अमेरिकन भूमीवरचे अखेरचे युद्ध..

२४ ऑगस्ट १८१४ चा दिवस होता.  ब्रिटिश आरमाराच्या युद्ध पोता 'चेस पीक' च्या खाडीत आग ओकत होत्या.  दुबळया अमेरिकन आरमाराची दाणादाण उडाली होती.  अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी. सी.  पर्यंत आरमार पोहचले.  समुद्राच्या लाटांसारखे तोफ गोळे वॉशिंग्टन डी. सी.  वर येऊन आदळत होते.  ब्रिटिश फौजा राजधानीत शिरल्या होत्या.  त्यांनी 'कॅपिटॉल हिल' नावाने ओळखले जाणारे, अमेरिकेचे संसद भवन जाळून टाकले.  त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवास स्थान असलेल्या 'व्हाईट हाऊस' कडे वळवला.  काही वेळातच व्हाईट हाऊसचे रुपांतर बर्निग हाऊस मध्ये झाले.  अमेरिकेचा गौरव असलेले व्हाईट हाऊस आणि कॅपिटॉल हिल हया दोन्ही ईमारती धडधडा जळत होत्या.  एवढी मोठी नामुष्की अमेरिकेच्या पदरात पडली होती.  अमेरिकने आपला सच्चा मित्र फ्रान्सला धोका देऊन ज्याविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध लढले. त्या इंग्लंडशी मैत्री करार केलेला होता.  असे असतांना देखील इंग्लंडच्या फौजा अमेरिकेच्या संसद भवन आणि राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान बेचिराख करतात.  हे समजून घेण्यासाठी आपल्याला सन १८०० मध्ये जावे लागते.  १८०० मध्ये इंग्लंड आणि फ्रांस युद्ध पेटलेले होते.  युद्ध काळात दोन्ही देशांनी आपल्याकडे पोहचणा-या अमेरिकन व्यापारी जहाजांची नाकेबंदी करण्यास सुरवात केली.  दोन्ही राष्ट्रांनी अमेरिकन व्यापारी जहाजांचा मार्ग रोखला.  ब्रिटिशांनी तर जहाजे जप्त केली आणि त्यावरील खलाशांना कैद केले.  एवढेच नव्हे तर या खलाशांना इंग्लंडच्या बाजून युद्धात लढण्यास भाग पाडले.  १८०९ मध्ये थॉमस जेफरसन यांनी स्वाक्षरी केलेला 'एम्बार्गो ॲक्ट' अमेरिकन काँग्रेसने बदलला.  त्यानुसार ब्रिटन आणि फ्रांस दोन्ही देशांशी व्यापार संबंध विच्छेद करण्यात आला.  त्यावेळी नेपोलियन बोनापार्ट याने सहकार्याची भूमिका घेतल्याने फ्रांसशी व्यापार सुरु झाला.  मात्र ब्रिटनबरोबर सर्व व्यापारी संबंध तोडण्यात आले.  ब्रिटनला याचा वचपा काढायचा होता.  त्यासाठी कारणाच्या शोधात असलेल्या ब्रिटनला १८११ साली अमेरिकेची खोड मोडण्याची संधी चालून आली.  थॉमस जेप‹Šसरनच्या काळात त्याने नेपोलियनकडून 'न्यू ऑर्लिन्स' शहर विकत घेण्याचे ठरवले होते.  नेपोलियनला युद्धामुळे पैशाची गरज असल्याने, हे शहर ज्या 'ल्युसियाना' प्रांतात होते.  तो संपूर्ण ल्युसियाना प्रांतच त्याने जेफरसनला एक कोटी पन्नास लाख डॉलर्सना विकला होता.  २० डिसेंबर १८०३ रोजी अमेरिकेचा ध्वज 'न्यू ऑर्लिन्स' शहरात फडकवण्यात आला आणि 'ल्युसियाना' अमेरिकेचा प्रांत झाला.  १८१० मध्ये अमेरिकने स्पेनकडून फ्लोरिडाचा काही भाग विकत घेतला आणि तो देखील ल्युसियाना प्रांतात समाविष्ट केला.  या सर्व घडामोडींमुळे अमेरिकेची पश्चिमकडे विस्तार करण्याची प्रवृत्ती वाढली होती.  अशा परिस्थितीत तेथे जे उरलेसुरले रेडइंडियन्स आदिवासी होते.  त्यांच्या मध्ये आपली भूमी अमेरिका बळाकावेल अशी भावना बळावली.  इंग्रंजांनी आपल्या राजकीय हातखंडयानुसार रेडइंडियन्सला भडकवण्याचा प्रयत्न सुरु केला.  ब्रिटिशांनी या भागात आपली वसाहत निर्माण करतांना, ज्या रेडइंडियन्सची अतोनात कत्तल केली होती.  त्यांच्यावर अमानवी अत्याचार केले होते. त्यांच्याबद्दलच आता ब्रिटिशांना खोटा उमाळा आला होता. हा उमाळा म्हणजे केवळ अमेरिकेविरुद्ध या रेडइंडियन्सना भडकवण्याचे हे षडयंत्र होते.  'टिक्युमेश' हा ल्युसियानातील रेडइंडियन्सचा नेता होता.  त्याच्या भावाचे नाव होते 'प्रॉफेट'.  टिक्युमेश अमेरिकेविरूद्ध इतर रेडइंडियन्स कबिल्यांची साथ मिळवण्यासाठी दक्षिण अमेरिकेत गेला होता.  तिकडे जातांना आपला भाऊ प्रॉफेटच्या हातात आपल्या 'टिपेकानोइ' या नगराचा कारभार देऊन गेला होता.  या संधीचा लाभ उठवत. १८११ च्या हिवाळयात इंडियानाचा गव्हर्नर विल्यम हॅरिसन याने प्रॉफेटच्या टिपेकानोई नगरावर हल्ला केला.  हया लढाईत हॅरिसनचा विजय झाला.  प्रॉफेट आणि त्याचे रेडइंडियन्स यांना ही भूमी सोडून पळून जावे लागले.  अमेरिकेच्या या कृतीमुळे पश्चिम अमेरिकेतील रेडइंडियन्सला असुरक्षित वाटू लाग.ले  त्यामुळे स्वसंरक्षणासाठी ब्रिटनची मदत घ्यावी.  असा विचार त्यांनी केला.  ब्रिटनचे सहकार्य लाभले, तर अमेरिका आपल्याला आपल्या मुलखातून हुसकावू शकणार नाही.  अशी त्यांची भाबडी समजूत होती.  इंग्लंड याच संधीचा प्रतिक्षा करत होता.  रेडइंडियन्ससाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीला खतपाणी घातले.  यासाठी रेडइंडियन्सला कॅनडाचे प्रशासकीय कर्मचारी देखील अमेरिकेविरुद्ध भडकवत होते.  अशावेळी टिपेकानोइच्या लढाईतील विजयाने विल्यम हॅरिसन अमेरिकेत युद्धवीर अथवा हिरो झाला होता.  देशभर विजयोन्माद ओसांडून वाहत होता.  अमेरिकन संसदेतील काही उग्र भूमिका असणा-या पक्षांचे प्रतिनिधी अमेरिकेने कॅनडा हस्तगत करावा याचा आग्रह करु लागले.  त्यांनी एक गट तयार केला.  त्याचे नाव ठेवले 'वॉर हॉक्स'.  दरम्यान १८१२ ची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक पार पडली.  निवडणूकीत वॉर हॉक्स गटाचे काही प्रतिनिधी अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आले.  राष्ट्राध्यक्ष जेम्स मेडिसन यांनी देशातील हवेचा अंदाज घेत.  संसदेत इंग्लंडच्या विरोधातील तक्रारींचा पाढा वाचला आणि 'घूँसे का जबाव घूँसे देंगे' अशी भूमिका घेतली.  यामुळे वॉर हॉक्स गटाला प्रोत्साहन मिळाले.  फेडरलिस्ट पक्ष मात्र याच्या विरोधात होता.  इंग्लंड नेपोलियन बोनापार्टसारख्या हुकूमशाही प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी लढत असतांना आपण इंग्लंडला त्रास देऊ नये.  अशी त्यांची भूमिका होती.  त्यांचा आवाज 'नगारखान्यातील पिपाणी' ठरला.  अखेर इंग्लंडविरोधात अमेरिकेने युद्धाची घोषणा केली.  तसेच देशविरोधी म्हणून फेडरलिस्ट पक्षाची ती अखेरची घटका ठरली.  देशद्रोही म्हणून अमेरिकेच्या राजकारणातून यानंतर फेडरलिस्ट कायमचे नष्ट झाले  कॅनडा काबीज करण्यासाठी युद्धाची घोषणा करणा-या अमेरिकेची सैन्य शक्ती त्यावेळी केवढी होती.  हे पाहणे महत्वाचे ठरते.  अमेरिकेची सेना ६७०० सैनिकांची होती.  साधनसामुग्रीचा अभाव आणि सक्षम सेनानायक नसलेली ही सेना होती.  अमेरिकेच्या आरमारात केवळ १२ युद्धपोता होत्या.  त्यापैकी सर्वात मोठी ४४ तौफा असलेली एक युद्धपोत होती.   तोफा असलेल्या २०० नावा होत्या.  ज्या स्वतःच्या सागरी किना-यांच्या संरक्षणासाठी देखील असमर्थ होत्या.  सरकारी खजिन्यात खडखडाट होता.  युद्धासाठी युद्धरोखे काढण्यात आले.  जे अत्यंत कमी भावात विकले गेले.  म्हणजे अर्थ आणि लष्कर दोन्ही दृष्टीने इंग्लंडसमोर अमेरिका कस्पट होता.  अमेरिकेचा हा युद्धोन्माद उंदराने सिंहाला आव्हान देण्यासारखा होता.  अती उत्साहाने अमेरिकच्या भुक्कड फौजेने कॅनडातील ब्रिटिश वसाहतींवरच सर्वप्रथम हल्ला केला.  'मस्ती में आकें मौंत कों भूल गये', असाच हा प्रकार झाला.  सामर्थ्यशाली आणि शिस्तबद्ध ब्रिटिश फौजांनी अमेरिकन सैन्याची दाणादाण उडवली.  १६ ऑगस्ट १८१२ रोजी डेट्रॉइट ब्रिटिश फौजांनी जिंकून घेतले.  पण पश्चिमेच्या सीमेवर अमेरिकेची परिस्थिती चांगली होती.    अमेरिकन जनरल ऑलिव्हर हजार्ड पेरी याने 'बॅटल ऑफ लेक इरी' मध्ये चांगले यश मिळवले आणि सप्टेंबर १८१३ मध्ये त्याने डेट्रॉइट शहर परत जिंकून घेतले.  १८१४ चे साल उजडले आणि युरोपात नेपोलियन बोनापार्टचा अंतिम पराभव झाला.  आता ब्रिटिश फौजेने आपले लक्ष अमेरिकेकडे वळवले.  ब्रिटनचा मोठा आरमारी बेडा आणि फौजा आता अमेरिकेच्या दिशेने निघाल्या.  त्यांच्यासमोर अमेरिकेचा टिकाव लागणे अशक्यच होते.  अखेर ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने चेस् पीक च्या खाडीवर हल्ला केला आणि फौजेने वॉशिंग्टन डी. सी.  गाठले.  ज्याचा परिणाम म्हणजे २४ ऑगस्ट १८१४ रोजी अमेरिकेची संसद आणि व्हाईट हाऊस जळून भस्मसात होणे.   १३ सप्टेंबर १८१४ रोजी ब्रिटिश आरमाराने बाल्टिमोरच्या किल्ल्यावर सतत २५ तास तोफांचा भडिमार केला.  अमेरिकन सैन्याने यशाशक्ती झूंज दिली.  शेवटी ब्रिटिश सैन्याने आणि आरमाराने चेस पीक खाडी मधून माघार घेतली.  ब्रिटिशांनी आपली सोंड आता न्यू ऑर्लिन्सकडे वळवली.  ८ जानेवारी १८१५ रोजी ब्रिटिश फौजांनी न्यू ऑर्लिन्सवर जोरदार हल्ला चढवला.  येथे त्यांना एका अमेरिकन योद्धयामुळे पराभव पत्कारावा लागला.  हा योद्धा भविष्यात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला.  हा योद्धा म्हणजे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष ॲड्रयू जॅक्सन.  खरे पाहिले तर ८ जानेवारीच्या लढाईच्या आधीच २४ डिसेंबर १८१४ रोजी इंग्लंड-अमेरिका युद्धबंदी करार झाला होता.  ज्यामुळे युद्ध समाप्त झाले होते.  युद्धबंदी कराराची बातमी ब्रिटिश आणि अमेरिकन फौजांपर्यंत अद्याप पोहचली नव्हती.  त्यामुळे ८ जानेवारीची लढाई झाली.  अमेरिकेच्या भूमीवर लढल्या गेलेले हे आजवरचे अखेरचे युद्ध ठरले.  अमेरिकेतील रेडइंडियन्सच्या माध्यमातून द्विराष्ट्रवादाची बीजं पेरण्याचा ब्रिटनचा प्रयत्न मात्र अमेरिकेत सफल होऊ शकला नाही.  ब्रिटिशांची 'डिव्हाइड अँन्ड रूल' थेरेपी अमेरिकेत फसली.  कारण अमेरिकनसुद्धा मुळचे ब्रिटिशच होते.  त्यांची ही थेरेपी भविष्यात आशिया खंडात यशस्वी होऊ शकली.  कारण धर्माच्या नावाने आपसात लढणा-यांची आशिया खंडात कमी नव्हती.  आजही अशांची कमतरता नाही.  त्यामुळे आजही आशिया खंड धगधगतच आहे.  आता अमेरिका आशिया खंडाला धगधगत ठेवण्याची कामगिरी बजावतो आणि आपले उखळ पांढरे करतो.  याला कारण ब्रिटिशांशी झालेल्या लढाईने अमेरिकेवर दुरगामी परिणाम केले.  एक राष्ट्र म्हणून अमेरिका या युद्धामुळे एकजूट झाला.  त्याचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आणि देशप्रेम वृद्धिंगत झाले.  आपसात लढण्यातील व्यर्थता त्याच्या लक्षात आली.  त्यामुळे विकासाच्या आणि प्रगतीच्या आकाशात गरूड भरारी घेण्याची स्वप्नं प्रत्येक अमेरिकन माणसाच्या डोळयात तरळू लागली.  आता एक महान देश म्हणून जगाच्या क्षितीजावर उगवण्यासाठी अमेरिकेने वाटचाल सुरू केली होती.  
  प्रा.डॉ.राहुल हांडे,
  भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !