जेफरसन अजून जीवंत आहे..

" मला शेतीचे संगोपन-संवर्धन किंवा फळबागांची काळजी घेणे यापेक्षा जगातील इतर कोणताही व्यवसाय सुंदर वाटत नाही." अमेरिकेच्या तिस-या राष्ट्राध्यक्षाचे हे विधान आहे.  या व्यक्तीने जीवनात दोनच छंद जोपासले होते.  पहिला म्हणजे राष्ट्रहित आणि दुसरा म्हणजे व्हर्जिनियाच्या डोंगरी भागात असेलेली आपली शेती व घर.  त्याला त्याच्या काळातील एक कुशाग्र राजकीय विचारवंत मानले गेले. असे असले तरी त्याच्या वैयक्तिक राजकीय जीवनात इतर नेत्यांची असफलता ही त्याची सफलता ठरली.  तो स्वतःचे विचार आणि कर्तृत्व यावर कदापि सफल होऊ शकला नाही.  त्याचे व्यक्तिमत्व म्हणजे एक तत्त्वज्ञ आणि शांतीप्रियता यांचा सुंदर मिलाफ होता.  कला,विज्ञान आणि धर्म यांच्यावर चर्चा करतांना मात्र त्याच्या व्यक्तिमत्वातला शांतपणा गळून पडत असे.  त्यावेळी त्याच्या इतका उत्साही आणि आनंदी असणारा व्यक्ती दुसरा कोणी नसेल.  त्याचे जिज्ञासू आणि चंचल मन सदैव आपल्या मातृभूमीला उपयुक्त ठरेल अशा गोष्टींच्या शोधात राहत असे.  तो एक अर्थशास्त्रज्ञ असला तरी त्याच्यातील तत्त्वज्ञाचा प्रभाव त्याच्यातील अर्थशास्त्रज्ञावर कायम होता.  त्यामुळे तत्त्वज्ञाप्रमाणे त्याच्या आर्थिक सिद्धांताची भाषा असंबद्ध होती.  जगातील कोणत्याही लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी त्याने एका विचाराचा आग्रह आयुष्यभर धरला होता.  तो म्हणायचा की," प्रत्येकाला आर्थिक व धार्मिक स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क व संधी दिल्याशिवाय ख-या लोकशाहीची स्थापना होऊ शकत नाही." कदाचित शेतकरी म्हणून मातीशी नाळ कायम असल्यामुळे लोकशाहीची मुळं समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहचवण्याचा आग्रह त्याने धरला असेल.  स्वातंत्र्ययुद्धात हया शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या नेत्याने दुसरा राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स याच्याप्रमाणे अत्यंत महत्वाची भूमिका निभावली होती.  काँटिनेंटल काँग्रेसचा सदस्य म्हणून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अमेरिकेच्या इतिहासात त्याचे योगदान महत्वाचे होते.  अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा बनविण्यात त्याचा सक्रिय सहभाग होता.  व्हर्जिनियाचा गर्व्हनर,फ्रांसमध्ये संयुक्त राज्य अमेरिकेचा राजदूत,जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात राष्ट्रीय सचिव आणि जॉन ॲडम्सच्या काळात उपराष्ट्राध्यक्ष म्हणून त्याने जबाबदारी पार पाडली होती.  यावरून आपल्या लक्षात येऊ शकते की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावरील समस्या व राजकारण यांचा प्रदीर्घ अनुभव असलेले हे व्यक्तिमत्व होते.  त्यामुळे तत्कालीन अमेरिकेतील राजकारणात त्याचे वेगळेपण नजरेत भरणारे होते.  जॉर्ज वॉशिंग्टन आणि जॉन ॲडम्स या त्याच्या पूर्वीच्या दोन्ही राष्ट्राध्यक्षांपेक्षा एकदम भीन्न प्रतिमा व प्रतिभा असलेला हा अमेरिकेचा तिसरा राष्ट्रध्यक्ष म्हणजे थॉमस जेफरसन.  जीवनातील महान यशानंतर ही त्याचे पाय मातीचे राहू शकले.  कारण राजकारणाच्या,सत्तेच्या,पदांच्या व प्रतिष्ठेच्या कोलाहलात त्याच्यातील शेतकरी कधी हरवला नव्हता.  व्हर्जिनिया राज्यातील 'रॉडवेल' गावी १३ एप्रिल १७४३ ला पिटर जेफरसन यांना पुत्रप्राप्ती झाली.  एक सधन,प्रगतिशील शेतकरी आणि सर्वेक्षक असलेल्या पिटर जेफरसन ओळखले जात. त्यांचे जेफरसन घराणे व्हर्जिनियातील प्रसिद्ध व प्रतिष्ठित घराणे होते.  थॉमस त्याच्या दहा भावंडांपैकी तिसरा होता.  थॉमसच्या हुशारीची चुणूक शालेय जीवनापासूनच दिसू लागली.  वयाच्या १६ व्या वर्षी थॉमसने 'विल्यम अँड मेरी' महाविद्यालयात प्रवेश घेतला.  जॉर्ज वेथ या प्राध्यपकाच्या प्रभावामुळे थॉमसने कायदयाचे शिक्षण घेण्याचे निश्चित केले.  अत्यंत हुशार असल्यामुळे अवघ्या दोन वर्षात थॉमसने कायदयाची पदवी मिळवली.  त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याचवेळस म्हणजे वयाच्या १६ व्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले.  पिटर जेफरसन यांच्या मुलांमध्ये त्यांच्या मालमत्तेचे वाटप झाले.  त्यानुसार थॉमस जेफरसनच्या वाटयाला ५००० एकर जमीन आणि ४० गुलाम ऐवढी संपत्ती आली.  त्यानंतर वयाच्या २४ व्या वर्षी म्हणजे १७६७ साली व्हर्जिनियामध्ये वकिलीची सनद मिळवली.  वाचनाचा अफाट व्यासंग म्हणजे थॉमस जेफरसन असे ही त्याचे वर्णन करता येते.  आयुष्यभर स्वतःचे वैयक्तिक ग्रंथालय समृद्ध करण्याचा छंद त्याने जोपासला.  त्यामुळे हजारो ग्रंथांचे विशाल वैयक्तिक ग्रंथालय. हे त्याचे आणखी एक वेगळेपण सांगता येते.  व्हर्जिनियात काही वर्षे वकिली केल्यानंतर थॉमस जेफरसन यांनी मार्था वेल्स यांच्याशी विवाह केला.  अभिजात संगीताची आवड हा मार्था आणि थॉमस यांना जोडणारा एक समान दुवा होता.  मार्था आणि थॉमस यांचे वैवाहिक जीवन अल्पायुषी ठरले.  अवघ्या दहा वर्षाच्या संसारात मार्थाने सहा मुलांना जन्म दिला.  या दरम्यान मार्थाचे वडिल जॉन वेल्स यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्याकडून वारसा हक्काने तिला ११००० हजार एकर जमीन आणि १३५ गुलाम संपत्ती म्हणून मिळाले.  वयाच्या ३३ वर्षी मार्थाला मधुमेहाने ग्रासले.   सहा बाळांतपणे आणि मधुमेह यामुळे मार्थाची प्रकृती दिवसोंदिवस ढासळत गेली.  अखेर ६ सप्टेंबर १७८२ रोजी मार्था यांचे निधन झाले.  थॉमस जेफरसन यांनी आपल्या मरणासन्न पत्नीला एक वचन दिले होते.  ते वचन म्हणजे आपण तिच्या निधनानंतर पुनर्विवाह करणार नाही.  थॉमस जेफरसन यांनी हे वचन पाळले.  त्यांनी पुन्हा विवाह केला नाही.  थॉमस जेफरसन यांनी आपल्या मिळकतीवर एक महालसदृश घर बांधले  ज्याचे नाव होते 'माँटेसिलो'.  १७६८ ते १७७३ या कालखंडात थॉमस जेफरसन व्हर्जिनियातील एक प्रख्यात वकिल म्हणून ओळखले गेले.  ब्रिटिश संसदेने अमेरिकेन वसाहतींवर  अन्याय करणा-या कायद्याचा जेफरसन यांनी कडाडून विरोध केला.  हा त्यांच्या राजकीय जीवनाचा आरंभबिंदू म्हणावा लागतो.  अमेरिकन वसाहतींचा कारभार स्वायत्तपणे चालवण्याचा अधिकार अमेरिकन समाजाला मिळवा यासाठी जेफरसन कायम आग्रही होते.  त्यांच्यासारख्या हुशार वकिलाने अन्यायकारक कायद्याविरुद्ध दंड थोपटल्याने व्हर्जिनियाच्या क्षितीजावर एक राजकीय नेतृत्व म्हणून त्यांचा उदय होणे अपेक्षितच होते.  आधुनिक जगातील सर्व स्वातंत्र्ययुद्धांचा इतिहास अवलोकल्यास आपल्या हे लक्षात येते की त्यांचे नेतृत्व प्रामुख्याने वकिलांनी केलेले आहे.  भारतीय स्वातंत्र्य लढयात देखील वकिलांचे योगदान सर्वात मोठे आहे.  एक नवे राजकीय नेतृत्व म्हणून व्हर्जिनियाच्या जनतेने १७७५ साली जेफरसन यांना दुस-या काँटिनेंटल काँग्रेसमध्ये आपले प्रतिनिधी म्हणून पाठवले.  यानंतर थॉमस जेफरसन हे नाव अमेरिकेच्या राजकीय क्षितीजावर चमकण्यास प्रारंभ झाला.  अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा उद्घोष म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामा.  हया जाहीरनाम्याचे लेखन करण्याचे महत्वपूर्ण काम थॉमस जेफरसन यांनी केले.  काँग्रेसने जेंव्हा जेफरसन यांच्यावर ही जबाबदारी सोपवली तेंव्हा ते यासाठी फारसे उत्सुक नव्हते.  त्यावेळी त्यांचा सख्या मित्र आणि  आजीवन कट्टर वैचारिक विरोधक असलेल्या जॉन ॲडम्स यांनी त्यांना या कामासाठी अखेर मनवले.  ॲडम्स आणि जेफरसन हे अमेरिकन राजकारणातील दोन ध्रुव होते.  त्यांच्यातील वैचारिक वैर दोघांच्या अखेरच्या श्वासापर्यंत संपू शकले नाही.  मात्र मैत्रीदेखील तुटू शकली नाही.  अनेक वर्षे दोघांमध्ये अबोला व दुरावा राहिला.  १८११ पर्यंत या दोन मित्रांचे वैर चालू होते.  अखेर १ जानेवारी १८१२ रोजी जॉन ॲडम्स यांनी थॉमस जेफरसन यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहिले.  मित्राच्या पत्राने वैराचे काटे गळून पडले आणि जीवनाच्या अखेरच्या पर्वात त्यांच्या मैत्रीला पुन्हा धुमारे फुटले.  ४ जुलै १८२६ ला अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच दोघांचे निधन झाले. या दोघांमुळेच हा दिवस 'स्वातंत्र्य दिन' ठरला होता.  जेफरसन यांनी ॲडम्स यांच्या पाच तास आधी अखेरचा श्वास घेतला.  मरणशय्येवर असलेल्या ॲडम्स यांना हे कळण्याची संधी नव्हती तरी त्याचं अखेरचे शब्द होते – "Thomas Jefferson still survives " म्हणजेच, " थॉमस जेफरसन अजून जीवंत आहे." या वाक्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी त्यांच्या दोघांचे अमेरिकेसाठी असलेले योगदान पहावे लागते.  हे दोघे त्यांच्या मृत्युच्या वेळी स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व केलेले अखेरचे नेते होते.  आपण जातोय तरी अमेरिकेसाठी अजून जेफरसन आहेत.  असे ॲडम्स यांना म्हणायचे होते.  दोघांच्या व्यक्तिमत्वात टोकाचे वेगळेपण होते.  ॲडम्स अत्यंत शिघ्र कोपी,चिडखोर,उग्र आणि 'मी सांगेल ते धोरण' असणारे तर जेफरसन अत्यंत शांत,सभ्य आणि विद्वान.  त्यांच्या अमेरिकेविषयी असलेल्या विचारधारा देखील कधी जुळल्या नाहीत.  अशा आपल्या मित्राच्या आग्रहावरून थॉमस जेफरसन यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला.  जो ४ जुलै १७७६ रोजी ॲडम्स यांनी काँटिनेंटल काँग्रेस मध्ये मंजूर करून घेतला.  त्यामुळेच ४ जुलै अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.  स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामुळेच थॉमस जेफरसन हे नाव अमेरिकेच्या व जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कायमचे कोरले गेले.
  प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !