पहिला शीख...




पंजाबमधील बाटला शहरात २४ सप्टेंबर १४८७ ला नानकदेव आणि सुलक्खनदेवी यांचा विवाह संपन्न झाला. गुरू नानकदेवांच्या विवाहाने त्यांच्या जीवितकार्याला एक नवा आयाम दिला. एक पती म्हणून नानकदेवांनी सुलक्खनदेवींचा प्रपंच सचोटीने प्रारंभ केला. नानकांच्या विवाहासाठी तळवंडी येथून त्यांचे अनेक बालमित्र सुलतानपूरला आले होते. तळवंडी सोडतांनाचे नानकदेव आणि सुलतानपूरचे नानकदेव यांच्यातील अमुलाग्र बदल त्यांच्या मित्रपरिवाराला स्तमित करून गेला. तळवंडी परिसरातील नानकदेवांचा जीवन म्हणजे बीजाचा कळीपर्यतचा प्रवास. महापुरुष ज्या परिसरात जन्माला येतात तेथील लोकांनी त्यांचा बीजापासून कळीपर्यंतचा प्रवासच अनुभवलेला असतो. आपल्या गावाच्या भूमीत रूजलेले हे बीज कळीपर्यंतचा प्रवास करेपर्यंत त्याच्या असामान्यत्वाची कल्पना किंवा जाणीव स्थानिकांना नसते. एक सामान्य बालक म्हणून हे महापुरुष त्यांच्या परिसरातील समाजाला माहित असतात. काही जणांना त्यांच्या असमान्यत्वाची जाणीव होत असते,परंतु ते संभ्रमात असतात. महापुरुषांच्या असामान्यत्वाला ओळखण्यासंदर्भात सामान्यांच्या या मर्यादा असतात. तो त्यांचा गुन्हा नसतो. तळवंडीची ही कळी सुलतानपूरमध्ये हळूवारपणे उमलायला लागली होती. तिच्यातून प्रकट होण्या-या फुलाचे चिरंतन सौंदर्य आणि अलौकिक परिमळ जाणवायला लागला होता.  तळवंडीच्या बालमित्रांना आपल्यासोबत खेळणारा,खोडया करणारा,रानावनात भटकणारा हाच तो नानक आहे. यावर विश्वास बसत नव्हता. निसर्गातील बीज असो वा मानवी जीवनातील असो ज्यांनी बीज पाहिले आहे, त्यांचा  त्या बीजातून उमललेल्या फुलावर विश्वास बसत नसतो. तसेच ज्याने थेट फुलच पाहिले तो बीजाची कल्पना करू शकत नाही. महापुरुषांचा प्राथमिक जीवनप्रवास पाहिलेल्यांना त्याच्या महानतेवर लवकर विश्वास बसत नसतो,त्यामुळे त्यांना बीजापासून फुलापर्यंतचा प्रवास पुन्हा समजावून घ्यावा लागतो. तसेच ज्यांनी महापुरुषांना थेट महान म्हणूनच अनुभवले त्यांना त्यांच्या प्राथमिक जीवनाप्रवासावर विश्वास बसत नाही. असे लोक फुलापासून मागे जात बीजाला समजण्याचा प्रयत्न करतात. नानकांचे बालमित्र पहिल्या प्रकारात मोडत होते. त्यांनी सुलतानपूरला आल्यानंतर फुलू लागलेले नानक अनुभवले. त्यामुळे हे बालमित्र भूतकाळात गेले आणि नानकांचा 'बीज ते फु' त्यांनी अनुभवलेला प्रवासाचा अन्वयार्थ ते पुन्हा एकवार शोधू लागले.  त्यांचा हा शोध पूर्णत्वास गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपण एका महापुरुषाची मैत्री व सहवास अनुभवलेले भाग्यवंत आहोत. ही जाणीवच त्यांना अभिमानाने व आनंदाने फुलवणारी होती. त्यांनी नानकदेवांच्या सहवासात सुलतानपूरलाच वास्तव्य करण्याचे ठरवले. त्यांना हा अमृतानुभव आता आयुष्यभर घ्यायचा होता. नानकदेवांनी त्यापैकी बहुतेकांना सुलतानपूरमध्ये नोकरी-धंदा मिळवून दिला. नानकांचा जीवनसंदेश त्यांना मनापासून भावला. भविष्यात या बालमित्रांनी नानकांचे शिष्यत्व पत्कारले. 'कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही,' अशा अगदी साध्या वचनाने नानकदेवांची संदेशयात्रा प्रारंभ झाली. हे साधे वाटणारे वचन पुढे एका महान मानवतावादी तत्त्वज्ञानाचे बीज होते. नानकदेवांच्या पहिल्या वचनापासूनच त्यांचे जगणे व तत्त्वज्ञान यांच्यात यत्किंचितही अंतर नव्हते याची प्रचीती येते. त्यांच्या बालमित्रांनी त्यांचे शिष्यत्व पत्कारले. यात भाई मनसुख आणि भाई भगीरथ हे मुख्य होते. हे जरी खरे असले,तरी ते नानकदेवांचे पहिल शिष्य नव्हते. त्यांचे शिष्यत्व सर्वप्रथम पत्कारणारा आणि आजीवन साथ करणारा  पहिला शिष्य सर्वात विशेष होता. तळवंडीचा मुसलमान असलेला भाई मरदाना हा वाद्यवादक त्यांचा पहिला शिष्य होता. रबाब हे वाद्य वाजवणारा मरदाना वयाने नानकदेवांपेक्षा दहा वर्षांनी मोठा होता. तो खानदानी वाद्यवादक होता. मंगलकार्य व सण-उत्सवांप्रसंगी वाद्य वाजवणा-या तळवंडीतील अलुतेदार घरातील मरदाना अत्यंत निष्णात रबाबवादक तर होताच,परंतु गायन देखील चांगले करायचा. नानकदेव आपली शिकवण पद्यात लिहित आणि भाई मरदाना त्याला चाल लावून आपल्या एकतारीवर ते गात असे.  त्याचा उल्लेख अनेक निरपेक्ष व अभ्यासक पहिला शीख असाच करतात. भाई मरदाना यांचा आणि नानकदेवांचा संबंध घनिष्ठ होण्यास एक घटना घडली. असे म्हटले जाते की भाई मरदाना यांनी गुरू नानकदेवांची एकदा भेट घेतली. आपल्या कुटुंबातील माणसांच्या अकाली मृत्यूने मरदाना आणि त्यांची आई अत्यंत दुःखी झाले होते. त्यांच्या आईने आपल्या तरूण मुलांचा मृत्यू अनुभवला होता. तिच्या दुःखाला पारावार राहिला नव्हता. मरदानांनी आपल्या आईची भेट नानकदेवांशी घडवली. त्यांच्या उपदेशाने व सांत्वनाने तिच्या पोळलेल्या मनाला शीतलता लाभेल याची खात्री मरदानांना होती. आपली सर्व मुलं मरत आहेत,याने कष्टी झालेली ती माता पाहून नानकदेवांनी अत्यंत सहानुभूती व स्नेहाने तिची चौकशी केली. तिने आपली व्यथा नानकदेवांनी सांगितली. त्यांनी तिला प्रश्न केला की, 'हा जो तुझा मुलगा जीवंत आहे,त्याला तू कोणत्या नावाने हाक मारते?' यावर ती माता म्हणाली,"मी त्याला 'मर-जाना',अशी हाक मारते." आपल्या मुलाला आपणच 'मर-जाना' असे संबोधले म्हणजे त्याला दृष्ट लागून अथवा काही अशुभ घडून तो मरणार नाही आणि आणखी एका मुलाचा मृत्यू आपल्याला पहावा लागणार नाही. अशी भोळी समजूत म्हणा अथवा अंधश्रद्धा यामागे होते. आपल्याकडे देखील पूर्वी कोणाची मुले दगावत असतील,तर वाचलेल्या मुलांची नावे कचरू,दगडू,धोंडू इत्यादी ठेवण्या  मागे हीच समजूत होती. नानकदेवांनी अत्यंत प्रेमपूर्वक त्या मातेला विचारले की, 'तू मला तूझा हा मुलगा देशील का ?'  यामागे तिला तिच्या आणखी एका मुलाच्या मृत्यूचे ओझे वाहून घ्यावे लागू नये. अशी त्यांची भावना होती. मरदानांच्या आईने हे मान्य केले. नानकदेवांनी तिला आश्वासन दिले की आता तुला तुझ्या मुलाचा मृत्यू पहावा लागणार नाही. त्यांनी 'मर-जाना' चे नाव 'मर-दा-ना' म्हणजे 'न मरणारा' असे केले. हाच मर-जाना शीख धर्माच्या इतिहासात भाई मरदानाजी नावाने अजारामर झाला. मरदाना हे बालपणापासून कबीर,त्रिलोचन,रविदास इत्यादी संतांचे काव्यपदे रबाब वाजवून अतिशय सुंदरपणे गात असत. नानकदेवांचा पहिला शीख झाल्यानंतर त्यांनी नानकदेवांची गुरूवाणी गाण्यातच आयुष्य वेचले. नानकदेवांपेक्षा दहा वर्षांनी मोठे असल्यामुळे मरदानांचा विवाह पूर्वीच झाला होता. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी देखील होती. सुलतानपूरला नोकरीसाठी गेलेल्या नानकदेवांना भेटून त्यांची खबरबात आणण्यासाठी नानकदेवांचे पिता काळूराम यांनी मरदानांना सुलतानपूरला पाठवले होते. नानकांची खबरबात आणण्यासाठी गेलेला मरदाना स्वतःचीच खबरबात विसरून नानकांचा होऊन गेला. नानकदेवांनी आपली शोधयात्रा सुरू केली,तेंव्हा भाई मरदानांना सोबत घेतले. त्यांच्या सोबत जातांना मरदानांना आपल्या मुलीच्या विवाहाची चिंता सतावत होती. त्यांची मनस्थिती दोलायमान झाली होती. एका बाजूला नानकदेवांचा पहिला शिष्य आणि दुस-या बाजूला एका उपवर मुलीचा गरीब बाप. मरदानांच्या जीवनात दोन्ही भूमिका तेवढयाच अटळ होत्या. नानकदेवांचे शिष्य भाई भगीरथ यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली आणि यथासांग पार पाडली. नानकदेवांच्या विवाहात मरदानांनी त्यांना बक्षीस अथवा भेट मागितली तेंव्हा त्यांनी एक नवीन रबाब भाई मरदानांना भेट दिली. ज्या रबाबच्या मधुर साथीने नानकदेवांची अविट गोड व रसाळ गुरूवाणी होरपळलेल्या मनांना शीतलता देऊ लागली. मुलीच्या विवाहानंतर भाई मरदानांनी आपले उभे आयुष्य नानकदेवांना अर्पण केले. नानकदेव आणि भाई मरदाना यांची जोडी 'कृष्ण-अर्जुन' यांच्याप्रमाणे म्हणता येते. नानकदेवांच्या शोध  व प्रबोधन यात्रेत त्यांना आमरण साथ देणारे भाई मरदाना हे त्यांच्या उपदेश व कृती यासंदर्भात कोणत्याही सामान्य माणसाला पडतील असे प्रश्न विचारत. प्रपंच आणि परमार्थ यांच्या द्वंद्वात कोणत्याही सामान्य माणसाला पडणारे प्रश्न म्हणजे भाई मरदाना आणि त्याचे यथार्थ उत्तर म्हणजे नानकदेव. नानकदेव त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरादाखल आपले तत्त्वज्ञान अधिक उलगडून सांगत. यामुळेच सामान्य माणसाला आकलन होईल असे तत्त्वज्ञान म्हणजे नानकदेवांची गुरूवाणी झाली. यामुळेच गुरूवाणी सामान्य माणसांना त्यांची वाटू लागली. कारण त्याला पडणारे प्रश्न आणि येणा-या शंका भाई मरदानांनी साक्षात नानकदेवांकडूनच सहज-सुगम करून घेतल्या होत्या. शीख धर्माच्या स्थापनेत भाई मरदानांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण होते. त्यांच्या रूपाने नानकदेवांना शिष्योत्तम लाभला होता. कारण गुरूला त्याच्या योग्यतेचा शिष्य लाभणे देखील तेवढेच महत्वाचे असते. भाई मरदाना यांनी स्वतः काही काव्य रचना केली आहे. त्यांच्या एका पदाचा समावेश गुरूग्रंथ साहेबमध्ये करण्यात आला आहे. नानकदेवांसोबत प्रवास करत असतांना इ..१५३४ ला बगदाद येथे भाई मरदाना आजारी पडले. हया आजारपणाने त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाची अखेर झाली. नानकदेवांचा अखंड सहवास लाभलेला आणि त्यांच्या तत्त्वज्ञान व जीवितकार्याने प्रपंचाकडून परमार्थाकडे वाटचाल केलेला पहिला शीख भाई मरदाना यांनी बगदादमध्ये अखेरचा श्वास घेतला. नानकदेवांनी त्यांचे दन बगदादमध्ये केले. आज बगदादच्या रेल्वे स्थानकाजवळ असलेली भाई मरदाना यांची कबर हिंदू-मुस्लिम भेदाला नानकदेवांनी दिलेल्या मूठमातीचे चिरंतन स्मारकच म्हणावे लागेल. 

प्रा.डॉ.राहुलहांडे,              भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६


Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !