गुरु मानियो ग्रंथ !

गुरु गोविंदसिंहांनी आपल्या निर्वाण समयी मानवी गुरुपरंपरा समाप्त केली  'गुरुग्रंथसाहिब' ला अंतिम गुरु म्हणून घोषित केले.  सर्व शीख गुरुंचे दर्शन या ग्रंथात तुम्हाला होईल,त्यामुळे गुरुग्रंथसाहिबचे नित्य वाचन-पठण करावे असा आदेश दिला.  त्यामुळे शीख धर्म आपल्या निर्गुण-निराकार ईश्वराच्या संकल्पनेवर कायमचा ठाम राहू शकला.  गुरुद्वा-यांमध्ये मूर्त्यांऐवजी गुरुग्रंथसाहिबची स्थापना झाली.  त्याचे नित्य वाचन व गायन हा भक्तीमार्ग ठरला.  कोणत्याही देशाच्या ग्रंथसंस्कृतीसाठी ही बाब गौरवास्पद आहे.  एक धर्म आपल्या उपासना स्थळात ग्रंथाची प्रतिष्ठापना करतो आणि त्याचे वाचन व गायन करण्याचा अधिकार प्रत्येकाला देतो  म्हणजेच ज्ञानप्राप्तीचा अधिकार प्रत्येकाला बहाल करातो.  त्यामुळेच शीख धर्मात धर्मगुरु किंवा पुरोहित यांचे वर्चस्व व शोषण निर्माण होऊ शकले नाही.  हे जगातील धर्मांच्या इतिहासातील अत्यंत विलक्षण वेगळेपण आहे.  गुरुग्रंथसाहिबला शीख धर्मपरंपरेत 'आदिग्रंथ' असे संबोधले जाते.  हा आदिग्रंथ मध्ययुगीन भारतातील एक अद्भूत रचना आहे.  आज त्याला धर्मग्रंथ म्हणून ओळखले जात असले तरी धर्मग्रंथांच्या पारंपरिक संकल्पनेला छेद देणारा हा ग्रंथ आहे.  कारण तो सर्व धर्मातील महानतम मूल्यांना स्वीकारणारा धर्मग्रंथ आहे.  त्याची ही सर्वसमावेशकता हे त्याचे अनन्यसाधारण वेगळेपण ठरते.  तेराव्या शतकातील शेख फरीद शकरगंज व जयदेव यांच्यापासून सतराव्या शतकातील गुरु तेगबहादरांच्या रचनांचा समावेश आदिग्रंथात करण्यात आलेला आहे.  आदिग्रंथ भारताच्या पाच शतकांच्या सुधारणावादी धर्मविचारांचे प्रतिनिधत्व करतो.  १६०४ मध्ये शीखांचे पंचम गुरु अर्जुनदेव यांनी आदिग्रंथाचे संकलन व संपादन सुरु केले होते.  मात्र यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या संतवाणीचा संग्रह आणि निवड करण्यास नानकदेवांपासून प्रारंभ झाला होता.  नानकदेवांनी आपल्या आयुष्यात जवळपास २२ वर्षे भारतातील सर्व प्रमुख तीर्थस्थळे तसेच श्रीलंका,मक्का,मदिना,बगदाद इत्यादींची यात्रा केली.  या यात्रेच्या दरम्यान त्यांच्या रचनांची निर्मिती झाली. तशीच त्यांनी आपल्या पूर्व व समकालीन संत-सूफी यांच्या रचनांचे संकलन देखील केले.  आयुष्याच्या सायंकाळी करतारपूर येथील वास्तव्यात त्यांनी संकलित केलेल्या सर्व रचनांना व्यवस्थित केले असावे.  असे काही अभ्यासक मानतात.  आदिग्रंथाचे संपादन कार्य १६०४ मध्ये गुरु अर्जुनदेवांनी केल्यानंतर त्याला लिपीबद्ध करण्यात भाई गुरुदास यांचे योगदान महत्वाचे ठरले.  भाई गुरुदास हे तिसरे शीख गुरु अमरदास यांचे पुतणे होते.  त्यांनी काही काळ काशीमध्ये राहून संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा सखोल अभ्यास केला होता.  गुरु अमरदास, गुरु रामदास, गुरु अर्जुनदेव आणि गुरु हरगोविंद अशा चार गुरुंचा सहवास भाई गुरुदासांना लाभला होता.  १५५१ मध्ये जन्मलेल्या भाई गुरुदासांनी आपल्या निधनापर्यंत म्हणजे १६३६ पर्यंत शीख धर्माच्या तत्त्वज्ञानाला ग्रंथरूप देण्यात महत्वाची भूमिका बजावली.  यामुळेच त्यांचा उल्लेख शीख धर्माचे प्रथम व्याख्याकार असा केला जातो.  पाचवे गुरु अर्जुनदेवांनी नानकदेवांच्या पोथ्या तिसरे गुरु अमरदास यांचे पुत्र बाबा मोहन यांच्याकडून प्राप्त केल्या आणि आदिग्रंथाला पूर्णाकार देण्यास सुरवात केली.  पोथ्यांमधून सिद्ध होत गेलेल्या आदिग्रंथाच्या रचनेचा इतिहास अत्यंत रोचक असा आहे.  आदिग्रंथात गुरु नानकदेवांनी रचलेल्या ९७४ 'शबद' (शब्द) समाविष्ट आहेत.  यामध्ये पद,सलोक( श्लोक),पौडी इत्यादी काव्य प्रकार दिसून येतात.  नानकदेवांनी आपले उत्तराधिकारी म्हणून स्वरचित आणि त्यांनी संकलित केलेले अन्य संतांच्या रचना गुरु अंगददेवांकडे सोपवल्या.  गुरु अंगददेवांनी स्वरचित ६२ रचनांची भर टाकून हा वारसा तिसरे गुरु अमरदास यांच्याकडे दिला.  गुरु अमरदास यांनी स्वरचित ९०७ रचनांची भर त्यात टाकली.  हया पोथ्यांना शीख परंपरेत 'सैंचिया' असे संबोधतात.  हया सर्व पोथ्यांचे विधिवत लेखन १५७० मध्ये प्रारंभ होऊन १५७२ ला पूर्णत्वास गेले.  हया पोथ्यांचा उल्लेख तीन प्रकारे करण्यात आलेला आढळतो.  त्यामध्ये 'सहंसर राम वाली पोथ्या' ज्यांचे लेखन गुरु अमरदासांचा नातू सहंसर राम याच्याकडे सोपवण्यात आले होते.  दुस-या पोथ्या 'गोयंदवाल पोथ्या' म्हणून ओळखल्या जातात.  कारण त्यांचे लेखन गुरु अमरदासांचे वास्वव्याचे ठिकाण असलेल्या गोयंदवाल या गावी झाले होते.  अमरदासांचे पुत्र बाबा मोहन यांनी लिहिलेल्या पोथ्या हा पोथ्यांचा तिसरा प्रकार.  या पोथ्यांमध्ये प्रथम तीन गुरुंच्या व्यतिरिक्त शेख फरिद,जयदेव,रामानंद,नामदेव,सैण,त्रिलोचन,रविदास,कबीर आणि भिकन या संतकवींच्या रचनांचा समावेश होता.  आदिग्रंथाचे संपादन सुरु झाल्यानंतर गुरु रामदासांच्या ६७९रचनांचा समावेश करण्यात आला.  गुरु अर्जुदेवांनी आदिग्रंथाला अंतिम रूप देण्याचे काम भाई गुरुदासांना सोपवले होते.  त्यांनी हे काम १६०४ मध्ये पूर्ण केले.  या मुळ प्रतिला हरमंदिस साहेब अमृतसरमध्ये प्रस्थापित करण्यात आले.  या प्रतीला 'करतारपुर वाली बीड' असे संबोधले जाते.  ही प्रत सध्या करतारपुरमधील सोढी वंशाच्या उत्तराधिका-यांकडे आहे.  यांनतर सुमारे शंभर वर्षांनंतर गुरु गोविंदसिंहांनी आदिग्रंथाला अंतिम रूप दिले.  सहाव्या,सातव्या आणि आठव्या गुरुंनी काव्यरचना केलेली नव्हती.  त्यानंतर नववे गुरु तेगबहादुरांनी ५९ पद व ५७ सलोक रचले.  त्यांचा समावेश गुरु गोवि्ांदसिंहांनी आदिग्रंथात करुन  त्याला अंतिम रूप दिले.  आदिग्रंथाचे इतर धर्मांच्या ग्रंथांपेक्षा असलेले व्यवच्छेदक लक्षण म्हणजे यातील पदांमध्ये अंतर्भूत असलेले संगीत आणि गेयता.  यासाठी आदिग्रंथाच्या अंतरंगात डोकवावे लागते.  आदिग्रंथाची प्रारंभ जपु,सोदर-सोपुरखु आणि सोहिला या गुरुवाणींनी होते.  त्यांना सर्वसाधारणपणे अनुक्रमे जपुजी साहब,रहिरास आणि कीर्तन सोहिला असे संबोधले जाते.  वारक-यांच्या हरिपाठ किंवा महानुभावांचा सूत्रपाठ याप्रमाणे हया तीन गुरुवाणींचे पठण  शीखांच्या नित्यपाठ म्हणून केले जाते.  प्रातःकाळी जपुजी,सायंकाळी रहिरास आणि रात्री झोपण्यापूर्वी कीर्तन सोहिला यांचे पठण करण्याचा नित्यनेम पाळला जातो.  जपुजी ही नानकदेवांची रचना आणि रहिरास व कीर्तन सोहिला हया इतर गुरुंच्या रचना आहेत.  हया तीन रचना आदिग्रंथाची एकप्रकारे प्रारंभ म्हणता येईल.  जपुजीच्या प्रारंभी मूलमंत्र आहे.  तो म्हणजे – ' एक ओंकार सतिनामु,करतापुरखु,निरभउ,निरवैर,अकाल मूरति,अजूनी,सैभं,गुरप्रसादि ।'. या मूलमंत्राचा सार असा सांगता येतो की,'परमेश्वर एक आहे.  त्याचे नाव म्हणजेच सत्य.  तो कर्तापुरुष आहे.  तो निर्भय आहे.  तो निरवैर म्हणजे सर्व वैरांच्या पल्याड आहे.  तो कालातीत आहे.  तो अयोनि आहे.  तो स्वयं प्रकाशित आहे. गुरुकृपेनेच त्याची प्राप्ती होऊ शकते.'  हा मूलमंत्र एक प्रकारे मंगलाचरणच म्हणावा लागतो.  आदिग्रंथात कोणत्या-कोणत्या स्वरूपात हा मूलमंत्र ५०० पेक्षा अधिक वेळा पुनरुक्त झालेला आहे.  आदिग्रंथात संकलित करण्यात आलेल्या सर्व गुरुवाण्यांमध्ये 'जपुजी' सर्वाधिक महत्वपूर्ण,बहुचर्चित,बहुपठित आणि बहुव्याख्यायित रचना आहे.  जपुजीला आदिग्रंथाचे सार तत्त्व असे देखील मानले जाते.  जपुजीत २ सलोक आणि ३८ पौडियाँचा(पदे) समावेश होतो.  पहिला सलोक आणि दुसरा सलोक यांच्यामध्ये पौडियाँ येतात.  अशा तीन गुरुवाण्यांनंतर शास्त्रीय संगीताच्या ३१ रागांमध्ये अन्य शीख गुरु ,संत,सुफि,भक्त यांच्या रचना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.  आदिग्रंथाचे मुद्रित संस्करण एकूण १४३० पृष्ठांचे आहे.  त्यामध्ये १४ ते १३५२ या पृष्ठांमध्ये यासर्व रागबद्ध वाण्यांचा समावेश होतो.  आदिग्रंथ आणि संगीताचा संबधाचे मुळ नानकदेव आणि भाई मरदाना यांच्या आध्यात्मिक प्रवासात दिसून येते.  नानकदेव आपल्या प्रवचनात स्वरचित पदे गात आणि भाई मरदाना रबाब वाजवून त्यांना साथसंगत करत.  प्रसंगी भाई मरदाना देखील या रचना गात.  हा संगीतमय प्रवास आदिग्रंथाच्या माध्यमातून शीखांच्या धार्मिक जीवनाचा चिरंतन भाग बनला.  विशुद्ध संगीत भक्तीचे रूपांतर समाधीत करण्याचा अत्यंत सहज मार्ग म्हणता येतो.  त्यामुळेच मध्ययुगीन भक्तीआंदोलनातील जवळपास प्रत्येक पंथात संगीताला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले.  शीख गुरुपरंपरेतील सर्व गुरु संगीत-गायन विद्येत निष्णात होते.  त्यामुळे त्यांनी त्यांची काव्यरचना करतांना रागदारीचा विचार केलेला होता.  तसेच इतर संतांच्या वाण्यांचा आदिग्रंथात समावेश करतांना त्यांच्यासाठी योग्य रागांची निवड तेंव्हाच निश्चित करण्यात आली होती.  नानकदेवांनी आपल्या अनेक रचनांमध्ये स्वतःचा उल्लेख 'ढाढी' म्हणजे गायक असा केलेला दिसतो.  आदिग्रंथाचा एक आणखी विशेष येथे नमुद करावासा वाटतो.  तो म्हणजे ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेल्या संताच्या रचनांचा क्रम हा त्यांचा काळ किंवा श्रेष्ठत्व अशा निकषांवर न करता शास्त्रीय संगीतातील रागांच्या आधारवर निर्धारित करण्यात आला आहे.  आदिग्रंथाचा उपसंहार गुरु अर्जुनदेवांच्या 'मुंदावाणी' शीर्षक असलेल्या पदाने होतो.  मुंदावाणीनंतर आदिग्रंथाच्या काही पृष्ठांवर रागमाला देण्यात आली आहे.  काव्य आणि संगीत यांचा सुरेख संगम म्हणजे शीख धर्माचा भक्तीमार्ग होय.  त्यामुळेच कोणत्याही गुरुद्वा-यापासून जातांना कोणताही कानसेन माणूस  रागदारीतील भजनांचे स्वर ऐकून तेथे घुटमळल्याशिवाय राहत नाही.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                                                       

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !