स्वतःलाच विसरलेला माणूस...

पौर्णिमेच्या चंद्र आता डोक्यावर आला होता.  चीनच्या सीमेवरील नाक्याभोवतालचा सारा प्रदेश नितळ चंद्रप्रकाशात गव्हाळ झाल्यासारखा भासत होता.  त्या ओसाड पठारावरचे बोचरे थंड वारे जणू काही चंद्रप्रकाशात न्हाऊन उबदार वाटत होते.  शेकोटी भोवतीच्या लोकांना लाओत्सेच्या गोष्टींनी मंत्रमुग्ध केले होते.  आकाशात पूर्ण चंद्र असला तरी शेकोटीजवळ जणू सूर्योदय होत होता.  नाक्याचा मुख्य अधिका-याचे मन मात्र हया म्हाता-याची ओळख निश्चित करण्यासाठी अस्वस्थपणे घिरटया घालत होते.  'लाओत्से' हे नाव त्याच्या मनाला स्पर्श करून जात असले तरी स्थिरावत नव्हते.  आज त्याच्या नाक्यावरील शेकोटीच्या ज्वाळा त्याला ज्ञानाची झळाळी घेऊन आकाशाकडे झेपावत असल्याचा भास होत होता.  व्यापारातील लाभ-नुकसान,दरोडेखोर-चोराचिलटांचा त्रास,विविध भागातील राजकारण,राज्यकर्त्यांची उदारता-क्रुरता,लहरीपणा,लढाया इत्यादी रोजच्या गप्पा सोडून शेकोटी भोवती भलताच विषय रंगला होता.  बाहय जगातील घडामोडींकडून प्रत्येकाला स्वतःच्या अंतरमनातील घालमेल जाणवत होती.  जगाचा व्यापार सोडून सगळे स्वतःच्या मनाचा व्यापार न्याहाळण्यात दंग झाले होते.  त्यांच्या मनात उठलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रत्येक जण म्हाता-याला गोष्टी सांगण्याच्या निमित्त्याने बोलते करण्याचा प्रयत्न करत होता.  तेवढयात एका सुज्ञ व्यापा-याने म्हाता-याला प्रश्न केला की, "बाबा ! माणसाने आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी कोणती साधना करणे आवश्यक आहे."  लाओत्सेने मंदस्मित केले.  तो व्यापा-याला म्हणाला, "मी माझ्या देखील तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला.  जोपर्यंत मी शांतीचा शोध घेत होता. तोपर्यंत मला ती कधीच मिळाली नाही.  तिला मिळवण्यासाठी मी जेवढा तिच्या मागे धावत होतो.  ती आणखी वेगाने पुढे धावत होती.  अखेर मी धावणे सोडले.  तर ती माझ्या मनात कायमची येऊन बसली."  लाओत्सेच्या उत्तराने त्या सामान्य जणांचे समाधान होण्याऐवजी गोंधळच वाढला.  मग तो व्यापारीच पुन्हा म्हणाला," आम्हा सर्वांचा गोंधळ वाढला आहे.  आपण आम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगावे."  लाओत्सेच्या देखील हे लक्षात आले होते की आपल्या विशुद्ध तत्त्वज्ञानाच्या भाषेतून यांना बोध होणे शक्य नाही.  तेंव्हा तो म्हणाला," मी यासाठी तुम्हाला माझ्या जीवनात घडलेली एक घटनाच सांगतो."  हे ऐकताच  शेकोटी भोवतीचा प्रत्येक जण ती ऐकण्यासाठी कान टवकारून बसला.  लाओत्से म्हणाला," मी शांतीचा शोध घेत होतो आणि ती मला प्राप्त झाली आहे.  हे समजलेला एक शांतीच्या शोधाची साधना करणारा एक साधक माझ्याकडे आला आणि म्हणाला मी साधक आहे.  मी शांतीच्या प्राप्तीसाठी अथक व अविरत साधना करत आहे.  मात्र मला शांती लाभली नाही.  मला काही करून शांती हवी आहे.  त्याच्या जीवाची तगमग बघून मला हसू आले आणि त्याच्याबद्दल गाढ सहानुभूती देखील वाटली.  तो शांतीपर्यंत पोहचला नसला तरी त्याची तिच्यापर्यंत जाण्याचा मार्ग शोधण्याची धडपड मला प्रभावीत करून गेली.  त्याला जाणण्याची तीव्र ईच्छा होती.  याचा अर्थ तो निश्चितच 'मुमुक्षु' होता."  त्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी मी म्हणालो," तुला कधीच ती कधीच मिळणार नाही."  माझ्या उत्तराने साधक अस्वस्थ व हतबल झाला.  तो काकुळतीला येऊन म्हणाला," का ? माझ्यात असं काय कमी आहे ? कसली अडचण आहे ? मी काय गुन्हा केला आहे की पाप ? का नाही मला शांती मिळणार ?" आता तो मला त्याला ज्या मार्गावर नेऊन सोडायचे होत त्याच्या जवळ पोहचला होता.  मी त्याला म्हणालो," जोवर तू शांतीची इच्छा धरशील तोवर ती तुला लाभणार नाही.  मी देखील पुष्कळ दिवस अशी इच्छा बाळगून होतो.  वाट पाहत होतो.  पण नंतर मला कळून चुकले की शांतीची आकांक्षा,अपेक्षा,इच्छा हीच मुळी मोठी अशांतीदायक असते.  या अशांतीहून अन्य दुसरी मोठी अशांती या जगात नाही."  लाओत्सेने साधकाच्या मनातील संभ्रम एका क्षणात दूर केला होता.  लाओत्सेने त्याला जगात प्रत्येक माणसाच्या मनात अशांती का आहे ? याचे अत्यंत साधे-सरळ उत्तर दिले होते.  मानवाचा हा आदिम प्रश्न प्रख्यात उर्दू शायर 'शहरयार' यांनी, 'सीने में जलन आँखो में तूफान सा क्यूँ है,इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है,' या शब्दांमध्ये आपल्या गजलमध्ये उभा केला आहे.  जगात प्रत्येकाच्या मनात 'जलन' म्हणजे अशांती-अस्वस्थता आहे.  तसेच प्रत्येकाच्या डोळयांमध्ये आसुरी इच्छा-आकांक्षाची वादळं थैमान घालत असलेली दिसतात.  त्यामुळे हया जगात प्रत्येक जण 'परेशान' म्हणजेच अस्वस्थ असलेला दिसतो.  मानव जातीच्या आरंभापासून माणसाला हा प्रश्न सतावत आला आहे.  मानवी इतिहासाच्या वेगवेगळया वळणारवर महापुरूषांनी हयाच प्रश्नाचे उत्तर दिले. मात्र अत्यंत मोजक्या लोकांना त्यांचे उत्तर समजले आणि त्यांचे जीवन बदलले.  अनेकांना समजले पण ते त्या मार्गावर चालू शकले नाही.  कारण समजले असले तरी त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आवश्यक ते धैर्य ते एकवटू शकले नाहीत.  उरलेल्या बहुतेकांकडे आपण अशांत-अस्वस्थ-दुःखी आहोत हे समजण्याची क्षमताच नाही.  ते यासाठी कर्मकांडांचा आधार घेता.  तरी अज्ञानाकडून अज्ञानाकडे असाच त्यांच्या जीवनप्रवासाचा अंत होतो.  याला कोणी     'अज्ञानात सुख' म्हणण्याचे ज्ञान पाझळू शकतो.  मात्र याचे उत्तर असे कदापि असू शकत नाही.  हे असे लोक असातात की ते आयुष्यभर अशांती-दुःख या रोगाचा त्रास सहन करत जगतात;परंतु जीवन संपून जाते तराè आपल्याला कशाचा त्रास होता हेच त्यांना समजत नाही.  लाओत्सेची ही गोष्ट ऐकून शेकोटी भोवतालच्या प्रत्येक जणाचे मन ढवळून निघाले होते.  हा म्हातारा सांगतोय तेच नेमके आपल्याबद्दल घडत आले आहे.  याची खात्री त्यांना ते करून घेऊ लागले.  त्याच्या तत्त्वाच्या कसोटीवर त्यांनी हे तपासून पाहण्यास सुरवात केली.  त्यांना लाओत्सेने सांगितलेले पटले होते.  आजही प्रत्येक प्रवचनात जाणा-याच्या मनाची हीच अवस्था होते.  प्रवचनाच्या काळात चांगला माणूस बनण्याची चढलेली नशा प्रवचन संपल्यावर संपुष्टात येते.  तसेच अत्यंविधीला स्मशानात गेलेल्यांना जीवनाच्या व्यर्थतेचा बोध होऊ लागतो.  त्यांच्या मनात एक प्रकारचे वैराग्य उत्पन्न होते.  त्यालाच आपण स्मशान वैराग्य असे म्हणतो.  स्मशानातून बाहेर पडल्यानंतर मात्र वैराग्याचा झटका जाऊन माणूस पुन्हा प्रपंचाच्या ओढीने घरी किंवा कामाच्या ठिकाणी धावत सुटतो.   शेकोटी भोवती निर्माण झालेली स्मशान शांतता मोडत एका सैनिकाने प्रश्न केला की," तुम्हाला एखादी गोष्ट दुस-याला समजण्यासाठी वारंवार सांगावी लागली असे कधी झाले आहे का ?" यावर लाओत्से म्हणाला," मी कायम खेडयापाडयातील अशिक्षित ग्रामीण लोकांमध्ये वावरलो.  त्यांच्याशी बोलणे,संवाद साधणे,गप्पा गोष्टी करण्यात मला खूप आनंद मिळायचा.  त्या ग्रामीण माणसांकडे समजण्याची क्षमता कमी असली तरी त्यांच्यातील निर्मळता,निरागसता,भोळे-भाबडेपणा मला सांगण्यावाचून राहू दयायचा नाही.  असेच मी एकदा त्यांच्याशी गप्पा मारतांना तिथे जमलेल्यांपैकी एकाला मी सांगितलेले समजले नाही.  तो दुस-या दिवशी सकाळीच माझ्या झोपडीकडे आला.  मी त्याला परत समजावून सांगितले.  तिस-या दिवशी सकाळी पुन्हा तो माझ्या झोपडीसमोर तोच मुद्दा समजावून घेण्यासाठी हजर होता.  हा उपक्रम एकवीस दिवस चालू होता.  हा प्रकार पाहून माझा शिष्य असलेला 'मात्सु' नावाचा तरुण मुलगा अखेर चिडला.  हा मूर्ख माणूस आपल्या गुरुला विनाकारण छळत आहे.  असे त्याला वाटले.  अखेर एकविसाव्या दिवशी त्याने त्या माणसाला झोपडीच्या दारातच अडवले.  मात्सु म्हणाला," बस झाले.  जा येथून.  तू एक वेडा तेच तेच रोज तिच गोष्ट समजावून घेणारा आणि दुसरा माझा गुरु रोज रोज पुनः तेच तेच सांगणार.  अरे,तू आयुष्यभर येत राहिलास तर तोही समजावून देतच राहिल."  त्या दोघांचा हा संवाद चालू असतांनाच मी कुटीच्या बाहेर आलो आणि त्या माणसाला पाहून म्हणालो," तू आलास ! ये ये आत ये.  कालचे पुन्हा विसरलेला दिसतोस.  ये पुन्हा सांगतो."  माझ्याकडून समजावून घेतल्यावर तो माणूस घरी गेला.  दुस-या दिवशी म्हणजे बाविसाव्या दिवशी तो आला नाही तर मी त्याच्या घरी गेलो आणि विचारले," का बाबा, आज आला नाही.  प्रकृती ठीक नाही का ?" तो माणूस म्हणाला,"सगळे ध्यानात आले.  आपण सांगितलेले समजले.  मी संपूर्ण बदललो आणि माझ्यात दडलेला खरा मी मला सापडलो आहे."  हे ऐकून शेकोटीजवळचा प्रत्येक माणूस स्तब्ध झाला होता.  अचानक नाक्याच्या अधिका-याच्या आवाजाने त्या निरव स्तब्धतेचा भंग केला.  तो एखादे रहस्य उलगडावे तसा ओरडत होता.  तो म्हणत होता की," त्या माणसाला तू सांगितलेले समजल्याने स्वतःचा शोध लागला.  शेकोटीजवळ गेले कित्येक तास तू जे सांगत आहे.  त्यातून तू कोण आहे हे मला समजले आहे."  त्याचे हे विधान ऐकून प्रत्येक जण प्रचंड उत्कंठतेने म्हाता-याकडे पाहू लागला. 
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                                                       
 

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !