बुद्धाच्या कुशीत विसावलेला 'शिंतो'

इसवी सनाच्या सहाव्या शतकात कोरियन द्विप समहातून बौद्ध धर्म जपानच्या धरतीवर अवतरला.  तोपर्यंत जपानी समाज ज्या तत्त्वज्ञान व मूल्यव्यवस्थेला प्रमाण मानून जगत होता.  जपानची संस्कृती आणि जीवन पद्धती ज्या तत्त्वज्ञान व मूल्यव्यवस्थेला उभी होती.  त्याचे नामकरण झालेले नव्हते.  सहाव्या शतकात बौद्ध धर्माच्या आगमनाने जपानी जगण्याला एक नाव मिळाले,ते म्हणजे 'शिंटो'.  यालाच आज शिंटो धर्म म्हणून संबोधण्याची पद्धत रुढ झालेली आहे.  बौद्ध धर्माचा जपानमध्ये प्रवेश होईपर्यंत धर्म ही संकल्पना जपानी समाजात अस्तित्वात नव्हती.  बौद्ध धर्माच्या परिचयाने जपानी समाजाला पहिल्यांदाच एका संस्थात्मक धर्माचा परिचय झाला.  वेगळया शब्दात सांगायचे म्हणजे जपानी समाजाला धर्म ही संकल्पनाच पहिल्यांदा समजली.  त्यामुळे बौद्ध धर्माच्या आगमनापर्यंत जपान ज्या    तत्त्वज्ञानावर,मूल्यांवर,श्रद्धांवर जगत होता.  ज्यातून त्याने आपली समृद्ध अशी संस्कृती निर्माण केली होती.  तिला त्याने काही नाव अथवा संबोधनच दिलेले नव्हते.  बौद्ध धर्मामुळे आपल्या तोपर्यंतच्या जगण्याला नाव देण्याची गरज जपानी समाजाला वाटली.  त्यामुळे त्यांनी आपल्या संस्कृतीचे नामकरण 'शिंटो' किंवा 'शिंतो' असे केले.  निसर्गातील विविध घटकांना म्हणजेच भारतीय संकल्पनेनुसार पंचमहाभूतांना परमशक्ती मानून,त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आणि त्यांचे पूजन करून जपानी लोकांनी आपल्या जीवनाला एक शिस्त अथवा व्यवस्था दिलेली होती.  म्हणजे आपली संस्कृती आणि जीवन पद्धती निर्माण केलेली होती.  बौद्ध धर्माच्या आगमनानंतर त्यांनी आपल्या याच जगण्याला शिंतो म्हणजे 'देवाचा मार्ग' असे संबोधले.  यामध्ये बौद्ध धर्मापेक्षा आपले वेगळेपण दाखवण्याचा भाव अंतर्भूत होता.  एखादी नवीन व्यवस्था आल्यानंतर जुन्या व्यवस्थेला स्वतःची व्याख्या अथवा पुर्नव्याख्या करण्याची गरज निर्माण होत असते.  बौद्ध धर्म येण्यापूर्वी आमच्याकडे सुद्धा काही मौल्यवान होते. हे सांगण्याची धडपड अथवा मानसिकता जपानी समाजात निर्माण होणे अत्यंत स्वाभावीक होते.  हे कोणत्याही मानवी समुहाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.  नवीन काहीही आल्यानंतर जुने टिकवण्याची धडपड जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातच होत असते.  जपानच्या बाबतीत बौद्ध धर्म आला म्हणून जपानी समाज आपल्या जीवनमार्गाला शिंतो संबोधू लागले.  याचा अर्थ त्यांनी बौद्ध धर्माविरुद्ध दंड थोपटले असा होत नाही.  जपानी समाजाची भूमिका स्वीकाराची होती.  नव्याने आलेल्या बौद्ध धर्माने त्यांचा परिचय धर्म संकल्पनेशी करून दिला.  त्यामुळे आजवर आपण जगत होतो.  त्याला काय म्हणावे? या पडलेल्या प्रश्नातून त्यांनी आपल्या जीवनपद्धतीला शिंतो असे संबोधले.  तसेच बौद्ध धर्माच्या संकल्पनेत आपल्या परंपरागत संकल्पना कशा बसवता येतील. याचा विचार जपानी लोकांनी केला.  कारण बौद्ध धर्माशी जपानी संस्कृतीचा संगम म्हणजे दोन नदयांचा संगम ज्या सहज नैसर्गिक पद्धतीने होता.  हा संगम अगदी तसाच होणे अपेक्षित होते.  शिंतोच्या माध्यमातून त्यांना बुद्धांला आणि त्यांच्या धम्माला विरोध करायचा नव्हता.  उलट बुद्धांला आणि त्यांच्या धम्माला जपानी करायचे होते.  त्यांनी बुद्धांना आणि त्यांच्या धम्माला शिंतोच्या सहाय्याने जपानी चेहरामोहरा दिला.  जपानमध्ये आलेल्या बौद्ध धम्माला देखील असे करण्यात काही अडचण आली नाही.  कारण भगवान बुद्धांनी धर्म सांगितला नव्हता तर जीवन जगण्याचा खरा मार्ग सांगितला होता.  शिंतो हा देखील जीवन जगण्याचा मार्गच होता.  सनातनीपणा किंवा कर्मठता दोन्ही मार्गांमध्ये नव्हती.  दोन मार्ग सहजपणे एकमेकांशी मिळून एकच मार्ग म्हणून पुढे चालू शकतात.  तसाच हा प्रकार सांगता येता.  यासाठी बौद्ध आणि शिंतो यांच्या परस्परसंबधांतील काही दुवे पाहिले तर हे आपल्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकते.  इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या मध्यकाळात जपानमधील 'नारा' याठिकाणी असलेल्या 'तोडाजाइजी' नावाच्या बौद्ध मंदिरात शिंतो देवतांची पूजास्थाने बांधण्यात आली होती.  तसेच प्रसिद्ध शिंतो देवस्थानांच्या परिसरात बौद्ध मंदिरांची उभारणी करण्यात आली.  यामागे शिंतो देवता हया बौद्ध धर्माचे रक्षण करतात अशी भावना व श्रद्धा अभिप्रेत होती.  शिंतो देवस्थानांसमोर बौद्ध प्रार्थना म्हटल्या जाऊ लागल्या.  आठव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जपानी शिंतो लोकांचा एक पंथ शिंतो देवतांना बोधिसत्व मानू लागला.  जपानमधील 'तेंडाई' नावाचा एक बौद्ध-शिंतो पंथ उदयाला आला.  त्यामध्ये शिंतो देवता म्हणजेच भगवान बुद्ध अथवा आद्य बुद्ध प्रकृती असे प्रतिपादन करू लागला.  कोकाई नावाच्या एका जपानी बौद्ध भिख्खुने 'शिंगॉन' अथवा 'शिंगोन' बौद्ध-शिंतो पंथाची स्थापना केली होती.  शिंगॉन वा शिंगोन हा 'मंत्र' या शब्दासाठी जापानी भाषेतील पर्यायी शब्द आहे.  साध्या शब्दात मंत्राला जापानी भाषेत शिंगोन म्हणतात.  कोकाई हा तांत्रिक बौद्ध धर्माचा अनुयायी होता.  त्याने इसवी सन ७९६ मध्ये महावृक्ष तंत्राचे ज्ञान मिळवले आणि त्याला मान्यता मिळवण्यासाठी तो इसवी सन ८०४ मध्ये चीन यात्रेला गेला.  कोकाईनेच आपल्या शिंगोन पंथात महाविरोचन तंत्राचा समावेश केला.  त्याने शिंतो देवता सूर्यालाच महाविरोचन असे संबोधले.  १८६८ मध्ये जपानमध्ये सम्राट मेजी याची कारकिर्द सुरू झाली.  त्याच्या राजवटीत बौद्ध-शिंतो धर्म अनेक देवस्थानांमध्ये संयुक्तपणे अस्तित्वात येऊ लागला.  इसवी सनाच्या तेराव्या शतकात जपानमधील बौद्ध-शिंतो धर्माची दार्शनिक बैठक पूर्णत्वास गेली.  अशा प्रकारचा मिलाफ होत असतांना काही लोकांच्या अंगात मूलतत्त्ववादाचे वारे येऊ लागते.  समाजाला समन्वयाकडून दुंभगण्याकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.  मूलतत्त्ववादाला खतपाणी घालण्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो.  यामधून त्यांना पात्रता नसली तरी स्वतःचे वेगळे अस्तित्व सहज निर्माण करता येते.  जपानमध्ये बौद्ध-शिंतो समन्वयामुळे पोटशुळ उठलेले काही लोक शिंतोला मूलतत्त्ववादाचा मुलामा चढवू लागले.  त्यातून काही पंथांची निर्मिती झाली.  'वाताराई शिंतो' हा त्याच्यातील पहिला पंथ.  शिंतोमध्ये आलेले बौद्धत्व वगळून शिंतोला शुद्ध जपानी रूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.  वाताराई शिंतोनुसार 'कोंतोन' म्हणजे गोंधळाची स्थिती किंवा अभाव (असत्) ही विश्वाची मूलभूत अवस्था मानण्यात आली.  हया अवस्थेतून सर्व सजीव सृष्टी निर्माण झाली.  अशी मान्यता होती.  प्राचीन शिंतोमध्ये सर्वात महत्वाच्या मानण्यात आलेल्या शुद्धतेला किंवा शुद्धाचरणाला महत्व देण्यात आले.  तसेच 'शोजिकी' म्हणजे साधूता आणि नैतिकता यांच्या बळावर आपण देवांशी एकरुपता साधू शकतो.  अशी हया पंथाची शिकवण होती.  इसवी सनाच्या पंधराव्या शतकात 'योशिदा' नावाचा असाच पंथ निर्माण झाला.  योशिदा कानेतोमो (१४३५-१५५१) हयाने या पंथाची निर्मिती केली.  वाताराई पंथाचा आणि लाओत्से प्रणित ताओवादाचा प्रभाव त्याच्यावर होता.  एखादी व्यक्ती खरोखरच विशुद्ध असेल,तर तिचे हदय हे देवांचे निवासस्थान होऊ शकते. अशी हया पंथाची शिकवण होती.  इसवी सनाच्या सतराव्या शतकात चिनी तत्त्वज्ञ कन्प‹यूशसच्या विचारांचा प्रभाव असलेले काही शिंतो पंथ निर्माण झाले.  अठराव्या शतकात शिंतोचे पुनरुज्जीवन करण्याची चळवळी सुरु झाल्या.  तिला 'फुक्को शिंतो' असे संबोधण्यात येते.  मोतुरी नोरीनागा (१७३०-१८०१) हा या पुनरुज्जीवनवादी चळवळीचा प्रणेता होता.  फुक्को शिंतोवादयांनी बौद्ध धर्मासोबतच कन्प‹यूशस यांचा शिंतोवरील प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  यासाठी त्यांनी अभिजात जपानी साहित्यातून प्रत्ययास येणा-या आपल्या प्राचीन पूर्वजांच्या श्रद्धा आणि त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी हयातून शिंतोचे प्राचीन रूप शोधण्याचा प्रयत्न केला.  यामधून जपानमधील आधुनिक शिंतो धर्माची निर्मिती झाली.  शिंतोमधील विविध संप्रदाय यामुळे लुप्त झाले. हे सर्व बुद्धविरोधक दुसऱ्या शब्दांमध्ये बुद्धच सांगत होते. त्यामुळे जपानमधील आणि अन्य देशांमधील बौद्धद्वेष्टयांनी जपानमधून बौद्ध धर्माचे अस्तित्व संपुष्टात आले.  अशा प्रकारच्या वल्गना आपल्या लेखनातून करण्यास सुरवात केली.  जपान,शिंतो आणि बौद्ध-शिंतो मिलाफ याविषयी अन्य जगाला फारशी माहिती नसल्यामुळे हा भ्रम पसरवण्यात त्यांना मोठया प्रमाणात यश देखील आले.  अत्यंत सहजपणे स्वीकारण्यात आलेले कोणतेही तत्त्वज्ञान समाजाच्या मनातून कदापि नष्ट करता येत नाही.  भगवान बुद्ध,लोओत्से आणि कन्प‹यूशस हे तीनही महापुरुष इसवी सनपूर्व सहाव्या शतकातले म्हणजे समकालीन होते.  त्यांच्या विचारधारा कमी-अधिक प्रमाणात एकमेकांशी नैसर्गिक साम्य सांगणा-या आहेत.  जपानमधील प्राचीन शिंतो संस्कृती देखील या तीनही तत्त्वज्ञानांशी असेच नैसर्गिक नात्याने जोडलेली होती.  बुद्ध,तोओ आणि कन्प‹यूशस हे तीनही महापुरुष आक्रमण करून जपानमध्ये आलेले नव्हते.  त्यांचे आगमन आणि प्रस्थापना रक्तविहिन होती.  सहज विहार करत ते जपानच्या भूमीवर पोहचले होते. स्वतःकडे  लोओत्से व कन्प‹यूशस असतांना देखील चीनने त्यांच्याही पेक्षा मोठया प्रमाणात बुद्धाला स्वीकारले.  तसेच अत्यंत सहजपणे आपल्या शिंतोला घेऊन जपान बुद्धाच्या कुशीत विसावला. याचे कारण शिंतोच्या मुलभूत संकल्पनेत दडलेल्या बुद्धात आहे.
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                                                          

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !