'ताओ' चा प्रवासी...
इसवी सन पूर्व सातव्या शतकाच्या अखेरची काळ होता. चीनच्या 'छू' राज्यात 'कू' नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या छू राज्यातील 'ली' जिल्हयातील एका गावात एक अक्रीत घडले. गावातील एका महिलेला झोपेत एका धूमकेतूचे दर्शन झाले. काहींच्या मते दिव्य प्रकाशाचे दर्शन झाले. हा 'धूमकेतू' किंवा 'दिव्य प्रकाश' आपल्या गर्भात प्रवेश करत आहे. अशी अनुभूती तिला आली. प्रसुतीनंतर तिने ज्या बालकाला जन्म दिला,त्याला पाहून तिच्यासह सर्वजण अचबिंत झाले. हे बालक जन्माला आले तर जन्मतःच त्याच्या डोक्यावरचे केस पांढरे होते,चेहरा जख्ख वृद्धासारखा सुरकुत्यांनी भरलेला होता आणि पांढरी शुभ्र लांब दाढी होती. तसेच त्याच्य कपाळावर चंद्र कलेची प्रतिमा आणि शरीरावर अनेक शुभ चिन्हं होती. काही लोकांच्या मते जन्माच्या वेळी या बालकाचे वय ८२ वर्षे होते. हे जन्माला आलेले बालकाचा जन्म मातेच्या एक्याऐंशी वर्षाच्या गर्भधारणेनंतर झाला होता. असामान्यत्वाच्याही परिघा बाहेर असलेले हे बालक नेमके कोण होते? कोणाच्या जन्मासंदर्भातील ही अशी विचित्र कथा आहे ? असे प्रश्न आपल्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. ही कथा ज्याच्या जन्माशी निगडित आहे. त्याने भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान चीनच्या धरतीवर पोहचलेले नव्हते तेंव्हा चीनी समाजाला सृष्टी-ब्रम्हांड यांचा निर्मिक,त्याचे स्वरूप,त्याच्या निर्मिती मागील कार्यकारण भाव,अंतिम सत्य यांचा 'ताओ' दाखवला होता. हा बुद्धांच्या समकालीन असलेला महापुरुष म्हणजे 'लोओत्से' आणि त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे 'ताओ' लाओत्सेच्या जन्माच्या संदर्भात असलेली ही लोककथा किंवा दंतकथा शब्दशः स्वीकारणे कोणत्याही विवेकशील माणसासाठी शक्य नाही. तसे ते असता देखील कामा नये. महापुरुषांच्या जन्मासंदर्भात अशा अविश्वसनीय कथा प्रत्येक ठिकाणी प्रचलित असलेल्या दिसतात. सामान्य वकूबाच्या लोकांना हया कथा शब्दशः ख-या वाटतात तर प्रखर विवेकवादी लोकांना भाकड अथवा अधंश्रद्धा वाटतात. टोकाचे मुर्ख असोत की टोकाचे विवेकवादी असोत दोन्ही प्रकारच्या लोकांना कोणत्याही सत्याचे यर्थाथ दर्शन होणे,अशक्य असते. कारण 'मुर्ख' कथांमधील शब्दांच्या पुढे विचार करू शकत नसतात आणि 'विवेकवादी' कर्मठांना कथेच्या शब्दांमागील सत्य अथवा तत्त्व शोधणे स्वतःच्या जीवनदृष्टीशी प्रतारणा वाटते. सामान्य लोकांना प्रतिमेतील देवाची भिती वाटत असते तर विवेकवादयांना स्वतःच्या प्रतिमेला तडा जाण्याची भिती वाटत असते. त्यामुळे लाओत्सेप्रमाणे बुद्धांचा जन्म झाल्यावर ते सात पाऊलं चालले व आठव्या पाऊलावर थांबले किंवा झतुराष्ट्र जन्माला आला तेंव्हा हसत जन्माला आले. हया कथांचा नेमका अन्वयार्थ लावल्यास असे लक्षात येते की हया कथा महापुरुषांच्या तत्त्वज्ञानाचे सार सांगण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून रचण्यात आल्या होत्या. भगवान बुद्धांचे जन्मताच सात पाऊलं चालून आठव्या पाऊलावर थांबणे यावरुन त्यांचा अष्टांगीक मार्गाचा निर्देश होतो. झतुराष्ट्रांचे जन्मातच जोरजोरात हसणे आनंदाने व हसत-हसत जीवनाचा आस्वाद घेत परमेश्वराची प्राप्ती करण्याचे त्यांचे तत्त्वज्ञान अधोरेखित करते. त्याचप्रमाणे लाओत्सेच्या जन्मकथेतून त्यांनी सांगितलेल्या भौतिक व पार्थिव जीवनातील वैराग्याचे महत्व प्रकाशमान होते. जीवनात अंतिम सत्याचा मार्ग सापडला नाही, तर जन्म व्यर्थ आहे. हे लाओत्सेचे तत्त्वज्ञान त्यांच्या जन्मकथेतून व्यक्त झाले आहे. तसेच चीनमधील प्राचीन मान्यतेनुसार वृद्धावस्थेला दीर्घायुष्य आणि बुद्धिमत्ता यांचे प्रतिक मानले जाते. कदाचित लाओत्सेला ८१-८२ वर्षांचे आयुष्य मिळाले असावे आणि जीवनच्या अखेरच्या पर्वात त्यांना अंतिम सत्याची प्राप्ती झाली असावी. हा अर्थ देखील त्यांच्या जन्मकथेतून घेता येतो. जसा जसा आपण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा शोध घेत जातो तसतसा त्यांच्या जन्मकथेचा बोध होतो. लाओत्सेला रुढार्थाने धर्मसंस्थापक म्हणता येत नाही. भगवान बुद्धांप्रमाणे त्यांनी देखील जीवन तत्त्वज्ञान आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग सांगितला. जो बुद्धांसारखाच कोणत्याही कर्मकांड,प्रतिमा,प्रतिकं इत्यादींशी निगडित नाही. भारतीय तत्त्वज्ञानातील उपनिषदांशी देखील त्यांच्या तत्तवज्ञानाचे साधर्म्य दिसून येते. लाओत्सेंच्या तत्त्वज्ञानाविषयी जगात मोठया प्रमाणात अभयास,चिंतन आणि संशोधन झालेले आहे; परंतु त्यांच्या आयुष्याविषयी काही मोजक्या कथा सोडल्यास फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. चीनी लोककथा आणि कन्प‹युशियस पंथाच्या साहित्यातील काही उल्लेख हेच लाओत्सेच्या जीवनविषयी माहिती देणारे प्रमुख स्त्रोत ठरतात. हया दोन स्त्रोतांमधूनच आजवर त्यांचे लौकिक चरित्र रेखाटण्यात आले आहे. ते अत्यंत विस्कळित असले तरी लाओत्से आणि त्यांचे तत्त्वज्ञान यांचा मेळ घालण्यासाठी उपयुक्त ठरते. 'सिम-कियान' याला चीन मधील आद्य इतिहासकार मानले जाते. हया सिम-कियान याने लाओत्से आणि कोंगत्सि म्हणजेच कन्प‹युशियस यांच्यातील भेटीचे वर्णन करून ठेवले आहे. हा लाओत्सेसंदर्भात एक आणखी विश्वसनीय पुरावा समजला जातो. लाओत्से आणि कन्प‹युसियस समकालीन होते. त्याच्या वयात सुमारे ५० वर्षांचे अंतर असले तरी त्यांना समकालीनच संबोधावे लागते. लाओत्से साधारणपणे कन्प‹युशियसपेक्षा ५० वर्षांनी मोठा होता. लाओत्सेसंदर्भात उपलब्ध माहितीनुसार चीन मधील 'झौओ' अथवा 'चाऊ' राजघराण्याच्या राजदरबारात त्याने काही काळ राजदप‹तरदार किंवा ग्रंथपाल म्हणून नोकरी केली. काही अभ्यासकांच्या मते लाओत्से दरबारी इतिहासकार होता. यावरुन एक गोष्ट मात्र खरी ठरते की लाओत्सेने राजदरबारात नोकरी केली होती. काही अभ्यासकांच्या मते वयाच्या साठीपर्यंत लाओत्से राजदरबारात नोकरी करत होता. जन्मजात लाभलेली प्रखर बुद्धीमत्ता आणि अथांग चिंतनशीलता हे लाओत्सेच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात व्यवच्छेदक लक्षण होते. अध्यन,मनन आणि ध्यान हयामध्ये आकंठ बुडालेला लाओत्से प्रपंचात राहून देखील निवृत्तीमार्गाचा पथिक होता. त्याला वैराग्याचे लेणं जन्मतः प्राप्त झाले होते. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अत्यंत विनम्र,सौजन्यशील,ऋजु स्वभावाचा आणि ज्ञानाचा सागर असलेला लाओत्से एक मुलखावेगळे रसायन होते. आपण त्याचे वर्णन संसारी ऋषी असे देखील करू शकतो. लाओत्सेची ख्याती चीनमध्ये सर्वदूर पसरलेली होती. त्याच्या ज्ञानाचा व सहवासाचा लाभ घेण्याच्या उद्देश्याने अनेक ज्ञानी,तत्त्वचिंतक आणि जिज्ञासू लोक त्याच्याकडे येत असतं. कोणत्याही व्यवस्थेतील आणि समाजातील वटवाघळांना प्रकाश दाखवणारा कोणताही माणूस कदापि सहन होत नसतो. जीवनाच्या उच्च चिरंतन मूल्यांप्रमाणेच हे देखील शुद्र असले तरी चिरंतन वास्तव म्हणून मान्य करावे लागते. मानवी इतिहासात बुद्ध,महावीर,झतुराष्ट्र,मोझेस, सॉक्रेटिस,येशू ख्रिस्त,मुहम्मद पैगंबर,नानकदेव,कबीर,नामदेव,तुकाराम इत्यादी प्रकाशसारथी समाजाला लाभले. त्यांच्या हयातीत त्यांच्यासोबत प्रकाशाकडे जाण्यास खूप थोडे लोक तयार झाले. उरलेल्या वटवाघळांना हा प्रकाश सहन होऊ शकला नाही. तसेच त्यांच्या अंधकारमय जीवनामुळे जीवनातील सर्व सुखं उपभोगू शकणा-या त्यांच्या नेत्यांनी त्यांना हा प्रकाश आपल्याला घातक आहे. हे त्यांच्या मनावर नेमकेपणाने बिंबवले. प्रकाशाला प्रतिसाद देण्यापेक्षा अंधारात लडबडत राहणेच वटवाघळांना सोयीचे वाटत असते. त्यांच्या मृत्यूनंतर वटवाघळांनी त्यांची विभूती पूजा प्रारंभ केली आणि त्यांनाही आपल्यासोबत अंधकारात नेले. आता प्रकाश अंधकारात नेल्यास तो नष्ट होत नसतो,तर अंधकार संपतो. कारण प्रकाशाच्या आगमनापर्यंत त्याचे अस्तित्व असते. वटवाघळांची परत अडचण झाली. अखेर त्यांनी या प्रकाशाला कर्मकांड,प्रतिमा,प्रतिक इत्यादींच्या आवरणात झाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्याने त्यांच्यापुरता पुन्हा हा प्रकाश नष्ट झाला. मात्र त्याचे प्रकाशत्व चिरंतन आहे. काळाच्या प्रवाहात हा प्रकाश वेळोवेळी त्याच्यावर टाकण्यात आलेले आवरण झुगारुन आपले अस्तित्व सिद्धच करत आलेला आहे. त्यातही दोन प्रकार आहेत. प्रकाशाचे महत्व समजलेले काही जण जाणीवपूर्वक प्रकाशाला सामोरे जातात तर काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी विजेच्या दिव्याप्रमाणे बटन दाबून सोयीने तो चालू बंद करतात. तसेच शेवटी लाओत्सेचे झाले. त्याला राजदरबारातून पदच्युत करण्यात आले. लाओत्सेसारखा प्रकाश राजा आणि त्याचा दरबार किती काळ सहन करूशकणार होता. अखेर त्यांनी राजदरबाराबाहेर जाण्याचा मार्ग लाओत्सेला दाखवला. लाओत्सेसारख्या जन्मजात ऋषीला त्याचा काहीच फरक पडणार नव्हता. उलट त्याने जगाला परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच 'ताओ' दाखवला. राजदरबार सोडल्यानंतर लाओत्सेने अज्ञातवास स्वीकारला. आता तो गुप्त ऋषी झाला. त्याने संपूर्णपणे अज्ञान जीवनाचा स्वीकार केला. त्याने आपले लाओत्से नाव जगाच्या इतिहासात सार्थ केले. लाओत्से शब्दाचा चिनी भाषेत 'वृद्ध बालक' असा एक अर्थ होतो. त्याच्या प्रतिमात्मक जन्मकथेनुसार लाओत्से वृद्ध म्हणून जन्माला आला तरी बालकाच्या निर्मळ नजरेतून त्याने जीवनाचा शोध घेतला म्हणजेच त्याच्या आत्मा आजन्म बालकाप्रमाणे विशुद्ध राहिला. 'दास कबीर जतनसे ओढी,ज्यों कि त्यों धर दीनी चदरिया' या कबीरसाहेबांच्या दोहयानुसार, 'जन्मतांना माझं आयुष्य जितकं विशुद्ध होतं तितकंच ते या जगाचा निरोप घेताना आहे.' अगदी असाच लाओत्से त्याच्या उपलब्ध जीवनकथांमधून आणि तत्तवज्ञानातून आपल्या भेटतो. ताओवरचा त्याचा चिरंतन प्रवास सुरु असलेला पाहायला मिळतो.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
भारतीय वाङमयातील
ReplyDeleteअशाच ऊपाख्यान ऊपमा अलंकार अन अदभुत कथाना
समजुन न घेता
अंधश्रध्दा म्हणण्याचा एककल्लीपणा तथाकथित विवेकवाद्याकडे आहे