संचखंड ते सतनाम..

'धर्म साधूच्या ठिगळे लावलेल्या फाटक्या वस्त्रात नाही,तो त्याच्या हातातल्या दंडामध्येही बंदिस्त नाही,धर्म शरीरावर लावलेल्या भस्मातही नाही,धर्म कानांतल्या भिकबाळीमध्ये नाही,डोक्याच्या गुळगुळीत गोटयात नाही,धर्म शंख फुंकण्यातही नाही,तुम्हाला ख-याखु-या धर्माचा मार्ग पहायचा असेल,तर या अपवित्र जगात राहून आपले पावित्र्य जपा.'  असा संदेश देतांना गुरू नानकदेवांनी धर्माचे सारच जणू व्यक्त केलेले दिसते  एखादयाने बाहय स्वरूपात स्वतःला धार्मिक अथवा धर्मपरायाण सिद्ध करण्यासाठी केलेली रंगरंगोटी म्हणजे धर्म नव्हे,हे अत्यंत ठामपणे सांगतांना नानकदेवांनी धर्माची सहज-साधी व्याख्या केलेली दिसते.  नानकदेवांनी येथे ढोंगी व दांभिक धर्ममार्तंडांचा बुरखा फाडलेला दिसतो. सुलतानपूर लोदी हे शहर म्हणजे नानकदेवांची तपोभूमी ठरू लागले होते.  नोकरी आणि संसार अत्यंत नेटकेपणाने करणारे नानकदेव सुलातनपूरवासीयांना दिसत होते.  तसेच त्यांच्यातील महात्म्याची अनुभूती देखील त्यांना येत होती.  प्रपंचात व परमार्थात समर्थ साथ देणारी पत्नी आणि दोन पुत्र यामुळे त्यांचा संसार बहरला होता.  आपल्या जीवितकार्याची,एक पती आणि पिता म्हणून आपल्या कर्तव्याशी त्यांनी सांगड घातली होती.  सर्वांनी आपल्या प्रापंचिक व पारमार्थिक जीवनाची सांगड घालावी. हा संदेश ते सर्वसामान्यांना देत होते.  त्याचा आदर्शच जणू त्यांनी आपल्या संसारातून त्यांनी उभा केला होता.  संसाराचा त्याग करून संन्यासी म्हणून जीवन जगण्याच्या ढोंगाला त्यांचा कठोर विरोध होता.  माणूस प्रपंचात राहून परमार्थ साधू शकातो. यावर त्यांचा ठाम विश्वास होता.  संसारतील विविध भूमिका नानकदेवांनी अतिशय समरसून पार पाडल्या.  जगाचा व्यवहार आणि प्रपंचाच्या जबाबदा-या पार पाडतांना देखील त्यांच्या तपश्चर्येत खंड पडलेला नव्हता.  परमेश्वराचे मननचिंतन,अखंड नामस्मरण व ध्यान याकडे त्यांच कदापि दुर्लक्ष झाले नाही.  एकांतात त्यांची तपश्चर्या चालू होती,तर समाजात वावरतांना ते समाजाचे सूक्ष्म अवलोकन करत होते.  धर्माच्या नावाने भरकटण्यात आलेला समाजाला ते समाजावून घेत होते.  जाती-पंथ-धर्म भेद यांच्या कृत्रिम भिंतींचा पोकळपणा आणि त्यांच्यामागे दडलेला स्वार्थ त्यांनी समाजाच्या अत्यंत सखोल निरिक्षणातून समजावून घेतला.  त्यांना स्वतःपुरता परमार्थ अभिप्रेत नव्हता,तर त्यांना समाजासाठी देखील परमार्थाचस सहज-सुगम मार्ग निर्माण करायाचा होता.  बुद्ध,महावीर,कबीर,रविदास इत्यादी महापुरूषांप्रमाणेच त्यांचा परमार्थ समाजाकडे पाठ करून बसलेला नव्हता किंवा समाजाकडे तुच्छतेने पाहत नव्हता.  तळवंडीमध्ये रावीच्या काठावर प्रारंभ झालेला,परमार्थाचा प्रवास सुलातनपूरच्या वेईच्या काठावर पूर्णत्वास पोहचण्याच्या मार्गावर होता.  इ स १४४७ ची एक रम्य पहाट  नानकदेव आपली नित्यसाधाना करण्यासाठी वेईच्या काठावर पोहचले.  त्यांचे काही प्रिय शिष्य नेहमीप्रमाणे सोबत होतेच.   वेई नदीच्या एका ठरलेल्या घाटावर नानकदेवांची नित्य स्नान-तपस्या होत असे.  त्यांच्या या नित्य दिनक्रमामुळे सुलतानपूरवासी या घाटाला 'संतघाट' असे संबोधू लागले होते.  संतघाटावर आज एक वेगळाच अनुभव त्यांच्या शिष्यांना आणि सुलातनपूर परिसराला येणार होता.  शिष्यांकडे आपली वस्त्रे त्यांनी दिली आणि ते नेहमीप्रमाणे वेईच्या प्रवाहात उतरले.  त्यादिवशीचा वेईचा प्रवाह इतिहासाच्या प्रवाहात चिरंतन स्थान मिळवणार होता.   नानकदेवांनी  नेहमीप्रमाणे पाण्यात बुडी मारली.  बराच वेळ लोटला,तरी ते बाहेर पडले नाही.  यामुळे शिष्य चिंताक्रांत व भयभीत झाले.  त्यांनी आणखी काही काळ धीर धरला.  अखेर त्यांचा धीर सुटला.  ते गावाकडे पळत सुटले आणि झालेली घटना त्यांनी सुलातनपूरवासीयांच्या कानावर घातली.  नानकदेवांवर प्रेम करणारे सुलतानपूरवासी वेईच्या दिशेने धावू लागले.  प्रत्येक जण आपल्यापरीने त्यांचा शोध घेऊ लागले.  कदाचित नानकदेवांनी जलसमाधी घेतली. अशी भिती त्यांच्या मनाचा थरकाप उडवू लागली.  नानकदेवांचा शोध घेण्यातील तत्परता व तळमळ हळूहळू खिन्नतेत रूपांतरीत होऊ लागली.  जाणा-या प्रत्येक क्षणासोबत त्यांना जलसमाधीविषयी त्यांची दृढ झाली.  अखेर त्यांच्या पार्थिव शरीराचा शोध घेण्यासाठी अनेक जण  नदीच्या प्रवाहात दुरवर जाऊन आले.  त्याच्याही शोध लागला नाही.  नानकदेवांचे नेमके काय झाले? हा प्रश्न प्रत्येकाला सतावू लागला.  तुकोबारायांवर अलोट प्रेम करणारे जसे इंद्रायणीच्या काठावर होते,तसेच त्यांचा टोकाचा मत्सर करणारे देखील होते.  तसेच नानकदेवांबाबतही घडले.  वेईच्या काठावर त्यांच्या विरहाने व्याकुळ झालेला अलोट जनसागर होता.  त्याच्यासोबत त्यांचा मत्सर करणा-यांचा गटही होता. मंबाजी व रामेश्वरभट तेथेही होते.  सुलतान दौलतखान ज्यांना मानतो. त्या नानकदेवांचे वेईच्या प्रवाहात गायब होणे,जणू त्यांच्या पथ्यावर पडले होते.  त्यापैकी काही जण म्हणू लागले, 'प्रपंचाला कंटाळून नानकदेवांनी आत्महत्या केली.'  काही म्हणू लागले,' त्यांनी सरकारी धान्य कोठारात जी अफरातफर केली,त्यामुळे होणा-या शिक्षेच्या भयाने नानकदेवांनी देहत्याग केला.  सुलतान दौलतखानाने नानकदेवांवर संपूर्ण विश्वास दाखवला होता. त्यामुळे आपण केलेल्या विश्वासघातामुळे दौलतखानला तोंड कसे दाखवायचे म्हणून नानकदेवांनी आत्महत्या केली.  अशा अफवा आणि गावगप्पा त्यांनी सुरू केल्या.  अशा विघ्नसंतोषी व कपटी लोकांना नानकदेवांविषयी ठणकावून सांगणारी आणि नानकदेवांवर प्रेम करणा-यांना विश्वास देणारी एकच व्यक्ती होती.  ती म्हणजे नानकदेवांची बहिण नानकी.  आपल्या लहान भावाच्या आकाशाला कवेत घेण्याचा मोठपणा प्रारंभीपासून तिनेच ओळखला होता.  'माझा भाऊ नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणारा नसून तो प्रवाहाविरूद्ध पोहण्याचे सामर्थ्य ठेवणारा आहे.  प्रवाहासोबत वाहत जाणारे सर्वसामान्य वेगळे आणि प्रवाहाविरूद्ध पोहून प्रवाहाचीच दिशा बदलवणारे असामान्य वेगळे असतात.  जगाला भवसागरातून तारण्यासाठी तारणहार म्हणून तो आलेला आहे.  ही सामान्य नदी त्याला कशी वाहून नेईल ?' असे नानकदेवांविषयी अत्यंत सार्थ उद्गार काढण्याचे सामार्थ्य केवळ नानकीकडेच होते.  नानकदेव वेईच्या प्रवाहात लुप्त होण्यास तीन दिवस लोटले.  चौथ्या दिवशी सुलतानपूर नजिकच्या जंगलातून निवांतपणे घरी परतणारे नानकदेव लोकांना दिसले.  त्यांच्या शिष्यांच्या आनंदाला व आश्चर्याला पारावार राहिला नाही. दुसरीकडे हितशत्रूंची बोबडी वळाली.  परतलेल्या नानकदेवांवर अनकांनी प्रश्नांचा भडीमार केला.  वेईच्या प्रवाहात अंतर्धान पावलेले नानकदेव आणि तीन दिवसांनी जंगलाच्या वाटेने परतलेल नानकदेव हे वेगळे होते.  तुम्ही कुठे बेपत्ता झाला होतात? तुम्हाला कोण भेटले? तुम्ही या दिवसात काय केले? कोणी तुम्हाला काय दिले? असे अनंत प्रश्न आणि त्यांना केवळ स्मित हास्याचे उत्तर.  यामुळे लोकांचा गोंधळ अधिकच वाढला होता.  परतलेल्या नानकदेवांचा नवे रुप सगळयांना कोडयात टाकणारे होते.  त्यांच्या घरात होते नव्हते ते सारे आल्या-गेल्याला अर्पण करण्याचा उपक्रमच त्यांनी हाती घेतला.  त्यांना जणू काही अक्षयपात्र मिळाले होते.  त्यांचे वाटणे थांबत नव्हते आणि वाटायचे ते संपत नव्हते.  १४ दिवसांनी भंडा-याच्या डोंगरातून परतलेल्या तुकोबांनी आपल्याकडील गहाणखते इंद्रायणीच्या प्रवाच्या स्वाधीन करुन आणि अशीच मुक्तहस्त उधळण केली होती.  देहूनी घेतलेली अनुभूती सुलतानपूर घेत होते.  काही अंधविश्वासू  व काही दुष्ट लोकांनी नानकदेवांना भूतबाधा झाली अशी अवई उठवली. त्यावेळी देखील बहिण नानकीने त्यांना मार्मिक उत्तर दिले.  नानकी म्हणाली,' मानवतेच्या उद्धारासाठी जन्म घेतलेल्या माझ्या भावाला ग्रासण्याची क्षमता कोणत्याच अशुभ शक्तीत नाही.  उलट संसारचक्रात ग्रस्तत्रस्त आणि चुकीच्या धार्मिक समजूतींनी ग्रासलेल्यांना सहीसलामत  बाहेर काढून त्यांना सन्मार्गावर आणण्याची किमया त्याच्याकडे आहे.' नानकदेवांच्या जीवनातील ही घटना भाई गुरूदास यांच्या 'वारां' नावाच्या रचनेत आली आहे.  भाई गुरूदास शीख धर्माच तृतीय गुरू अमरदास यांचे शिष्य आणि शीख समाजाचे सर्वात जुने नेते म्हणून ख्यातनाम आहेत.  नानकदेवांचा सहवास साक्षात लाभलेल्या शिष्यांकडून भाई गुरूदास यांनी त्या अद्भूत घटनेचा तपशील प्रत्यक्ष ऐकला होता.  त्यांची रचन 'वारां' ही गुरूग्रंथ साहेबची किल्ली मानली गेली आहे.  शीख धर्माचे पंचमगुरू अर्जनदेव यांनी 'वारां' ची पुष्कळ सुस्ती व पाठराखण केली होती.  भाई गुरूदास यांच्या वारांमध्ये या घटनेचा उल्लेख 'सच्चखंड' असा करण्यात आलेला आहे.  सहावे गुरू हरगोविंदजी यांच्या काळात पुराणाच्या शैलीत लिहिलेला एक ग्रंथ आहे.  त्याला 'पुरातन जनमसाखी' असे संबोधले जाते.  त्यामध्ये देखील ही घटना वर्णन करण्यात आली आहे.  शीख परंपरेत ही घटना नानकदेवांची देवलोकीची यात्रा म्हणून मानली जाते.  वेईच्या प्रवाहात अंतर्धान पावलेले नानकदेव देवलोकात गेले,कारण साक्षात परमेश्वरानेच अत्यंत प्रेमाने त्यांना आमंत्रित केले होते.  देवदेवतांनी त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान केला.  त्यांना अनेक सिद्धीसोबतच जगदोद्धाराचा महामंत्र दिला.  नानकदेवांचा अवतार यामुळे सफल झाला आणि त्यांच्या उर्वरित जीवनकार्याची दिशा त्यांना स्पष्ट झाली.  परमेश्वरानेच त्यांना 'उदासी' म्हणजे विरक्तीची वस्त्रे दिली. सर्वसामान्यांच्या सुखाचा मार्ग साक्षात परमेश्वराकडून आखून घेऊन नानकदेव इहलोकात परतले.  गुरूग्रंथ साहेबमध्ये 'माझ दी वार,महला एक' यामध्ये साक्षात नानकदेवांच्या मुखातून ही घटना शब्दबद्ध करण्यात आली आहे.  नानकदेव म्हणतात,'मी अगदी विरक्त होऊन गेलो होतो.  हवे तर सर्वपाशमुक्त असा मी अगदी बेकार झालो होतो,असे देखील म्हणता येईल.  देवदरबारात उदासीचे सन्मानवस्त्रे मला देण्यात आली.  देवाचे सत्यस्वरूप प्राप्त करून देणारा नाममंत्र मला मिळाला.  हे नाम म्हणजेच अमृत होय.  नामजपातून जगाकडे पाहण्याची सतदृष्टीपेक्षा माझे म्हणून वेगळे जीवन राहिलेले नाही.  त्याच्या नामातच सारे काही आले. म्हणूनच 'अमृताहुनी गोड,नाम तुझे देवा' याची प्रचीती सतनामाच्या रूपाने नानकदेवांनी जगाला दिली. कदचित या नाममहिमेमुळेच पुढे नानाकदेवानंतर रावीच्या भेटीला चंद्रभागा गेली असेल.
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
      



Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !