लोहा गरम हैं, मार दो हथौड़ा..
१७८१ सालचा ऑगस्ट महिना उजाडला आणि वेगवान घडामोडी घडू लागल्या. अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील लढा आता निर्णायक अवस्थेत पोहचला होता. त्याच बरोबर जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या सरसेनापती पदाची अंतिम परीक्षेला प्रांरभ झाला. ब्रिटिश सेनेच्या घराचे वासे आता फिरले होते. त्याला अंतिम व नेमक्या धक्क्याची आवश्यकता होती. याचवेळी अमेरिकन क्रांतीसेनेचा सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन आणि फ्रेंच नौदलाचा ॲडमिरल काउंट दे ग्रास यांनी भूदल व नौदल यांच्या समन्वयातून एक जबरदस्त रणनीती आखली. नवा ब्रिटिश सरसेनापती कॉर्नवालिस याने व्हर्जिनिया ताब्यात घेतल्याशिवाय युद्धाची समाप्ती अशक्य आहे. हा विचार करून त्यानुसार डावपेच आखण्यास सुरवात केली होती. युद्धाचे केंद्र आता व्हर्जिनिया होणार होते. पुढील सर्व हालचाली व्हर्जिनियाच्या आवतीभोवती होणार होत्या. त्यानुसार कॉर्नवालिसने कॅरोलीनाच्या उत्तरेला प्रस्थान केले आणि जनरल अर्नोल्डच्या तुकडीला जाऊन मिळाला. अमेरिकन क्रांतीसेनेचा जनरल लाफाएट हा तेथे छोटशी तुकडी घेऊन आघाडी सांभाळत होता. कॉर्नवालिसच्या विचारानुसार लाफाएट फार तर फार गनिमी काव्याचा वापर करून,आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो. याऊपर त्याची मजल जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याने लाफाएट आणि त्याची तुकडी यांना नगण्य समजून दुर्लश केले आणि तो पुढे पुर्वेकडे मार्गस्थ झाला. अखेर २ ऑगस्ट १७८१ रोजी यार्क नदीच्या मुखावर (समुद्राला नदी मिळते ते ठिकाण) असलेल्या यॉर्क टाऊन शहराजवळ त्याने आपला तळ ठोकला. येथून त्याला दुहेरी मदत मिळण्याची शक्यता होती. न्यूयॉर्कवरुन जनरल क्लिंटनचे सैन्य त्याच्या मदतीला येऊ शकत होते आणि यॉर्क नदीच्या खाडीमधून तो नौदलाचे सहकार्य मिळवू शकत होता. क्रांतीसेनेचा जनरल लाफाएटने गनिम युद्धाचे तंत्र वापरण्या ऐवजी कॉर्नवालिसच्या तळापासून काही अंतरावर आपला तळ ठोकला. त्यामुळे कॉर्नवालिसला नकळतपणे त्याच्या हालचालींकडे लक्ष दयावे लागत होते आणि एक प्रकारचा तणाव सहन करावा लागत होता. जॉर्ज वॉशिंग्टन आणि काउंट दे ग्रास यांच्या योजनेसाठी अनुकुल परिस्थिती निर्माण झाली. दे ग्रासच्या प्रस्तावानुसार तो आपले आरमार घेऊन वेस्टइंडिजकडे जाणार आणि तेथील अमेरिकन क्रांतीसेनेच्या सहकार्याने ब्रिटिश सैन्यावर चढाई करणार होता. त्याचवेळी न्यू पोर्टमध्ये काउंट रोशेमव्यू याच्या नेतृत्वात असलेली फ्रेंच थलसेना वॉशिंग्टन यांना येऊन मिळणार होती. त्याचवेळी न्यू पोर्ट मध्ये असलेल्या फ्रेंच आरमाराच्या युद्धनौका काउंट दे ग्रासच्या आरमारी ताप‹याला जाऊन मिळण्यासाठी मार्गस्थ झाल्या. वॉशिंग्टन यांनी त्वरीत व्हर्जिनियाला रवाना होऊन,तेथे लाफाएटच्या सैन्याला जाऊन मिळण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिश जनरल क्लिंटन न्यूयॉर्क शहरावर कब्जा करून बसलेला होता. वॉशिंग्टन यांच्या डावपेचांना आता सुरवात झाली. त्यांनी आपली मोठी फौज न्यूयॉर्कजवळ ठेवली. स्वतः मात्र केवळ सहा हजार सैनिकांची तुकडी घेऊन व्हर्जिनियाकडे कूच केली. न्यूयॉर्कमध्ये बसलेल्या जनरल क्लिंटन याला वाटले की वॉशिंग्टन यांची फौज आता न्यूयॉर्कवर चाल करणार. त्यामुळे तो न्यूयॉर्कच्या मोर्चेबांधणीत व्यस्त झाला. संभाव्य चढाईच्या दृष्टीने त्याने सर्व तयारी सुरु केली. वॉशिंग्टन यांचा डाव त्याच्या लवकर लक्षात आला नाही. त्याच्या हेरांकडून जेंव्हा त्याला समजले की न्यूयॉर्क बाहेर तळ ठोकून बसलेल्या विशाल क्रांतीसेनेचा सरसेनापती छावणीत नसून तो व्हर्जिनियाकडे गेला आहे. तेंव्हा क्लिंटनच्या डोक्यात प्रकाश पडला कि वॉशिंग्टन यांनी आपल्याला धोबीपझाड दिली असून आपला अंदाज सपशेल चुकलेला आहे. तोपर्यंत वॉशिंग्टन आणि त्यांचे सहा हजार क्रांतीसैनिक खूप दूरवर गेले होते. त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठणे देखील अशक्य होते. अशावेळी हातमळत बसण्याशिवाय जनरल क्लिंटन याच्यासमोर कोणताही पयार्य उरलेला नव्हता. यॉर्क टाऊनमध्ये बसून व्हर्जिनिया काबीज करण्याचे दिवास्वप्न पाहत बसलेला ब्रिटिश सरसेनापती कॉर्नवालिस भानावर आला,तेंव्हा त्याची चारी बाजूने नाकाबंदी झालेली होती. त्याच्याजवळच तळ ठोकून शांत बसलेल्या क्रांतीसेनेच्या जनरल लाफाएटच्या तुकडीसाठी त्यांचा सरसेनापती स्वतः सहा हजार सैन्याची कुमक घेऊन आला होता. त्यामुळे कॉर्नवालिसच्या सात हजार सैन्याच्या दुप्पट क्रांतीसेनेचे संख्याबळ झाले होते. तसेच दस्तुरखुद्द सरसेनापती आता आपले नेतृत्व करणार म्हंटल्यावर हजार हत्तींचे बळ क्रांतीसेनेच्या योद्धांमध्ये संचारले होते. सप्टेंबर महिना सुरू झाला. त्याच्या पहिल्याच सप्ताहात यॉर्कची खाडी असलेला चेसापीक उपसागर फ्रेंच आरमाराच्या २८ युद्धनौकांनी व्यापून गेली. त्यामुळे कॉर्नवालिसला सैन्यास पळून जाण्यासाठीचा जलमार्ग देखील बंद झाला. वॉशिंग्टन आणि फ्रेंच ॲडमिरल दा ग्रास यांचे नेमकी रणनीती आणि त्यासाठी केलेल्या नियोजनबद्ध व जलद हालचाली यांचा परिपाक म्हणजे कॉर्नवालिस जमिन व जल अशा दोन्ही स्तरांवर वेढला गेला. अचंबित करणारा हा वेढा होता. ब्रिटिश जनरल क्लिंटन याने कॉर्नवालिसला वाचवण्याचा प्रयत्न केला;परंतु नशिबाने ब्रिटिशांची साथ सोडली होती. अहर्निश परिश्रम,अतुट चिकाटी आणि अविचल श्रद्धा यांच्यामुळे अमेरिकन क्रांतीसेनेचे पारडे जडच झाले नव्हते, तर असीम स्वातंत्र्याच्या भूमीला स्पर्श करण्यास आतुर झाले होते. जनरल क्लिंटन याने कॉनर्वालिसला समुद्रमार्गे मदत पाठवण्याचा निर्णय घेतला. रॉयल नेव्हीचा ॲडमिरल ग्रेव्हिज याला चेसापीक उपसागाराच्या दिशेने आपल्या युद्धनौका घेऊन जाण्याचा आदेश क्लिंटनने दिला. ९ सप्टेंबर १७८१ चा दिवस होता. धडाडणा-या तोफांनी चेसापीकचा उपसागर दणाणला. फ्रेंच नौदल आणि रॉयल नेव्हीच्या युद्धनौकांवरील तोफा धडाडत आग ओकू लागल्या. जणू काही सागराच्या पाण्याने पेट घेतला होता. सलग पाच दिवस चेसापीकचे पाणी वणव्यासारखे पेटले होते. त्यातच फ्रेंच आरमाराच्या नव्या दमाच्या काही युद्धनौका चेसापीकच्या पाण्यावर अवतरल्या. आता मात्र रॉयल नेव्हीची भंबेरी उडाली. न्यूयॉर्कला आवटळून बसण्याची घोडचूक करून बसलेल्या जनरल क्लिंटनने सैन्याची एक तुकडी आणि ४४ युद्धनौका यॉर्क टाऊनकडे रवाना केल्या. रॉयल नेव्हीच्या या युद्धनौका जेंव्हा चेसापीकच्या पाण्यावरून यॉर्क टाऊनच्या किना-याजवळ पोहचल्या. तेंव्हा आपल्याला पोहचायला उशीर झाला,याची जाणीव त्यांना झाली. कारण हा ताफा पोहचण्याच्या नऊ दिवस आधीच ब्रिटिश सरसेनापती लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिस याने अमेरिकन क्रांतीसेनेसमोर शरणागती पत्कारली होती. चेसापीकच्या उपसागरावर फ्रांसचे प्रभूत्व प्रस्थापित झाले होते. अमेरिकन क्रांतीसेना आणि फ्रेंच सेना यांनी ब्रिटिशांचे दोन किल्ले हस्तगत केले होते. कॉर्नवालिसला पळून जाण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे निराश व हतबल सरसेनापती कॉर्नवालिस १९ ऑक्टोबर १७८१ रोजी आपल्या संपूर्ण सैन्यासह यॉर्क टाऊनच्या युद्धात बिनशर्त आत्मसमर्पण केले. त्याचे हे आत्मसमर्पण एका अर्थाने ब्रिटिश सत्तेचा संपूर्ण पराभवच होता. कारण अमेरिकेच्या या विजयाने भविष्य आणि नशिबाचा कौल कोणाच्या बाजूने गेला आहे,हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ केले होते. या युद्धाने अंतिम विजयाची पताका कोण फडकवणार हे निश्चित केले होते. असे असले तरी युद्धविराम होण्यासाठी आणखी एक वर्ष आणि शांतता तह होण्यासाठी दोन वर्ष अवधी लागणार होता. तसे पाहिले तर हा अमेरिकेचा संपूर्ण जय आणि ग्रेट ब्रिटनचा संपूर्ण पराजय असला तरी एक वर्ष किरकोळ चकमकी होणारच होत्या. ज्याप्रमाणे जंगलात पेटलेला वणवा एकदम शांत होत नसतो किंवा मारलेले कोंबड काही काळ फडफडत असते. त्याचप्रमाणे नाक कापले गेलेले इंग्रज न्यूयॉर्क व चार्ल्सटन मध्ये दटून उभे राहण्याचा प्रयत्न करत होते. अशा शक्तीहीन,गलितगात्र आणि विजयी शत्रुने घेरलेल्या इंग्रजांना स्वतःचा पराभव सहजपणे पचवता येत नव्हता. त्यासाठी ही शेवटची तडफड होती. महासत्ता ब्रिटनच्या सैन्याचा सरसेनापती कॉर्नवालिस महासत्तेच्या मस्तीत युद्धामध्ये रणनीतीच्या महत्वाला विसरला होता. महासत्तेचा मस्तवालपणा रक्तात भिनलेल्या कॉर्नवालिसला एक सेनापती म्हणून बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेता आला नाही. तसेच त्याप्रमाणे रणनीती देखील आखता आली नाही. 'शोले' चित्रपटातील गब्बरसिंग नाच-गाण्याच्या मस्तीत रंगला आहे,याची खबर मिळताच ठाकूर बलदेवसिंग जय-वीरूला त्याच्यावर हल्ला करण्यास सांगतो. हे सांगतांना तो ऐवढेच म्हणतो की,' लोहा गरम हैं, मार दो हथौड़ा'. जय - विरू अत्यंत नेमका वार करतात आणि गब्बरसिंगची घमेंड मोडीत काढतात. तशीच अवस्था जॉर्ज वॉशंग्टन आणि काउंट दा ग्रास या दोघांनी कॉर्नवालिसची केलेली होती.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment