लोकांच्या पाठीमागे चाला...
"जो मूर्तिमंत धर्म बनून गेला. तो लहान बालकासारखाच होऊन जातो. मग त्याला विंचू दंश करीत नाही. जंगली पशू त्यावर झडप घालीत नाहीत. की,हिंस्त्र पक्षी त्याला चोच मारीत नाहीत !" ख-या ज्ञानाचा परिचय आपल्याला सदैव बालकाच्या नजरेतून जगाकडे पाहिले तरच होऊ शकतो. असे सांगणारा लाओत्से आजन्म आपल्यातील लहान मुल जपू शकला. असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रतिभा लाभलेला लाओत्से बालकासारखा निरागस व निष्पाप होता. वृद्धत्वातही त्याला आपले शैशव जपता आले. लाओत्सेचे खरे नाव 'ली अर्ह' असे होते. 'ली' हे त्याचे आडनाव आणि 'अर्ह' हे त्याचे नावं. असे असले तरी तो जगामध्ये लाओत्से नावाने ओळखला गेला. लाओत्से याचा आणखी एक अर्थ आहे - प्राचीन गुरु,आचार्य अथवा तत्त्वज्ञ ! तसेच 'लाओ' म्हणजे शिक्षक. या अर्थाने 'लाओत्से' हे विशेषण अथवा सन्मानदर्शक शब्द पदवीप्रमाणे या महान आचार्याला,धर्मसंस्थापकाला,तत्त्वज्ञाला जाणत्यांनी आदरपूर्वक बहाल केले होते. लाओत्सेच्या शिकवणूकीनुसार माणसाने स्वतःला कायम अपरिचित अथवा अज्ञात ठेवले पाहिजे. यासाठी त्याचे आणखी एक वचन महत्वाचे ठरते लाओत्से म्हणतो,"तुम्हांला ख-या अर्थाने लोकांचे नेतृत्व करायचे असेल तर त्यांच्या पाठीमागे चला." या वाक्यात अत्यंत सखोल अर्थ दडलेला आहे. आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी प्रचंड वेगाने इतरांच्या पुढे धावेल,तोच जगात यशस्वी होईल. असे सांगणा-या भांडवलशाही तत्त्वज्ञानाचे जगावर अधिराज्य असतांना लाओत्सेचा हा विचार बुचकळयात पाडणारा ठरतो. भांडवलशाहीने यासाठी 'मोटिवेशनल स्पीकर' नावाची जमात निर्माण केली आहे. नेपोलियन महाशयांनी सांगितल्याप्रमाणे 'अशक्य' हा शब्द त्यांच्या ही शब्दकोशात नसतो. समाजात आसुरी स्पर्धा निर्माण करण्यासाठी हे लोक प्रत्येक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना,पालकांना व कर्मचा-यांना धावण्याचा संदेश देत असतात. त्यांचा हेतू एकच असतो भांडवलदारांसाठी सगळया समाजाला धावायला लावणे आणि व्यक्ती-व्यक्तींमध्ये झुंज लावून भांडवलदारांचे अधिकाधिक हित साध्य करणे. समाजात एखादयाचे ऐकून विचार करण्याऐवजी भारावून जाऊन पळत सुटणारे अधिक असतात. अशावेळी समाजात एकमेकाला मागे टाकण्यासाठी चाललेली धावण्याची जीवघेणी स्पर्धा निर्माण होणे अपरिहार्य आहे. ज्याच्या अनुभूती आपण वर्तमानात घेत आहोत. अशावेळी लाओत्सेचे विचार म्हणजे मोटिवेशनल स्पीकरांमुळे मंत्रमुग्ध झालेल्या लोकांच्या लेखी भंपकपणाचे ठरतात. लाओत्सेला नेतृत्व करण्यासाठी लोकांच्या पाठीमागे चला असे सांगतांना प्रवाहपतित न होता स्वतःतील वेगळेपण शोधा. धावण्याच्या स्पर्धेत सामील नसल्यामुळे आणि एकांत लाभल्याने तुम्हांला तुमच्या वेगळेपणाचा संपूर्ण व स्वतंत्र आविष्कार करता येईल. एक दिवस तुमच्या पुढे धावत असलेला समाज तुमच्या मागे धावतांना दिसेल. असे अपेक्षित होते. त्याच्या या वचनाचे वास्तव त्याच्या स्वतःच्या जीवनात दिसून येते. 'झौओ' अथवा 'चाऊ' राजदरबारातून पदच्युत झालेल्या लाओत्सेने अज्ञातवास स्वीकारला. तेंव्हा राजा,त्याचे दरबारी आणि समाज त्याचा शोध घेऊ लागले. अज्ञातवासात गेलेल्या लाओत्सेच्या ज्ञानाची,पांडित्याची ख्याती कस्तुरीच्या गंधाप्रमाणे सर्वत्र दरवळू लागली. आता चीनच्या सम्राटालासुध्दा लाओत्से आपल्या दरबारात असावा असे वाटू लागले. आपण अशा विद्वान पुरुषाला आपला मुख्य प्रधान करू ज्यामुळे त्याच्या शहाणपणाचा लाभ आपल्या राज्यकारभारत होऊ शकतो. तसेच लाओत्सेसारखा महापुरुष आपला मुख्य प्रधान आहे. यामुळे आपला गौरव-ख्याती वाढेल ! सम्राटाने तात्काळ लाओत्सेला निमंत्रण पाठवण्याचा निर्णय घेतला. आपल्या निमंत्रणाने सम्राट आपल्याला मुख्य प्रधान करत आहे. हे ऐकून लाओत्से लागलीच धावत येईल. असा अंदाज सम्राटाने केला होता. लाओत्सेपर्यंत आधीच ही वार्ता पोहचली होती. त्याला सम्राटाच्या दरबारातील निर्जिव शोभेची बाहुली म्हणून जगण्यात कोणताही रस नव्हता. कारण तो लाओत्से होता. सम्राटाची माणसं त्याला शोधत असतांना तो त्यांना हुलकावणी देत होता. त्यांना आपला पत्ता मिळू नाही,यासाठी तो गावोगावी भटकत होता. सम्राटाचे अधिकारी,वजीर लाओत्सेचा पाठलाग करण्यात हैराण झाले होते. एखाद्या गावात लाओत्से आहेत. हे समजल्यावर ते तात्काळ तेथे पोहचत. मात्र त्यांच्या हाती निराशा येई. कारण लाओत्से रात्रीच त्या गावाचा निरोप घेऊन दुस-या गावाला गेलेला असे. अखेर एक दिवस त्यांना लाओत्सेचा नेमका ठिकाणा सापडला आणि लाओत्से देखील ठिकाण्यावर सापडला. लाओत्से एका गावाबाहेरील तळयाच्या काठी आहे. ही खबर मिळताच हा लवाजमा तेथे पोहचला. दरबारातील हया सर्व मानक-यांनी पाहिले लाओत्से तळयाच्या काठी निवांत मासेमारी करत होता. वजीर त्याच्याजवळ पोहचले. त्यांनी अत्यंत आदबीने त्याला अभिवादन केले आणि म्हणाले,"आम्ही आपला सतत शोध घेत आहोत. आपणास सम्राटांनी राजदरबारात आमंत्रित केले आहे. सम्राटांची ईच्छा आहे की आपण मुख्य प्रधान म्हणून राज्यकारभारात त्यांना मार्गदर्शन करावे." वजीर सांगत असलेल्या निरोपाने लाओत्सेवर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने त्याच्याकडे पाहिले देखील नाही, तर उत्तर देणे लाबंच राहिले. वजीर बुचकळयात पडला आपण बोलत आहोत,ते कदाचित लाओत्सेला ऐकू गेले नसावे. असे त्याला वाटले. त्याने लाओत्सेच्या अंगाला हात लावला आणि त्याला हलवले. पुन्हा तेच सांगितले. आणखी पुढे तो असेही म्हणाला,"सम्राटांची मर्जी झालीय तुमच्यावर. तुम्हांला ते मुख्य प्रधान करणार आहेत !" आता मात्र लाओत्से त्याच्याकडे पाहून हसला. तो बसला होतो,तेथे जवळच एक छोटे डबकं होतं. डबक्याकडे बोट दाखवीत लाओत्से वजिराला म्हणाला," ते डबकं पाहिलंत काय आहे त्यात ?" वजीर म्हणाला," चिखल,पाणी." यावर लाओत्से म्हणाला,"कासवं दिसतंय का त्यात ? मी ऐकलं आहे की तुमच्या राजवाडयातही एक मोठं जुनं कासव आहे म्हणे." वजिराने उत्तर दिले,"'होय,आहे." यावर लाओत्से म्हणाला," चीनच्या प्राचीन सम्राटाचं ते राजचिन्ह आहे. त्याची दरवर्षी मोठी पूजाअर्चा होते. उत्सव होतो,त्यासाठी लाखो रुपये खर्च होतात,खरं ना?" वजीर उत्तरला,"होय अगदी खरं." लाओत्से वजिराकडे पाहत हसला आणि म्हणाला,"मग तुझी अशी भव्य पूजा होईल,एवढा सन्मान मिळेल,चीनचा सम्राट तुझ्यासमोर नतमस्तक होईल,असं जर त्या डबक्यातील चिखलात मुक्त जीवनाचा आनंद घेणा-या कासवाला सांगितलं तर ते राजवाडयात येण्यास तयार होईल का ?" वजिराला लाओत्सेच्या बोलण्याचा रोख लक्षात येत होता. म्हणून तो म्हणाला," जीवनाचा मुक्त आनंद घेणारे हे कासव ते कसं करील? कारण तिथं तर मृत्यू आहे. निर्जीवपणा आहे. पूजा आहे,पण सोन्याच्या कासवाची." लाओत्सेला नेमकं हेच उत्तर अपेक्षित होते आणि तो म्हणाला," राजमहालात सोन्यांन मढवलेलं अंग असलेले कासव आहे. पण त्यात प्राण नाही. परेमश्वरानी निसर्गात मुक्त जगण्यासाठी दिलेले स्वातंत्र आणि आनंद नाही. चिखलातले कासव परमेश्वरानी त्याला निसर्गात जसे जगण्यासाठी पाठवले आहे. तसे जगत आहे. मग त्या चिखलातल्या कासवाला एवढी अक्कल आहे, तेवढी मला नाही का? जा बाबांनो,मला नको तुमचे प्रधानपद." लाओत्सेच्या उत्तराने निराश झालेले राजदरबारी माघारी परतले. मनात कोणतीही ईच्छा,आश-आकांक्षा,स्वार्थ नसलेला लाओत्से अज्ञातवासात गेला तर लोक त्याला शोधू लागले. त्याने आपल्याला मार्गदर्शन करावे असे त्यांना वाटू लागले. चीनचा सर्वात सामर्थ्यशाली व्यक्ती म्हणजे चीनचा सम्राट. त्याला देखील लाओत्सेची गरज वाटली. आपल्या दरबारात लाओत्सेची साधी उपस्थिती देखील त्याला स्वतःसाठी गौरवाची व भूषणाची बाब वाटू लागली. जगातील जीवघेण्या धावण्याच्या स्पर्धेत लाओत्से कायम मागे राहिला होता. आपल्या चालीनं तो चालत होता. त्याला मागे टाकून पुढे धावत गेलेल्यांना काही काळ आपण लाओत्सेला मागे टाकले. याचे समाधान लाभले असेल; परंतु त्यांच्या धावण्याला अंत नाही. अंतिम यश किंवा ध्येय नाही. एक यश अथवा ध्येय गाठले की त्याचे समाधान अल्पकाळ टिकते आणि दुसरे ध्येय खुणावू लागते. मग परत पळायला सुरवात करायची. जीवन संपुष्टात येते; परंतु आपण पळत आहोत तो रस्ता संपत नाही. रस्त्यावर जसे मैलाचे दगड असतात. एक मैलाच्या दगडाजवळ पोहचल्यावर दुस-या ध्येयाचे अंतर त्याच्यावर कोरलेले दिसते. माणूस परत अस्वस्थ होतो आणि धावायला सुरवात करतो. अशावेळी बैलावर बसून शांतपणे चालेला लाओत्से डोळ्यासमोर येतो. कारण चीनी संस्कृतीत बैल हे स्थिरतेच प्रतिक मानले जाते. ही स्थिरता लाओत्सेच्या मनाने व आत्म्याने प्राप्त केली होती. त्याने जीवनाचा प्रवास असा स्थिरतेने करण्याचा संदेश आपल्या तत्वज्ञानातून दिला. मानवी जीवनातील अस्वस्थतेपासून विचार करण्यास सुरवात केल्यास लाओत्सेने सांगितलेल्या 'तोआ' ची ओळख आपल्याला नकळतपणे होऊ लागते.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment