अमेरिकन लोकशाहीतील फडांचा प्रारंभ


थॉमस जेफरसन (Thomas Jefferson) यांच्या अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्ष पदी निवडीच्या प्रक्रियेने निवडणूक आणि त्याच्यातील डावपेच-षडयंत्र यांचा प्रवेश अमेरिकन राजकारणात (American politics) झाला. जॉर्ज वॉशिंग्टन (George Washington) आणि जॉन ॲडम्स (John Adams) यांच्यापर्यंतचा काळ हा स्वातंत्र्य युद्ध आणि नव्याने मिळालेले स्वातंत्र्य यांनी भारावलेला होता. त्यामुळे वॉशिंग्टन आणि ॲडम्स यांची राष्ट्राध्यक्ष पदी निवडीसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरली. थॉमस जेफरसन यांच्या निवडीच्या वेळी लोकशाहीतील सर्वात महत्वाच्या असणा-या निवडणूक प्रक्रियेचा खरा रंग दिसायला सुरवात झाली.

वॉशिंग्टन आणि ॲडम्स यांच्याप्रमाणे थॉमस जेफरसन देखील अमेरिकेच्या राष्ट्रपित्यांमध्ये गणला जात असला तरी राष्ट्राध्यक्ष पद मिळवण्यासाठी त्याला चांगली झुंज दयावी लागली. वॉशिंग्टन सर्वसंमत्तीने तर ॲडम्स बहुमताने निवडले गेले. असे सौभाग्य जेफरसन यांच्या वाटयाला आले नाही. १८०० सालच्या अमेरिकेच्या तिस-या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूकीत अशी काही गुंतागुंत झाली होती की त्यावर तोडगा निघेल. अशी कोणतीच शक्यता शिल्लक उरली नव्हती. थॉमस जेफरसन आणि ॲरॉनबर यांच्यात ही लढत रंगली होती. ३५ वेळा मतदान घेण्यात आले, तरी राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणालाही र्निविवाद कौल मिळत नव्हता. अखेर त्यांचा कट्टर विरोधक असलेला ॲलेक्झांडर हॅमिल्टन (Alexander Hamilton) याने तोडगा काढला आणि ३६ व्या वेळी जेफरसन यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडीवर शिक्कामोर्तब झाले. खरे तर थॉमस जेफरसन आणि ॲरॉनबर हे दोघेही त्याला आणि त्याच्या समर्थकांना मान्य नव्हते.

अमेरिकन लोकशाहीतील फडांचा प्रारंभ
शापित राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेच्या राष्ट्रपित्यांपैकी एक असून देखील जेफरसनला (Thomas Jefferson) राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी एवढा संघर्ष का करावा लागला? यासाठी त्याच्या राजकीय प्रवासाचा आढावा घ्यावा लागतो. १७७९ साली वयाच्या ३६ व्या वर्षी व्हर्जिनियाचा (Virginia) गव्हर्नर म्हणून जेफरसन निवडून आला होता. नियमानुसार ही नियुक्ती एक वर्षासाठी असायची. १७८० मध्ये जेफरसन पुन्हा एकदा गव्हर्नर म्हणून निवडण्यात आला. व्हर्जिनियाची राजधानी 'विल्यम्सबर्ग' (Williamsburg) होती. तिच्या जागी जेफरसनने 'रिचमंड' (Richmond) शहराला राजधानी म्हणून घोषित केले. एव्हाना स्वातंत्र्य युद्ध पेटले होते. जानेवारी १७८१ मध्ये ब्रिटिश फौजांचा सरसेनापती कार्नवेलिस (Charles Cornwallis) याने रिचमंड शहारावर हल्ला करण्याची योजना आखली. त्यावेळी जेफरसनने रिचमंड शहरातील नागरिकांना अन्यत्र हलवले. कार्नवेलिसने त्याला पकडण्यासाठी देखील २५० सैनिकांची तुकडी त्याच्या 'माँटसिलो' या त्याच्या निवासस्थानी पाठवली होती. जॅक ज्योईट हया स्वातंत्र्यसैनिकाने ही खबर जेफरसनला दिली. त्यामुळे जेफरसनला तेथून पलायन करुन आपले प्राण वाचवता आले. यामध्ये जॅक ज्योईट हिरो ठरला आणि जेफरसन व्हिलन ठरला. व्हर्जिनियाच्या संसदेने जॅक ज्योईटचा दोन पिस्तुलं आणि एक तलवार देऊन सन्मान केला, तर राजधानी खाली करणे,गव्हर्नर म्हणून आपल्या जबाबदा-यांचे पालन न करणे आणि राजधानी सोडून पळून जाणे यासाठी चौकशी आयोग नेमला. जेफरसन परत कधीच व्हर्जिनियात गव्हर्नर म्हणून निवडला गेला नाही.

स्वातंत्र्यानंतर अमेरिकेतील विविध प्रांतांनी काँग्रेस ऑफ काँनफिडरेशनची (Congress of Confederation) स्थापना केली. यामध्ये जेफरसनला व्हर्जिनियाचे प्रतिनिधत्व करण्याची संधी देण्यात आली. तसेच परकीय चलन समितीचा सद्स्य म्हणून ही त्याची निवड करण्यात आली. समितीचा सद्स्य म्हणून अमेरिकन चलनात दशमान पद्धतीचा समावेश करावा. ही त्याची सूचना मान्य करण्यात आली. त्यानंतर जेफरसन हा अमेरिकन राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून प्रख्यात झाला. अमेरिकेच्या जाहीरनाम्यात गुलाम पद्धतीवर बंदी आणण्याचा कायदयाचा समावेश त्याने केला होता. हे कलम वगळून त्याने लिहिलेला हा जाहीरनामा ४ जुलै १७७६ रोजी मंजूर करण्यात आला. त्यामुळेच ४ जुलै हा दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जातो.

अमेरिकन लोकशाहीतील फडांचा प्रारंभ
अमेरिकन राज्यघटनेचा शिल्पकार

अमेरिकन काँग्रेसने जेफरसन यांना फ्रांसमध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त केले होते. त्यावेळी त्यांनी अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडली. १७८९ सालच्या सप्टेंबर महिन्यात जेफरसन अमेरिकेत परतले. अमेरिकेत परतल्यावर तात्काळ राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या मंत्रीमंडळात त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नेमणूक केली. मंत्रीमंडळात प्रवेश झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री थॉमस जेफरसन विरुद्ध अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टन असा सामना रंगण्यास सुरवात झाली. स्वातंत्र्य युद्धात अमेरिकेवर झालेल्या कर्जाची परतफेड आणि इंग्लंड-फ्रांस युद्धात फ्रांसला सहकार्य न करता इंग्लंडशी मैत्री करार करणे. हया कारणांनी जेफरसन आणि हॅमिल्टन वैराला प्रारंभ झाला. जेम्स मेडिसनची साथ जेफरसनला मिळाली. हॅमिल्टन विरोधात त्याने कारवाया करण्यास सुरवात केली. मंत्रीमंडळातील एक मंत्री असून आपल्या सहकारी मंत्र्याविरुद्ध आणि प्रशासनाच्या विरोधात जेफरसनने चळवळ उभारली. त्यात हॅमिल्टन हा वॉशिंग्टनचा सर्वात विश्वासू सहकारी. त्यामुळे जेफरसनची मंत्रीमंडळातून हकाहपट्टी निश्चित झाली होती. जेफरसनने स्वतःच मंत्री पदाचा राजीनामा देऊन स्वतःची प्रतिष्ठा राखली. हॅमिल्टनच्या धोरणानुसार वॉशिंग्टन कारभार करणे जेफरसनला मान्य नव्हते. त्यामुळे ते वॉशिंग्टन यांच्यावर नाराज झाले. भविष्यात वॉशिंग्टन आणि जेफरसन यांच्यातील वैर कधीच संपुष्टात येऊ शकले नाही. १७९६ ला डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार म्हणून थॉमस जेफरसन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढले.

जॉन ॲडम्स यांना अत्यंत चुरशीची लढत त्यांनी दिली. अवघ्या काही मतांवरुन त्यांचा पराभव झाला. अखेर त्यांना उपराष्ट्राध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले. ॲडम्स आणि जेफरसन यांच्यातील लढतीने नकळतपणे भविष्यात अमेरिकेत पक्षीय राजकारणाची सुरवात होणार होती. ॲडम्स यांच्यापासून 'रिपब्लिकन पक्ष' आणि जेफरसन यांच्यापासून 'डेमोक्रॅटिक पक्ष' हया अमेरिकन राजकारणातील दोन विचारधारा विकसित होत गेल्या. जॉन ॲडम्स यांच्या सरकारने मंजूर केलेले दोन कायदे अमेरिकेतील पक्षीय राजकारणाच्या सुरवातीचे दुसरे महत्वाचे कारण होते. ते म्हणजे 'ओलियन आणि सेडिटेशन ॲक्ट १७९८'. जॉर्ज वॉशिंग्टन पक्षीय राजकारणाच्या विरोधात होते. ते कोणत्याही पक्षाचे सभासद नव्हते. पक्षीय राजकारण देशासाठी घातक ठरू शकते. असे त्यांचे व्यक्तिगत मत होते.

अमेरिकन लोकशाहीतील फडांचा प्रारंभ
आधुनिक जगाचा दिपस्तंभ..

जॉन ॲडम्स आणि थॉमस जेफरसन यांच्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी लढत झाली. तेंव्हा 'फेडरलिस्ट' आणि 'अँटी फेडरलिस्ट' असे दोन गट अमेरिकेच्या राजकारणात होते. अँटी फेडरलिस्ट गटालाच 'डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी' किंवा 'जेफरसनियन रिपब्लिक' असे संबोधत. अलेक्झांडर हॅमिल्टन आणि जेम्स मेडिसन यांनी केलेल्या लेखणी युद्धामुळे हया दोन गटातील विरोध अधिक टोकदार होत गेला. 'ओलियन आणि सेडिटेशन ॲक्ट १७९८' ला आपण मराठीत 'स्थलांतर आणि राजद्रोह कायदा' असे म्हणू शकतो. यातील सेडिटेशन म्हणजे राजद्रोहाचा कायदा जेफरसन-मेडिसन प्रभूतींच्या अँटी फेडरलिस्ट गटाला धोकादायक वाटत होता. राष्ट्राध्यक्षांना धोकादायक वाटणा-या तुरूगांत टाकण्याचा अथवा हद्दपार करण्याची तरतुद या कायदयात होती. अशा विविध कारणांनी अमेरिकेतील राजकारणात हया दोन विचारधारा अधिक स्पष्ट होण्यास सुरवात झाली.

थॉमस जेफरसन यांच्या निधनानंतर अवघ्या दोन वर्षात म्हणजे ८ मार्च १८२८ रोजी 'डेमोक्रॅटिक पक्षा'ची विधिवत स्थापना झाली. जेफरसन यांचा उल्लेख काही अभ्यासक 'शेतकरी राष्ट्राध्यक्ष' असा करतात. त्यांचा वैचारिक कल नेहमी शेतकरी,कनिष्ठ मध्यम वर्ग,आर्थिक दुर्बल,गुलाम इत्यादी वर्गांच्या बाजूने राहिला होता. त्यामुळे त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या विचारधारेवर आधारित पक्षात दिसणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकेतील डाव्या विचारधारेचा पक्ष समजला जातो. तर 'रिपब्लिकन पक्ष' उजव्या विचारसरणीचा मानला जातो. अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी फेडरलिस्ट पक्षाला मजबूत केले. एक मजबूत संयुक्त केंद्र सरकार,इंग्लंडशी घनिष्ठ संबंध,एक केंद्रिकृत बॅकिंग प्रणाली आणि सरकार व धनको-उद्योगपती यांचे घनिष्ठ संबंध इत्यादी फेडरलिस्ट पक्षाची हॅमिल्टनदत्त विचारधारा म्हणावी लागेल. एका अर्थाने फेडरलिस्ट गटाचे रुपांतर रिपब्लिकन पक्षात झाले.

अमेरिकन लोकशाहीतील फडांचा प्रारंभ
आम्ही संयुक्त राज्यांचे साधारण लोक..

रिपब्लिकन पक्षाने २२ फेब्रुवारी १८५६ रोजी पेनसिल्व्हेनियामधील 'पिट्सबर्ग' येथे पहिले राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते .डेमोक्रॅटिक पक्ष हा जगातील सर्वात जुना मतदार-आधारित राजकीय पक्ष आणि युनायटेड स्टेट्समधील सर्वात जुना विद्यमान राजकीय पक्ष आहे. अमेरिकेच्या इतिहासात आजवर 'जो बायडन' धरून १६ राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे झाले आहेत. अमेरिकच्या राजकारणात एक आणखी गंमत दिसून येते. थॉमस जेफरसन हे आयुष्यभर गुलामी प्रथा संपविण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र या प्रथेचा नायनाट करुन निग्रोंना ख-या अर्थाने मुक्त करण्याचे काम अब्राहम लिंकन यांनी केले. लिंकन हे रिपब्लिकन पक्षाचे होते.

अमेरिकेतील दक्षिण भागातील राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा तर उत्तर भागात रिपब्लिकन पक्षाचा पारंपरिक प्रभाव असलेला दिसून येतो. १८२८ पासून अमेरिकेत ख-या अर्थाने उघड असे पक्षीय राजकारण सुरु झाले. राजकीय पक्ष आल्यानंतर राजकारण कसे होते? याचे पहिले प्रात्यक्षिक १८२८ च्या निवडणूकीत अमेरिकन जनतेने पाहिले. ही निवडणूक तोपर्यंतची सगळयात गलिच्छ निवडणूक म्हणून नोंदविल्या गेली आहे. थॉमस जेफरसन यांची निवड नकळतपणे अमेरिकन लोकशाहीतील भावी पक्षीय राजकारणाच्या फडांची नांदी ठरली.

प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

Comments

  1. खूप सुंदर . . .👍 धन्यवाद .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !