'बाला' साहेब आणि बाबा बाकले

गुरू हरगोविंदांनी तीन विवाह केले होते.  त्यांना पाच पुत्र व एक कन्या अशी अपत्ये झाली.  गुरूदित्ता,सूरजमल,अनीराय,बाबा अटल आणि तेगबहादुर अशी या पुत्रांची नावं होती.  हरगोविंदजींची पहिली पत्नी दामोदरी यांच्या पोटी १६१३ मध्ये 'गुरूदित्ता' यांचा जन्म झाला आणि दुसरी पत्नी नानकी यांच्या पोटी १६२२ मध्ये 'तेगबहादुर' यांचा जन्म झाला.  हरगोविंदांच्या पश्चात शीख गुरू परंपरेचा इतिहास या दोन व्यक्तींच्या भोवतीच गुंफलेला दिसतो.  आपल्यानंतर गुरूदित्ता यांनी गुरूगादी सांभाळावी अशी त्यांची ईच्छा होती.  मात्र गुरूदित्ता यांच्या जीवनप्रवाहाने वेगळे वळण घेतले.  एकदा हरगोविंदजी नानकदेवांचे पुत्र श्रीचंद यांच्या उदासी आश्रमात त्यांची भेट घेण्यासाठी गेले.  संत श्रीचंद यांनी त्यांचा सर्वात थोरला पुत्र गुरूदित्ता आपल्याला अर्पण करावा अशी ईच्छा व्यक्त केली.  त्यांची आज्ञा हरगोविंदजींनी प्रमाण मानत गुरूदित्ता यांना त्यांच्या स्वाधीन केले.  संत श्रीचंदांनी त्यांना आपल्या उदासी पंथाच्या गादीचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.  बाबा गुरूदित्ता आणि त्यांची पत्नी निहाल कौर यांना पुत्र प्राप्ती झाली.  त्याचे नाव 'हरराय' असे ठेवण्यात आले.  गुरूदित्ता उदासी पंथाचे गुरू झाल्यामुळे हरगोविंदांनी आपला नातू हरराय याला गुरूगादी सोपवण्याचा निर्णय घेतला.  हरगोविंदजींनी शीख गुरूपरंपरेत सर्वात अधिक काळ म्हणजे ३७ वर्षे गुरूगादी सांभाळली.  त्यांचा कार्यकाळ दीर्घ आणि इतर गुरूंच्या तुलनेत शांततामय असा गेला.  शीख धर्माचा सर्वांगीण प्रचार-प्रसार याकाळात मोठया प्रमाणात झाला. शौर्य आणि नीतितज्ज्ञ अशी ख्याती असलेल्या हरगोविंदजींनी शीख धर्मपरंपरेला लष्करी स्वरूप देऊन,नव्याने जन्माला आलेल्या धर्माचे संरक्षण व संवर्धन केले.  त्यांनी 'हरमंदिर साहेब' म्हणजे सुर्वण मंदिरात अकालतख्ताचे निर्मिती केली,तसेच 'लोहगढ' नावाचा किल्ला बनवला.  एक राज्यकर्ती जमात म्हणून शीख धर्माच्या भावी वाटचालीसाठी हरगोविंदजींची ही कर्तबगारी अत्यंत महत्वाची होती.  हरगोविंदजींची एक आणखी वेगळे वैशिष्टय म्हणजे त्यांची एक ही रचना गुरूग्रंथ साहेब अथवा अन्यत्र आढळत नाही.  आपला निर्वाण काळ समिप आल्याची जाणीव होताच,१६४४ साली त्यांना आपला नातू 'हरराय' याला गुरूगादीवर अभिष्कित केले.  हरगोविंदजींपर्यत सहा गुरूंना अभिष्कित करणारे भाई बुड्ढा यांचे निधन झाले असल्यामुळे त्यांचे पुत्र भाई भन्ना यांच्या हस्ते हा विधी करण्यात आला.  यांनंतर काही दिवसातच हरगोविंदजींचे निर्वाण झाले.  त्यांच्या निर्वाणस्थानाला 'पातालपुरी' असे देखील संबोधले जाते.  बालपणापासून अत्यंत कोमल हदयाचे असलेले गुरू हरराय यांनी गुरूगादीचा सांभाळ सुमारे सतरा वर्ष केला.  एके दिवशी उद्यानात फिरत असतांना त्यांच्या लांब पायघोळ अंगरख्यामुळे एका रोपटयाला आलेल फुल तुटले.  अत्यंत संवेदनशील हररायजींना याचे अत्यंत दुःख झाले.  त्यांनी त्यानंतर कायम आपला पायघोळ अंगरखा दोन्ही हातांनी वर उचलून चालण्याची सवय करून घेतली.  शीख धर्मपरंपरेतील पहिला पोलादी पुरूष असे ज्यांचे वर्णन करता येईल,त्या हरगोविंदजींचा हा नातू त्यांचे दुसरे टोक होता.  असे म्हणणे वावगे ठरणार नाही.  बादशहा शहाजहाँचा मुलगा 'दाराशिकोह' एकदा अत्यंत आजारी होता.  शहाजहाँच्या आग्रहावरून गुरू हरराय यांनी आपल्याकडील अत्यंत प्रभावी औषधी पाठवली.  दाराशिकोह या औषधीमुळे ठणठणीत बरा झाला.  त्यामुळे त्याच्या मनात हररायजींबद्दल कायमचा कृतज्ञता आणि स्नेह भरून राहिला.  धर्मशास्त्रांचा आणि तत्त्वज्ञानाचा अत्यंत विद्वान आणि सर्वधर्म समभावाचा भोक्ता असणारा दाराशिकोहने गुरू हरराय यांची भेट घेण्याचा दोनदा प्रयत्न केला.  पहिल्यांदा तो त्यांना भेटण्यासाठी किरतपुरपर्यत गेला; परंतु भेट होऊ शकली नाही.  दुस-या वेळेस मात्र व्यास नदीच्या काठावर त्याने गुरूजींना गाठलेच.  दोघांमध्ये गहन चर्चा व दाट मैत्री झाली.  यानंतर काही दिवसातच भारताचा इतिहास बदलला.  बादशहा शहाजहाँला आपल्यानंतर आपला संतवृत्तीचा थोरला मुलगा दाराशिकोह बादशहा व्हावा असे वाटत होते.  आपला उत्तराधिकारी म्हणून त्याने तशी घोषणा देखील केली होती; परंतु मुगल साम्राज्याची आणि भारताच्या इतिहासाची नियती वेगळीच होती.  भारताच्या राजकिय पटलावर औरंगजेबाचा उदय झाला. वृद्ध शहाजहाँला कैदेत टाकून आणि दारशिकोहचा पराभव करून औरंगजेब सत्ता संघर्षात विजयी झाला.  तो बादशहा म्हणून दिल्लीच्या तख्तावर बसला.  दाराशिकोहची हत्या करून,त्याने आपल्या भावी राजवटीची झलक दाखवली.  गुरू हरराय आणि दाराशिकोह यांची मैत्री त्याची कायमची डोक्यात बसली होती.  याकारणावरून हररायजी ईस्लामविरूद्ध कट करत असल्याचा प्रचार करण्यास सुरवात केली.  थोडक्यात शीखांमुळे ईस्लाम खत-यात आहे,अशी भूमिका त्याने घेतली.  निरंकुश सत्ता चालवण्यासाठी नेहमीच 'धर्माला-वंशाला-जातीला' खत-यात घालण्याचा घाट एखाद्या राज्यकर्त्याकडून घातला जात असतो.  हा प्रयोग इतिहासात विशिष्ट कालखंडानंतर यशस्वी होणारा हुकमी एक्का ठरतो.  जगण्यातील समृद्धता व शांतता अजिर्ण झाल्यावर जनतेला देखील धर्म-वंश-जात यांच्या नावाखाली जीवनात सणसणाटी हवी असते.  मग हीच जनता हिटलरला जन्माला घालते आणि अखेर खायला महाग होते.  औरंगजेबाने पन्नास वर्षे हाच मंत्र अत्यंत यशस्वीपणे वापरला.  अखेर मुगल वंशाच्या सत्तेला व भारताला ग्रहण लावून स्वतः कायमचा कबरीत विसावला.  यात भारताचे झालेले अपरिमित नुकसान हा वेगळा चर्चेचा विषय आहे.  गुरू हरराय यांचा काटा काढण्यासाठा,कपटी औरंगजेबाने त्यांना दिल्लीला बोलवले.  हररायजी स्वतः त्याच्या दरबारात न जाता त्यांनी आपला पुत्र 'रामराय' याला पाठवले.  त्यांनी रामरायला औरंगजेबाचे गोड बोलणे किंवा आदरातीथ्य यांना बळी पडू नकोस असे बजावले होते.  त्यांच्या कल्पनेनुसारच औरंगजेबाने रामरायचे शाही स्वागत केले.  अत्यंत प्रेमाने त्याच्याशी जवळीक साधली शीख गुरूंची प्रशंसा केली.  एके दिवशी त्याच्याशी चर्चा करतांना गुरूग्रंथ साहेबमधील नानकदेवांचा ,'मिट्टी मुसलमान की,पेडे पई कुंभिआर । घर भांडे ईंटन किया,जलदी करे पुकार ।।' हा 'सलोक' (श्लोक) ईस्लामचा अपमान करणारा आहे, असा प्रश्न केला.  त्याच्या जाळयात अडकलेला रामराय याने त्याची मर्जी सांभाळण्यासाठी या सलोकात 'मुसलमान' नव्हे तर 'बेईमान' असा शब्द आहे.  अशी बतावणी केली.  ही वार्ता गुरू हरराय यांना कळाली.  नानकदेवांच्या गुरूवाणीशी रामरायाने केलेली बेईमानी त्यांना सहन होण शक्य नव्हते.  त्यांनी रामरायाला गुरूगादीचा उत्तराधिकारापासून वंचित केल्याची घोषणा केली.  तसेच रामरायाने घरी येऊ नये,तो घरी परतल्यास ते तत्क्षणी देहत्याग करतील असा निरोप पाठवला. रामरायाने 'बेईमान' शब्द एका अर्थाने स्वतःसाठीच वापरला होता.  कारण त्याच्या नंतरच्या वागण्याने हे सिद्ध झाले.  त्याने गुरू हररायांची व शीख धर्माची बदनामी करण्यास सुरवात केली.  औरंगजेबाने नेमका डाव  साधला होता.  त्याने रामरायाला आपल्याकडे ठेऊन घेतले.  अत्यंत संवेदनशील असलेल्या गुरू हरराय यांना यासर्व प्रकाराचा मोठा धक्का बसला.  नानकदेवांच्या सलोकात रामरायाने केलेला बदल,त्यांच्यासाठी धर्मद्रोह ठरत होता.  त्यांनी १६६४ साली आपला दुसरा पुत्र हरकृष्णराय याला गुरूगादीवर अभिष्कित केले.  रामरायाच्या गद्दारीने अत्यंत व्यथित झालेल्या आणि स्वार्थी जगाचा विट आलेल्या गुरू हरदेवांनी वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी आपला नानकदेवांनी दाखवलेल्या परम ज्योतीत स्वतःला विलिन करून टाकले.  शीख धर्माचा येथून पुढचा काळ अत्यंत नाटकीय घडामोडींचा ठरणार होता.  गुरू हररायांच्या निर्वाणानंतर औरंगजेबाने दुसरा डाव टाकला.  हरकृष्णराय यांच्या मनात आपल्या मोठया बंधू रामराय याच्या वर्तनाबद्दल राग व द्वेष निर्माण झाला आहे.  याचा सुगावा लागता.  त्याने नवे गुरू हरकृष्णराय यांना दिल्लीला आणण्यासाठी राजा जयसिंग याला पाठवले.  हरकृष्णरायांनी माझ्यापूर्वीचे कोणतेच गुरू दिल्ली दरबारात गेले नाही आणि मी देखील ही परंपरा मोडणार नाही.  असे राजा जयसिंगला स्पष्ट सुनावले.  मात्र जयसिंगाने मोठया चाणाक्षपणे त्यांना यासाठी तयार केले.  दिल्लीच्या प्रवासात चौथ्याच दिवशी गुरू हरकृष्णराय तापाने फणफणले आणि त्यांना देवीची लागण झाली आहे,  असे लक्षात आले.  आपला अंतिम समय जवळ आला याची जाणीव हरकृष्णराय यांना झाली.  उठून बसणे शक्य नसल्याने आपल्या जवळ त्यांनी पाच पैसे व नारळ मागवले आणि तीन वेळा हात हालवून आपला उत्तराधिकारी म्हणून कोण्या 'बाबा बाकले' च्या नावाचा उच्चार केला.  यापश्चात त्यांनी देहत्याग केला.  त्यावेळी गुरू हरकृष्णराय यांचे वय केवळ सात वर्षे व काही महिने होते.  या बाल गुरूचे निर्वाण झाले ते ठिकाण आज 'बाला साहेब' म्हणून ओळखले जाते.  बाला साहेब येथे गुरू हरकृष्णरायांनी उच्चारलेल्या 'बाबा बाकले' नावाने शीख धर्मात पुढे मोठा गोंधळ उडाला.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
      


Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !