कामीकडे जाण्यासाठी माकोतो

"जा !माझ्या भव्य वंशजा ! तेथे जा आणि राज्य कर.  तुझ्या घराण्याची भरभराट होवो.  स्वर्ग व पृथ्वीप्रमाणे तुझा वंश अक्षय टिको." असा आशीर्वाद परमेश्वराने मिकाडोला देऊन त्याला पृथ्वीवर पाठवले.  परमेश्वराने पृथ्वी उत्पन्न करण्याची वेळी सर्वप्रथम जपान हे बेट उत्पन्न केले.  अशा जपानवर राज्य करण्यासाठी त्यांनी 'मिकाडो' नावाच्या व्यक्तीला राजा म्हणून हया भूमीवर पाठवले.  त्यामुळे शिंतो मान्यतेनुसार मिकाडो हा परमेश्वराचा म्हणजेच सूर्यदेवतेचा पृथ्वीवर आलेला पहिला वंशज ठरतो.  शिंतो धर्माच्या मान्यतेनुसार जपानचे राज्य व भूमी ही खास ईश्वरी योजनेने अस्तित्वात आली आहे.  ज्याप्रमाणे 'यहूदी-ख्रिश्चन-इस्लाम' यांच्या मान्यतेनुसार 'जेरूसलेम' किंवा 'इस्त्राइल' ची भूमी ईश्वराने त्याच्या आवडत्या मानवी समूहाला वास्तव्य करण्यासाठी दिलेली ईश्वरदत्त भूमी आहे.  त्याप्रमाणेच जपानी भूमी मिकाडोच्या वंशाला दिली होती.  त्याच्या घराण्यानेच जपानच्या भूमीवर हजारो वर्षे राज्य केले.  हा मिकाडो सूर्यादेवतेपासून म्हणजे 'अमातेरसू' किंवा 'ओहमी कामी' (सूर्यासाठी असलेले जपानी संबोधन) पासून निर्माण झाला.  शिंतो परंपरा यामुळे अमातेरसूला म्हणजे सूर्याला सर्वश्रेष्ठ देवता म्हणून मान्यता देते.  शिंतोच्या 'को-जिकी' धर्मग्रंथात यासंदर्भात सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. अमातेरसूने मिकाडोला जपानच्या भूमीवर पाठवतांना सांगितले की,"अमातेरसू आपल्या संततिपैकी एकाला खास पृथ्वीवर राज्य करण्याच्या दृष्टीन पाठवते.  खाली उतर तेथे राहा आणि भाताच्या लोंगरांच्या व बोरुंच्या फलद्रुप भूमीवर राज्य कर." को-जिकी धर्मग्रंथात मिकाडो प्रथम ज्या जागी उतरला ती जागा देखील सांगितली आहे.  त्यानुसार मिकाडो महाराज 'हो-नो-नि-नि-गी' हे प्रथम 'त्सुकुशी' प्रांतात 'टाकात्री' या पर्वताच्या शिखरावर उतरले.  यामुळेच आपल्या वंशाची उत्पत्ती आणि त्याला देण्यात आलेली राजसत्ता हया दोन्ही घटना दैवी आहेत.  असा दावा मिकाडो वंशातील राजे वारंवार करतात.  को-जिकी ग्रंथात मिकाडो राजांचा एक संदेश आहे.  त्यानुसार,"ऐका,जनहो ऐका ! उच्च स्वर्गात शासन करणारे आमचे प्रिय मित्र आदिपिता व आदिमाता यांनी आम्हाला आस्थापूर्वक असा आशीर्वाद दिला आहे की बोरू व भाताच्या फलद्रुप भूमीवर आमचे विभूतीयुक्त पौत्र सुखाने राज्य करतील." सूर्यदेवतेने म्हणजे अमातेरसूने आपल्या वंशाजाकडे भूमीवरील अधिराज्य सोपवून म्हटले,"माझी मुलेबाळे दैवी अंशाची असल्याने हया भूमीवर राज्य करतील." त्यामुळे मिकाडो राजघराण्याच्या उद्घोषणेनुसार जगाच्या आरंभापासून जपानवर मिकाडो राजे राज्य करीत आहेत.  मिकाडो राजांचा जपानवर राज्य करण्याचा देवदत्त अधिकार आधुनिक जपानच्या राज्यघटनेत देखील मान्य करण्यात आला आहे.  त्यामुळे आजही जपानमध्ये राजेशाही असलेली दिसते.  मिकाडो राज्यांची ही देवदत्त सत्ता ज्या को-जिकी नावाच्या शिंतो धर्माच्या प्रमुख ग्रंथात मान्य करण्यात आली आहे.  तो ग्रंथच मिकाडो राजाच्या दरबारातील एका मंत्र्याने लिहिलेला आहे.  त्यामुळे धर्मग्रंथाच्या माध्यमातून राज्य करण्याचा आपल्या घराण्याचा ईश्वरदत्त अधिकार त्यांनी मान्य करून घेतलेला दिसतो.  बौद्ध,लोओत्से व कन्प‹यूशस ही तीन तत्त्वज्ञानं इसवी सनाच्या सहाव्या-सातव्या शतकात जपानच्या धरतीवर पोहचल्यानंतर जपानी संस्कृतीचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी को-जिकी ग्रंथाची निर्मिती करण्यात आली.  त्यामुळे एक राष्ट्र म्हणून जपानची जडणघडण होण्यास प्रारंभ झाला.  त्यामुळेच को-जिकी आणि निहोनशोकी हया दोन्ही ग्रंथांमध्ये जपानमधील विविध कुलांच्या पुराणकथा समाविष्ट करण्यात आल्या आणि सूर्यदेवतेला सर्वश्रेष्ठत्व देण्यात आले.  सूर्याला शिंतो परंपरेनुसार सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे.  त्याच्यासाठी 'अमातेरसू' हा शब्द वापरण्यात आलेला दिसतो.  मात्र येथे एक वेगळेपण जाणवते.  शिंतो परंपरेत अमातेरसू ही मातृदेवता मानल्या जाते.  म्हणजे सूर्याला माता मानले जाते.  त्याचा उल्लेख स्त्रीलिंगी केला जातो.  हे शिंतोचे आणखी एक वेगळेपण सांगता येते.  शिंतोचे पारंपरिक तत्त्वज्ञान पाहिल्यास त्यामध्ये जगासंदर्भात दोन वेगवेगळया संकल्पना मानण्यात आलेल्या दिसतात.  शिंतोनुसार जग दोन स्वरूपात अस्तित्वात आहे.  एक 'उर्ध्व' म्हणजे उभ्या रेषेत असणारे जग आणि दुसरे म्हणजे 'समस्तर' जग म्हणजे आडव्या रेषेतील जग'  उर्ध्व अथवा उभ्या जगात अगदी वरच्या टोकाला स्वर्गलोक (ताका-मागा-हारा),मध्यभागी मनुष्यलोक (नाकात्सु-कुनी) आणि अगदी तळाला तमोभूमी(योमी-नो-कुनी).  आपल्या भाषेत यालाच 'पाताळ' असे संबोधतात.  जपानी पुराणकथांमध्ये हयाच कल्पनेला अधिक महत्व देण्यात आलेले दिसते.  समस्तर किंवा आडव्या रेषेतील जगाच्या संकल्पनेत वर्तमान जग आणि दुसरे शाश्वत जग असे भेद करण्यात आले आहे.  शाश्वत जग हे अतिदूर समुद्रावर अस्तित्वात असते.  आपण ज्या जगात राहतो ते वर्तमान जग असते.  हे वर्तमान जग शिंतोच्या तत्त्वज्ञानानुसार सर्वात आदर्श आहे.  शिंतोचे अठराव्या शतकात जे पुनरुज्जीवन करण्यात आले, तेंव्हा देखील आपण राहतो त्या म्हणजेच वर्तमान जगाच्या स्वीकारावर भर देण्यात आला,  म्हणजेच शिंतो हा वर्तमान जगण्याला महत्व देणारा आणि सर्वश्रेष्ठ मानणारा धर्म ठरतो.  मृत्यू पश्चात जगाला तो काडीची किंमत देत नाही.  हे तत्त्व शिंतोला बौद्ध आणि पारसी तत्त्वज्ञानाच्या निकट नेणारे ठरते.  अमातोरसू म्हणजे सूर्यदेवता ही मिकाडो राजघराण्याची जनक म्हणूनच नव्हे,तर जपानी जनतेची सर्वश्रेष्ठ संरक्षक देवता म्हणून तिला सर्वोच्च स्थान प्राप्त झालेले आहे.  असे असले तरी जपानमधील विविध कुलांच्या कुलदेवता वेगवेगळया आहेत.  विविध कुलांच्या या  कुलदेवतांच्या उत्सवप्रसंगी जपानच्या मिकाडो राजघराण्याकडून त्यांना नैवद्य अर्पण करण्याची प्रथा इसवी सन ६४५ पर्यंत चालू असल्याचे संदर्भ अनेक अभ्यासकांना सापडले आहेत.  निसर्गातील मानवी क्षमतेबाहेरली प्रत्येक घटकाला देवत्व बहाल करणा-या शिंतो परंपरेच्या को-जिकी धर्मग्रंथात आठ लक्ष देवांचे अस्तित्व मानण्यात आले आहे.  तथापि अमातेरसूला म्हणजे सूर्यालाच प्रधान देव मानण्यात आले आहे.  इसवी सनाच्या अठराव्या शतकात शिंतोचे पुनरुज्जीवन करण्याची चळवळ झाली.  त्यामध्ये आधुनिक शिंतो धर्माची संकल्पना मांडण्यात आली.  यामध्ये अभिजात जपानी साहित्यातून प्रत्ययास येणा-या आपल्या प्राचीन पूर्वजांच्या श्रद्धा आणि त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी हयांतून शिंतोचे प्राचीन रूप शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.  हया चळवळीमुळे जपानमधील आधुनिक शिंतो धर्म अस्तित्वात आलेला दिसतो.  आज शिंतोचे तीन प्रकार असलेले आढळतात.  पहिला प्रकार म्हणजे देवस्थानांना म्हणजे 'श्राइन' ला महत्व देणारा.  देवस्थान हे आध्यात्मिक एकतेचे केंद्र होय,असे मानणारे लोक  एका सर्वेक्षणानुसार १९६४ साली देवस्थानकेंद्रित शिंतोची सुमारे ८००० देवस्थाने आणि १७००० हजार धर्मगुरू होते.  तसेच या शिंतोला मानणारी एक कोटी चाळीस लाख कुटुंबे जपानमध्ये होती.  शिंतोचा दुसरा प्रकार म्हणजे लोकशिंतो.  धार्मिक संघटना आणि विचारव्यवस्था यांच्यापेक्षा लोकश्रद्धांना हया प्रकारात महत्व देण्यात आलेले आहे.  लोकशिंता त्यामुळे देवस्थानकेंद्रित शिंतोच्या अधिक जवळ जाणारा वाटतो.  तिसरा प्रकार पंथीय शिंतोचा आहे.  पंथीय शिंतो ही एकोणिसाव्या शतकात उदयाला आलेली एक चळवळ आहे.  तेरा पंथांच्या शिंतो संघटनांनी तिचा विस्तार घडवून आणला आहे . त्यामध्ये 'इझुमो ताइशा-कयो' आणि 'तेन्री-कयो' हया पंथाचे अनुयायी अधिक आहेत.  हे तिन्ही शिंतो प्रकार एखादया वस्त्रातील धाग्यांसारखे एकमेकांत गुंतलेले दिसतात.  निसर्गपूजक शिंतोधर्मात बहुतेक देवता निसर्गाच्या भिन्न शक्ती आहेत.  आदिमाता 'इझानागी' आणि पिता 'इझांगी' यांनी विश्वाची निर्मिती केली.  अमातेरसू म्हणजे सूर्यदेवता ही शिंतोमध्ये अत्यंत पूज्य आहे.  सूर्याला स्त्री मानणारा हा जगातील एकमेव धर्म आहे.  शिंतो मंदिरांमध्ये सर्व देवातांची आराधना-पूजाअर्चा केली जाते.  'ईसे' नावच्या शहरात मिकाडो राजांची आदिमाता अमातेरसूचे मोठे पवित्र मंदिर आहे.  शिंतो धर्म मूर्तीपूजक नाही.  त्याच्या मंदिरांमध्ये एक वाटोळा आरसा ठेवलेला असतो.  तो अंतरिक्षातील पवित्र सूर्याचे प्रतीक मानला जातो.  हा आरसा साक्षात अमातेरसूने आपला पहिला वंशज मिकाडो याला स्वतःचे पवित्र चिन्ह म्हणून दिला,अशी श्रद्धा आहे.  हया आरशात पाहिल्यानंतर आपला पुत्र मिकाडो याला आपले दर्शन होईल,असे आश्वासन अमातेरसूने दिले.  शिंतोमध्ये देवांना 'कामी' असे संबोधले जाते.  कामीपर्यत पोहचण्यासाठी मानवाने 'माकातो' म्हणजे सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे.  कारण सत्यसंकल्प अथवा सत्याचा मार्ग हा देवत्वाचा गाभा आहे.  मनुष्य,विश्वातील प्रत्येक वस्तू आणि देव यांच्यातील चिरंतन नात्यात माकोतो अंतर्भूत असतो.  थोडक्यात सत्याशिवाय परमेश्वरापर्यंत पोहचता येत नाही.  त्यामुळे शिंतो माकातो म्हणजेच सत्याला अमूर्त मानत नाही.  सत्याची प्रचिती आपल्याला वास्तवातून येत असते असे मानतो.  परमेश्वर म्हणजे 'माकातो' म्हणजेच 'सत्य'.  सत्याशिवाय परमेश्वराचे वेगळे अस्तित्वच नसते.  त्यामुळे माकातो वा सत्य माणसात जेंव्हा कार्यरत होते. तेंव्हाच त्याला परमेश्वराची प्राप्ती,सहकार्य व अनुग्रह होऊ शकतो.  अशी शिंतोची मान्यता आहे.  शिंतोनुसार देवांनी माणसाला जीवन दिले आहे.  त्यामुळे सर्व माणसे समान व पवित्र आहेत.  त्यामुळे माणसाची जीवनाकडे व इतरांकडे पाहण्याची वृत्ती ही नम्रतेची व सत्यशीलतेची असावी.  या वृत्तीमुळेच माणसाकडून नैतिक कृत्ये घडू शकतात.  आपले काम आणि आपले मानवी संबंध हयात आपला जीव ओतला पाहिजे.  आपल्या मर्यादित आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण मनःपूर्वक कारणी लावला पाहिजे.  त्या दृष्टीने प्रत्येक वर्तमान क्षण मौल्यवान आहे.  सतत पुढे जाणा-या आणि विकसित होणा-या इतिहासात मिसळून जाण्याचा हाच खरा मार्ग आहे.  शिंतो संस्कतीच्या हया वैशिष्टयामुळे जपानने प्रत्येक संस्कृती व धर्माचा सहज स्वीकार केला.  सर्वांचा सुसंवादी मेळ घालत एका अनन्यसाधारण संस्कृतीची निर्मिती केली.  म्हणजे माकातोने जपानचा कामीकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त केला.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                                                         

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !