संघर्ष-बलिदानाचा महामेरू
इ. स. १६९९ मध्ये खालसाची स्थापना झाल्यानंतर गुरू गोविंदसिंह केवळ शीख गुरू राहिले नाही. आता ते एक लष्करी नेतृत्व म्हणून देखील भारताच्या राजकीय पटलावर तळपू लागले. उत्तर भारतात मुघल सत्ता उलटवण्याचा पहिला गंभीर प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा आढावा घेणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात त्यांच्या काही काळ आधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुगल सत्तेला आव्हान देत यशस्वीपणे रयतेच्या स्वराज्याची स्थापना केली होती. मुगल सत्तेविरुद्ध यशस्वी झुंज देणारे शिवराय तसे भारतीय इतिहासातील एकमेव उदाहरण म्हणावे लागेल. महाराणा प्रतापांनी केलेला संघर्ष अतुलनीय असला तरी मुघलांच्या मुख्य सत्ताकेंद्राजवळ मेवाड असणे,तेथील भौगोलिक रचना आणि इतर रजपूत राजघरण्यांचा असहकार. यामुळे महाराणा प्रतापांना त्यांच्या आजिवन संघर्षाला अंतिम यशात परावर्तित करता आले नाही. गुरू गोविंदसिंहांची परिस्थिती आणखी वेगळी होती. ते शीखांचे गुरू होते. एका महान गुरू परंपरेचे ते वारसदार असले तरी त्यांना राजकीय म्हणून कोणताही वारसा लाभलेला नव्हता. खालसाच्या माध्यमातून त्यांनी एका धर्मपरंपरेला लष्करी व राजकीय शक्ती म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लष्करी व राजकीय दृष्टया ते आणि त्यांचे अनुयायी नवखे होते. खालसाच्या स्थापनेच्या आधी काही वर्ष त्यांनी यमुना नदीच्या तीरावर असलेल्या पाओन्टा येथे एक किल्ला बांधला होता. त्यानंतर आनंदपूर,लोहगढ,केशगढ आणि फत्तेगढ इथे आणखी चार किल्ले बांधले. किल्ल्यांच्या निर्मितीबरोबर आपल्या अनुयायांची एक लष्कर म्हणून बांधणी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. सय्यद बुद्धु शाहच्या पठाण सैनिकांच्या सहकार्याने त्यांनी शेजारच्या डोंगराळ प्रदेशातील टोळयांशी झालेल्या अनेक लढायांमध्ये विजय संपादन केला. इ. स. १६९९ ला खालसा दलाची स्थापना झाल्यानंतर औरंगजेब सतर्क झाला. त्याने गोविंदसिंहांच्या विरोधात मोहिम उघडण्याचा निर्णय घेतला. इ. स. १७०१ मध्ये सरहिंद व लाहोरच्या मुघल सरदारांनी आनंदपूरच्या किल्ल्यावर आक्रमण केले. सुमारे तीन वर्ष त्यांनी किल्ल्याला वेढा दिला होता. गुरू गोविंदसिंह आणि त्यांचे खालसा सैन्य मुगल सैन्याला शरण जाण्यास तयार नव्हते. त्यावेळी गुरूजींनी आपला मोठा मुलगा अजितसिंह याला निवडक सैन्यासह शेरगडावर ठेवले होते. आनंदपुरमध्ये खालसा देत असलेली चिवट झुंज पाहून औरंगजेब चिडला. त्याने अंतिम निकराचा प्रयत्न म्हणून पंजाबातील सुभेदारांना वादळीवेगाने आनंदपुरावर हल्ला करा असा आदेश दिला. तोफांचा भडिमार सुरु झाला. काही आठवडे तुंबळ युद्ध झाले. अखेर सारी रसद तोडण्यात आली. खालसा सैन्याने चणे खाऊन दिवस काढले,पण हार मानली नाही. खालसा दलाने प्राणपणाने किल्ला लढवला. अखेर बलाढय मुघल सैन्यासमोर गुरू गोविंदसिंहांचा नाईलाज झाला. त्यांनी किल्ला गमावला. शिवाजीमहाराज ज्याप्रमाणे आग्य्राहून सुटले तसेच आनंदपुरमधून गोविंदसिंहजी शत्रुच्या हातावर तुरी देऊन यशस्वीपणे निसटले. त्यांनी दिल्लीजवळील चमकोर हे ठिकाण गाठले. चमकोर येथे देखील किल्ला होता. गुरूजी तेथे पोहचल्याचे समजताच मुगलांनी त्या किल्ल्याला वेढा दिला. पुन्हा तोफा आग ओकू लागल्या. यावेळी गुरूजींचा मोठा मुलगा शाहजदा अजितसिंह ज्याचे वय केवळ १४ वर्षे होते. त्याने अभिमन्युप्रमाणे शौर्य दाखवले. निवडक सैन्यासह अजितसिंहांनी शत्रुवर थेट हल्ला चढवला. त्यांनी शर्थीची झुंज दिली. अखेर 'वाहे गुरू वाहे गुरू' म्हणत अजितसिंहांनी वीरमरण पत्कारले. आपल्या थोरल्या भावाचे शौर्य आणि बलिदान पाहून धाकटया जुझारसिंहाने राहवले नाही. त्यानेही युद्धावर जाण्याचा हट्ट धरला. नाइलाजाने गुरूजींनी परवानगी दिली. जुझारसिंहांना देखील अखेर रणांगणावर वीरमरण आले. चमकोर किल्ल्यातून निसटण्याच्या निर्णय गुरूजींनी घेतला. या धामधुमीत त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांची ताटातूट झाली. त्यांची आई आणि दोन धाकटी मुले मागे राहिले. गुरूजींच्या मातेने आपल्या दोन नातवांसह एका ब्राह्मणाकडे आश्रय घेतला. त्या लोभी माणसाने त्यांच्याकडील सर्व धन-संपत्ती हडप केली. यावर माता गुजरीदेवी यांनी आक्षेप घेतला असता. त्यांना दोन्ही नातवांसह गावातील जमिनदाराच्या ताब्यात दिले. जमिनदाराने सरहिंदचा सुभेदार वजीरखान याच्या ताब्यात त्यांना दिले. अशापद्धतीने गुरूजींची माता आणि दोन मुले जोरावरसिंह व फतेहसिंह मुगलांच्या तावडीत सापडली. शाहजादे जुझारसिंह यांचे वय ९ तर फतेहसिंह यांचे ७ वर्ष होते. माता गुजरीदेवी आणि जुझारसिंह व फतेहसिंह यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर १७०५ मध्ये जुझारसिंह आणि फतेहसिंह या वीरबालकांना भिंतीत चिणण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ आज त्या ठिकाणी फतेहगढ गुरूद्वारा उभा आहे. वजीरखानाने माता गुजरीदेवी यांना हे भयंकर दृश्य पाहण्याची शिक्षा दिली. गुजरीदेवींना हे क्रौर्य सहन होणे शक्य नव्हते. जगातील कोणत्याही आजीला ते शक्य नाही. पतीचा शिरच्छेद हया मातेने पचवला होता. मात्र तिच्या दुधावरची साय म्हणजे तिचे नातू अशा कोवळया वयात मारले जात आहेत. हे पचवणे माता गुजरीदेवींना शक्य झाले नाही. त्यांना मुर्च्छा आली आणि त्यांनी तेथेच प्राणत्याग केला. गुरूजींना हे भयंकर वृत्त कळले तेव्हा क्षणभर ते सुन्न झाले. आज त्यांच्याकडे शीखांसाठी गमवण्यासारखे आपला प्राण सोडून काही राहिले नव्हते. आपल्या चार पुत्रांचे बलिदान देऊन त्यांनी गुरू म्हणून सर्वात मोठी आहूती शीख धर्म यज्ञात टाकली होती. काही वेळातच त्यांनी स्वतःला सावरले ते केवळ त्या चार पुत्रांचे पिता नव्हते अखिल शीख धर्माचे पिता होते. त्यामुळे स्वपुत्रांच्या बलिदानाचा शोक करण्याची सोय देखील त्यांच्याकडे नव्हते. त्यांना सर्व शीखांना सांभाळायचे होते,त्यांचे संरक्षण व संवर्धन करायचे होते. त्यांनी काही काळ भूमिगत राहून आपले संघटन अधिक मजबूत करण्याचा आणि औरंगजेबाला धडा शिकवण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांच्या भूमीकडे म्हणजे दख्खनकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय लगेच अमंलात येऊ शकला नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यानंतर महाराणी ताराबाई यांच्या लढयाने हतबल झालेला औरंगजेब स्वतः महाराष्ट्राकडे निघाला होता. मजल दरमजल करीत तो मराठवाडयात देवगिरीजवळ आला. तिथेच दीर्घकाळ थांबला दरम्यान गोविंदसिंहांनी आपल्या खालसा सैन्याची जमवाजमव केली. जिथे शक्य तिथे मुगल सैन्यावर गनिमी काव्याने हल्ले करुन औरंगजेबाची उत्तरेतील सल्तनत खिळखिळी करुन टाकली. याकाळात औरंगजेबाने त्यांना दिल्ली दरबारात येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी गुरूजी दीना काँगड या गावी होते. औरंगजेबाचा कावा ओळखून गुरूजींनी त्याला एक पत्र लिहिले आणि भाई दयासिंह यांच्या हाती देऊन ते महाराष्ट्रात अहमदनगर येथे मुक्काम ठोकून बसलेल्या औरंगजेबापर्यंत प्रत्यक्ष पोहचवण्याची सोय केली. १७०५ साली फारसी भाषेत लिहिलेले ११५ उद्गारांचे हे पत्र 'जफरनामा' म्हणजे 'विजयपत्र' म्हणून प्रसिद्ध आहे. जफरनाम्यात गुरूजींनी अगदी कुराणची शपथ घेऊन जरी तू काही म्हणालास तरी त्यावर विश्वास ठेवणारा अखेर स्वतःच शरमिंदा होऊन जावा,असा तुझा लौकिक आहे. असे म्हणून औरंगजेबाचे नेमके वर्णन केले होते. दरम्यान महाराष्ट्राच्या भूमीतच औरंगजेबाची माती झाली. त्याच्या मुलांच्या सत्तासंघर्षात बहादुरशहा हा त्याचा मुलगा यशस्वी झाला आणि त्याने गुरूजींना आपली मित्रता स्वीकारण्याची व आपल्या आशीर्वाद देण्याची विनंती केली. त्याच्या सत्तासंघर्षात गुरूजींनी त्याला मदत केली होती. त्यानुसार गुरूजी आग्रा येथे पोहचले. त्यानंतर ते बहादुरशहासोबत जयपुर,चित्तोड,बुरहानपुर येथे सोबत गेले. बहादुरशहा तेथून हैदराबादकडे गेला आणि गुरूजी महाराष्ट्रातील गोदावरीच्या किना-यावरील नांदेडला पोहचले. तो दिवस होता १९ जुलै १७०८. त्यांनी गोदा किनारी गुरूद्वारा स्थापन केला. १८ ऑगस्ट १७०८ ला एका पठाणाने त्यांच्या पोटात कटयार घुसवली. त्याला त्यांनी तलवारीच्या एका वारात गारद केले. जखमी झालेल्या गुरूजींवर उपचार करण्यासाठी बादशहा बहादुरशहाने निपुण वैद्य पाठवले आणि त्यांना प्रयत्नांची शर्त करण्यास सांगितले. त्यामुळे गुरूजी बरे होत आले. त्यांच्या पोटाला टाके घालण्यात आले होते. त्यांची जखम भरत आली होती. एक दिवस एक धनुर्विद्यापारंगत योगी त्यांच्या भेटीला आला. त्याने गुरूजींचे प्रचंड धनुष्य पाहिले आणि त्याला वाटले गुरूजींनी हे केवळ शोभेसाठी जवळ ठेवले असावे. त्याने तसे बोलून दाखवले. हे ऐकताच गुरूजींमधील हाडाचा धर्नुधर डिवचला गेला. ते ताडकन उठून बसले आणि त्यांनी धनुष्याचा प्रत्यंचा लीलया लावून दाखवला आणि म्हणाले,'झाली तुझी खात्री ?' मात्र त्यामुळे पोटाचा एक टाका तुटला आणि पोटातून रक्ताची धार लागली. ही घटना त्यांच्यासाठी प्राणघातक ठरली. संघर्ष आणि बलिदानाचा महामेरू असलेल्या देहाच्या प्रत्यंच्यामधून श्वासाचा बाण कायमचा सुटण्याची वेळ नजीक येऊन ठेपली.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
खूपच छान आणि माहितीपर,ज्ञांवर्धक पोस्ट आपण लिहिली आहे.औरंगजेब पंचवीस एक वर्षे महाराष्ट्रात ठिय्या देऊन बसलेला असताना उत्तरेकडील त्याचा कारभार कसा,कोण चालवीत होतं हे जाणून घेण्याची माझ्यासह बऱ्याच इतिहास प्रेमींना उत्सुकता आहे.तरी आपणास विनंती आहे की विषयी आपण एखादा माहितीपर लेख लिहून आमची जिज्ञासा पूर्ण करावी.धन्यवाद.
ReplyDelete