सवा लाख से एक लड़ाऊं..

''हात जोडून मी असा आशीर्वाद मागतो,
की माझे आयुष्य जेंव्हा अंताला येईल,
तेव्हा एका महान संघर्षात माझा देह पडो '' 
असे आपल्या अंतिम श्वासापर्यंत सत् आणि सत्व याच्यासाठी संघर्ष करण्याची मनीषा व्यक्त केलेल गुरु गोविंदसिंहजी आपल्या योद्धयाच्या वेषात सुसज्ज होऊन उभे होते.  खांद्यावर धनुष्य आणि हातात बंदूक असलेल्या गोविंदसिहांनी 'गुरुग्रंथसाहिब' आपल्या समोर उघडून ठेवला होता.  त्याच्या जवळच पाच पैसे आणि नारळ ठेवलेला होता.  गुरुजी आपल्या अनुयायांना संबोधून म्हणाले," आता माझी प्राणज्योती ज्योतिस्वरुप परमतत्त्वाच्या तेजाशी एकरूप होण्याचा क्षण समोर येऊन ठेपला आहे.  श्रीगुरुग्रंथसाहिब यांचे पूजन मी केले आहे.  तुम्हीही करा.  त्यांनाच आता तुम्ही गुरु मानावयाचे आहे आणि यापुढे खालासा चालू ठेवा आणि श्रीगुरुग्रंथसाहिबलाच गुरु माना  गुरुपंथ हा गुरुजींचा देह असून ज्याला ईश्वराला भेटण्याची आच आहे. त्याने गुरुजींच्या शब्दांचा वा उपदेशाचा मागोवा घ्यावा. गुरु मानियो ग्रंथ ! आपल्या सद्गुरुंनी आपापल्या काळाची शिकवण सर्वांसाठी दिली  ती या गुरुग्रंथात आहे.  अन्य भारतीय संतभक्तांचीही आहे.  या ग्रंथालाच यापुढे गुरुस्थानी माना.  त्याला पवित्र समजून त्यातच दहा गुरूंचे असलेले प्रतिबिंब पाहा" गुरु गोविंदसिहांनी आपल्यानंतर गुरु परंपरा असणार नाही.  गुरुग्रंथसाहिबच आता गुरु असेल कारण त्यांच्यापर्यंतच्या दहा गुरूंचे दर्शन त्याच्यात होणार आहे.  ही उद्घोषणा करुन  शीखांच्या धर्मग्रंथाला गुरुचा सन्मान प्रदान केला. त्यामुळे ग्रंथाला गुरु मानणारा शीख धर्म हा जगातील पहिला आणि अंतिम धर्म ठरला.  आज 'दहा गुरु आणि गुरुग्रंथसाहिब यांच्यावर श्रद्धा असणारा' अशी केली जाणारी शीख मनुष्याची व्याख्या गुरुजींनी यामधून निश्चित केली.  असे असले तरी दहाच्या दहा गुरुंना मानणारे,पण स्वतःला शीख म्हणवणारे लोक आजही दिसतात.  त्यामध्ये उदासी,मीणा आणि राम राय या पंथांचा समावेश आहे.  दहा गुरूंच्या वंशवृक्षामध्ये उल्लेख असलेल्या व गुरुपदावर अयशस्वीरित्या आपला दावा सांगणा-या लोकांचे हे अनुयायी आहेत.  आणखी काही लोक,दहाव्या गुरुंनंतरही गुरु परंपरा चालूच आहे. असे मानणारे आहेत व ते आजच्या एखाद्या हयात गुरुने सांगितलेले नीतिनियम पाळतात.  अशांमध्ये निरंकारी व नामधारी यांचा समावेश होतो.  गुरुग्रंथसाहिबमधील काही उता-यांवर शंका घेणारे,त्यामध्ये नसलेल्या गोष्टी समाविष्ट करण्याचा आग्रह धरणारे,कुठल्यातरी एकाच गुरुप्रती एकनिष्ठ असणारे किंवा गुरुपरंपरेत खरे गुरू बाजूलाच राहिले असा दावा करणारे अनेक उपसंप्रदाय शीखांमध्ये दिसून येतात.  असे असले तरी अशांना फारसे महत्व नाही.  दहा गुरू व गुरूग्रंथसाहेब यांच्यावरील अढळ श्रद्धा हा शीख धर्मातील मूलभूत समान दुवा आहे आणि बहुसंख्य शीख या सदरात मोडतात.  त्यामुळे खालसा शीख आणि सहजधारी शीख असे दोन प्रकारच प्रामुख्याने विचारात घेतले जातात.  आपले उद्बोधन समाप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळ असलेले पाच पैसे आणि नारळ बंदा बैरागी यांच्या हातात दिले आणि आपल्यानंतर खालसाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवले.  बंदा बैरागींना वंदन करुन  गुरू गोविंदसिहांनी आपला इहलोकाचा प्रवास थांबवला आणि अनंताच्या दिशेने ते मार्गस्थ झाले.  तो दिवस होता ७ आॅक्टोबर १७०८. त्यांचा अखेरचा दरबार आता संपला होता.  अवघे ४२ वर्षांच्या लौकिक आयुष्यात शास्त्र आणि शस्त्र निपुण गोविंदसिहांचे जीवन व कार्य जीवनसंघर्ष करणा-या प्रत्येकासाठी चिरंतन दीपस्तंभ ठरला आहे.  एखादया धर्माचा प्रमुख आपल्या धर्माच्या चिरंतन अस्तित्वासाठी आपल्या संपूर्ण परिवाराचे बलिदान करतो.  अखेरच्या क्षणी त्याच्या जवळ त्याचा शिष्य परिवारच असतो.  आपल्या अनुयायांसाठी त्याने परिवारातील प्रत्येकाची आहूती दिलेली असते.  उभे आयुष्य संघर्षाच्या अग्नित जाळलेले असते.  त्याचा अंतिम श्वास देखील त्याच्या धर्मात संघर्षाची कधीही शांत न होणारी मशाल पेटवून जातो.  त्याच्या जाण्याने जणू काही रावीचा प्रवाह गोदावरीला येऊन मिळतो.  असे गुरू गोविंदसिंह एक अमिट आदर्श ठेवून गेले.  गोविंदसिंहांची प्रतिमा सामान्य माणूस पाहतो किंवा त्यांच्या विषयक ऐकतो तेंव्हा त्यांचे एक योद्धा म्हणून असलेलेच व्यक्तिमत्व त्याच्या डोळयासमोर उभे राहते.  त्यांच्या व्यक्तिमत्वाची तेवढीच सशक्त दुसरी बाजू मात्र शीख धर्मियांना आणि अभ्यासकांनाच माहित असते.  गोविंदसिंह यांची शस्त्रावर जशी पकड होती तशीच शास्त्रावर व साहित्यावर देखील होती.  त्यांच्या दरबारात वीरांऐवढाच विद्वानांना आणि प्रतिभावतांना स्थान व मान होता.  त्यांनी आपल्या दरबारात ५२ कवींना आश्रय दिला होता.  संस्कृत ग्रंथांचे विशुद्ध आणि सुंदर अनुवाद व्हावे यासाठी त्यांनी त्यांच्या ५ शिष्यांना काशीला संस्कृतचे सखोल अध्यन करण्यासाठी पाठवले होते.  एक दृडसंकल्प असलेले धर्मप्रमुख,नीतिपरायण नेता आणि साहसी शुरवीर असलेले गोविंदसिंह स्वतः एक प्रतिभावान कवी होते.  'विचित्र नाटक' या काव्यात त्यांनी आपल्या पूर्वजन्माचे इतिवृत्त मांडले.  तसेच आपल्या अनुयायांमध्ये वीररस निर्माण होण्यासाठी वीररसयुक्त अशा काही  कवणांची निर्मिती देखील त्यांनी केली.  त्यांच्या सर्व काव्याचे संकलन 'दशमग्रंथ' म्हणन प्रसिद्ध आहे.  कारण शीख गुरूंपैकी दशम गुरू असलेले गोविंदसिंहजी यांची साहित्यनिर्मिती सर्वाधिक आहे.  अवघे बेचाळीस वर्षाचे आयुष्य आणि त्याचा उत्तरार्ध म्हणजे केवळ संघर्ष असे असतांनाही त्यांनी ऐवढी विपुल साहित्यनिर्मिती केली,हे विशेष.  बालवयापासूनच त्यांनी विविध भाषा आणि त्यांच्यातील साहित्य यांचे केलेले अध्ययन त्यांच्या प्रतिभेला एक वेगळीच धार देऊन गेले.  त्यांनी आपल्या व्यासंगाला धर्म-पंथ-संप्रदाय अशा मर्यादा कधीच ठेवल्या नाही.  त्यामुळे त्यांची बुद्धी व प्रतिभा कायम तरल राहिली.  पाटण्यात त्यांचा जन्म आणि बालपणातील मोठा काळ व्यतीत झाल्याने या परिसरातील ब्रजभाषेचा व ब्रजसाहित्य संस्कृतीचा प्रभाव त्यांच्यावर असणे स्वाभाविक होते.  त्यामुळे राम-कृष्ण यांच्यावर त्यांनी मोठया प्रमाणात काव्यरचना केली.  त्यांनी लिहिलेले 'गोविंदरामायण' विशेष प्रसिद्ध झाले.  त्यांनी गुरूमुखीमध्ये त्याची रचना केली असली तरी ब्रज व खडी या हिंदीच्या बोलींचा आणि विविध भाषांमधील शब्दांचा वापर सहजपणे केलेला आहे.  वाल्मीकी रामायणातील काण्डात्मक रचना स्वीकारता त्यांनी प्रसंगात्मक रचनेचा वापर केला.  काव्याचे बरेच अप्रचलित छंद देखील त्यांनी वापरले.  रचनेतील गेयता आणि रामलीलेमध्ये सादरीकरणाची शक्यता देखील टिकवली.  गोविंदरामायणामध्ये त्यांच्यातील कवीची प्रयोगशीलता दिसून आली.गुरू गोविंदसिंहांची साहित्यनिर्मिती हा विस्तृत व स्वतंत्र लेखनाचा विषय आहे.  असे असले तरी त्यांनी आपल्या स्वतंत्र साहित्यनिर्मितीपेक्षा गुरूग्रंथसाहिबला अनन्यसाधारण महत्व देण्यास सांगितले.  यामधून त्यांच्यातील गुरू व नेता म्हणून असलेले वेगळेपण व महानता जाणवल्याशिवाय राहत नाही.  आपल्यानंतर खालसाचे नेतृत्व त्यांनी ज्या 'बंदा बैरागी' यांच्याकडे सोपवले. हया गोष्टीकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे.  जन्माने काश्मिरी असलेले माधवदास उर्फ बंदा बैरागी हे मुळात शीख नव्हते.  त्यांच्या जीवनाचा मोठा काळ महाराष्ट्राच्या भूमीत व्यतीत झालेला होता.  त्यामुळे शिवरायांच्या पराक्रम गाथा आणि त्यांच्यानंतर शिवप्रेरणेतून मराठयांनी दाखवलेला अपूर्व पराक्रम यांचे साक्षीदार होण्याचे सौभाग्य बंदा बैरागींना मिळाले.  त्यामुळे नेतृत्व आणि युद्धनीती याची नेमकी जाणीव त्यांच्यात विकसित झालेली होती.  त्यामुळेच गुरूजींनी त्यांच्या शीख असण्या नसण्यापेक्षा त्यांच्या अढळ व अविचल श्रद्धेला आणि अनुभवाला प्राधान्य दि.ले  बंदा बैरागी यांनी देखील गुरूजींनी केलेली त्यांची निवड भविष्यात सार्थ ठरवली.  खालसाचे एका विशाल सैन्य उभे करत रणांगणावर देह ठेवणारे बंदा बैरागी इतिहासात 'वीर बंदा बहादुर' म्हणून अजरामर झाले.  त्यांनी आपल्या पराक्रमातून भावी शीख राज्याचा मार्गप्रशस्त केला.  त्यांच्या निवडीतून गोविंदसिंहांनी शीख धर्माच्या सर्वसमावेशकतेला कायमचे अधोरेखित केले.  ७ ऑक्टोबर १७०८ ला गुरू गोविंदसिंहांचा देह गोदा काठावर कायमचा विसावला.
  'सवा लाख से एक लड़ाऊं,
 चिडियिन ते मैं बाज तुड़ाऊं,
 तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं' 
हा त्यांनी पेरलेला आत्मविश्वास शीख समाजाची चिरंतन शिदोरी आहे. आज त्यामुळेच नांदेड शीख धर्माचे एक प्रमुख तीर्थस्थान बनले  गुरूजींनी तेथे स्थापन केलेल्या गुरूद्वा-याला भव्यता देण्याचे काम महाराजा रणजितसिंह यांनी सुरु केले.  अंतसमयी गुरू गोविंदसिंहांकडे किंवा त्यांच्या कुणा अनुयायाकडे आपला स्वतःचा असा काही मुलुख होता वा काही खाजगी मालमत्ता  सर्वस्व गमावलेला हा महापुरुष आणि त्यांचे अनुयायी यांच्याकडे फक्त अविचल श्रद्धा आणि संघर्षासाठी आवश्यक चिवटपणा होता.  मात्र यामध्ये भविष्यात शिखांचे स्वतंत्र राज्य स्थापन होण्याची बीजं पेरली गेली होती.  हा एका महापुरुषाच्या लौकिक जीवनाचा अंत असला तरी त्याच्या चिरंतन प्रेरणेचा शुभारंभ होता.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
                                                        

Comments

  1. उत्तम लेख. आशय आणि शैली अशा दोन्ही बाजूंनी लेख उत्तम आहे.

    ReplyDelete
  2. Nicely presented.....like a story... keep it up

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !