देवांचा मार्ग शिंतो..

जपानचा आद्य धर्म म्हणून 'शिंतो' चा उल्लेख केला जातो.  शिंतो शब्दाचा अर्थ 'देवांचा मार्ग' असा होतो.  आज शिंतोला धर्म संबोधले जात असले तरी ख-या अर्थाने तो धर्म नाही.  ती जपानी समाजाची प्राचीन जीवनप्रणाली किंवा जीवनशैली आहे.  शिंतोचा एकच असा धर्मसंस्थापक नाही.  त्यामध्ये एक ईश्वर संकल्पना आणि एक धर्मग्रंथ अस्तित्वात नाही.  म्हणजेच संस्थागत धर्मांच्या निकषांमध्ये शिंतोला आपण बसवू शकत नाही.  एवढेच नव्हे तर शिंतो हे त्याचे नामकरण इसवी सनाच्या सहाव्या शतकात करण्यात आले आहे.  ज्या जपानी जीवनशैली व संस्कृतीला आज शिंतो धर्म म्हणून ओळखले जाते.  तिच्या अस्तित्वाच्या खुणा इसवी सन पूर्व ६६० पासून उपलब्ध होतात.  इसवी सनाच्या सहाव्या शतकात जपानच्या धरतीवर बौद्ध धर्म पोहचल्यानंतर जपानी समाजाचा संस्थागत धर्म संकल्पनेशी परिचय झाला.  त्यामुळे आपण आजवर ज्या परंपरेचे,संस्कृतीचे,श्रद्धांचे आणि जीवनशैलीचे अनुकरण करत आलो.  तिचे अस्तित्व आणि वेगळेपण अधोरेखित करण्याची गरज जपानी लोकांना वाटली.  त्यामुळे त्यांनी आपल्या या परंपरेला शिंतो धर्म असे संबोधण्यास सुरवात केली.  त्यानंतर त्यांनी आपल्या इतिहासाचा मागोवा घेतला आणि त्याला शब्दबद्ध करण्यास प्रारंभ केला.  यातून दोन शिंतोच्या दोन धर्मग्रंथांची निर्मिती झाली.  ते म्हणजे 'कोजीकी' (को-जिकी) आणि 'निहोनशोकी'(निवोन-जी).  'कोजीकी' हा ग्रंथ इ. स. ७१२ मध्ये निर्माण करण्यात आला.  याला इंग्रंजीत 'रेकॉर्ड्स ऑफ एन्शंट मॅटर, असे संबोधले जाते.  हा ग्रंथ म्हणजे जपानमधील पौराणिक कथा आणि त्यातून व्यक्त होणा-या मान्यतांचे दर्शन घडवणारा ग्रंथ आहे.  याला पुराण वृत्तांताचा संग्रह असे देखील म्हणता येते.  कोजीकी ग्रंथाला शिंतो परंपरेत आदिग्रंथ मानण्यात येते.  या ग्रंथात सृष्टी व मानवजात निर्माण होण्यापूर्वी देवयुग अस्तित्वात होते. असे सांगण्यात आले आहे.  देवयुगातील देवतांची संभाषणे आणि त्यांची कार्ये याची हकीकत देण्यात आली आहे.  दुसरा ग्रंथ 'निहोनशोकी' हा इ. स. ७२० मध्ये लिहिण्यात आला.  याला इंग्रजीत 'क्रॉनिकल्स ऑफ जपान' असे म्हणतात.  खरे पाहिले तर त्याला धर्मग्रंथ म्हणता येत नाही.  हा ग्रंथ म्हणजे इसवी सनाच्या सातव्या शताकापर्यंतच्या जपानच्या इतिहासाचे संकलन आहे.  निहोनशोकीमध्ये ईश्वराने जपानची उत्पत्ती कशी केली येथपासून एक हजार वर्षांच्या कालखंडात जपानमध्ये होऊन गेलेल्या राजांच्या राजवटींची हकिकत सांगण्यात आली आहे.  जपानमध्ये बौद्ध धर्म गेल्यामुळे जपानची पारंपरिक जीवनपद्धती आणि जपानचा इतिहास पहिल्यांदाच शब्दबद्ध झाला.  त्यामुळेच या दोन ग्रंथांची निर्मिती झाली.  कोजीकी ज्याला आज शिंतोचा आदिग्रंथ मानण्यात येते.  त्याचे लेखन जपानच्या सम्राटाच्या दरबारातील एका सरदाराने केले आहे.  कोजीकीच्या प्रस्तावनेतच या ग्रंथकर्त्याने स्वतःची व ग्रंथलेखनासंदर्भातील माहिती दिली आहे.  प्रस्तावनेत तो उल्लेख करतो की,'' मी राजदरबारी पाचव्या दर्जाचा एक सरदार आहे.  प्राचीन कालातील सुभाषितांचा व राजेलोकांच्या वंशावळीचा संग्रह करुन त्याला व्यवस्थित रुप देण्याची सम्राटाने मला आज्ञा केली आहे.  यातील सर्व माहिती मला एका अपूर्व पुराणिकाच्या तोंडून मिळाली आहे.  हा पुराणिक इतका बुद्धीशाली आहे की त्याने एकदा एखादा ग्रंथ वाचला की तो त्याला तोंडपाठ झालाच समजावे."  यावरुन एक स्पष्ट होते की ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेली माहिती व इतिहास हा केवळ मौखिक परंपरेमधून संकलित करण्यात आला आहे.  ग्रंथाच्या लेखकाला माहिती देणा-या पुराणिकाला त्यापूर्वीचे कोणते ग्रंथ मुखोद्गत होते.  हे समजण्याचा मार्ग नाही.  कोजीकीच्या पूर्वी जपानमध्ये ग्रंथ असतील तर कोजीकीला आदिग्रंथ का संबोधण्यात आले? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.  असो तो वेगळया संशोधनाचा विषय आहे.  एक मात्र खरे की कोजीकी आणि निहोनशोकी हयांना आज काहीजण शिंतो धर्माचे पवित्र ग्रंथ मानतात.  हया दोन्ही ग्रंथांमध्ये धर्मग्रंथामध्ये अपेक्षित असलेल्या नैतिक उपदेश व आध्यात्मिक सिद्धांत-साधना यांचा थेट उल्लेख वा नोंद करण्यात आलेली नाही.  त्यामुळे शिंतो धर्माचे सिद्धांत नेमके काय असावेत हे स्पष्ट होत नाही.  अभ्यासकांनी हया दोन्ही ग्रंथांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या पौराणिक व समाजाच्या श्रद्धांना अनुसरून असलेल्या चालीरीतींच्या वर्णनातून शिंतोचे सिद्धांत शोधण्याचा प्रयत्न केला आहे.  यामधून सर्वात महत्वाचे एक तत्त्व स्पष्ट होते.  ते म्हणजे सर्वसामान्यत्वाच्या किंवा सर्वसामान्य माणसाच्या कक्षेबाहेर असलेल्या सृष्टीतील प्रत्येक घटकाला प्राचीन जपानी समाज देव मानत होता.  म्हणजेच माणसाच्या आवाक्याबाहेरील निसर्गातील प्रत्येक शक्तीला त्यांनी देवत्व बहाल केले होते.  शिंतो परंपरा निसर्गाच्या महानतेसमोर नतमस्तक होऊन त्यांची आराधना करणारी होती.  यामुळेच शिंतोमध्ये निसर्गदेव संकल्पना मध्यवर्ती होती.  निसर्गदेवांमध्ये सूर्य,पृथ्वी,समुद्र,पर्वत,प्राणी-पक्षी,वनस्पती इत्यादी नैसर्गिक तत्त्वांचा समावेश होतो.  त्याचप्रमाणे शिंतोमध्ये मानवदेव ही संकल्पना देखील आढळते.  मरण पावलेले थोर वीर किंवा पराक्रमी पुरुष यांच्या महत्कृत्यांमध्ये ईश्वरी स्वरुपाचे दर्शन होते.  ही जपानी समाजाची मान्यता होती.  त्यामुळे अशा लोकांचा समावेश मानवदेव या संकल्पनेत जपानी समाजाने केलेला होता.  त्याचप्रमाणे सृष्टीची 'निर्मिती-विकास-लय' आणि पुर्ननिर्मिती करणा-या एका अज्ञात ईश्वरीय शक्तीची संकल्पना शिंतोमध्ये असलेली दिसते.  सद्विचार-कुविचार,सद्भाग्य -दुर्भाग्य अशा मानवी प्रवृत्तींच्या मागे असलेल्या शक्तींना देखील देव मानण्यात आले होते.  कुटुंबाचे रक्षण करणा-या रक्षकदेवतांची कल्पना शिंतोमध्ये अस्तित्वात होती.  प्रत्येक जपानी कुटुंब आपल्या हया रक्षकदेवतांची पूजा करत असे.  प्राचीन काळापासून जगाच्या कोणत्याही भागातील मानवी जीवन कृषिकेंद्रितच होते.  त्यामुळे शेती म्हणजे जीवन ही संकल्पना जगातील प्रत्येक मानवी समुहात अस्तित्वात असलेली दिसते.  मानवी जीवनात धर्मसंकल्पनेचा विकास होण्यापूर्वीपासून शेती व धन-धान्य यांना मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व राहिले आहे.  कारण शेती हाच मानवाच्या अस्तित्वाचा आधार आणि धन-धान्याची समृद्धीच त्याच्या जीवनातील परमसुख आहे.  आज आधुनिक काळात ही मानव शेतीतून मिळणा-या धनावर जगू शकतो.  जगातील इतर कोणतेही धन हया काळया मातीच्या धनासमोर कःपदार्थच आहे  त्यामुळेच जगात  शेतीशी निगडीत अनेक विधी व उत्सव अस्तित्वात आहेत.  पूर्वी त्यांना अनन्यसाधारण महत्व होते.  कारण निसर्ग आणि शेती यांच्या वेळापत्रकानुसार हया विधी-उत्सव-परंपरा यांची निर्मिती जगाच्या विविध भागातील भौगोलिक वैशिष्टयांनुसार करण्यात आलेली होती.   जपानच्या शिंतो जीवनपद्धती देखील याली पारखी नव्हती.  पीक उत्तम येण्यासाठी वंसत ऋतूत केली जाणारी प्रार्थना आणि शरद ऋतुत धन-धान्य दिल्याबद्दल देवाचा आभार मानण्याचा विधी.  हे जपानच्या शिंतो परंपरेतील शेतीशी निगडित  प्रमुख विधी सांगता येतात.  आज जपानला आपण एक अत्यंत स्वच्छ राष्ट्र म्हणून ओळखतो.  जपानी समाजात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व असलेले दिसते.  या स्वच्छतेची मुळं शिंतोमध्ये दिसून येतात.  कारण शिंतोमधील एक वैशिष्टयपूर्ण शिकवण म्हणजे 'स्वच्छता' होती.  शिंतोच्या माध्यमातून नेहमी स्वच्छ राहण्याचे संस्कार जपानी समाजाचा अविभाज्य भाग बनले.  शिंतो ही जीवनपद्धती असल्यामुळे स्वच्छतेचा स्वीकार जपानी समाजाने जीवनमूल्याप्रमाणे केलेला दिसतो.  त्यामुळे स्वच्छतेचे वेगळे संस्कार करण्याची गरज जपानमध्ये पडत नाही  कोजीकी आणि निहोनशोकी हया दोन्ही ग्रंथामध्ये स्वच्छतेचा उपदेश करण्यात आला आहे.  हया दोन्ही ग्रंथांमध्ये 'इझानागी' या आदी देवतेचा उल्लेख आला आहे.  इझानागी ही देवता आपल्या शरीराच्या शुद्धीसंदर्भात अत्यंत दक्ष असल्याचे सांगण्यात आलेले दिसते.  कोजीकी मध्ये इझानागी म्हणते,"मी माझ्या दिव्य शरीराची शुद्धी करीन."  तर निहोनशोकी मध्ये ती म्हणते,"माझा देह अशुद्धीपासून मुक्त करणे हे योग्य आहे." हा शिंतोचा विशेष लक्षात घेण्यासारखा आहे.  इतर धर्मांमध्ये माणसाच्या शरीराच्या शुद्धीपेक्षा मनाच्या शुद्धीला महत्व देण्यात आले आहे.  त्यासंदर्भातील अनके वचनांनी त्या-त्या धर्मांच्या ग्रंथांचा आणि संतवाणीचा मोठा भाग व्यापलेला आहे.  त्यामुळे देवाला शरीर स्वच्छतेची आवश्यकता व्यक्त करणारा शिंतो निराळाच वाटतो.  देवाला जर आपले शरीर स्वच्छ करण्याची गरज पडत असले तर मानवाने देखील आपली शरीर स्वच्छता राखली पाहिजे.  हा खरा इझानागीच्या मुखातील वचनांचा अर्थ सांगता येतो.  अनेकांना  ईश्वर हा तर निर्गुण-निराकार आहे.  हया तत्त्वज्ञानाला छेद देणारा वचनं वाटू शकतात.  हा वाद येथे उपस्थित होण्यापेक्षा शिंतोमधील स्वच्छतेचा संदेश  महत्वाचा मानला पाहिजे.  शिंतो परंपरेत 'आहो-हराई' नावाच्या एक विधी अत्यंत महत्वाचा मानला आहे.  तसा हा बळी देण्याचा विधी आहे.  मात्र हा विधी करतांना प्रारंभीच एक क्षालनविधी करावा लागतो.  हा स्वच्छतेचाच निदर्शक आहे.  या प्रसंगी देण्यात आलेला बळी नदीत किंवा समुद्रात विसर्जित करतात.  या विधीमुळे लोकांचे पाप बळी बरोबरच निघून जाते.  तसेच शेतीच्या कामांतील विविध प्रकारची संकटे व अडथळे यांचीही याच्यात समावेश असतो.  बळी नदीत किंवा समुद्रात विसर्जित केल्याने जलप्रदुषण होते.  हा प्रश्न आजच्या काळात विचारला जाऊ शकतो.  मात्र कोणत्याही धर्मात व परंपरेत असे प्रश्न विचारायचे नसतात.  एक मात्र खरे की शिंतो ही आदिम समाजांप्रमाणे;परंतु त्यांच्यापेक्षा अधिक विकसित असलेली निसग सन्मुख धार्मिक जाणीव आहे.  शिंतोचे तत्त्वज्ञान पाहिल्यास आपल्या हे लक्षात येऊ शकते.   
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                                                          

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !