‘हिन्द की चादर’ गुरू तेगबहादुर

१६६५ साली 'बाबा बाकला' येथे गुरूगादीवर अभिष्कत झालेल्या गुरू तेगबहादुरांनी काही दिवस तेथेच वास्तव्य केले.  बाबा बाकला गावात तेगबहादुरजींनी एकूण  २६ वर्षे ९महिने आणि १३ दिवस निवास करुन तपश्चर्या केली होती.  तसेच याच ठिकाणी त्याां गुरूगादीवर अभिषिक्त करण्यात आले.  त्यामुळे शीख धर्म इतिहासात हे गाव 'बाबा बाकला साहेब' म्हणून अजरामर झाले.  अखेर तेगबहादुरजींनी आपल्या अनुयायांसह बाबा बाकलाचा त्याग केला.  ते अमृतसर येथे गेले.  अमृतसरच्या हरमंदिर साहेबच्या दर्शनासाठी देखील त्यांना संघर्षच करावा लागला.  हरमंदिर साहेबचा स्वयंघोषित पुजारी 'हरजी सोढी' याने त्यांना मंदिरात प्रवेश देण्यास नकार दिला.  कारण तेगबहादुरजींनी हरमंदिर साहेबचा ताबा घेतल्यास हरजी सोढी याला होणारी बक्कळ कमाई बंद झाली असती. तेगबहादुरजींना शीख समुदायाने बलपूर्वक हरमंदिर साहेबमध्ये प्रवेश करण्याची अनुमती मागितली; परंतु हे गुरूपरंपरेच्या विरोधात वर्तन ठरेल.  असे त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले. हा गोंधळ चालू असतांना  ते हरमंदिर साहेबच्या जवळ एका बोराच्या वृक्षाखाली बनवण्यात आलेल्या चबुत-यावर बसले होते. त्यांना हरमंदिर साहिबचे दर्शन होऊ शकले नाही. त्याची स्मृती पुढे शीख धर्मियांनी जोपासली आणि तिथे एक भव्य गुरूद्वारा निर्माण केला.  जो आज 'थडा साहिब गुरूद्वारा' म्हणून ओळखला जातो.   बलप्रयोग करण्याऐवजी गुरूजी अमृतसरजवळील 'बल्ला' गावी गेले.  काही काळ बल्ला गावात वास्तव्य करुन ते पुन्हा बाबा बाकला येथे परतले.  त्यांनी वास्तव्य केलेल्या बल्ला गावात देखील एका गुरूद्वाराचे निर्माण करण्यात आले.  जो 'कोठा साहिब गुरूद्वारा' म्हणून परिचित आहे.  बाबा बाकल्यातील स्वयंघोषित लबाड गुरूंना पुन्हा त्याची अडचण होऊ लागली.  त्यांनी तेगबहादुरजींना त्रास देण्यास सुरवात केली.  याच दरम्यान त्यांचा भाऊ आणि पक्का वैरी धीरमल याच्या सांगण्यावरुन काही मंसदांना त्यांना बंदुकीची गोळी घालून मारण्याची चिथावणी दिली.  काही मंसदांनी तसा प्रयत्न देखील केला.  तेगबहादुरजी अशा मंसदांनी केलेल्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले.  याउपर कोणी त्यांना ईजा पोहचवू शकले नाही.  भाऊ धीरमल आणि पुतण्या रामराय यांच्या षडयत्रांनी त्रस्त तेगबहादुरजींनी अखेर विविध प्रातांत यात्रा करुन शीख धर्मपरंपरेचा प्रचार-प्रसार करण्याचा निर्णय घेतला.  आपल्या प्रवासात ते 'कतलूर' राज्यातील 'भागोवाल' या गावी पोहचले.  पर्वत रांगांनी वेढलेले आणि निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव त्यांना खूप आवडले.  तेथील राजाकडून त्यांनी हे गाव विकत घेतले आणि तेथे 'आनंदपूर' नावाचे एक नवे नगर वसवले.  ज्याला आज आपण 'आनंदपूर साहिब' म्हणून ओळखतो.  भविष्यात हेच आनंदपूर शीख धर्माच्या इतिहासातील  एका तेजस्वी काळाचे साक्षीदार होणार होते. आनंदपूरमध्ये सहा महिने वास्तव्य केल्यानंतर तेगबहादुरजीनीं आपली यात्रा परत प्रारंभ केली.  दिल्ली,मथुरा,वृदांवन,आग्रा,इटावा आणि कानपूर अशा प्रत्येक ठिकाणी गुरूजींचा परिवार व अनुयायी यांचे अत्यंत उत्साहात व सहर्ष स्वागत होत होते.  अखरे ते प्रयाग म्हणजे काशीला पोहचले.  त्यावेळी काशीला कुंभ मेळा भरलेला होता.  तेगबहादुरांनी तेथे नानकबाणीने सर्वाना मंत्रमुग्ध केले.  त्यांची किर्ती दूर-दूर पर्यंत पोहचली.  सहा महिने त्यांनी काशीमध्ये मुक्काम केला.  काशीच्या 'रेशम कटरा' भागातील 'शबद का कोठा' नावाच्या ठिकाणी त्यांनी निवास केला होता.  त्याची आठवण म्हणून तेथे निर्माण करण्यात आलेल्या गुरूद्वारातील 'बडी संगत' मध्ये त्यांच्या पादुका व अंगरखा आजही मोठया भक्तीभावाने जतन करण्यात आले आहेत.  काशी सोडल्यावर तेगबहादुरजी पटन्याला पोहचले.  त्यांची पत्नी माता गुजरी गर्भवती असल्यामुळे आपल्या परिवाराला पटना येथे ठेवून ते पुढील प्रवासासाठी अनुयायांसह मार्गस्थ झाले.  पटन्याचा एक धनिक त्यांचा शिष्य झाला होता.  त्याने आपी आलमगंज येथील एक हवेली गुरूजींच्या परिवारासाठी समर्पित केली.  गुरूजी पटन्यावरुन  ढाका येथे पोहचले.  गुरूजींच्या ढाक्याकडे प्रस्थानानंतर ७ जानेवारी १६६६ रोजी पटना येथे तेगबहादुरजींना एक पुत्ररत्न प्राप्त झाले.  ढाक्यात असतांना तेगबहादुरजींकडे जयपूरचा सवाई राजा जयसिंग यांनी आपला पुत्र रामसिंग याला एक पत्र घेऊन पाठवले.  ब्रम्हपुत्रा नदीच्या किना-यावरील 'घुवडी' येथे रामसिंगाने गुरूजींची भेट घेतली.  जयसिंग यांनी पत्रात विनंती केली की बादशहा औरंगजेबला आपण कुचबिहारच्या लढाईत मदत करावी.  राजे जयसिंग यांच्या विनंतीला तेगबहादुरजींनी मान दिला.  कुचबिहार हे मोगल साम्राज्याचे एक छोटसे मांडलिक राज्य होते.  कुचबिहारच्या राजाने खंडणी देण्याचे बंद केले होते.   औरंगजेबाने दोन-चार वेळा तेथील राजाला खंडणी मागण्याचा प्रयत्न केला.  औरंगजेबाचे जे लोक खंडणी मागण्यासाठी गेले. त्यांना खंडणी देण्यास राजाने नकार दिला.  एवढेच नाही तर त्यातील काहिंना मारून टाकले.  त्यातील काही लोक जीव मुठीत धरून पळाले.  अखेर चिडलेल्या औरंगजेबाने सवाई राजा जयसिंह यांचा पुत्र सवाई राजा रामसिंह याच्या नेतृत्वात एक विशाल सेना कुचबिहारवर चाल करुन जाण्यासाठी पाठवली.  रामसिंहाची विशाल सेना पाहून कुचबिहारचा राजा घाबरला.  गुरू  तेगबहादूर रामसिंहाच्या मदतीला ढाक्यावरुन येत आहेत.  हे समजल्यावर कुचबिहारच्या राजाने गुरूजीं भेट घेवून त्यांच्यासमवेत विचारविनिमय केला.  त्यांच्या मार्गदर्शनानुसार तो तहासाठी तयार झाला.  शांतीप्रिय तेगबहादुरांना रक्तपात होणे योग्य वाटत नव्हते.  त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन तहाची बोलणी प्रारंभ करवली.  तह झाला परंतु रामसिंह व कुचबिहारचा राजा यांच्यात राज्यांच्या सीमेवरुन एकमत होत नव्हते.  दोघेही आपल्या म्हणण्यावर ठाम होते.  याप्रसंगी तेगबहादुरजींनी आपली कटयार काढली आणि दूरवर भिरकावली खाली आल्यावर कटयार जमिनीत रूतून बसली.  ज्याठिकाणी कटयार जमिनीत रूतली होती,ती जागा प्रमाण मानून रामसिंह आणि कुचबिहारचा राजा यांनी आपल्या राज्यांच्या सीमा निश्चित केल्या.  तेगबहादुरजींच्या मध्यस्थीमुळे मोठा नरसंहार आणि रक्तपात टळला.  यानंतर गुरूजी कामरूपला (आसाम) पोहचले.  कामरूपमधील काही शहरांना भेट दिल्यानंतर तेगबहादुरजींनी पटन्याला परतण्याचे ठरवले.  त्यांना पटना सोडून आता चार वर्षे झाली होती.  त्यांचा पुत्र देखील चार वर्षांचा झाला होता.  पटन्यात पोहचल्यावर आपल्या पुत्राला पाहून त्यांना अतिशय आनंद झाला.  गुरूगादीचा भावी वारसदार मिळाल्याचे समाधान त्यांना प्राप्त झाले होते. त्यांनी पुत्राचे नामकरण गोविंदराय असे केले.  आपल्या पत्नी गुजरी व पुत्राला पटना येथ ठेवून गुरूजी आनंदपूरला आले.  दरम्यानच्या काळात औरंगजेबाच्या धर्मांध राजकारणाने संपूर्ण भारताला अस्वस्थ केले होते.  उर्वरित देशापेक्षा पंजाब आणि काश्मिरची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.  आनंदपूरला पोहचल्यावर पंजाबमधील शीख व हिंदू यांच्यावर होणा-या अत्याचारांची माहिती त्यांना मिळाली.  कारण सुमारे सहा वर्षांनंतर ते पंजाबमध्ये परतले होते.  त्यांच्यासोबत सवाई राजा रामसिंह देखील होता.  त्यामुळे त्यांना पंजाबमध्ये येण्यास कोणताही अटकाव झाला नाही.  आनंदपूरमध्ये परतल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या घराण्यातील ज्या लोकांनी सुरवातीला त्यांना विरोध केला होता.  ते देखील आता शांत झाले आहेत आणि त्यांचा उपद्रव थांबला आहे.  कारण संपूर्ण उत्तर भारतात शीखांचे गुरू म्हणून तेगबहादुरजींना मान्यता आणि लोकप्रियता मिळाली होती.  शीख धर्माचा प्रचार-प्रसार त्यांनी ढाका म्हणजे आजाचा बांग्लादेशापर्यत केला होता.  आनंदपुरमध्ये त्यांनी आपला दरबार भरवण्यास सुरवात केली.  सर्व वातावरण वरकरणी तरी शांत भासत होते.  दरम्यान त्यांनी आपल्या परिवाराला दिल्लीला घेऊन येण्याची जबाबदारी आपल्या काही अनुयायांवर सोपवली.  या लोकांनी त्यांच्या परिवाराला सुरक्षितपणे दिल्लीला आणले.  आनंदपुर साहिबच्या तेगबहादुरजींच्या दरबारात एके दिवशी काही काश्मिरी ब्राहमण येऊन पोहचले.  हे लोक गुरूजींना शरण आले होते.  गुरूजींनी अत्यंत प्रेमाने त्यांचे स्वागत केले.  तसेच त्यांच्या येण्याचे कारण विचारले.  गुरूजींनी काश्मिरी ब्राहमणांना येण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की,' गुरूजी,आम्ही काश्मिरमधून आपल्याकडे शरण मागण्यासाठी आलो आहोत.  काश्मिरमध्ये सर्व हिंदू लोकांच्या धन-संपत्ती,मान-सम्मान आणि जीवन-धर्म धोक्यात आला आहे.  आता आम्हांला केवळ आपला आसरा आहे.  आपणच आमच्या दुःखांचे निवारण करू शकता.' ' हात जोडून त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या काश्मिरी पंडितांकडे शांतपणे पाहत गुरूजींनी प्रश्न केला की,'असे का झाले आहे ? तेगबहादुरजींचा हा प्रश्न शीख धर्माच्या इतिहासाला आणि भविष्याला एक चिरंतन तेजोवलय देणार होता. गुरू तेगबहादुर हिंद की चादर हे सिद्ध करणार होता.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
   

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !