उगवत्या सूर्याच्या देशातील 'शिंटो'
सूर्याचे किरणं पृथ्वीवरील ज्या भूमीला सर्वप्रथम स्पर्श करतात तो म्हणजे जपान. त्यामुळचे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे देखील संबोधले जाते. चार मोठया आणि ६८५२ छोटया द्विपांचा समूह असे जपानचे भौगोलिक वर्णन करता येते. होक्काइडो,होंशू,शिकोकू,क्यूशू आणि ओकिनावा हे या द्विपसमुहातील प्रमुख द्विप सांगितले जातात. आशिया खंडातील हा देश पूर्वेला उत्तर पश्चिम प्रशांत महासागराने,उत्तरेला ओखोटस्क सागरापासून चीनी सागरापर्यंत आणि दक्षिणेला जपानी महासागर यांनी वेढलेला आहे. चीन,कोरिया आणि रशिया हे त्याचे सख्खे शेजारी. जगामध्ये हा देश जपान म्हणून ओळखला जात असला तरी जपानचे लोक आपल्या देशाला 'निप्पॉन' असे संबोधतात. निप्पॉन या शब्दाचा अर्थ 'सूर्योदय' असा होतो. आपल्या देशाला जपानी लोक निप्पॉन संबोधतात हे अत्यंत सार्थ वाटते. कारण जगाच्या पाठीवर सूर्योदय सर्वप्रथम पाहणारे हे लोक आहेत. आपल्याला निप्पॉन हा शब्द निप्पो बॅटरी अथवा बॅटरीचे सेल यासंदर्भात चांगला माहित आहे. निप्पॉन ही जपानची खूप मोठी कंपनी असून विविध क्षेत्रात ती विस्तारलेली आहे. टोकिया जपानची राजधानी असली तरी योकोहामा,ओसाका,क्योटो,नागायो,साप्पारो,फुकुओका,कोबे ही देखील जपानमधील मोठी शहरं आहेत. जगात लोकसंख्येच्या दृष्टीने जपान अकराव्या स्थानावर येतो. लोकसंख्येची घनता आणि शहरीकरण हे देखील जपानचे वैशिष्टय सांगता ये.ते ४७ प्रांत आणि ८ पारंपारिक भौगोलिक प्रदेश यांच्यात जपानचे विभाजन करण्यात आले आहे. जपानी लोक आपल्या देशाला निप्पॉन असे संबोधतात तर जगात हा देश जपान म्हणून का ओळखला जातो ? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. जपानी भाषेत जपानचे नाव 'कांजी' असे आहे,मात्र त्याचे उच्चारण जापानी लोक निप्पॉन किंवा निहोन असे करतात. यासाठी जपानी भाषेचे वेगळेपण आपल्याला लक्षात घ्यावे लागते. जपानी भाषेच जगातील इतर कोणत्याच भाषेशी साधर्म्य नाही. ती संपूर्णपणे एक स्वतंत्र भाषा आहे. त्यामुळे जपानी लोक आपल्या देशाचे नाव लिहितांना कांजी आणि उच्चारतांना निप्पॉन अथवा निहोन असे का करतात ? याचे उत्तर जपानी भाषेचे जाणकार किंवा भाषावैज्ञानिकच अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकतात. इसवी सनाच्या ८ व्या शतकाच्या प्रारंभी जपानी लोक जपानचा उल्लेख 'यमातो' असे करायचे तर चीनमध्ये जपानला 'वा' असे संबोधले जात असे. १३ व्या शतकात आशियात आलेल्या मार्को पोलोने जपानचा उल्लेख 'सिपंगु' असा केलेला आहे. यानंतर चीनच्या दक्षिण किनारपट्टीवरील बोली भाषांमधून हया प्रदेशासाठी वापरल्या जाणा-या 'जपुन' अथवा 'जपांग' या शब्दांवरून जपान हे नाव आले असावे. तसेच १६ व्या शतकात पोर्तुगीज व्यापा-यांमुळे ते जगभर प्रसिद्ध झाले. असा काही अभ्यासकांचा कयास आहे. यासाठी दोन पुरावे देता येतात. एक म्हणजे १५६५ च्या एका पोर्तुगीज पत्रव्यवहारात 'जपान' असा उल्लेख आलेला आहे. तसेच १५७७ मध्ये इंग्रंजीत प्रकाशित झालेल्या एका ग्रंथात 'जपान' हे संबोधन या देशासाठी वापरण्यात आले आहे. इतिहासात आज ज्याला आपण जपान म्हणतो त्या भूभागाचा लिखित स्वरूपातील पहिला पुरावा इसवी सन ५७ च्या एका चीनी लेखामध्ये मिळतो. जपानमधील एक राजकीय दूत चीनमध्ये आला होता. तो चीनच्या पूर्वेकडील कोणत्या तरी द्विपावरून आला होता. असा उल्लेख या लेखात मिळतो. यामधील पूर्वेकडील द्विप म्हणजे जपान. त्यानंतर चीन आणि जपान या दोन्ही देशांमध्ये राजकीय व सांस्कृतिक संबंध प्रस्थापित होत गेले. एका अर्थाने चीन हा जपानसोबत संबंध प्रस्थापित करणारा जगातील पहिला देश. असल्यामुळे चीनचा सखोल प्रभाव जपानवर पडणे स्वाभाविक होते. चीनच्या संपर्कातूनच इसवी सनाच्या सहाव्या शतकात बौद्ध धर्म जपानपर्यंत पोहचला. यानंतर बौद्ध हा जपानचा प्रमुख धर्म बनला. आज जपानच्या लोकसंख्येपैकी ९६ % लोक बौद्ध आहेत. उर्वरित ४ % लोकसंख्या ख्रिश्चन,हिंदू इत्यादी धर्मियांची आहे. त्यामुळे जपानचा उल्लेख 'बौद्ध राष्ट्र' असा करण्यात येतो. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जपानचा धार्मिक इतिहास सविस्तर उपलब्ध आहे. त्यावर जगातील अनेक अभ्यासकांच्या लेखनात आणि बौद्ध वाङ्मयात जपानचा धार्मिक इतिहास शब्दबद्ध झालेला दिसतो. येथे प्रश्न असा निर्माण होतो की बौद्ध धर्म जपानच्या भूमीवर पोहचेपर्यंत जपानमध्ये कोणता धर्म होता? किंवा जपानला तोपर्यंत धर्म नव्हता का? किंवा तोपर्यंत जपानी लोक कोणत्या धर्मपरंपरेचे पालन करत होते? हया सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आपल्या इसवी सनाच्या सहाव्या शतकापूर्वीच्या जपानमध्ये जावे लागते. सहाव्या शतकापर्यंत जपानमध्ये कोणताही संस्थागत धर्म नव्हता हे खरे आहे. बौद्ध धर्मामुळे जपानी लोक एका संस्थागत धर्माचे अनुयायी झाले. तोपर्यंत जपानी समाज निसर्गातील शक्तींवर श्रद्धा असलेला समाज होता. ज्याप्रमाणे जगातील सर्व आदिवासी समूह निसर्गालाच सर्वशक्तीमान मानतात आणि त्याच्यातील विविध घटकांवर श्रद्धा ठेवतात आणि त्याचे पूजन करतात. त्याप्रमाणेच जपानी लोकांच्याही मान्यता होत्या. असे असले तरी जपानी समाज आणि जगातील आदिवासी समाज यांच्या निसर्गाच्या परमसत्तेच्या मान्यतेत एक मूलभूत अंतर असलेले दिसते. जगातील विविध आदिवासी समाजात निसर्गाच्या सर्वोच्य सत्तेवर श्रद्धा असली तरी त्या शक्तीला परम मानन्यापर्यंतच त्यांचे विचार पोहचलेले होते. निसर्गशक्तींच्या पाठीमागील कार्यकारण संबंधांचा शोध येथे अपवादानेच घेण्यात आला. जपानी समाजात हा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न झालेला होता. याचा अर्थ जपानी समाज इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत इतर जगापासून अलिप्त असला तरी तो एकदमच आदिम अवस्थेत नव्हता. तसेच इसवी सनाच्या सहाव्या शतकात बौद्ध तत्त्वज्ञानाशी परिचय होईपर्यंत जपानला स्वतःचे असे काही तत्त्वज्ञान नव्हते असे देखील नाही. जपानला स्वतःच्या म्हणून काही मान्यता,मूल्यं आणि तत्त्वज्ञान होते. त्यांची स्वतःची एक समृद्ध परंपरा होती. बौद्ध धर्माच्या परिचयाने ती अधिक विकसित झाली एवढेच. त्यामध्येही बौद्ध तत्त्वज्ञान हे जपानी जीवन व संस्कृतीशी अत्यंत नैसर्गिकपणे एकरूप होणारे होते. म्हणजेच जपानी समाजाच्या परंपरागत संस्कृतीला,मान्यतांना,तत्त्वज्ञानाला,मूल्यव्यवस्थेला आणि जीवन पद्धतीला अधिक समृद्ध व व्यापक करणारी बौद्ध परंपरा होती. दुस-या शब्दात आपण असे ही म्हणू शकतो की जपानी तत्त्वज्ञानाचा आणि संस्कृतीचा पूर्ण विकास म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञान. त्यामुळेच जपानमध्ये बौद्ध धर्माचा अत्यंत सहजपणे स्वीकार करण्यात आला. चीनच्या संपर्कामुळे बौद्ध धर्म जपानमध्ये पोहचला असला तरी तो जपानवर लादण्यात आला नाही. तो जपानने सहज स्वीकारला. जपानचे जे मुळचे तत्त्वज्ञान व संस्कृती होती. तिला बौद्ध धर्मामुळे एक आखिव-रेखिव चौकट मिळाली. आज जपानच्या प्राचीन संस्कृतीला व तत्त्वज्ञानाला 'शिंटो' किंवा 'शिंतो' धर्म असे संबोधले जाते. आज शिंटोचा उल्लेख धर्म म्हणून करण्याची प्रथा रूढ करण्यात आली आहे. जपानमधील बौद्ध धर्माचे महत्व कमी लेखण्यासाठी काही अभ्यासकांनी शिंटोला जाणीवपूर्वक वेगळा धर्म म्हणून रेखाटण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतो. त्यामुळे शिंटोविषयी अनभिज्ञ लोक भरकटण्याची शक्यता असते. बौद्धद्वेष्टे असलेले काही अभ्यासक तर शिंटोची माहिती देतांना जपानमध्ये बौद्ध धर्म मागे पडत चालला आहे. आता जपानमध्ये पुन्हा शिंटोला मानणारे लोक वाढत आहेत. अशा लोणकढी थापा देखील मारत असतात. जपानमधील वास्तव नेमके याच्याविरूद्ध आहे. आजचा जपानी समाज म्हणजे 'शिंटो' व 'बौद्ध' हया दोन्ही परंपरांचा एक नैसर्गिक असा सुरेख संगम आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपण धर्म ही संकल्पना पाहतो तेंव्हा तत्त्वज्ञान व आचारपद्धती यांची चौकट हा कोणत्याही धर्माचा पाया असतो. तसेच एक धर्मसंस्थापक व एक धर्मग्रंथ असणे. प्रत्येकाला उपासनेचा अथवा धर्मग्रंथाच्या पठणाचा समान अधिकार असणे. अशा सर्व गोष्टी धर्मसंकल्पनेत अंतर्भूत होत असतात. शिंटो ही जपानची जीवन श्रद्धा आणि जीवन शैली होती. शिंटोला धर्माच्या कोंदणात बसवण्याचे काम बौद्ध धर्माने केले. त्यामुळे जपानच्या धर्मपरंपरेचा विचार करतांना शिंटो ही संकल्पना समजावून घेणे महत्वाचे आहे. शिंटोला कोणतीही लिखित परंपरा नसल्यामुळे शिंटोविषयी मिळणारी माहिती अत्यंत त्रोटक अशी आहे. त्यातल्या त्यात इंग्रंजीमध्ये शिंटोविषयी काही प्रमाणात लेखन झालेले दिसते. भारतीय भाषांमध्ये शिंटोविषयी अत्यंत जुजबी माहिती उपलब्ध आहे. असे असले तरी शिंटोविषयी उपलब्ध स्त्रोतांमधून आपण शिंटोची एक ढोबळ संकल्पना निश्चितच समजावून घेऊ शकतो.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
चांगले सुटसुटीत मुद्दे लिहिले आहेत
ReplyDelete