कर्मयोगाचा महासागर : संत सांवता माळी
"कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी।", असे सांगणारे संत सांवता माळी हे भागवत संप्रदायाच्या मांदियाळीतील एक अनन्यसाधारण संत आहेत. आपल्या कर्मातच ईश्वराचा शोध घेत सांवतोबा संतशिरोमणी झाले. आपले कर्म हेच विठठल आणि विठठल हेच कर्म हा अखंड ध्यास म्हणजे सांवतोबांचा जीवनप्रवास. भक्ती वा अध्यात्म यांचे स्तोम माजवत कर्तव्याकडे पाठ करुन परपोषी जीवन जगणा-या सर्वांसाठीच सांवतोबांचे जीवन म्हणजे झणझणीत अंजनच म्हणावे लागेल. "सांवता सागर ।प्रेमाचा आगर।", असे संत नामदेवांनी सांवतोबांचे अत्यंत समर्पक व नेमके वर्णन केलेले आहे. संत नामदेवांनी भागवत धर्माचे मंदिर उभे करतांना अठरा पगड जातीतील संतांची जी मांदियाळी फुलवली त्यात माळी समाजातील संत सांवता माळी यांचे स्थान निश्चितच सर्वात अनन्य आहे.सोलापुर जिल्हयातील माढा तालुक्यातील 'अरणभेंडी' हे सांवतोबांचे गाव पंढरपुरच्या जवळच वसेलेले आहे. त्यांचे आजोबा 'दैवू माळी' पोट भरण्यासाठी अरण येथे येऊन स्थायिक झाले.या घराण्याचे मुळ गाव मिरज संस्थानातील 'औसे' होय. ते पंढरीचे वारकरी होते. पुरसोबा आणि डोंगरोबा ही त्यांची दोन मुले देखील विठ्ठल भक्त होते. पुरसोबाचा विवाह पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. ती देखील विठ्ठल भक्त होती. असा पांडुरंग भक्तीचा वारसा लाभलेल्या या दांपत्याच्या पोटी, सन १२५० मध्ये सांवतोबांचा जन्म झाला. विठ्ठल भक्ती व वारकरी संप्रदायाचे संस्कार हे त्यांना मातेच्या उदरातच प्राप्त झाले असे म्हणावे लागेल. आपल्या जन्म व जन्म गावविषयी सांवतोबा म्हणतात,
"धन्य ते अरण,रत्नांचीच खाण । जन्मला निधान सावता तो ।।सावता सागर,प्रेमाचा आगर । घेतला अवतार माळया घरी ।।",
'भानवसे रुपमाळी' हे घराणे असलेल्या 'भेंड' गावच्या जनाई सोबत सांवतोबांचा विवाह झाला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. प्रपंच नेटका करत सांवतोबांनी केवळ परमार्थच साधला नाही तर संतत्व प्राप्त केले. 'साव' म्हणजे शुद्ध चारित्र्य, सज्जनता, सभयता याच्यासाठी सांवता हा भाववाचक शब्द बनतो. सांवतोबांचे अखंड जीवन याचेच प्रतिक आहे. उभे आयुष्य विठ्ठलमय जगलेले सांवतोबा एकदाही पंढरीला न जाता पांडुरंगाचे लाडके भक्त झाले, नव्हे तर संतत्वाला पोहचले, हे एखादयाला गुढच वाटेल. ऐहिक जीवनात कर्तव्याकडे पाठ न करता, त्यातच पांडुरंग शोधणा-या सांवतोबांसाठी हे अत्यंत सहज झाले. "न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची", असा अनुभव त्यांनी साक्षात तर घेतलाच पण इतरांनाही हा सहजमार्ग दाखविला. अवघे ४५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सांवतोबांनी समरसुन जीवन जगतांना, त्यातून अलिप्त देखील राहण्याची किमया साधली. कर्तव्याकडे व जीवनाकडे पाठ न फिरवता शुद्ध अंतःकरणाने केवळ नामास्मरणाच्या सामर्थ्यावर " वैकुंठीचा देव आणू कीर्तनी", ही आपली प्रतिज्ञा साक्षात उतरवली. म्हणून एकदा ही पंढरीला न गेलेल्या सांवतोबांना भेटण्यास आजही विठ्ठल पालखीमधून अरणला येतो.
"स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।", किेवा "सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।"
अशा त्यांच्या अंभगांमधून त्यांचा कर्मवाद ठळकपणे अधोरेखित होतो. सर्वसंगपरित्याग न करता, प्रपंच करता करता आपल्या प्रत्येक कर्मात पांडुरंग शोधला तर सहज परमार्थ साधता येतो, हे सांवतोबांनी दाखवून दिले. यासाठी त्यांनी नामसंकीर्तनावर भर दिला. आज सांवतोबांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग एखादयाला संख्येने कमी वाटू शकतात,परंतु जो खरा भक्त आहे,परमार्थ मार्गी आहे, परमतत्वाचा ज्याला नेमका बोध झाला आहे,जो प्रामाणिकपणे त्या मार्गावर चालत आहे, ज्याला आपल्या भक्तीचे वा अभ्यासाचे अवंडबर करुन बांडगुळाप्रमाणे पोट भरायचे नाही,प्रसिद्धी मिळवून मिरवायचे नाही,त्याला अधिक बोलण्याची आवश्यकताच भासत नाही. त्यांच्या या अभंगांचे अवलोकन केल्यास समाजातील दांभिकता,अंधश्रद्धा,कर्मठपणा व बाहय अवडंबर यांच्यावर निर्भीडपणे कोरडे ओढलेले दिसतात. अनुभवशुन्य पोथीपंडितांसाठी ते म्हणतात,"
योग-याग तप धर्म। सोपे वर्म नाम घेता।। तीर्थव्रत दान अष्टांग । याचा पांग आम्हा नको।।",
येथे महाराष्ट्रातील समाजप्रबोंधनाचा प्रवाह सांवतोबापासून महात्मा ज्योतीबा फुलेंपर्यंत अखंड वाहतांना दिसतो.
"आमची माळीयाची जात,शेत लावू बागाईत",
असे म्हणणा-या सांवतोबांनी आपल्या कर्मभक्तीतून मराठी समाजाच्या मनाचीच मशागत केलेली आहे. परमतत्वाच्या साक्षात्काराने तन्मयानंदात तल्लिन सांवतोबांनी मोक्षाची अपेक्षा कधीच धरली नाही. नामरुपी तरफेच्या सामर्थ्यावर भवसागर पार करणा-या सांवतोबांनी आपल्या समवेत आपल्या वारकरी बांधवांना तारुण नेण्याचा प्रयत्न केला. कर्मयुक्त भक्तीचा महामार्ग त्यांना दाखविला. यासाठीच ते म्हणतात,
"प्रपंची असूनि परमार्थ साधावा।वाचे आळवावा पांडुरंग।",
पंढरीत असून केवळ शुद्र म्हणून पांडुरंगाचे दर्शन घेऊ न शकणा-या संत चोखोबांनी आपल्या भावपूर्ण भक्तीने विठ्ठल पाहिला,तर
"लसण मिरची कोथंबिरी।अवघा झाला माझा हरि ।।मोट,नाडा,विहीर,दोरी।अवघी व्यापिली पंढरी।।"
अशा अनुभूतीतून सांवतोबांनी पांडुरंग आणि पंढरी अनुभवली. ज्ञानेश्वर व नामदेव यांच्या सोबत सांवतोबांच्या मळयात आलेला विठ्ठल सांवतोबांच्या छातीत लपतो, या कथेतील कल्पना बाजूला केल्यास आपल्या कळते की सांवतोबांची भक्ती किती महान होती याची प्रचिती ज्ञानेश्वरांना आणि नामदेवांनाही आली होती. सांवतोबा अंर्तबाहय विठ्ठलमय झाले होते. सांवतोबांचे अभंग काशिबा गुरवाने लिहून ठेवले, तर महादेवशास्त्री, कामाजी माळी, शरिबा अशा अरण गावातील अनेकांनी सांवतोबांच्या मागून भक्तिगंगेत स्नान केले. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७(दि.१२ जुलै १२९५) रोजी सांवता महाराज अनंतात विलीन झाले. येथेच त्यांचे समाधीमंदिर आहे. सन १८८८मध्ये नामदेव गवळी यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. सांवतोबांचे वंशज असणारे वसकर घराणे इथली व्यवस्था पाहतात.
"'नको तुझें ज्ञान,नको तुझा मान।माझें आहे मन वेगळेंची।। नको तुझी मुक्ति, नको तुझी मुक्ति। मज आहे विश्रांती वेगळीच।। चरणी ठेवुनी माथा,विनवितसे सांवता। ऐका पंढरीनाथा,विज्ञापना।।"
असा संदेश देणा-या सांवता महाराजांचा आदर्श प्रपंच करत परमार्थ साधणा-या प्रत्येकाने घ्यावा असा आहे. आपले कर्म न त्यागता वा त्याच्याकडे पाठ न करता वा केवळ परमार्थाच्या नावावर उदरभरण न करता संतत्वाला पोहचण्यासाठी सांवतोबांना आपल्या मनाशी संघर्ष करावा लागला नाही, कारण त्यांचे ध्येय त्यांना नेमके माहित होते आणि त्याच्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग ही त्यांच्यासमोर स्पष्ट होता. यामुळेच त्यांनी कोणालाही गुरु करण्याचा प्रपंच केला नाही. आपल्या मनाची शुद्धताच त्यांना कायम महत्वाची वाटली. अशा या कर्मयोगी संताच्या स्मरणार्थ श्रमदान शिबीरं आयोजित करून तेथे आजच्या समाजाला कर्मभक्तीचे संस्कार देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
प्रा.डॉ. राहुल हांडे,
भ्रमणध्वनी - ८३०८१५५०८६
Comments
Post a Comment