सच्चा सौदा...
वयाची सोळा वर्ष उलटलेल्या नानकांचा विवाह करण्याची माता-पित्यांची तीव्र ईच्छा होती. नानकदेव मात्र कोणत्याही संसारीक कामात लक्ष घालत नव्हते. पिता काळूराम यांची आर्थिक परिस्थिती चांगली असली,तरी विवाहासाठी मुलगा कर्तबगार असणे आवश्यक होते. नानक कमवते झाले नाही,तर त्यांना कोणीही आपली मुलगी देणार नाही. याची कल्पना व काळजी असल्याने माता-पित्यानीं एक योजना आखली. तळवंडी गावात गावोगाव फिरून व्यापार करणारे काही लोक होते. हे लोक आपले व्यापारी तांडे घेऊन विविध भागात प्रवास करत. व्यापार नफा कमावून तळवंडीला परतत. गावातील अशा व्यापारी तांडयांसोबत नानकांना व्यापारासाठी पाठवावे,ज्यामुळे ते व्यापार-उदिमाचे कौशल्य,अनुभव आणि व्यावहारिक ज्ञान प्राप्त करू शकतील. अशी कल्पना काळूरामांच्या मनात आली. नानकदेवांनी पित्याच्या ईच्छेचा मान ठेवला. काळूरामांनी वीस रूपये भांडवल म्हणून व्यापारासाठी त्यांना दिले. तसेच 'बाला' नावाचा त्यांचा एक अत्यंत विश्वासू नोकर नानकांनासोबत म्हणून दिला. तळवंडीचा व्यापारी तांडा व्यापारासाठी बाहेर पडला. तळवंडीपासून बारा मैलांवर असणा-या 'चूहङ्काणा' नावाच्या गावात तांडयाचा पहिला पडाव पडला. थोडा आराम करून,व्यापारी लोक चूहङ्काणाच्या बाजारपेठेत मालाच्या खरेदीविक्रित व्यस्त झाले. नानकांना मात्र बाजारपेठेऐवजी गावाच्या वेशी बाहेरच्या आमराईकडे जाण्याचा मोह आवरता आला नाही. तळवंडीच्या निसर्गरम्य परिसरात साधना करणा-या नानकदेवांना अशी सुंदर आमराई खुणवणारच होती. त्या आमराईत फिरत्या साधू-संन्याशांचा एक जत्था उतरलेला होता. सर्वस्वाचा त्याग केलेल्या साधूंची परमार्थ चर्चा सुरू होती. निसर्गरम्य आमराई आणि त्यात संन्याश्यांची भेट,हा नानकांसाठी 'दुग्ध-शर्करा' योग ठरला. जगाचा व्यापार चूहङ्काणाच्या बाजारपेठेत चालला होता,तर ईथे ईश्वराच्या नामाचा व्यापार सुरू होता. नानकांनी बालाला सांगितले आपल्या तळवंडीत असा योग व आनंद मिळत नाही. मला हाच व्यापार आवडतो. वडिलांनी दिलेले वीस रूपये त्यांनी बालाला दिले आणि तूला हेवे ते कर असे सांगितले. नानक संन्याशांसोबत चर्चेत देहभान हरपून गेले. बाला हा काळूरामांचा अत्यंत विश्वासू नोकर होता. त्याने बाजारात जाऊन काही खरेदी-विक्री केली आणि नफा कमावून तो नानकांकडे आला. साधूसंतांच्या सेवेत मग्न असलेल्या नानकांना बालाला पाहून आनंद झाला. हे साधूसंत भीक्षा मागून खात नाही आणि ते अनेक दिवस उपाशी आहेत. त्यामुळे गावात जाण्याचा त्राण त्यांच्यात नाही. आपणच त्यांच्यासाठी काही तरी भोजन व्यवस्था करावी,अशी कल्पना त्यांनी बालाला सांगितली. प्रथम नानकांनी साधूंना बालाकडे असलेले सर्व पैसे स्वीकारण्याची विनंती केली. साधूंनी पैसे घेण्याचे नाकारले. त्यांना नानकांची सेवा व प्रेमच महत्वाचा वाटले. त्यांनी पैसे घेणे नाकारले,कारण अशामुळे नानकांचे माता-पिता त्यांना रागवतील आणि हे सर्वसंगपरित्याग केलेले साधू असल्याने पैशाचा त्यांना मोह नव्हता. नानकांचा आग्रह व तळमळ मात्र अत्यंत तीव्र होती. अखेर त्यांनी काही अन्न प्रसाद म्हणून स्वीकारण्यास मान्यता दिली. नानकदेव बालासह गावात आले. त्यांनी बालाजवळ असलेले पैसे मागितले,हुकुमाचा ताबेदार बाला एकही शब्द बोलला नाही. त्यांने नानकांच्या हाती पैसे सोपवले. मग दोघांनी बाजारातून अन्न पदार्थ खरेदी केले. यामध्ये सर्व पैसे संपून गेले. साधूंच्या सहवासाने आणि प्रसादभोजनाने नानकांना असीम समाधान व संतोष प्राप्त झाला. हाच खरा व्यापार होय,म्हणजे सच्चा सौदा. याची अनुभूती नानकांना आली. बालासह गावी परतल्यावर पिता काळूराम यांचा राग डोळयासमोर उभा राहिला. घाबरलेल्या नानकांनी बालाला पुढे पाठवले. घरी जाऊन बालाने नानकांनी केलेल्या सच्चा सौदयाची माहिती दि.। सोळाव्या शतकातील वीस रुपये ही केवढी मोठी रक्कम होती,याची कल्पना आपण करू शकतो. घराजवळच्या एका झाडावर नानक लपले होते. साहाजिकच काळूराम यांचा पारा चढला. वीस रुपये उधळून लाखाचे बारा हजार करून नानक परतले होते. पिता काळूराम यांच्या क्रोधाला व प्रसादाला नानकांना सामोरे जावे लागले. नानकांचे चाहते जहागिरदार रायबूलार यांनी अखेर मध्यस्थी केली आणि काळूरामांचा राग शांत केला. नानकदेवांच्या जीवनातील ही घटना विस्ताराने सांगणे अत्यंत महत्वाचे अत्यंत महत्वाचे ठरते. कारण हा शीख धर्माच्या पायातील एक महत्वाचा घटक ठरणार होता. सच्चा सौदा हे सांसारिक अथवा प्रापंचिक जीवनासाठी महत्वाचा धडा नानकदेवांनी या प्रसंगात दिला. आपल्या जवळेचे दुस-याला निस्वार्थपणे देण्याचे व सेवा करण्याचे महत्व नानकदेवांनी येथे अधोरेखित केले. तुकोबारायांनी ज्याप्रमाणे आपल्या वाटयाला आलेले गहाणपत्र इंद्रायणीच्या स्वाधीन केले आणि गोरगरिबांची शोषणातून मुक्तता केली. हा देखील सच्चा सौदाच होता. तुकोबारायां दिलेली ही शिकवण महाराष्ट्र विसरला. शीख धर्मात मात्र सर्वात महत्वाच्या आचारधर्मापैकी एक म्हणून ही शिकवण अत्यंत काटेकोरपणे अंमलात आणली जाते. पारशी धर्मात व शीख धर्मात निर्व्याज व निरपेक्ष भावानेने सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. आपल्या कमाईत समाजाचा देखील हिस्सा आहे,याची जाणिव या धर्मांच्या पायातच असलेली दिसते. आज नानकदेवांच्या सच्चा सौदयाची आठवण गुरूद्वा-यांच्या रूपाने शीख धर्मात जतन करण्यात आली आहे. चूहङ्काणाच्या त्या आमराईच्या ठिकाणी 'सच्चा सौदा गुरूद्वारा' नानकदेवांनी जीवन व्यापारातील संवेदनशीलता,सहृदयता आणि सहकार्य या मानवतेच्या मुख्य लक्षाणांची दिलेल्या शिकवणीची साक्ष देत उभा आहे. तसेच सच्चा सौदा करून परतलेल्या नानकदेवांनी पित्याच्या कोपापासून वाचण्यासाठी तळवंडीतील ज्या झाडाचा आश्रय घेतला होता,तेथे 'तंबूसाहिब गुरूद्वारा आहे. शीख धर्माचे अभ्यासक डॉ.अशोक कामत यांनी गुरूद्वारा शब्दाची उत्पत्ती सांगतांना,गुरूद्वार या शब्दापासून गुरूद्वारा हा शब्द निर्माण झाला असावा असे प्रतिपादन केले आहे. त्यांच्या मते 'गुरूद्वार' शब्दाचा अर्थ गुरूंकडे नेणारा मार्ग अथवा गुरूंकडे जाण्याचा दरवाजा. पण खरे तर तो ईश्वराकडे जाण्यासाठी गुरूने दाखविलेला मार्ग किंवा दरवाजा असा आहे. पंजाबी भाषेमधील बोलण्याच्या लकबीमुळे गुरूद्वार शब्द गुरूद्वारा असा उच्चारला जाऊ लागला. सच्चा सौदानंतर नानकांना तळवंडी सोडावे लागले. त्यांची अत्यंत प्रिय बहिण नानकीकडे सुलतानपूर येथे त्यांना पाठवण्यचा निर्णय काळूरामांनी घेतला. नानकांची मोठी बहिण नानकी यांची त्यांच्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका राहिलेली आहे. नानकदेवांचे असामान्यत्व ख-या अर्थाने ओळखणारी ती पहिली व्यक्ती होती. आपल्या भावावर पुत्रवत प्रेम करणा-या नानकीने कायम नानकांची पाठराखण केली. आपला लहान भाऊ चारचौघांसारखा सामान्य माणूस म्हणून जन्माला आलेला नाही,ही जाणीव असलेली नानकी म्हणजे एकप्रकारे नानकदेवांचे मनच म्हणावे लागेल. नानकीचे पती जयराम हे सुलतानपूरच्या नबाबाच्या मर्जीतील दरबारी होते. जयराम हे गृहस्थ अत्यंत व्यवहारकुशल आणि समाजात प्रभाव पडणारे व्यक्तिमत्वाचे होते. नानकांसंदर्भातील घटना अथवा प्रसंग कानावर आल्यानंतर त्यांनाही काळजी वाटत असे. नानक एक असामान्य व बुद्धिमान मुलगा आहे,याची त्यांना खात्री होती. आपण नानकला योग्य प्रकारे मार्गदर्शन करून,त्याला जीवनात यशस्वी करण्यास सहकार्य करू अशी त्यांची प्रामाणिक भावना होती. पिता काळूराम सच्चा सौदयाच्या प्रसंगानंतर चिडलेलेच होते. त्यांनी जयराम यांच्यकडे नानकांना पाठविण्याचे ठरवले. जयराम यांचे भारदस्त,प्रभावी व जबाबदार व्यक्तिमत्वाचा नानकांवर नक्कीच परिणाम होईल. नानक देखील जबाबदारीने वागू लागतील अशी काळूरामांची अपेक्षा होती. तसेच नानकीचा प्रेमळ सहवास देखील नानकांना लाभेल. नानकांसाठी जयराम व नानकी यांची तळमळ अत्यंत प्रामाणिक होती. पित्याच्या आज्ञेप्रमाणे नानकांनी सुलतानपूरला जाण्याचे ठरवले. तळवंडीसारख्या खेडयातून प्रातांची राजधानी असणा-या सुलतानपूरसारख्या शहरात जाणे,हे खूप मोठे परिवर्तन होते. शहर माणसाला जीवनाचे वेगळेच अनुभव देत असते. खेडयातील जीवनातील अनौपचारिकता,सहजता व सहकार्य यांचा शहरात तुलनेने अभावच असतो. खेडयात माणूस एका सुरक्षित कोषात जगतो. गरिबी असली तरी तिचे चटके जाणवत नाही. अभावाची जाणीव देखील फारसी तीव्र नसते. शहरात मात्र जगण्यासाठी धडपड करावीच लागते आणि पैसा कमवणे भागच असते. त्यामुळे नानकांच्या जीवनातील एका नव्या पर्वाला सुलतानपूरमध्ये सुरवात होणार होती. त्यांना तळवंडीपेक्षा मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार होते. नानक सुलतानपूरमध्ये आले. मोठया शहरातील एक वेगळेच जग त्यांना अनुभवायला मिळू लागले. तळवंडीमध्ये रायबूलार हे मुस्लिम जमिनदार आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. ग्रामीण जीवनातील मानवता त्यामध्ये होती आणि रायबूलार यांचे व्यक्तिमत्व देखील तसे होते. सुलतानपूरमध्ये मुस्लिम शासकांची कार्यपद्धती नानकांना जवळून पाहता आली. सुलतानपूनचा नबाब दौलतखान मोठा रसिक माणूस होता. जयराम यांनी नानकांची भेट दौलतखानाशी करून दिली. पहिल्या भेटीतच नानकांचा प्रभाव नकळतपणे त्याच्यावर पडला. हा माणूस काही तरी वेगळा आहे,हे दौलतखानाच्या पारखी नजरेने हेरले. याला मोदीखान्याचा म्हणजे सरकारी धान्यकोठाराचा प्रमुख केल्यास,हा प्रामाणिमपणे काम करेल. याची खात्री दौलतखानला झाली. त्याने नानकांची नेमणूक मोदीखान्याचा प्रमुख म्हणजे मोदी म्हणून केली. सरकारी कर्मचारी म्हणून नोकरी करतांना देखील नानक सच्चा सौदाच करत राहणार होते.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment