माणसाच्या पूर्णत्वाचे निरव संगीत...

चीनच्या सीमवरील नाक्यावर वयोवृद्ध लाओत्से पोहचला होता.  आपली काठी टेकवत प्रवासाने श्रमलेल्या त्याच्या जर्जर शरीराला काही काळ विसाव्याची गरज होती.  घशाला कोरड पडली होती आणि पोट दोन घासांची मागणी करत होते.  नाक्यावरील पहारेक-यांनी वृद्ध लाओत्सेकडे पाहिले.  नावाने आणि तत्त्वज्ञानाने अवघ्या चीनला माहीत असलेला लाओत्से सीमेवरील पहारेक-यांना त्याकाळाचा विचार करता चेह-याने माहीत असणं शक्यच नव्हते.  हा म्हातारा येथे कशाला आला असेल? याचा विचार करत असातांनाच लाओत्सेने त्यांच्याकडे पाणी मागीतले.  म्हाता-याची वय आणि अवस्था पाहून पहारेक-यांनी तात्काळ पाणी, तर दिलेच त्यासोबत त्याला भोजन देखील दिले.  अन्न-पाणी पोटात जाताच लाओत्सेच्या सुरकुत्यांनी भरलेला चेह-यावर तकवा जाणवू लागला.  पहारेक-यांनी त्याला तेथे येण्याचे कारण विचारले तेंव्हा तो म्हणाला ,"मला चीन देशाच्या बाहेर जायचे आहे,म्हणून मी येथे आलो," असे सांगितले.  पहारेकरी म्हणाले,"बाबा ! तुमच्यासोबत कोणी नाही ? तुम्हाला चीनमधून बाहेर पडून कोठे आणि कशासाठी जायचे आहे? एकटयाने प्रवास करण्यासारखी तुमची अवस्था देखील नाही." लाओत्सेने त्यांचा प्रश्न ऐकला आणि एक मंद स्मित केले.  आपल्या वयाकडे पाहून पहारेक-यांना आपल्याविषयी सहानुभूती वाटतं आहे.  म्हणजे अजूनही माणसात माणूसकी शिल्लक आहे.  याविषयी काहीसे समाधान वाटले.  तो म्हणाला," मी चीनमध्येच काय तर या जगात कोठून आलो. हेच मला माहित नाही,तर मला कोठे जायचे? हे मी कसे सांगू शकेल." त्याच्या बोलण्याने बिचारे पहारेकरी बुचकळयात पडले.  त्यांच्या मते ते एका वृद्धाशी बोलत होते; परंतु तो लाओत्से आहे.  हे त्यांना माहित नव्हते.  वयामुळे म्हाता-याच्या डोक्यावर परिणाम झाला असावा,असे त्यांना वाटले.  घरच्यांना कंटाळून घर सोडून आलेल्या हया म्हाता-याची समजूत काढून याला घरी पाठवून द्यावे असा विचार त्यांनी केला.  त्यांनी लाओत्सेला आपल्या अधिका-याकडे नेले.  त्याच्याशी झालेल्या संवादात त्याच्या विषयी त्यांनी  काढलेला निष्कर्ष त्यांनी आपल्या अधिका-याला सांगितला.  अधिका-याने लाओत्सेला विचारले," देशाच्या सीमेबाहरे जातांना परवाना आणि सोबत असलेल्या सामानाची परवानगी आवश्यक असते. तुझ्याकडे हया गोष्टी आहेत का?" लाओत्से त्याला म्हणाला,"माझ्याकडे परवाना नाही.  साहित्याचे म्हणाल तर ते देखील माझ्याकडे नाही." अधिका-याने त्याच्याकडे पाहून काही काळ विचार केला.  त्याला आपल्या हाता खालच्या लोकांच्या म्हणण्यात तथ्य जाणवले.  वृद्धापकाळाने मानसिक संतुलन बिघडलेल्या या म्हाता-याची समजूत काढून याला घरी पाठवून दयावे असा विचार त्याने देखील केला.   त्याने लाओत्सेला बाहेर जाण्यास सांगितले आणि आपल्या पहारेक-यांना आदेश दिला की," आता रात्र झाली आहे.  हया म्हाता-याला रात्रभर थांबवून घ्या,त्याच्या भोजनाची व झोपण्याची सोय करा.  सकाळ होताच नाक्यावर थांबलेल्या व्यापा-यांसोबत त्याला त्याच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करा." पहारेकरी आपल्या अधिका-याचा आदेश घेऊन बाहेर आले. त्यांनी अधिका-याने सांगितल्याप्रमाणे लाओत्सेच्या मुक्कामाची सोय केली.  सीमेवरील निर्जन प्रदेशात असलेल्या नाक्यावर रात्री शेकोटी भोवती जमून गप्पा मारणे हाच काय तो एक विरंगुळा होता.  शेकोटीच्या गप्पांमध्ये नाक्यावरील अधिकारी,पहारेकरी,व्यापारी,प्रवासी इत्यादी लोक सहभागी होतं.  व्यापारी व प्रवाशांमुळे नाक्यावरील कर्मचा-यांचा विरंगुळा तर होतच असे मात्र विविध भागातील घडामोडी व रंजक गोष्टी देखील ऐकायला मिळतं.  आज मात्र शेकोटीजवळील गप्पांचे मुख्य आकर्षण होतं. चीनसोडून बाहेर जाण्याची ईच्छा व्यक्त करणारा हा म्हातारा.  लाओत्सेने 'माणसाने स्वतःला कायम अज्ञात-अपरिचित ठेवावे', या तत्त्वानुसार आपली खरी ओळख त्यांना सांगितली नव्हती.  मात्र त्या रात्री नाक्यावरील प्रत्येक माणसाला हा म्हातारा,त्याचे वागणे व त्याचे बोलणे याच्याविषयी कुतुहल वाटत होते.  जेवणं झाल्यानंतर सर्वजण शेकोटीभोवती जमले.  लाओत्से देखील त्यांच्यामध्ये होता.  नाका असलेल्या डोंगराच्या पठारावरील थंड बोच-या हवेत शेकाटीची ऊब मनाला व शरीराला सुखावत होती.  नाक्यावरील अधिकारी लाओत्सेला म्हणाला," बाबा ! तुम्ही आयुष्याचा एवढा अनुभव घेतला आहे.  तुमच्या जीवनातील काही अनुभव आम्हांला सांगा !" लाओत्से हसला आणि म्हणाला," माझ्यासारखे सामान्य जीवन जगलेल्या माणसाकडे सांगण्यासारखे कोणते अनुभव असतील.  तसे ते कोणाकडेच नसतात.  तरी तुम्ही विचारता आहात म्हणून सांगतो.  आमच्या गावाजवळ एक विख्यात गायक व संगीतकार होता.  त्याने कित्येक वर्षांत एकही गीत गायले नव्हते की संगीत निर्माण केले नव्हते.  त्याचे नाव मी ऐकले व त्याचा शोध करीत त्याच्याकडे गेलो.  कारण मला जाणून घ्यायचे होते की,अशा माणसाला लोक तरी एवढा मोठा संगीतकार का म्हणून मानतात?" लाओत्सेने हे सांगायला सुरवात केली आणि शेकोटीजवळील प्रत्येकाची उत्कंठा वाढली.  प्रत्येक जण सावरून व कान टवकारून ऐकू लागला.  लाओत्से पुढे सांगू लागला," मी संगीतकाराकडे गेलो. त्यावेळी त्याच्याजवळ संगीताचे  काही खास साज-सामान नव्हते.  तो आपला एका झाडाखाली बसलेला होता.  मी त्याला विचारले,आपण फार मोठे संगीतकार आहात असे ऐकले,पण इथं तर काहीच साज-सामान अथवा वाद्य दिसत नाही." संगीतकाराने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला," साज-सामानाची तोवरच गरज होती,जोवर संगीत स्वतःहूनच उत्पन्न होत नव्हते आणि मला ते उत्पन्न करावे लागत होते.  आता संगीत स्वतःच उत्पन्न होऊ लागले आहे.  गाणे स्वतःहून फुलत नव्हते तोवर मी गात होतो,आता गाणे स्वतःच फुलते आहे,म्हणून मी गाण्याच्या खटाटोपात पडत नाही." हे ऐकून मी संगीतकारला म्हणालो," मला ते गाणे ऐकायला येत नाही." संगीतकार म्हणाला," माझ्याजवळ राहा.  थांब हळू हळू तुला ते ऐकू येईल." त्यानंतर काही काळ मी संगीतकाराजवळ राहिलो आणि हळूहळू मलाही संगीत ऐकू येऊ लागले.  मी माझ्या गावी परतलो तेंव्हा लोक मला विचारूलागले,"ऐकले का संगीत? कसे होते ?" मी त्यांना सांगितले की," ते अपूर्व शून्याचे संगीत होते ! तिथे शब्द नव्हते,शून्यांची नितान्त शांती होती.  संगीत तेच,जिथे शब्द शून्य होऊन जातात."  निसर्गाशी ऐकतानता साधता आली तर माणसाला परमात्म्याच्या निरव संगीताची अनुभूती मिळू शकते.  त्याला संगीतासाठी वाद्यांच्या साहयाने ध्वनी निर्माण करण्याची आवश्यकता पडत नाही.  तसेच गाण्यासाठी गळा वापरावा लागत नाही. कारण तुमचे मनच तेथे गाऊ लागते.  जेंव्हा माणूस भौतिक सुखांच्या मागे लागला तेंव्हा त्याची सृष्टीशी असलेली एकजिनसत्व संपुष्टात आले.  निसर्गातील इतर सजीव आजही हया सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत; परंतु माणूस मात्र जगात उप-यासारखा झाला आहे.  लाओत्सेला माणसाने सृष्टीचे संगीत ऐकण्यासाठी आपले गमावलेले कानं पुन्हा मिळवणं आवश्यक आहे.  हेच या गोष्टीतून सांगायचे होते.  'हेडफोन' लावून फिरणारा आजच्या माणसाने  कितीही उच्च प्रतिचा हेडफोन वापरला तरी निसर्गाच्या निशब्द-निरव संगीताचा तो आनंद घेऊ शकत नाही.  हेडफोनने तो निसर्गापासूनच काय पण सभोवतालच्या माणसांपासून देखील तुटलेला आहे.  हेडफोनने ध्वनी कल्लोळ ऐकता येईल; परंतु संगीत कधीच ऐकता येणार नाही.  लाओत्सेची ही गोष्ट सांगून झाली.  तेथे बसलेला प्रत्येक जण जरा विचारात पडला.  हे म्हातारं काही वेडसर नाही,हे काही वेगळंच प्रकरण दिसतयं,हे नाक्याच्या मुख्य अधिका-याच्या लक्षात येत होते.  आपली गोष्ट सांगून लाओत्से शांत बसला होता.  शेकोटी भोवती कुजबुज वाढली होती.  त्यानं सांगितलेल्या गोष्टीचा अन्वयार्थ प्रत्येक जण आपल्या परीने लावण्याचा प्रयत्न करत होता.  रात्रीच्या घनदाट अंधारात शेकोटीच्या आगीने लाल झालेल्या चेह-यांच्या नजरांमधून म्हाता-याविषयी उत्सुकता डोकवू लागली होती.    मुख्य अधिकारी लाओत्सेला म्हणाला," आपण सांगितल्याप्रमाणे निसर्गाशी अशी संपूर्ण एकरूपता साधण्यासाठी काय करावे लागेल? हे आम्हांला सांगा !" यावर लाओत्से म्हणाला," यासाठी तुम्हांला एक प्रसंगच सांगतो. एकदा मी एका मुलाला झाडाची काही पाने तोडून आणायला सांगितली.  त्याने झाडाची एक फांदी तोडून आणली.  मी त्याला थांबवले आणि म्हटले,'अरे वेडया,काय केलेस हे? तुला कल्पना नाही की फांदी तोडून त्या झाडाला तू अपंग व अपूर्ण बनविले आहेस.  ऐवढेच नाही तर तुला याचीही कल्पना नाही की झाडच केवळ तू अपूर्ण बनविले नाहीस, तर झाडाबरोबर तू स्वतःलाही अपूर्ण बनविले आहेस ! अरे,हे पूर्ण झाड समोर उभे आहे. म्हणून आपणही पुष्कळसे हिरवे टवटवीत आहोत.  आज तू त्याच्यावर घाव घातलास,तो आपल्याही अंतरात बसलेला आहे." लाओत्सेला सांगायचे होते की माणूस निसर्गाला जेवढा अपंग व अपूर्ण करेल तेवढा तो स्वतः अपंग व अपूर्ण बनतो.  आज माणसाने निसर्गाचा -हास करुन उभारलेल्या  सिंमेटच्या जंगलात कितीही झाडं लावली तरी निसर्गासोबत गमावलेले पूर्णत्व आणि निसर्गाशी असलेले एकरूपत्व तो परत प्राप्त करु शकत नाही.  नाक्याचा अधिकारी आणि शेकोटी भोवतालचे लोक आता गोष्टी सांगणा-या म्हाता-याकडे अचंबित होऊन पाहू लागले होते.  लाओत्सेच्या चीनमधील अस्तित्वाची ही अखेरची  रात्र जगासाठी त्याच्या तत्त्वज्ञानाचा अढळ सूर्य उगवूनच संपणार होती.  
   प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                       

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !