लाओत्सेला शिष्य मिळाला नाही !

कन्प‹युशियस एकदा 'झौओ' किंवा 'चाऊ' प्रांतात भ्रमंती करत होता.  त्यावेळी लाओत्सेला भेटण्याची ईच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली.  कायम राजकीय आश्रय आणि सुविधायुक्त जीवनाचा उपभोक्ता असलेला कन्प‹युसियस लाओत्सेला भेटीला गेला.  लाओत्से एका झोपडीवजा घरात राहत होता.  कन्प‹युशियसने लाओत्सेचे निवासस्थान पाहिले तेंव्हा त्याचा भ्रमनिरास झाला.  त्यावेळी कन्प‹युशियसचे वय चौतिस वर्षे आणि लाओत्से चौ-यांशी वर्षाचा होता.  अगदी तरुण वयात कन्प‹युशियसची ख्याती चीनमध्ये सर्वदूर झाली होती.  लाओत्सेच्या एकदम विरुद्ध त्याचे तत्त्वज्ञान होते.  सामाजिक आचरणाच्या सामर्थ्यावर चीनचे गतवैभव परत मिळवण्याची त्याची महत्वकांक्षा होती.  चीनच्या इतिहासाचे संकलन,संशोधन आणि सांगोपांग अभ्यास यांच्या माध्यमातून चीनी समाजाला त्याच्या उज्ज्वल गतकाळातून स्फूर्ती निर्माण देण्यासाठी कन्प‹युशियसची धडपड सुरु होती.  इतिहासाकडून प्रेरणा घेऊन त्याला नवा चीन घडवायचा होता.  आपले हे विचार त्याने लाओत्सेला ऐकवले.  लाओत्सेला मात्र स्वतःचा शोध घेऊन खरा माणूस शोधायचा होता.   कन्प‹युशियसचे विचार ऐकून लाओत्सेला हसू आले. तो कन्प‹युशियसला म्हणाला,"ज्या लोकांबद्दल तू बोलत आहेस ते लोक केव्हाच मरून गेले आहेत.  त्यांच्या हाडांचीही माती होऊन गेली आहे.  आपली घमेंड आणि आपल्या धावत्या ईच्छांना पायबंद घाल." लाओत्सेला सांगायचे होते की इतिहासातील मढे उकरून काही एक उपयोग होत नसतो.  आपल्याला वर्तमानात जगायचे असते.  वर्तमानातील माणूस सुधारला तर आजचे जग सुंदर होईल आणि भविष्य देखील उज्ज्वल होईल.  आपल्या विचारांना स्पष्ट करण्यासाठी लाओत्सेने आणखी एक महत्वाचे तत्त्व सांगितले,तो म्हणाला," भूतकाळात जगणारे नैराश्यात जगतात,भविष्यात जगाणारे भयग्रस्त-चिंताग्रस्त जगतात आणि वर्तमानात जगाणारे शांतीपूर्ण जगतात." लाओत्सेला हेच सांगायचे होते की वर्तमान जग बदलायचे असेल तर वर्तमानात जगावे लागेल.  माणसाने इतिहासाचे ओझे फेकले आणि भविष्याची चिंता सोडली तर त्याला आत्मशोध घेता येईल.  त्यामुळे त्याला आपल्यातील चांगुलपणाचा शोध घेता येईल आणि आजचे जग आपोआप चांगले होईल.  भगवान बुद्धांच्या वर्तमानात जगण्याच्या तत्त्वाशी साधर्म्य लाओत्सेच्या तत्त्वात आपल्या दिसून येते.  परम सुख-शांती असलेला स्वर्ग धरतीवर निर्माण करायाचा असेल तर इतिहास आणि भविष्य दोन्हींमध्ये रमणे सोडावे लागेल.  कारण सुख-शांती भूतकाळात आणि भविष्यकाळात नसून आपल्या मनात दडलेली आहे.  लाओत्सेच्या बोलण्याने कन्प‹युशियसच्या अहंकाराला धक्का बसला होता.  राजाश्रयाने राहणारा कन्प‹युशियसला आणखी एक धक्का बसणे बाकी होते.  कन्प‹युशियस लाओत्सेला भेटायला आला तेंव्हा तो अत्यंत थाटामाटात आलेला होता.  त्याचा पोशाख उंची आणि भडक होता.  एकप्रकारचा ताठा त्याच्यात होता.  लाओत्सेच्या झोपडीत आल्यानंतर तेथे बसण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उंच आसन अथवा खुर्ची नव्हती.  आपल्यासारख्या जगत मान्य गुरुने उच्चासनाशिवाय कसे बसायचे? असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला.  कन्प‹युशियसची अडचण लाओत्सेच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही.  कन्प‹युशियसचा अहंकार त्याला आपल्या झोपडीत जमिनीवर बसण्याच्या आड येत आहे.  हे लक्षात आल्यावर लाओत्से म्हणाला,"माझ्या झोपडीत कुठेही बैस.  कारण कुठेही बसलास तरी ही झोपडी तुझी मुळीच दखल घेणार नाही किंवा फिकर करणार नाही.  एवढच काय तुझ्या बसण्याची ती मुळीच दखल घेणार नाही,की थोडीदेखील चिंता करणार नाही.  कुठेही बैस.  मी इतका वेळ बसलोय ना इथं,पण या झोपडीने माझ्याकडे ढुंकनही पाहिलेले नाही." लाओत्सेने त्याच्या हया साध्या शब्दांमधून कन्प‹युशियसलाच नव्हेत तर एकूणच मानवी समाजाला मोठा संदेश दिला.  हया जगात जगतांना प्रत्येक जण स्वतःला आणि स्वतःच्या अहंकाराला सतत गोंजारत असतो.  हया जगात मी,माझा मान-सन्मान आणि माझा अहंकार अत्यंत महत्वाचा आहे.  या भ्रमात राजापासून रंकापर्यंत सगळे जगत असतात.  मात्र प्रत्येकाला एका गोष्टीचा विसर पडलेला असतो की तुझ्यासारखे अगणित असे या जगात आले आणि गेले.  त्याची साधी दखल देखील कधी  या सृष्टीने घेतलेली नाही.  पृथ्वीवर अधिराज्य करण्याची महत्वकांक्षा ठेवलेल्या सगळयांना अखेर या मातीने आपल्यात सामावून घेतले आहे.  कबीरसाहेबांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास,"माटी कहे कुम्हार से,तू क्या रोंदे मोहे,एक दिन ऐसा आएगा,मैं रोंदूगी तोहे। आये हैं तो जायेंगे,राजा रंक फकीर,एक सिंघासन चडी चल,एक बंदे जंजीर।" लाओत्सेच्या शब्दांनी कन्प‹युशियसचे गर्वहरण झालेलेचे होते.  मात्र पीळ गेलेला नव्हता.  पुढे लाओत्से त्याला म्हणाला,"खरा सूज्ञ सदैव निगर्वी असतो आणि आपल्या ज्ञानाचा पाहणाराला पत्ताही लागू देत नाही.  इतकेच नाही तर तो अगदी बावळटपणाची मुद्रा धारण करून जगात वावरतो." गर्वहरण होत असातांना ही माणसाला संताप येतच असतो.  अखेर कन्प‹युशियस खाली बसला  मात्र मनातून कुरकुरतच तो खाली बसला.  पण बेचैन होता.  कारण तो कुठे गेला म्हणजे असा जमिनीवर बसत नसे.  लाओत्सेला कन्प‹युशियसचा हा राग व बेचैनीही जाणवली.  तो त्याला म्हणाला," शरीर तर बसलेले दिसतं आहे.  आता तू देखील बैस,आरामात ." त्यावर कन्प‹युशियस म्हणाला," हे काय? बसलो तर आहे?" लाओत्से पुन्हा हसला आणि म्हणाला,"तुझे शरीर बसले,पण तुझे मन कुठे बसले आहे ! अहंकार तर मागे उभाच आहे !" लाओत्सेला येथे हेच सांगायचे होते की माणूस जगात विनम्रपणाचे किवां साधेपणाचे ढोंग करु शकतो; परंतु मनापासून विनम्र किंवा साधे वागणे हे महत्वाचे असते.  त्यासाठी साधनेची आवश्यकता असते.  अहंकाराची पुटं जोवर मनावर आहे.  तोपर्यंत मानवाची जगातील कोणतीही कृती म्हणजे ढोंगच ठरते.  लाओत्सेने आपल्या मनातील अहंकार ओळखला याची जाणीव झाल्याने कन्प‹युशियस शरमला होता.  अहंकारात तामझामसह शिष्यगण जमवून फिरणा-या कन्प‹युशियसला आज खरा गुरु सापडला होता.  त्याच्या जीवनविषयक संकल्पना आणि तत्त्वज्ञान यांना हादरे बसत होते.  नैतिक विचारवंत असणा-या कन्प‹युशियसला लोकांना सदाचार कसा शिकवावा याविषयी चिंता सतावत होती.  चोरी,निंदा,क्रोध,हिंसा सोडून समाजाने प्रामणिक,क्षमाशील व शांतिप्रिय जीवनाचा स्वीकार करावा.  अशी शिकवण देण्याचा प्रयत्न तो सातत्याने करत होता.  आपल्या शिकवणूकीला लाभादायक असे काही ऐकण्याच्या हेतूने त्याने लाओत्सेला काही प्रश्न विचारले.  त्यांच्यातील ही प्रश्नोत्तरे अत्यंत महत्वाची आहेत.  त्याचा पहिला प्रश्न होता की," आपण लोकांना त्यांनी चांगले कसे व्हावे हे सांगा." लाओत्से उत्तर देतांना म्हणाला," जोपर्यंत त्यांच्याकडून वाईट होत नाही.  तोवर लोक भले कसे होतील ? वाईट होईल तेव्हाच लोक भले होऊ शकतील.  मी लोकांना वाईट करू नका,वाईट वागू नका असेच सांगत असतो.  मी चांगल्या वागण्याची फिकर करीत नाही. मी तर अशी अवस्था यावी याची वाट पाहत आहे की,जिथे चांगुलपणाचाही पत्ता लागू नये.  कोण भला आहे हे देखील कळू नये. " लाओत्सेच्या बोलण्याने कन्प‹युशियस कन्प‹युझ झाला.  तो म्हणाला,"लोक अप्रामाणिक आहेत,त्यांना प्रामाणिकता शिकवला पाहिजे." लाओत्से म्हणाला,"ज्या क्षणापासून तू प्रामणिकपणाविषयी बोलू लागलास त्याच क्षणापासून अप्रामणिकपणा दृढ झाला.  लोक प्रामाणिकतेचा उल्लेखही करणार नाहीत. अशा दिवसाची मी वाट पाहतो आहे." लाओत्सेच्या उत्तरांनी कन्प‹युशियससारखा गोंधळला होता तर सामान्य माणसांची काय बात.  लाओत्सेचे सांगणे अत्यंत सरळ होते.  त्यासाठी आपल्या मनातील 'चांगले-वाईट' किंवा 'पाप-पुण्य' हया संदर्भातील पारंपरिक संकल्पना दूर कराव्या लागतात.  लाओत्सेचे म्हणणे असे होते की," सर्व नैतिक चिंतक आणि समाज चांगले आणि वाईट हया दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत.  असे मानत असतात  वाईटपणाचा त्याग केल्यास चांगले निर्माण होईल,अशी त्यांची समजूत असते.  मात्र चांगले व वाईट दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  एकाचा त्याग करुन दुस-याची प्राप्ती होणार नाही.  फेकायचे तर दोन्ही फेकून द्या.  नाहीतर एक सांभाळायला गेलात तर दुसरेही त्याच्या पाठोपाठ येतेच.  अधिक सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास,'मी चांगले करत आहे.  ही भावना माझ्यात वाईट देखील आहे.  हे सिद्ध करत असते.  मी प्रामणिक आहे.  हे सांगतांना अप्रामणिकतेला आपण मान्यता देत असतो.' माणसामधील मधील 'मी' जोपर्यंत समग्र सृष्टीशी आपले एकरुपत्व अनुभवत नाही.  एवढेच नव्हे तर त्याने स्वतःला जे वेगळे मानले आहे.  ते सोडून तो सृष्टीत विरघळून जात नाही.  तोपर्यंत मानवातील हे द्वैत संपुष्टात येणार नाही.  सृष्टीपेक्षा स्वतःला वेगळा व श्रेष्ठ असण्याचा जो भाव माणसाने निर्माण केलेला आहे.  तोच सर्व दुःखांचे कारण आहे.  माणूस ज्या दिवशी स्वतःला निसर्गाचा व सृष्टीचा अविभाज्य भाग मानू लागेल.  खरे तर इतर सजीवांप्रमाणे तो सृष्टीचा भाग आहेच.  इतर सजीवांमध्ये वेगळेपणाचा भावच नसतो,त्यामुळे निसर्गचकात ते अत्यंत सहज-नकळतपणे आपली भूमिका वठवत असतात.  आपण ही भूमिका वठवत आहोत याची वेगळी जाणीव देखील नसते.  त्यामुळे त्यांच्यात चांगले-वाईट किंवा प्रामाणिक-अप्रामाणिक असे द्वंद निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही.  माणसाने स्वतःला निसर्गापेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानले,तेंव्हापासूनच त्याच्या जीवनात हे प्रश्न निर्माण झाले.  लाओत्सेच्या रुपानं कन्प‹युशियसला ख-या अर्थाने गुरु मिळाला होता.  याचे त्याने कधीही जाहीर प्रकटन केले नसले तरी त्याच्यासारख्या नैतिक तत्त्वज्ञानाचा सुंदर मुखवटा घडवून बसलेल्या अनेकांच्या चेह-याचा एक्सरे म्हणजे लाओत्से होता.  यामुळेच जगाला लाओत्से मिळाला होता; परंतु लाओत्सेला शिष्य मिळाला नाही.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                                                        


Comments

  1. आपले वर्तमान जग बदलायचे असेल तर वर्तमानात जगावे व आपल्या अहंकारचा त्याग करावा हे तत्त्व सांगणारा हा लेख खूप छान आहे

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिखाण आहे.विचारांना चालना देणारा लेख आहे.असेच लिहीत रहा, वाहेगुरुजी सहाय्य होवो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !