शिर देईल पण धर्म..
गुरू तेगबहादुरांसमोर हात जोडून उभे असलेले काश्मिरी पंडित त्यांची कैफियत मांडत होते. 'असे काय झाले आहे?' असा प्रश्न गुरूजींनी केल्यावर एक काश्मिरी पंडित सामोरा झाला आणि म्हणाला,' गुरूजी,आपण औरंगजेबाच्या हिंदू विरोधी राज्यकारभार पाहत आहातच. त्याने काश्मिरमध्य नेमलेला आपला सुभेदार शेर अफगान याला एक हुकूमनामा पाठवला आहे. त्यानुसार काश्मिरमध्ये राहणा-या हिंदुना धर्मांतरीत करुन मुसलमान बनण्याचा घाट घातला आहे. त्याच्या हुकूमनाम्याने आमचे जगणे मुश्किल झाले आहे. शीख गुरूंनी कायमच हिंदू धर्माचे रक्षण केले आहे. म्हणूनच आम्ही आपण आमचे रक्षण करावे. अशी अपेक्षा आणि आशा घेऊन आलो आहोत. आपण नक्कीच आमचे रक्षण कराल. असा आम्हांला विश्वास आहे.' काश्मिरी पंडितांचे हे निवेदन ऐकून तेगबहादुरजी गहन विचारात पडले. औरंगजेब देशाचा शासक होता. त्याने असा धर्मवेडेपणा करावा आणि आपल्या प्रजेत भेदभाव करावा हे त्यांना कदापि मान्य नव्हते. राजासाठी कायम राजधर्म महत्वाचा असतो,अन्य कोणताही धर्म नाही. असे त्यांचे स्पष्ट मत होते. गुरू नानकदेवांपासून जेवढे शीख गुरू झाले त्यांनी हिंदु-मुसलमान ऐक्याला कायम प्राधान्य दिले. दोन्ही धर्मांमध्ये सौहार्द निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांच्या नजरेत सर्वधर्म समान होते. देशातील एकूण परिस्थितीची गुरू तेगबहादुरांना संपूर्ण कल्पना होती. गुरूजी आणि काश्मिरी पंडित यांच्यातील संवाद गुरूंजीचा सुपुत्र गोविंदराय ऐकत होता. आपल्या पित्याला गहन विचारात बुडलेले पाहुन गोविंदराय सहज उद्गारला,' पिताजी,अशी गोष्ट असेल तर हिंदुचे रक्षण करण्यासाठी आपल्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरा कोण आहे.' आपल्या पुत्राने प्रकट केलेल्या विश्वासाने तेगबहादुरजी विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. त्यांनी काश्मिरी पंडितांना सांगितले की ,'आपण लोक निश्चिंत होऊन आपापल्या घरी जा. जेंव्हा सुभेदार शेर अफगान आपल्यावर मुसलमान होण्यासाठी दबाव टाकेल. त्यावेळी निर्भीकपणे त्याला सांगा की गुरू तेगबहादुर मुसलमान होण्याचे स्वीकार करत असतील, तर आम्ही लोक देखील इस्लाम स्वीकारण्यास तयार आहोत.' पंडितांना तेगबहादुरांवर पूर्ण विश्वास होता. या अचानक आलेल्या आपदेतून गुरूजी आपणास निश्चतच मुक्ती देतील. गुरू तेगबहादुरांच्या आश्वासनाने त्यांच्यात एक नवे साहस निर्माण केले. ते निशि्ंचतपणे आपापल्या घरी परतले. काही दिवसांनंतर सुभेदार शेर अफगान याने आपल्या सैनिकांना काश्मिरी पंडितांच्या घरी पाठवले आणि त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यास सुरवात केली. गुरू तेगबहादुरांचे अभय मिळालेल्या पंडितांनी बेडरपणे उत्तर देण्यास सुरवात केली की,' जर शीखांचे नववे गुरू तेगबहादुर मुसलमान बनण्यास तयार असतील, तर आम्ही देखील इस्लामचा स्वीकार करू.' पंडितांचे उत्तर ऐकून शेख अप‹Šगान क्रोधाने लाल झाला. त्याने औरंगजेबाकडे एक सविस्तर खलिता पाठवला आणि शीखांचे गुरू तेगबहादुर इस्लामच्या प्रसारात बाधा आणत असल्याची तकार केली. असे करणे शाही फरमानाचा अवमान आणि बादशहाच्या सत्तेविरूद्ध उघड विद्रोह आहे. तसेच तेगबहादुरांचे अनयायी देखील काश्मिरी पंडितांना मुसलमान होण्यापासून परावृत्त करत आहेत. त्यामुळे गुरू तेगबहादुर यांना कडक शिक्षा देणे आवश्यक आहे. कारण त्यांनी काश्मिरी पंडितांना सांगितले आहे की ,' मी मुसलमान होण्यास तयार झालो, तरच तुम्ही इस्लाम स्वीकारा त्यामुळे गुरू तेगबहादुारांना मुसलमान होण्यास भाग पाडले पाहिजे.' ज्याचे सर्व राजकारण धर्मवेडावर अवलंबून होते. असा औरंगजेब आधीपासूनच तेगबहादुरजींना इस्लामचा शत्रु समजत होता. त्यांनी जर इस्लामचा स्वीकार केला, तर त्यांचे सर्व अनुयायी इस्लाम स्वीकारतील असा त्याचा कयास होता. त्याने आपल्या सैन्याची एक तुकडी आनंदपुर साहिब येथे पाठवली आणि असा आदेश दिला की कसेही करुन गुरू तेगबहादुर यांना दिल्लीला घेऊन यावे. औरंगजेबाचा संदेश पाहून संगतमध्ये बसलेल्या तेगबहादुरांनी आपल्या अनुयायांना आवाहन केले की,' कोणी तरी पुण्यात्म्याने हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलिदान करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.' त्यावेळी त्यांचा पुत्र गोविंदराय संगतमध्ये हजर होता. गोविंदराय म्हणाला की ,' पिताजी,यावेळी देशात आपल्याशी बरोबरी करू शकणारा पुण्यात्मा कोण आहे.' गुरूजींनी आपल्या पुत्राकडे कौतुकाने पाहिले आणि म्हणाले की ,' बेटा ! तु एकदम योग्य बोललास. धर्माच्या रक्षणार्थ मी आपल्या प्राणांचे बलिदान देणार.' गुरूजींच्या निर्णय ऐकून संगतमध्ये गंभीर शांतता पसरली. यावर अत्यंत गंभीर स्वरात तेगबहादुरजी म्हणाले की,'मी दिल्लीला जात आहे. आता माझे अर्धवट राहिलेले काम माझा पुत्र गोविंदराय पूर्ण करेल. तुम्ही एखादा शुभमुहूर्त बघून त्याला गुरूगादीवर अभिषिक्त करावे.' काही दिवसातच गुरू तेगबहादुर गोविंदराय आणि शीख धर्माची जबाबदारी आपल्या काही विश्वस्त अनुयायांवर सोपवली आणि आपल्या दहा अनुयायांसह ते दिल्लीकडे निघाले. त्यावेळी औरंगजेब आग्रा येथे होता. त्यामुळे त्यांनी आग-याला जाण्याचे ठरवले. वाटेत त्यांनी रोपड येथे मुक्काम केला. रोपडचा मुस्लिम पठाण शासक त्यांचा भक्त होता. त्याला गुरूजी आग-याला जात आहेत हे समजल्यावर त्याने त्यांना सांगितले की,' गुरूजी,मी आपणास औरंगजेबाकडे जाऊ देणार नाही. तो अत्यंत कावेबाज आणि जुल्मी आहे. जहांगीराने ज्याप्रमाणे गुरू अर्जनदेवांसोबत केले होते. तसेच औरंगजेब आपल्यासोबत करेल. आपण येथेच रहा जोपर्यंत मी आणि माझ्या कुळातील शेवटचा वंशज जिंवत राहिल तोपर्यंत औरंगजेब आपल्या सावलीला देखील स्पर्श करू शकणार नाही.' गुरूजींनी त्याला शांत केले आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर ते आग-याला पोहचले. तेथे पोहचल्यावर त्यांनी भाई मतीदास,भाई गुर दित्ता,भाई दयाला,भाई उदाजी आणि भाई चिमाजी यांना आपल्यासोबत ठेवले आणि उर्वरित पाच शिष्यांना आनंदपुरला परतण्याची आज्ञा दिली. गुरूजी आग-या एका बागेत मुक्कामी आहेत,हे समजल्यावर औरंगजेबाने आपला सेनापती हसनअली याला त्यांना अटक करण्याचा आदेश दिला. गुरूजी आणि त्यांच्या शिष्यांना बाराशे सैनिकांच्या बंदोबस्तात दिल्लीला नेण्यात आले. तेथे त्यांना नजरबंद ठेवण्यात आले. औरंगजेबाने काजींच्या माध्यमातून गुरू तेगबहादुर आणि त्यांच्या शिष्यांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. त्याचबरोबर विविध प्रलोभने दाखवली. कोणताही उपाय चालत नाही,असे समजल्यावर औरंगजेबाने सर्वप्रथम भाई मतीदास आणि नंतर भाई दयाला यांची भरचौकात हत्या केली. त्यावेळी गुरू तेगबहादुर यांना एका पिंज-यात ठेवण्यात आले. गुरू अर्जनदेवांनंतर शीख धर्मासाठी बलिदान देणारा दुसरा शहिद म्हणून भाई मतीदास अजरामर झाले. तेगबहादुरांच्या या दोन्ही शिष्यांनी अखेरच्या क्षणी आपले मुख आपल्या गुरूंकडे असावे अशी अंतिम ईच्छा व्यक्त केली. त्यांची ही ईच्छा पूर्ण करण्यात आली. अखेर गुरू तेगबहादुरांनी भाई उदाजी व भाई चिमाजी यांना कैदेतून सुटण्याचा आणि आनंदपुरला जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी आपली सुटका करुन घेतली भाई गुरूदित्ता आपल्या गुरूजींजवळ राहिले. काजी पुन्हा तेगबहादुरांकडे आले आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु गुरूजींनी अत्यंत निर्भयपणे त्यांना अखेरचे सांगितले की,'मी आपले शिर देऊ शकतो,धर्म कदापि नाही.' अखेर दुस-या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबर १६७५ रोजी त्यांना चबुत-यावर आणण्यात आले. अत्यंत शांतपणे गुरूजी चबुत-यावर बसून अकाल पुरुषाचे स्मरण करू लागले. त्यांचे शिर एका वारात धडावेगळे करण्यात आले. आज या ठिकाणी शीशगंज गुरूद्वारा आहे. अलोट गर्दी केलेल्या जनतेने दंगल करू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जनतेच्या मनात दहशत बसावी म्हणून त्यांचे शिर व धड तसेच पडून राहू देण्याचा आदेश औरंगजेबाने दिला होता. त्यांचे शिर धडावेगळे होताच जनतेने दंगल करण्यास सुरवात केली. त्या गडबडीत भाई जत्ता या शिखाने त्यांचे शिर आपल्या चादरीत लपवले आणि तो आनंदपुरला पोहचला. गोविंदरायांनी आपल्या पित्याच्या शिराचा अंतिम संस्कार केला. लक्खीशाह बंजारा याने गवताच्या गाडीत गुरू तेगबहादुरांचे धड लपवले आणि तो आपल्या झोपडीकडे पोहचला. त्याने आपल्या झोपडीत त्यांचा देह ठेवला आणि झोपडीला आग लावून त्यांच्या शरिराला अग्नि दिला. आज याच ठिकाणी रकाबगंज गुरूद्वारा गुरू तेगबहादुरांच्या बलिदानाची साक्ष देत उभा आहे.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
फारच हृदयद्रावक !!शीख धर्मातील गुरुंचा इतर धर्मांबद्दल किती उदात्त भावना होती याचा परिचय या लेखातून येतो. महान गुरु तेगबहादूर यांना शत शत प्रणाम.
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
Delete