरू होती.  दरम्यान १८६८ मध्ये हया ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झाले.  त्यामुळे लाओत्से आधुनिक जगाच्या कानाकोप-यात पोहचला.   ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरकाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  हया अडचणी भाषांतकारांनाच नव्हे तर चिनी संपादक-लेखक-भाष्यकार यांना देखील आल्या.  हया अडचणी होम्स वेल्च हया पाश्चात्य अभ्यासक व भाषांतरकाराने अत्यंत नेमकेपणाने नमुद केलेल्या दिसतात.  होम्स वेल्च यांच्या मते,"ताओ ते चिंग अभिजात चिनी भाषेत लिहिलेले असल्यामुळे त्याच्या आकलनात अनेक अडचणी येतात.  अभिजात चीनी भाषेत एकवचन-अनेकवचन भेद नसणे,नाम-काळ-भाव नेमकेपणाने व्यक्त न होणे,सकर्मक-अकर्मक क्रियापदांमध्ये भेद नसणे यामुळे अनेक अडचणी येतात.  ग्रंथाचा जो मजकूर उपलब्ध आहेत त्यातील अनेक व्याकरणीक दुवे गायब आहेत.  त्यामुळे मजकूर अचूक होण्यास मर्यादा येतात.  ग्रंथातील अनेक परिच्छेद जाणीवपूर्वक अस्पष्ट व संदिग्ध ठेवण्यात आले आहे.  तसेच अभिजात चिनी भाषेत कोणतही विरामचिन्ह नसल्यामुळे एक वाक्य कोठे संपते आणि दुसरे कुठे सुरू होते. हे निर्णायकपणे निश्चित करता येत नाही.  पूर्णविराम किंवा स्वल्पविराम यांच्या स्थानात बदल झाल्यास ग्रंथातील परिच्छेदाच्या अर्थात गंभीर बदल किंवा परिवर्तन होऊ शकते.  त्यामुळे अनुवादकाला वाक्यांचे विभाजन आणि अर्थ याबद्दल अत्यंत दक्ष रहावे लागते." होम्स यांच्यासारखाच अभिप्राय अनेक संपादक आणि अनुवादकांनी दिला आहे.  त्यांच्या मते आज ताओ ते चिंग ग्रंथाचा उपलब्ध मजकूर इतका दूषित आहे की अध्यायातील वर्णांचे क्रम न बदल्यास अध्याय समजणे अशक्य होते.  ताओ ते चिंग हा ग्रंथ इसवी सन पूर्व सहाव्या शतकात लिहिला असल्यामुळे हया अडचणी निर्माण होणे अपरिहार्य होते.  इसवी सनाच्या तेराव्या शतकात रचण्यात आलेल्या ज्ञानेश्वरीच्या संदर्भात हा प्रश्न संत एकनाथांसमोर अवघ्या दोनशे वर्षात उभा राहिला होता.  ज्ञानेश्वरांनंतर दोनशे वर्षात ज्ञानेश्वरीची जी हस्तलिखिते तयार झाली.  त्यांच्यात हस्तलिखित तयार करणा-या लेखनिकांनी आपल्या ओव्या टाकण्याचा प्रकार केला होता.  तसेच एकनाथांच्या काळात ज्ञानदेव-नामदेवकालीन मराठी भाषा देखील बदलली होती.  त्यामुळे एकनाथांना ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करावी लागली.  त्यामध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  आज आपल्याला मराठीतील पहिला श्रेष्ठ ग्रंथ असलेली 'ज्ञानेश्वरी' समजण्यासाठी यादवकालीन मराठीचा शब्दकोश वापरावा लागतो.  ताओ ते चिंगची शुद्ध प्रत तयार करण्याचा प्रयत्न त्याच्या निर्मितीनंतर सुमारे अडीच हजार वर्षांनंतर प्रारंभ झाला.  तोपर्यंत मूळ ग्रंथात झालेली भेसळ आणि काळाच्या ओघात प्रचंड बदलेली चिनी भाषा हे प्रमुख अडथळे ठरल्यास नवल नाही.  अखेर असे सर्व अडथळे पार करत १९३० मध्ये 'चेन चू' याने संपादित केलेली ताओ ते चिंग ग्रंथाची प्रत मूळ ग्रंथाची सर्वात निकट जाणारी समजण्यात आली.    ताओ ते चिंग हया ग्रंथाची शुद्ध प्रत लाओत्सेच्या पुस्तकाला पाच हजार चिन्हांचे पुस्तक असे देखील चीनी परंपरेत संबोधले जाते.  लाओत्सेच्या मूळ पुस्तकात पाच हजार शब्द असल्यामुळे हया पुस्तकाचा उल्लेख असा केला जातो.  आपण त्याला पाच हजार शब्दांचे पुस्तक म्हणू शकतो.  आज हया पुस्तकाची शब्दसंख्या त्याचे संपादन करणा-या तसेच त्याच्यावर भाष्य करणा-यांच्या सोयीनुसार पाच हजार शब्दांपेक्षा कमी-अधिक असलेली दिसते.  तसेच त्यामधील विषयांच्या संख्येत देखील कमी-अधिक दिसून येते.  लाओत्सेचे मुळ पुस्तक ८१ छोटया भागांत विभागलेले असून त्याचे दोन मुख्य भाग केलेले आहे.  त्यामधील पहिला भाग ३७ अध्यायांचा आहे,तर दुसरा भाग ४४ अध्यायांचा आहे.  प्राचीन काळापासून उपलब्ध ताओ ते चिंग पुस्तकाचे विभाजन अशाच प्रकारे केलेले आढळते.  यामुळे असे विभाजन लाओत्सेनेच केलेले असावे हया तथ्याला बळकटी मिळते.  काही अपवादात्मक आवृत्यांमध्ये दोन्ही भागतील अध्याय संख्येत भिन्नता आढळत असली तरी अभ्यासक त्याला अधिक महत्व देत नाही.  काही अंकज्योतिष्याचे जाणकार अंकजोतिष्य शास्त्रानुसार ताओ ते चिंग पुस्तकाची अध्याय संख्या ८१ असण्यामागे ८+१= ९ हा शुभअंक असावा असे मानतात.  कारण अंकजोतिष्यानुसार ३ अंक आणि त्याच्या पटीत वाढणारे ६ व ९ हे अंक सर्वात शुभ मानण्याची पद्धत आहे.  हा ज्याच्या त्याच्या मानण्याचा भाग आहे.  लाओत्सेने असला फालतू विचार केला असेल,हे आपल्याला त्याच्या प्रखर बुद्धिवादी तत्त्वज्ञानाचा विचार करता मान्य करता येत नाही.  हा केवळ योगायोग असण्याचीच शक्यता अधिक असावी.  ताओ ते चिंग चा पहिला म्हणजे पूर्व भाग आणि दुसरा म्हणजे उत्तर भाग यांना दोन भीन्न नामांनी संबोधले जाते.  पूर्व भागाला 'ताओ चिंग' अर्थात ताओचे पुस्तक आणि उत्तर भागाला 'ते चिंग' अर्थात तेचे पुस्तक असे संबोधण्याची पद्धत चीनमध्ये रूढ आहे.  ताओ ते चिंग ग्रंथाची भाषा लाओत्सेच्या गहन तात्ति्वक चिंतनातून प्रकट झालेली आहे.  हया भाषेत गूढ सांकेतिक अर्थ दडलेले आहेत.  तसेच काही ठिकाणी ही भाषा दुर्बोध व जटिल देखील वाटते.  असे असले तरी जड-जड शब्दांचा विनाकारण वापर लाओत्सेने कदापि केलेला नाही.  ताओ ते चिंग हा ग्रंथ म्हणजे लाओत्सेने स्वतःशी आयुष्यभर केलेला आत्मसंवाद आहे.  भगवान बुद्धांनी जसा स्वतःचा शोधात बोधीसत्वाची प्राप्ती केली.  तसेच लाओत्सेचे होते.  त्यामुळे बुद्धांप्रमाणेच लाओत्से सिद्धांतांचे जोखड फेकून देत सहज-सुलभ हृदयसंवाद साधतांना दिसतो.  त्याच्या वचनांमध्ये कबीर-तुकोबांची स्पष्टता-निर्भयता,ज्ञानदेवांचे अपार्थिव गूढगुंजन,नामदेवांचा सहज भाव,चोखोबांचे आर्जव,सावतोबांची निसर्गसन्मुखता असल्यामुळे कोणत्याही मराठी माणसाला हया सगळयांचे प्रतिबिंब ताओ ते चिंगमधील शब्दांमध्ये निश्चितच दिसल्याशिवाय राहू शकत नाही.  ख-या अर्थाने ताओ ते चिंग म्हणजे एखादया महाकवीने अत्यंत मोजक्या शब्दात ब्रम्हांडाला कवेत घ्यावे,असे लाओत्सेचे अलौकिक प्रतिभा सामर्थ्य म्हणावे लागते.
             प्रा.डॉ.राहुल हांडे,             भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६                                                          


Comments

  1. अतिशय छान लेखन शैली आहे सर!

    ReplyDelete
  2. खूप सुंदर 👌 लवकरच या सर्व लेखांचे एक उत्तम पुस्तक तयार होऊन वाचकांच्या हाती पडावे अशा शुभेच्छा 🙏 🙏 🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !