वेडया म्हाता-याचा अखेरचा मुक्काम...

इसवी सनाच्या पूर्व सहाव्या शतकातील कोणत्या तरी दिवसाची सांयकाळ.  एक वृद्ध आपली काठी टेकवत चीनच्या सीमेजवळ पोहचला.  चीनची ही कोणती सीमा होती,हे देखील आज ज्ञात नाही.  लांबचा प्रवास आणि वयाने थकलेला हा जराजर वृद्ध सीमेवरील नाक्याजवळ येऊन विश्रांतीसाठी विसावला.  त्याला आपला चीन देश सोडून कायमचे बाहेर जायचे होते.  चीनमधील तत्कालिन परिस्थितीमुळे ही वयोवृद्ध व्यक्ती व्यथीत झालेली होती.  चीनच्या राजसिंहासनावर दावा सांगण्यासाठी सुरु असलेल्या गलिच्छ घडामोडी आणि रक्तरंजीत संघर्ष या वृद्धाला नकोसा झाला होता.  कोणे एके काळी हा वृद्ध देखील चीन मधील चीनमधील 'चाऊ' अथवा 'झौऊ' राज्याच्या दरबारात 'राजदफ्तरदार' अथवा 'ग्रंथपाल' होता.  वयाच्या साठीपर्यंत त्याने आपली नोकरी अत्यंत नेकीने केली.  चीनच्या तत्कालिन घाणेरडया राजकारणाने अखेर त्याचा ही बळी घेतला.  त्याला राजदरबारातून पदच्युत केले गेले/  हा वृद्ध केवळ कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मनमारून जगणारा चाकरमान्या नव्हता.  तो संसारात असून त्यात न रमलेला गुप्त ऋषी होता.  त्याने आपली सारी हयात एका महान आणि कालजयी तत्त्वज्ञानाच्या चिंतनात घालवेली होती.  जन्मापासूनच त्याची ही साधना प्रारंभ झालेली होती.  त्याचे उभे आयुष्य एका साधकाचे आयुष्य राहिले होते.  आपण गुरु होण्याइतके ज्ञानी झालो आहोत किंवा आपण आता दुस-याला ज्ञान देण्यास सक्षम आहोत.  असा दावा त्याने कदापि केलेला नव्हता.  आपल्याला पदच्युत केल्याची देखील त्याला तीळमात्र खंत नव्हती.  मुळी खंत,राग,द्वेष,कोणाला विरोध हे प्रकार त्याच्या शब्दकोशातच नव्हते.  एकदा असाच रस्त्याने जात असतांना.  एका माणसाने त्याला काठी मारून फेकली.  काठीचा मार त्याला चांगलाच बसला होता.  तरी या महाभागाने त्या व्यक्तिकडे थांबून, साधे वळून मारणा-याला पाहण्याची देखील तसदी घेतली नाही.  अखेर मारणाराच अस्वस्थ झाला.  एखादयाने मारणे किंवा शारिरीक ईजा पोहचवणे ही खूप मोठी गोष्ट असते.  एखाद्याने शिवी अथवा अर्वाच्य भाषेचा वापर केला, तर माणसाचा पारा चढतो.  माणूस त्याला प्रत्युत्तर देतो.  असे करणा-याला प्रत्युत्तर मिळाले तरच त्याचे खरे समाधान होत असते किंवा त्याचा प्रयत्न सफल होत असातो.  त्याला प्रत्युत्तर दिल्याने तो अस्वस्थ होत नाही; परंतु प्रतिसाद न दिल्याने अस्वस्थ होत असतो.  या वृद्धाला काठी मारणा-याचे असेच झाले.  तो वृद्धाच्या मागे धावत गेला आणि त्याला आडवा होत म्हणाला,"भल्या माणसा ! अरे,वळून तरी पाहा कुणी मारले ते.  अन्यथा माझे मारणेही व्यर्थ जाईल.  पहा तरी  काही बोल तरी." वृद्ध शांतपणे म्हणाला,"होतं असं कधी कधी चुकून माणसाच्या हातून,त्यात काय ! कधी कधी आपलेच नख आपल्याला लागून रक्त नाही का निघत,तेंव्हा आपण काय करतो ? कधी रस्त्याने जाताना ठोकर लागून पडतो.  लागते,तेंव्हा काय करतो आपण?" आता मात्र मारणा-याच्या न मारताच श्रीमुखात बसली होती.  तो पुरता शरमला होता.  हा वृद्ध त्याला पुढे सांगू लागला की," एकदा मी नावेत बसून प्रवास करत होतो.  तर एक रिकामी नाव माझ्या नावेवर येऊन धडकली. तेंव्हा तरी मी काय केले?; परंतु दुस-या नावेत जर नावाडी असता,तर भांडण झाले असते.  नाव रिकामी होती,म्हणून काही झाले नाही.  पण त्या दिवसापासून मी समजून चुकलो की,नाव रिकामी असो की,नावाडी बसलेला असो धडक दिल्यावर काय फरक पडणार आहे ! तर हे भल्या गृहस्था,तू आपले काम केले आहेस.  आता जा मला माझे काम करू दे." एवढे बोलून वृद्ध शांतपणे चालू लागला.  दुस-या दिवशी सकाळीच तो माणूस वृद्धाच्या दारात उभा राहून क्षमायाचना करत होता.  तो म्हणत होता की," मला रात्रभर झोप आली नाही."  शब्द असो की शस्त्र तुम्ही त्यांच्या मा-याला प्रतिकार केला नाही,तर ते आपोआप निष्प्रभ-निष्फळ ठरतात.  येथ या वृद्धाने सहनशीलतेचे सामर्थ्य दाखवले.  या वृद्धाच्या या तत्त्वावरच चीनमधील 'ज्युडो' हया स्वरक्षण कलेचा विकास झाला.  एखादा प्रचंड ताकदीचा मल्ल किंवा बॉक्सर ज्युडो येणा-या काटकुळया माणसाकडून पराभूत होतो.  कारण ताकदवर मल्ल किंवा बॉक्सर प्रारंभी प्रचंड ताकदीने त्याच्यावर प्रहार करत असतो.  तेंव्हा ज्युडोवाला हया प्रहारांना शारिरीक आणि मानसिक स्तरावर काहीच विरोध करत नाही.  आपण एखाद्या स्पंज किंवा कापसाच्या उशीवर बुक्का मारल्यास आपल्या हाताच्या आकारा एवढा स्पंज किंवा कापसाच्या उशीचा भाग आत जातो आणि पुन्हा पुर्ववत होतो. म्हणजेच हया वस्तूंना आपल्या प्रहाराचा काहीच फरक पडत नाही.  त्याचप्रमाणे शरीर व मन जेंव्हा प्रहाराला विरोध करत नाही, तेंव्हा ज्युडोवाल्याला फारसा मार बसत नाही.  मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करणारा मल्ल किंवा बॉक्सर यांची ताकद काही वेळात संपुष्टात येते आणि ज्युडोवाला त्यांना सहजपणे पराभूत करू शकतो.  त्यामुळेच ज्युडो खेळाडूंना सर्वप्रथम सहनशीलतेचे संस्कार व प्रशिक्षण दिले जाते.  ज्युडोचे हे केंद्रवर्ती तत्त्व या वृद्धाच्या तत्वज्ञानातूनच विकिसित झाले.  म्हणून एका अर्थाने ज्युडो कलेचा जनक म्हणून ही वृद्ध जगात ओळखला गेला.  चीनमध्ये १९ व्या शतकापर्यंत भांडण करण्याचा एक अजब प्रकार अस्तित्वात होता.  १६८०च्या दरम्यान तंबाखूच्या व्यापाराच्या निमित्त्याने डच आणि १८२० ला वस्त्र व्यापा-याच्या निमित्त्याने ब्रिटिशांचा संबंध चीनसोबत सर्वप्रथम आला.  १८५० च्या दरम्यान एक ब्रिटिश बोटीतून चीनच्या एका बंदरावर उतरला.  बंदरामध्ये त्याला दोन चीनी भांडत असलेले दिसले.  त्यांच्या भांडणात त्याला एक अजब प्रकार दिसल्यामुळे तो तेथे थबकला.  भांडणारे चीनी तावातावाने बोलत होते आणि एकमेकांवर ओरडत होते.  मध्येच एकमेकाला मारण्यासाठी हात उगारत होते.  त्यांची भाषा जरी ब्रिटिशाला समजत नसली तरी भांडणातील तीव्रता त्यांच्या अर्विभावावरुन लक्षात येत होती.  एकमेकांना मारण्यासाठी अनेकवेळा हात उगारून देखील ते एकमेकांना मारत नव्हते.  युरोपातील भांडणात भाषेचा वापर अत्यंत कमी होता.  युरोपियन लागलीच हाणामारीवर येतात आणि त्यानेच भांडणाचा शेवट होतो.  त्यामुळे हया ब्रिटिशाच्या संयमाची देखील ही परीक्षा ठरत होती.  हे ऐकमेकाला मारुन भांडणाचा निकाल का लावत नाही ? केवळ मारण्यासाठी हात उगारून मागे घेत आहेत.  हया विचाराने तो अस्वस्थ झाला असतांनाच अखेर एकाने दुस-याच्या कानशिलात लगावली.  त्याचबरोबर ज्याच्या कानशिलात बसली त्याला लोक खांदयावर घेऊन नाचू लागले आणि ज्याने मारली होती तो मान खाली घालून तेथून निघून गेला.  हे पाहून ब्रिटिश आणखीनच बुचकळयात पडला.  त्याने आपल्या दुभाष्याला हा सर्वप्रकार नेमका काय आहे ? हे विचारले.  दुभाष्या त्याला म्हणाला की," हया दोघांच्या भांडणात ज्याने दुस-याच्या कानशिलात मारली तो पराभूत झाला आणि ज्याच्या कानशिलात बसली तो जिंकला.  कारण आमच्याकडे भांडणात शाब्दिक मारा सहन करून ही जो दुस-याला मारत नाही.  तो खरा कणखर अथवा बलवान समजला जातो.  भांडणात जो आपला संयम गमावून दुस-याला मारतो तो कमजोर अथवा दुर्बल समजला जातो.  त्यानुसार मार खाणारा विजयी आणि मारणारा पराभूत समजला जातो.  त्यामुळे ज्याने मार खाल्ला तो विजयी झाला म्हणून लोक त्याला खांदयावर घेऊन नाचत आहेत आणि ज्याने मारले तो पराभूत झाला म्हणून मान खाली घालून निघून गेला." आता कोठे ब्रिटिशाच्या डोक्यात प्रकाश पडला.  चीनच्या हया भांडणाच्या पद्धतीत देखील या वृद्धाचेच तत्त्वज्ञान दडलेले होते.  दरबारातून पदच्युत झाल्यानंतर अत्यंत सहजपणे हा वृद्ध अज्ञातवासात गेला.  त्याच्या तत्त्वज्ञानानुसार माणसाने स्वतःला कायम अपरिचित किंवा अज्ञात ठेवले पाहिजे.  त्याची ख्याती ऐकून चीनच्या सम्राटाने त्याला आपला प्रधान करण्याची मनीषा बाळगुन त्याला दरबारात घेऊन येण्यासाठी पाठवलेल्या दरबा-यांनाही त्याने भीक घातली नाही.  लौकिक जीवनातील पदांची,पुरस्कारांची,प्रतिष्ठेची आणि प्रसिद्धीची व्यर्थता जाणलेला तो 'महर्षि' लाओत्से होता.  लाओत्से चीनमधील राजकीय व सामाजिक अधःपतनाला कंटाळून चीनचा कायमचा त्याग करण्यासाठी सीमेपर्यंत पोहचला होता.  त्याला सीमेवर पोहचण्यास सायंकाळ झाली होती.  तसेच तो प्रवासाच्या श्रमाने थकला होता  त्यामुळे सीमवरील नाक्यावर मुक्काम करावा आणि दुस-या दिवशी आपल्या मायभूमीला अखेरचा दंडवत करून   अज्ञाताच्या अथांग अवकाशात कायमचे विलिन होऊन जावे.  अशी लोओत्सेची ईच्छा होती.  आपल्या मायभूमीवरील त्याचा शेवटचा थांबा म्हणजे हा सीमेवरील नाका होता.  सीमेवरील त्याचा हा मुक्काम जगाच्या इतिहासात अजरामर ठरणार होता.  हया मुक्कामात हा वेडा म्हातारा जे करणार होता.  त्याने  येणा-या प्रत्येक पिढीतील विचार करणा-या माणसांना हलवून जागं करणार होता.  ही माणसंसुद्धा जीवनाच्या प्रवासात काही काळ का होईना हया म्हाता-याजवळ विसावणार होती.
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                                                          


Comments

  1. Super .Today china needs such great personalities

    ReplyDelete
  2. मस्त खरी मानवीय भावनांची, दोन महायुद्ध ची कहाणी

    ReplyDelete
  3. तथागत भगवान बुद्धांचे तत्वज्ञान जगणारा खरा महर्षी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !