भागवत धर्माचे महासमन्वयक : संत नामदेव
जग जिंकणा-या सिंकदराला पंजाबच्या भूमीतून माघार घेत परत फिरावे लागले. त्या ठिकाणी भेट दिल्यावर विनोबा भावे म्हणाले होते,"सिंकदर युद्धाने पंजाब जिंकू शकला नाही,पण नामदेवाने तो प्रेमाने जिंकला." आपल्या नामसंकिर्तनातून प्रेमभक्तीच्या सामर्थ्यावर मध्ययुगीन काळात नामदेवांनी मध्य भारताचे मन जिंकले. नरसी मेहता,मीराबाई आणि कबीर यांना प्रेरणा देणारे नामदेव राष्ट्रीय स्तरावर पोहचणारे पहिले मराठी संत ठरले. पंजाब मधील समाजमनावर नामदेवांच्या व्यक्तिमत्वाचा आणि सहज सुगम भक्तीचा एवढा प्रभाव पडला की शीख धर्माच्या 'गुरुग्रंथ साहेब' मध्ये नामदेवांची ६१ हिंदी पदे समाविष्ट करण्यात आली. पंजाबमध्ये भागवत संप्रदायाचे बीजारोपण नामदेवांनी केले,त्यालाच आज तेथे नामदेव संप्रदाय म्हणतात. भारतातील शीख समाज सर्वप्रथम जगाच्या विविध भागात पोहचल्यामुळे संत नामदेव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचणारे पहिले मराठी संत ठरतात.वारकरी संप्रदायाची वैचारिक पायाभरणी करणारे मराठीतील आद्य आत्मचरित्रकार,आद्य प्रवासवर्णकार,आद्य कवी कुलगुरु,आद्य किर्तनकार संत नामदेव महाराष्ट्रात कायमच दुर्लक्षित राहिले. १३ व्या शतकात मराठी भाषेला तात्विक बैठक देण्याचे काम संत नामदेवांनी केल हे आज फार कमी लोकांना माहित आहे. घुमान या पंजाबमधील गुरुदासपुर जिल्हयातील छोटया गावात त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची २०वर्षे व्यतीत केली. नामभक्ती,आत्मचिंतन व संकिर्तनात रंगलेल्या नामदेवांनी पंजाबच्या भूमीला आपलेसे केले. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर सरदार जस्सासिंग रामगरिया यांनी एक सुंदर मंदिर बांधले आणि जवळच असलेल्या तलावाचे नूतनीकरण पुढे महाराजा रणजितसिंग यांच्या सासुबाई राणी सदाकौर यांनी केले. भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांच्या सुचनेवरुन सन १९८६ मध्ये पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन स्थापन करण्यात आले. उत्तर भारतातील पंजाब,राजस्थान,हिमाचल प्रदेश,मध्य प्रदेश,आणि उत्तर प्रदेशात नामदेवांची ८०० हून अधिक मठ-मंदिरे आहेत.जिथे त्यांच्या अभंग काव्याचे,नामसंकीर्तनाचे अखंड गायन सुरु असते. तेथिल अनेक शिक्षण संस्थानां संत नामदेवांचे देण्यात आले आहे.भागवत धर्माचे आद्य प्रचारक असणारे नामदेव या संप्रदायाचे आद्य समन्वयक देखील होते. भागवत संप्रदायाचे अघोषित नेतृत्व करणा-या नामदेवांचे संघटन व समन्वय कौशल्य अलौकिक असे आहे. "संतकृपा झाली।इमारत फळा आली ।। ज्ञानदेवे रचिला पाया । तेणें उभारिले देवालया ।।नामा तयाचा किंकर । तेणे रचिलें तें आवार ।। जनार्दन एकनाथ।खांब दिला भागवत ।। तुका झालासे कळस।।" असे वर्णन संत तुकारामांच्या शिष्या बहिणबाई यांनी केले आहे. एक समर्पित,कल्पक व योजनाशिल प्रचारकाची व समन्वयाची भूमिका स्वीकारत नामदेवांनी भागवत धर्मरुपी देवालयाचा विस्तार केला. निवृत्ती - ज्ञानदेवांपासून चोखोबांपर्यत २४ संतांना वारकरी संप्रदायाच्या पताकेखाली आणण्याची किमया नामदेवांनी साधली. हे सारे संतकवी तत्कालीन समाजाने बहिष्कृत ठरवलेले होते. त्यात ज्ञानेश्वरादी भावंडांचाही समावेश होतोच,कारण वाळीत टाकण्याचा अनुभव त्यांनाही होता. जातीयता,उच्च-नीच भेदभाव यांचा अनुभव नामदेवासह प्रत्येक संताने घेतला होता. यामुळेच नामदेवांनी समतेवर आधारित व कर्मकांड विरहीत अशा भागवत धर्माचा प्रसार केला. त्यामधूनच 'नामापरते साधन नाही' आणि 'विठ्ठला वाचूनि दुजे दैवत नाही' अशी अगदी साधी-सोपी रचना असेलला भागवत धर्म त्यांनी समाजमानसासमोर उभा केला.संत नामदेवांनी लिंगायत व महानुभाव संप्रदायांच्या अवस्थेवरुन समन्वयाचा बोध घेत, केवळ धर्माच्या व अध्यात्माच्या क्षेत्रात समतेची व लोकशाहीची मागणी केली. लिंगायत व महानुभाव पंथांनी शोषणग्रस्त समाजव्यवस्थेवर केलेले आघात,तत्कालिन समाजाला पेलवणारे नव्हते. यामुळे या पंथाना ओहटी लागली, धर्ममार्तंडांनी समाजाला व शासनाला या पंथांच्या विरोधात उभे केले,याची जाणीव असलेल्या नामदेवांनी धार्मिक-अध्यात्मिक लोकशाहीचा पुरस्कार करत समन्वय साधला आणि आपल्या द्रष्टेपणाचा परिचय दिला. दुस-या बाजुने त्यांनी चोखोबांना मरणोपरांत पांडुरंगाच्या मंदिराच्या शेवटच्या पायरीवर स्थान देण्यासाठी संघर्ष केला. कदाचित महाराष्ट्रात देण्यात आलेले हे पहिले आरक्षण असावे. नाथ संप्रदायी असणा-या निवृत्ती - ज्ञानदेवांना सोबत करत नामदेवांनी महाराष्ट्राच्या भूमीतून शैव - वैष्णव वाद कायमचा निकालात काढला. पंढरीचा पांडुरंग हरी- हर एैक्याचे प्रतिक बनला. जनाबाईसारख्या अनाथ अबलेला संतत्वापर्यंत पोहचविणा-या नामदेवांनी स्त्री मुक्तीचा संदेश समाजामानस दुखावणार नाही अशा पद्धतीने देत समन्वय साधला. ज्ञानदेवांच्या ज्ञानभक्तीत साध्या सहज नामभक्तीचे मिश्रण करत,सगुणापासून निर्गुणापर्यंतचा प्रवास नामसंकीर्तनाच्या तरफेवर करण्याचा मार्ग दाखविला येथेही त्यांचा समन्वय कामी आला. संस्कृतचे वर्चस्व बेमालुमपण नाकारत लोकभाषा असणा-या मराठीचा पुरस्कार त्यांनी केलाच,परंतु उत्तर भारतातील वास्तव्यात तेथिल लोकभाषा असलेल्या हिंदीचा स्वीकार करत,लोकभाषांचा समन्वय देखील साधला. म्हणूनच "ईभै बाèठलू उभै बीठलू बिठलू बिना संसारू नाही", हा त्यांचा उद्घोष शीख बांधवांच्या पवित्र गुरूग्रंथसाहेबामध्ये आजही निनादत आहे.चाणाक्ष नामदेवांनी मंदिराच्या आवारातील कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात नेले. म्हणजेच भक्तीची गंगा शुद्रातीशुद्रापर्यंत नेली,यामुळेच चोखोबा,जनाबाईच नव्हे तर वारांगणा कान्होपात्रा देखील संतत्वास प्राप्त झाली. आज महाराष्ट्र सामाजिकदृष्टया आधुनिक राज्य समजले जाते,'फुले-शाहु-आंबेडकर' या भारताला दिशा देणा-या महामानवांचे राज्य समजले जाते. यासाठी समाजमानसाची हळूवार मशागत करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केलेले आहे. नामदेवाच्या कीर्तनाच्या रंगी रंगलेल्या महाराष्ट्राच्या मनात ज्ञानदीप प्रज्वलित झाला आहे. आजपासून ७०० वर्षांपूर्वी नामदेवांनी धर्म-जात-भाषा-प्रदेश यांच्या तटबंदयांना पार करत महासमन्वयाचे बीज या महाराष्ट्राच्या भूमीत रुजविले ती भूमी याच कारणांवरुन होरपळत असलेली दिसत आहे. समाज व धर्मसुधारणेसंदर्भात भारताचे नेतृत्व करणारा महाराष्ट्र संत नामदेवांपासून प्रारंभ पावलेल्या समन्वय,समता,सहिष्णूता व सामाजिक सौहार्द यांना विसरत प्रतिगामी शक्तींकडे आकर्षित होणे निश्चितच अस्वस्थ करणारे आहे. नामदेवांनी पंढरीच्या वाळवंटात उभे केलेले लोकविद्यापीठ सातशे वर्षांहुन अधिक काळ मराठी माणसाला 'जीवन शिक्षण' देत आहे. ज्ञानोबा-चोखोबा-तुकोबा यांना सोबत घेऊन नामदेवाने पुन्हा महासमन्वय साधावा, आपल्या वीणा झंकारत संकिर्तनाने हा ज्ञानदीप अधिक तेजस्वी करावा. याचाच अर्थ नामदेवांनी दिलेला समन्वयाच्या महामंत्राचा उद्घोष करत पुन्हा पुरोगामीत्वाचा निर्मळ प्रवाह वाहता करणे हीच महासमन्वयकार संत नामदेवांनी खरी श्रद्धांजली !
प्रा.डॉ. राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment