शापित राष्ट्राध्यक्ष
४ जुलै १८२६ ला अमेरिकेच्या दोन राष्ट्राध्यक्षांचे निधन होते. त्यापैकी एक अमेरिकेच्या राज्यघटनेचा शिल्पकार होता. ज्याला अमेरिकेच्या राष्ट्रपित्यांपैकी एक मानले जाते. आपली प्रखर बुद्धिमत्ता,निस्वार्थीपणा आणि देशभक्ती याच्यासाठी देखील तो ओळखला जातो. ज्याचा सर्व परिवाराने नव्या अमेरिकेच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले. स्वातंत्र्य युद्ध आणि स्वातंत्र्योत्तर अमेरिका यांच्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचणा-या या महापुरुषाचे स्मारक आजतागायत अमेरिकेत उभे राहू शकलेले नाही. २०२६ मध्ये त्याच्या निधनाला दोनशे वर्ष होतील. त्याच्या निधनानंतर अवघ्या सोळा महिन्यांनंतर त्याचा मुलगा अमेरिकेचा सहावा राष्ट्राध्यक्ष झाला. हा महापुरुष म्हणजे जॉन ॲडम्स आणि त्यांचा पुत्र म्हणजे जॉन क्विन्सी ॲडम्स. पित्यानंतर पुत्र अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्याचा ॲडम्स पिता-पुत्राचा विक्रम बुश पिता-पुत्रालाच मोडता आला. असे असतांनाही अमेरिकेत त्याच्या एका राष्ट्रपित्याचे स्मारक उभे राहू शकत नाही. भारतासारख्या देशाच्या संदर्भात असे घडणे काही नवल नाही. मात्र अमेरिकेत असे घडते हे मोठे विशेष म्हणावे लागते. २००१ मध्ये ॲडम्स पिता-पुत्राचा विक्रम मोडणा-या बुश पिता-पुत्रापैकी पुत्र जॉर्ज बुश ज्युनियर यांनी जॉन ॲडम्स यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. आज २० वर्षे झाली तरी हे स्मारक समित्या आणि शासकीय निर्णय यांच्या फे-यात अडकलेले आहे. २०१९ ला घेण्यात आलेल्या निर्णयानुसार २ डिसेंबर २०२५ पर्यंत ॲडम्स स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत ठरवण्यात आली आहे. अशा अंतिम मुदती अनेक वेळा बदललेल्या आहेत. असे का झाले? ॲडम्स यांच्याबद्दल अशी उदासिनता का? याचा शोध घेण्यासाठी ॲडम्स यांचे खाजगी जीवन आणि त्यांचा स्वभाव कारणीभूत असावा असे वाटते. १७८० साली अमेरिकेच्या मॅसेच्युसेटस् प्रांतात निग्रो गुलामांना माणूस म्हणून गो-यांच्या बरोबरीने माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्रदान करण्यात आला. त्यासाठी मॅसेच्युसेटस्च्या संविधानात मानव अधिकारांचा जाहीरनामा अंतर्भूत करण्यात आला होता. त्यानुसार 'गुलामी प्रथा' संपुष्टात आणण्यात आली. गो-यांच्या दृष्टीने हे सर्व पातक करणारा व्यक्ती म्हणजे जॉन ॲडम्स. कारण मॅसेच्युसेटस् प्रांताच्या संविधानाचा निर्मिक ॲडम्स होता. ॲडम्सने आयुष्यभर गुलामी प्रथेचा जाहीर विरोध केला होता. निग्रोंना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कायदयाने मिळवून देणारा हा अमेरिकेतील पहिला गोरा होता. यावरून जॉन ॲडम्स प्रकांड पंडित असला किंवा त्याची देशभक्ती जाज्वल्य असली तरी राजकारणी म्हणून तो मुर्ख होता. हे सिद्ध होते. कारण राजकारण्यांनी आदर्शांचा केवळ उच्चार करायाचा असतो आणि अत्यंत सावधपणे सोयीने त्यांची अमंलबजावणी करायची असते. राजकारणाला आदर्श हानीकारक ठरत असतील तर त्यांना बगल दयायची असते. हे ॲडम्सला जमले नाही. म्हणजेच त्याचा पिंड कसलेल्या राजकारण्याचा नव्हता. १७९६ च्या निवडणूकीत अमेरिकेचा दुसरे राष्ट्राध्यक्ष म्हणूज जॉन ॲडम्स विजयी झाले. या निवडणूकीत त्यांचे कट्टर वैचारिक शत्रु थॉमस जेफरसन आणि त्यांच्यात काटयाची टक्कर झाली. ७१ विरुद्ध ६८ अशा निसटत्या बहुमतोन ॲडम्स राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान झाले. या दोघांचे आयुष्यात एकाच गोष्टीवर एकमत होऊ शकले. ही गोष्ट म्हणजे यांनी मृत्युसाठी एकच दिवस निवडला. जॉर्ज वॉशिंग्टन यांची तत्त्वे,नीती आणि योजना ॲडम्स यांना तशाच पुढे राबवल्या. मात्र तोपर्यंत वॉशिंग्टन यांचा दुसरा हात अलेक्झांडर हॅमिल्टन अधिक ताकदवर झाला होता. त्याच्याशी ॲडम्स यांचे सख्य नव्हतेच. ते एकमेकांचे विरोधकच होते. ॲडम्स यांचे वाढलेले वय आणि तरूण हॅमिल्टन यांच्या संघर्षात हॅमिल्टनच वरचढ ठरत होता. राष्ट्राध्यक्ष पदाच्या उत्तरार्धात ॲडम्स नामधारी झाले होते. यामध्येच अमेरिकेत त्यांची लोकप्रियता घसरवणारा दुस-या विवादास्पद निर्णयाची जबाबदारी त्यांनी आपल्या अंगभूत प्रामाणिकपणामुळे स्वतःवर घेतली. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे रंग झपाटयाने बदलत होते. वॉशिंग्टन,ॲडम्स,हॅमिल्टन आणि जे यांनी इंग्लंडसोबत शांती करार केल्याने फ्रांस बिथरला होता. त्याच्याशी वैर नवजात अमेरिकेला परवडणारे नव्हते. कारण फ्रांस त्यावेळी जगातील महासत्ता होती. अशावेळी ॲडम्स यांनी नेपोलिअनशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी १७९९ मध्ये त्याने जॉन मार्शल याला नेपोलिअनकडे पाठवले आणि मैत्रीचा प्रस्ताव सादर केला. नेपोलिअनला देखील त्यावेळी युद्ध नको होते. त्यामुळे त्याने अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारला. या दरम्यान फ्रांस आणि अमेरिका यांच्या मध्ये बाहुबल दाखवण्याचे प्रशांत सागरावर सुरु होते. अमेरिकेने केलेला विश्वासघात आणि इंग्लंडशी मैत्री याने नाराज झालेला फ्रांस युद्धाच्या धमक्या तर देतच होता; परंतु अमेरिकन व्यापारी जहाजांना अडथळा निर्माण करत होता. ज्याचा परिणाम अमेरिकेच्या व्यापारावर होऊ लागला. अमेरिका-युरोप व्यापार खंडित करण्यासाठी फ्रेंच नौदल प्रशांत महासागरावर सज्ज झाले होते. त्याच्यासमोर अमेरिकेचे मरतुकडया आरमाराचा निभाव लागणे कदापि शक्य नव्हते. फ्रांससमोर आपला पराभव निश्चित आहे. याची पूर्ण जाणीव ॲडम्सला यांना होती. तरीही त्यांनी आपल्या नौदलाला लढण्याचा आदेश दिला होता. फ्रेंच-अमेरिकन सागरी युद्धाला 'क्विन्सी वॉर' असे संबोधले जाते. या कठिण परिस्थितीत सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांना सरसेनापती म्हणून पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांच्या हाताखाली अलेक्झांडर हॅमिल्टन याला दुय्यम सेनापती म्हणून देण्याचे ठरवण्यात आले. ॲडम्स यांना वॉशिंग्टन यांना बोलवणे पसंत नव्हते. यामागे राष्ट्राध्यक्ष म्हणून जनतेच्या नजरेत आपण दुबळे ठरू.अशी भावना देखील असू शकते. मात्र ते ज्या फ्रेडरलीस्ट पार्टीचे होते. त्या पाटींच्या दबावापोटी त्यांना हे मान्य करावे लागले. हॅमिल्टन याने या संधीचा नेमका लाभ उठवला. वॉशिंग्टन यांनी देशासाठी सैन्याचे नेतृत्व करण्याचे मान्य केल्यामुळे हॅमिल्टनचे पारडे जड झाले होते. त्याने युद्धाची सर्व सुत्रे हातात घेतली. त्याने अत्यंत तातडीने तीन युद्धनौका तयार करून घेतल्या. या युद्धनौकांनी अमेरिकन व्यापारी जहाजांवार होणारे फ्रेंच हल्ले यशस्वीपणे परतवले. त्यामुळे अमेरिकेत एक विजयी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. फौजेवर हॅमिल्टनची पकड अधिक मजबूत झाल्याने तो राष्ट्राध्यक्षाप्रमाणे वागू लागला. त्याला या परिस्थितीचा लाभ स्वतःसाठी आणि फ्रेडरलीस्ट पार्टीसाठी करून घ्यायचा होता. तो घेत असलेले अनेक निर्णय ॲडम्स यांना मान्य नव्हते. मात्र पार्टी हॅमिल्टनच्या बाजूने होती. त्यामुळे ॲडम्स हतबल झाले होते. हॅमिल्टनने फौज आणि त्याचे समर्थक यांचा वापर करून डेमोकॅटिक रिपब्लिकन पाटींची नाकेबंदी केली होती. रिपब्लिकन पाटींच्या समर्थकांना सैन्यात महत्वाच्या जागा देण्यास ही तो नकार देत होता. त्याचा आणि फ्रेडरलीस्ट पार्टीचा आनंद आणि गर्व गगनात मावत नव्हता. ते देशातील वातावरणाचा नेमका लाभ घेण्याच्या विचारात असतांनाच जॉन मार्शल यांना नेपोलिअनकडे पाठवून जॉन ॲडम्स यांनी फ्रांससमवेत मैत्री करार केला. यामुळे हेमिल्टन आणि फ्रेडरलीस्ट पार्टी यांच्या आनंदावर विरजन पडले. तसेच अमेरिकन जनतेचा देखील गैरसमज झाला. सामान्य जनतेत युद्धोन्माद निर्माण करणे सोपे असते. कारण युद्धामुळे होणारे भावी नुकसान लक्षात येण्यापत तिची क्षमता नसते. अशावेळी एखाद्या द्रष्टया माणसाने भविष्याचा विचार करून घेतलेला निर्णय त्याच्या बदनामीचे कारण ठरतो. तसेच त्याच्या आयुष्यभराच्या कर्तबगारीवर यामुळे पाणी फिरते. अशावेळी जनतेच्या उन्मादाला खतपाणी घालून काही लोक सत्तेत येण्यात यशस्वी होतात. मात्र अशा उथळ लोकांमुळे द्रष्टे व सच्चे देशभक्त नेते जनतेच्या टिकेचे व द्वेषाचे लक्ष बनतात. असे करून सत्तेवर आलेल्या उथळांचे पितळ उघडे पडेपर्यंत देशाच्या सामान्य जनतेने बरेच काही गमावलेले असते. प्रामाणिक माणसांच्या वाटयाला शेवटी बदनामीच आलेली आहे. देशाच्या जनतेला हे जेंव्हा उमगते तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. नेमके हेच जॉन ॲडम्स यांच्या बाबतीत घडले. हॅमिल्टन आणि त्याच्या सहका-यांनी निर्माण केलेल्या विजयोन्मादात अमेरिकन जनतेला ॲडम्स यांनी केलेला मैत्री करार हा देशद्रोह वाटला. त्यामुळे ॲडम्स बदनाम झाले. मात्र त्यांनी अमेरिकेचे भविष्यातील होणारे मोठे नुकसान टाळले होते. नवीन आरमाराच्या बांधणीत अमेरिकेला मोठया प्रमाणात खर्च करावा लागला होता. त्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी जनतेवर नवे कर लादावे लागले अमेरिकन जनतेवर अशाप्रकारे मोठया प्रमाणात कर लादण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे ॲडम्स यांच्या विरोधातील जनप्रक्षोभास तेथूनच सुरवात झाली होती. नीग्रोंची गुलामी नष्ट करणे या मानवतावादी आणि फ्रांसशी मैत्री करार करुन नवजात अमेरिकेला मोठया नुकसानापासून वाचवणे अशा दोन राष्ट्रवादी पातकांमुळे अमेरिकेचा हा दुसरा राष्ट्राध्यक्ष आजवर शापित ठरला आहे. देशाच्या व जनतेच्या प्रती खरोखर प्रामाणिक राहिलेले लोकच जनतेत बदनाम केले जातात किंवा होतात. त्यामुळे जनतेलाच अप्रामणिक लोक नेते म्हणून हवे असतात. असेही वाटून जाते. अमेरिकेचा राष्ट्रपित्यांपैकी एक आणि अमेरिकेच्या राज्यघटनेचा शिल्पकार असलेला हा बुद्धिमान नेत्याचा आत्मा आजही आपल्या स्मारकाच्या प्रतिक्षेत घुटमळत आहे.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
सर मला पहिल्यांदा ही माहिती कळाली आहे. आपल्या लेखनातून विविध माहिती कळते .
ReplyDelete