हरणांच्या गावातला राजहंस

गुरू हरकृष्णराय यांनी आपल्या निर्वाण समयी दोन-चार वेळा हात हलवून 'बाबा बाकले' नावाचा उच्चार केला.  यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. यासाठी बाबा बाकले ही काय भानगड होती,हे समजणे महत्वाचे आहे.  आजच्या अमृतसर जिल्हयात  'बाबा बाकला' नावाचे तालुक्याचे शहर आहे. आज यास बाबा बाकला साहिब असे संबोधतात.  या शहराचे खरे नाव 'बाक्कन-वाला' असे होते.  हे नाव फारशी भाषेतील असून त्याचा अर्थ 'हरणांचे शहर' (Town of Deer) असा होतो.  बाक्कन-वालाचा अपभ्रंश होऊन 'बाकला' असे झाले.  शीख धर्मपरंपरेशी त्याच्या संबंध आल्याने आज ते बाबा बाकला साहिब म्हणून ओळखले जाते.  गुरू हरकृष्णराय यांच्या 'बाबा बाकले' या अंतिम उच्चारणाचा अर्थ असा घेण्यात आला की शीखांना त्यांचा पुढील गुरू बाबा बाकले शहरात मिळेल.  शीख धर्माच्या अंतर्गत शत्रुंनी हरकृष्णरायजींच्या संदिग्ध संदेशात नेमकी संधी शोधली.  गुरू हररायजींचा धर्मद्रोही मुलगा रामराय आणि धीरमल यांनी स्वतःला गुरूगादीचे वारसदार म्हणून घोषित केले.  तसेच बाकला शहरात वास्तव्य करणा-या त्यांच्या सोढी घराण्यातील २२ लोकांनी गुरू म्हणून स्वतःच्या स्वतंत्र गाद्या स्थापन केल्या.  त्यावेळी गुरू हरराय यांचे सर्वात कनिष्ठ बंधू तेगबहारदुर बाबा बाकला शहरात वास्तव्यास होते.  एका अर्थी शीख धर्मात हा एक संभ्रमाचा कालखंड होता.  शीख धर्मपरंपरेनुसार एका घटनेमुळे गुरूगादी संदर्भात निर्माण झालेला किंवा करण्यात आलेला गोंधळ दूर झाला.  पंजाबमधील शीख धर्म स्वीकारलेल्या 'लवाना' घराण्यातील 'मख्खन शाह' नावाचा प्रसिद्ध व्यापारी होता.  तो नानकदेवांचा निस्सीम भक्त होता.  समुद्रमार्गे व्यापारासाठी गेलेले त्याचे जहाज एका प्रचंड समुद्रीवादळात सापडले.  जहाजासह आपल्याला जलसमाधी मिळणार याची जाणीव झाल्यानंतर मख्खन शाहने नानकदेवांचा धावा केला.  तसेच आपण या आपत्तीमधून सहिसलामत बचावलो, तर आपण वर्तमान गुरूंच्या चरणी ५०० सुवर्णमुद्रा अर्पण करू अशी प्रार्थना केली.  मख्खन शाह आणि त्याचे जहाज वादळातून सहिसलामत बचावले.  परतल्यानंतर आपल्या संकल्पानुसार मख्खन शाह बाबा बाकला येथे आला.  त्याच्याकडे अर्पण करण्यासाठी असलेल्या ५०० सुर्वणमुद्रांची थैली होती.  बाबा बाकला येथ पोहचल्यानंतर मात्र त्याचा गोंधळ उडाला.  बाबा बाकलामध्ये स्वयंघोषित गुरूंचे पेव फुटले होते.  अशा परिस्थितीत नेमका गुरू कसा ओळखायचा ? हा पेच मख्खन शाहसमोर उभा राहिला.  विचारांती त्याने यावर एक तोडगा काढला.  त्यानुसार बाबा बाकलामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक स्वयंघोषित गुरूकडे जायचे त्याला पाच सुवर्णमुद्रा अर्पण करायच्या आणि जो खरा गुरू असेल तो त्याच्यावर आलेली आपत्ती आणि त्याने केलेला  संकल्प सांगेल.  हा अनुभव ज्याच्याकडे येईल तोच खरा गुरू असेल, असे त्याने ठरवले.  त्यानुसार मख्खन शाह गुरूंकडे जाण्यास सुरवात केली.  असे करतांना व्यापारी असणा-या मख्खन शाहने या बनावटी गुरूंची नेमकी पारख केली.  त्यांचा अधिकार व व्यासंग यांचा तोकडेपणा त्याच्या व्यापारी नजरेतून सुटला नाही.  त्यांच्यापैकी एकानेही त्याला त्याच्यावर आलेली आपत्ती आणि त्याने केलेला  संकल्प याविषयी सांगितले नाही.  स्वयंघोषित त्याच्यावर आलेली आपत्ती आणि त्याने केलेला  संकल्प बनलेल्या सोढी घराण्यातील सर्व २२ भामटयांची ओळख पटल्यानंतर,तो निराश झाला.  कारण त्याला शीखांच्या गुरूगादीचा खरा वारसदार हवा होता.  त्याने गावातील लोकांकडे चौकशी केली की,'गुरूच्या वंशातील आणखी कोणी व्यक्ती बाकलामध्ये राहत नाही का ?'त्यावेळी त्याला सांगण्यात आले की गुरू हरगोविंद यांचे सर्वात कनिष्ठ पुत्र आणि गुरू हरराय यांचे सर्वात कनिष्ठ बंधु तेगबहारदुर बाबा बाकलामध्येच वास्तव्यास आहेत.  एका गुहेत ते वास्तव्य करत आहेत.  त्याने घरातच जमिनीखाली एक गुफा बनवली आहे आणि दिवस-रात्र तो तेथे तपश्चर्या-भजनसंकिर्तन करत असतो.  मख्खन शाह त्वरीत तेगबहादुरांच्या घरी पोहचला.  तेगबहादुर समाधी लावून बसले होते.  काही वेळानंतर त्यांची समाधी संपली आणि त्यांनी मख्खन शाहकडे पाहिले.  त्याने पाच सुवर्णमुद्रा त्यांच्या चरणांमध्ये अर्पण केल्या.  त्यावेळी त्यांनी त्याला आपल्या पाठीकडे पाहण्यास सांगितले.  त्यांची पाठ पाहून मख्खन शाह हादरला कारण त्यांच्या पाठीमध्ये खिळे घुसल्यामुळे जखमा झाल्या होत्या आणि त्या जखमांमधून रक्त वाहत होते.  तेंव्हा तेगबहादुर म्हणाले की,'मख्खन शाह जेंव्हा तुझे जहाज समुद्रात बुडत होते.  त्यावेळी तू ५०० सुवर्णमुद्रा गुरू चरणी अर्पण करण्याचा संकल्प केला होता.  आता मात्र केवळ ५ सुवर्णमुद्रा अर्पण करत आहेस.' तेगबहादुरांच्या बोलण्याने मख्खन शाहच्या आनंदाला पारावार राहिला नाही.  तो धावत त्यांच्या घराच्या छतावर गेला आणि आनंदाने बहोष होऊन ओरडू लागला,'गुरूमिळाला... गुरू मिळाला.'  त्याच्या आवाजाने बाबा बाकला गावाचे कान टवकारले.  गावकरी तेगबहादुरांच्या घराभोवती जमा झाले.  मख्खन शाहने घडलेली सर्व हकिकत गावक-यांना सांगितली.  बाबा बाकला गावच्या गावक-यांना आता खात्री पटली की तेगबहादुरच ख-या अर्थाने आता गुरू हरगोविंदजींच्या गादीचा खरा उत्तराधिकारी आहे.  बाकला गावच्या शीख संगतने सर्वदूर संदेश पोहचवला.  लांबून-लांबून शीख धर्मिय बाबा बाकलामध्ये जमा होऊ लागले.  बाबा बाकला गुरू तेगबहादुरांच्या जयजयकाराने दुमदुमु लागले.  शीखांना त्यांच्या गुरगादीचा खरा वारसदार गुरू तेगबहादुरांच्या रूपाने मिळाला होता.  तेगबहादुरांना शीखांनी आपले गुरू म्हणून स्वीकारले ही वार्ता धीरमल आणि रामराय यांच्या कानावर गेली.  धीरमल त्यांचा भाऊ आणि रामराय पुतण्या हे दोघेही अत्यंत अस्वस्थ झाले.  कारण आता त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या सर्व बनावट गुरूंच्या गाद्या धोक्यात आल्या होत्या.  धीरमल आपल्या भावाविषयी द्वेषाने पेटून उठला  क्रोधाने वेडा झालेल्या धीरमलने आपल्या काही माणसांना तेगबहादुरांच्या घरावर हल्ला करण्यास सांगितले.  त्याच्या लोकांनी तेगबहादुरांना आलेल्या भेटवस्तू,पैसा आणि सुर्वणमुद्रा लूटून नेल्या.  मख्खन शाहला ही वार्ता मिळताच त्याने आपल्या माणसांना धीरमलच्या घराला वेढा घालण्यास सांगितले.  त्यामध्ये असंख्य शीख आणि मख्खन शाहचे हत्यारबंद लोक होते.  या लोकांनी लुटलेला सर्व ऐवज परत मिळवला.  त्याचबरोबर रामराय आणि त्याच्या लोकांना देखील बेदम मारहान केली.  रामराय आपल्या माणसांसह व्यास नदी पार करून पळून गेला.  रामरायने गुरू ग्रंथ साहेबची मुळ प्रत आपल्या ताब्यात घेतली होती.  मख्खन शाह आणि त्याच्या माणसांनी ही मुळ प्रत त्याच्याकडून हिसकावून घेतली.  आता गुरू ग्रंथ साहेबची मुळ प्रत तेगबहादुरांच्या ताब्यात देण्यात आली.  शीखांना त्यांचा नवा गुरू मिळाल्याची वार्ता जे लोक गुरू हरकृष्णराय यांच्यासोबत दिल्लीच्या प्रवासात होते,त्यांच्या कानावर गेली.  त्यांच्याकडे गुरू हरकृष्णराय यांनी दिलेले पाच पैसे आणि नारळ होते.  हे लोक देखील बाबा बाकलामध्ये दाखल झाले.  प्रचंड मोठा शीख जनसमुदाय बाकलामध्ये जमला.  अखेर २० मार्च १६६५ रोजी तेगबहादुरांना गुरूगादीवर अभिष्कित करण्यात आले.  गुरू हरगोविंदजी आणि त्यांच्या पत्नी नानकी यांचे सर्वात लहान अपत्य असलेल्या तेगबहादुरजींचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथ झाला. होता  मुघल सत्तेविरुद्ध भक्कम पाय रोवून उभे राहण्यासाठी गुरू हरगोविंदांनी भक्ती आणि शक्ती यांचा संयोग महत्वाचा मानला होता.  यामुळेच त्यांनी आपल्या अनुयायांसोबतच आपल्या पुत्रांना देखील त्याप्रकारे प्रशिक्षित केले होते.  त्यामुळे तेगबहादुरांना देखील धर्मशास्त्रांच्या अभ्यासासोबतच युद्धकला,घोडेस्वारी आणि शस्त्रविद्या यांचे ज्ञान अवगत करता आले.  आपल्या इतर भावांपेक्षा अत्यंत कमी अवधीत त्यांनी यासर्व विद्या,कला व तंत्रांमध्ये निपूणता प्राप्त केली होती.  तेगबहादुरांचा खरा कल ईश्वराधनेकडे होता.  ते तासतांस समाधी लावून ईश्वराधना करत असत.  मुघल सैन्याने ज्यावेळी किरतपूरवर चढाई केली त्यावेळी तेगबहादुरांना प्रत्यक्ष युद्धात आपला पराकम दाखवण्याची संधी मिळाली.  कमी वयात त्यांनी या युद्धात भल्या-भल्या योद्धयांना अचंबित करेल असा पराक्रम दाखवला.  करतारपुरचे रहिवासी भाई लालचंद यांची कन्या 'गुजरी' हिच्याशी वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला.  गुरू हरगोविंदजींच्या निर्वाणानंतर तेगबहादुर गुरूगादी संदर्भातील कोणत्याच संघर्षात न पडता बाबा बाकला येथे शांतपणे ईश्वर साधना करत जीवन व्यतीत करू लागले.  गुरू हरकृष्णराय यांच्या अकाली मृत्यमुळे आणि त्यांनी केलेल्या बाबा बाकले असा संदिग्ध उच्चारामुळे रामराय-धीरमलसारख्या अपप्रवृत्तींना डोके वर काढण्याची संधी मिळाली.  बाबा बाकले या उच्चारातून कदाचित हरकृष्णराय यांना आपले सर्वात लहान चुलते तेगबहादुर यांच्याकडे निर्देश करायचा असेल.  आपल्यानंतर गुरूगादीचे उत्तराधिकारी तेगबहादुर राहतील असे सुचवायचे असेल.  तेगबहादुरांच्या जन्मजात संतप्रवृत्तीमुळे त्यांनी यासंदर्भात कोणतीही आग्रही व आक्रमक भूमिका घेतली नाही.  बाबा बाकलेमध्ये त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांच्या सोढी घरण्यातील आणखी २२ भामटे बाबा बाकलेमध्ये वास्तव्य करून स्वयंघोषित गुरू झाले.  अखेर गुरूगादीचा खरा वारसदार गुरू तेगबहादुरच आहेत हे सिद्ध झाले.   शीखांना हरणाच्या गावात त्यांचा राजहंस सापडला.  त्याचबरोबर शीख धर्माच्या सर्वात तेजामय पर्वाचा प्रारंभ झाला.
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
     

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !