फोडिलें भांडार धन्याचा हा माल...

सुलतानपूरच्या सुलतानाचा मोदीखान्याचा (सरकारी धान्य भांडार किंवा गोदाम) मोदी (धान्य भांडाराचा प्रमुख) गोर-गरीबांना मोफत धान्य वाटप करत होता. गरजूनां मुक्तपणाने हवे तेवढे धान्य देत होता. त्याची उदारता आणि मानवता यांनी सुलतानपुर परिसरात त्याचा नावलौकिक वाढत होता. लोक त्याला संत-महात्मा संबोधू लागले होते. सुलातनपूरवासी असा मोदी पहिल्यांदाच अनुभवत होते. ज्याची नोकरी परमार्थासाठी होती. सुलतानाने दिलेल्या नोकरीचा वापर हा मोदी खरोखरी जनसामान्यासांठी करत होता. सरकारी नोकरीचा वापर स्वतःच्या सुखासाठी अथवा ऐषोआराम यांच्यासाठी तो कदापि करत नव्हता. तो खरोखरच जनतेचा सेवक म्हणून आपले कर्तव्य बजावत होता. सरकारी धान्य भांडारातील धान्य-खरेदी विक्रीत तो व्यापा-यांचे नव्हे,तर शेतक-यांचे व सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत होता. त्याच्या नावलौकिकाने जळणा-या  सुलतानाच्या दरबारातील भ्रष्ट लोकांनी त्याच्याविरूद्ध सुलतानाकडे कागाळया करण्यास सुरवात केली. अनेक वेळा त्याची चौकशी करण्यात आली,मात्र तो कोठेही दोषी आढळला नाही. कारण त्याच्या कथनी व करणी यामध्ये किंचतही अंतर नव्हते. तसे पाहिले तरे तो एक मामुली सरकारी नोकर होता,त्याच्याकडे स्वतःचे र्निदोषत्व सिद्ध करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती की जीचा वापर तो करू शकेल. त्याचा अत्यंत प्रामणिपणा,हेच त्याचे सामार्थ्य होते. यामुळे तो कायम निष्कलंक ठरला. सत्तेच्या जोरावर निष्कलंक ठरणे वेगळे आणि सत्याच्या जोरावर निष्कलंक ठरणे वेगळे असते. हे त्याने वेळोवेळी सिद्ध केले. तो निर्दोष आहे,याची जाणीव सुलतानाला होती. मात्र काहीवेळा राज्यकारभार व राजकारणाचा भाग म्हणून चौकशी वा तपासणीचे नाटक त्याला करावे लागत होते. असे असतांना अनेकवेळा सरकारी गोदामांची तपासणी करूनही कोणताच गुन्हा त्याच्यावर सिद्ध होऊ शकला नाही. पण एकदा काही हितशत्रूंनी केवळ सूड उगवायचा म्हणून तपासणीच्या वेळी त्याला एका कोठडीत बंद करून ठेवले. त्या सत्पुरूषाचा महिमा असा की त्याला काहीकाळासाठी ज्या कोठडीत बंद करण्यात आले,ती इतिहासात 'कोठरीसाहिब गुरूद्वारा' म्हणून प्रसिद्ध झाली. कारण कोठरीत बंद केलेला तो महात्मा दुसरा तिसरा कोणी नसून गुरू नानकदेव होते. मोदीखान्याचे प्रमुख म्हणून त्यांनी राज्यकर्त्यांना एक धडा दिला होता,की राज्याच्या धन-धान्याच्या भांडाराचे तुम्ही धनी नसून जनताजनार्दन खरे धनी आहेत. सर्व सरकारी यंत्रणा केवळ भारवाही हमाल आहेत. संत तुकोबारायांचे 'फोडिलें भांडार धन्याचा हा माल।मी तंव हमाल भारवाही।।',हे शब्द येथे साक्षात साकार होत होते. तुकोबारायांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी पाठविलेले धन मावळयांना परत केले आणि धान्य देहूतील गोर-गरीबांना वाटले. तीच अनुभूती नानकदेवांच्या कृतीमधून येते. याचाच अर्थ ख-या संत महात्म्यांचे गुणसुत्र सर्वत्र सारखेच असतात. ज्याप्रमाणे खोटया संतमहात्म्यांचे असतात. धर्म-काळ-स्थळ यामुळे या गुणसुत्रांमध्ये यत्किंचितही अंतर पडत नाही. नानकदेवांचे हे वर्तन त्यांचे मेव्हणे जयराम आणि बहिण नानकी यांची चिंता वाढवत होते. नानकांच्या वागण्याने त्यांचीच नव्हे, तर आपली देखील नोकरी धोक्यात येऊ शकते अशी काळजी जयराम यांना वाटत होती. असे झाले आणि सुलतानाच्या दरबारातील कपटकारस्थानी लोकांनी सुलतानाची दिशाभूल करण्यात यश मिळवले तर आपल्याला परागंदा देखील व्हावे लागेल. या भयाने जयराम प्रचंड तणावात होते. त्यांनी आपले सासरे आणि नानकांचे पिता काळूराम यांच्या कानावर सर्व वृत्तांत घातला. परिवारातील सर्वांच्या विचारविनिमयातून अखेर नानकांचा विवाह करण्याची योजना निश्चित करण्यात आली. कोणतीही तरूण व्यक्ती विवाहाच्या माध्यमातून प्रपंचाच्या जोखडात अडकली,तर वठणीवर येते. असा समज मानवी समाजात विवाहसंस्था व कुटुंबसंस्था निर्माण झाल्यापासून अबाधित आहे. त्यानुसार इ.स.१४८८ ला नानकांचा विवाह वयाच्या एकोणिसाव्या वर्षी गुरूदासपूर बटालाच्या बाबा मूला यांची कन्या सुलक्खनीदेवी हिच्याबरोबर झाला. माता-पिता आणि बहिण-मेव्हणे यांच मन नानकांनी विवाहच्यासंदर्भात मोडले नाही. तसेच विवाहबद्दल उत्साह देखील दाखवला नाही. त्यांच्या मते हे सर्व काही परमेश्वराच्या इच्छेनुसार होत होते. जीवनमुक्त महात्म्यांनी देखील पारिवारिक सुखदुःखांची अनुभूती घ्यावी असा नानकदेवांचा कायम आग्रह राहिला आहे. संसार किंवा प्रपंचाकडे पाठ फिरवून आपण नेटका प्रपंच करून परमार्थ साधण्याचा उपदेश सर्वसामान्य माणसांना देऊ शकणार नाही. अनुभूतीशिवाय अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. ते केवळ कोरडे शब्द ठरतात. निसर्गाचे वा सृष्टिचे चक्र व्यवस्थित चालण्यासाठी माणसाने प्रपंच करणे देखील महत्वाचे आहे. ब्रह्मचर्याच्या नावाखाली सांसारिक लोकांना तुच्छ मानने किंवा मोक्ष प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ब्रह्मचर्य या तत्त्वावर नानकदेवांचा विश्वास नव्हता. निसर्गसन्मुख वर्तन प्रकृती असते,तर निसगविन्मुख वर्तन विकृती असते याची प्रखर जाणीव त्यांना होती.  भारताच्या भूमीत जे-जे महापुरूष झाले आणि आजही भारतीय समाज ज्यांना अनुसरतो त्यासर्वांनी विवाह करून प्रपंच केला होता. नानकदेवांसारखा महापुरूष देखील याच परंपरतेला होता. यामुळचे नानकदेवांनी संसारी माणसांचे अतिशय सुंदर वर्णन आपल्या एका कवनातून केले आहे. नानकदेव म्हणतात, 'सर्वसामान्य सांसारिक माणसांच्या अंतरंगात कोमलता आणि प्रेमभाव वसत असतो,पण बाहेरून मात्र ते साधे सरळ नि भाबडे दिसतात,असे सामान्य कुटुंबवत्सल लोक जगाला बरेच काही चांगले देऊ शकतात. त्यांचे मन परमात्म्याच्या निरंतर ओढीने भरलेले राहते. त्याच्या दर्शनाची ते प्रतीक्षा करीत असतात. कधी देवदर्शनाचा आनंद त्यांना होतो आणि ते प्रेमविव्हल होऊन रडतात,तर कधी विरहव्यथेने अश्रुपात करतात. काही वेळा शांतनिवांत बसतात.' नानकदेवांचे हे कवन आणि त्याच्यातील उपदेश अत्यंत महत्वाचा आहे. काही सन्मान्य अपवाद वगळता विविध धर्माचे धर्मगुरू धार्मिक व्यासपीठावरून व्यवस्थित प्रपंच करणा-या स्त्री-पुरूषांना सदैव नाव ठेवतांना दिसतात. त्यामुळे सामान्य लोकांना मार्गदर्शन होण्याऐवजी त्यांचे खच्चीकरणच अधिक होते. हया जगातील प्रेम,कोमलता,स्वार्थत्याग,तडजोड अशा सर्व माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठी आणि इतरांना जगू देण्यासाठी आवश्यक कसोटया कुटुंबवत्सल माणसांमुळेच अबाधित आहेत. त्यात काही मोजके विकृत निर्माण होतात,तो त्यांचा मुळचा स्वभाव असतो. कोणत्याही धर्मातील सनातन्यांचा प्रयत्न सर्वसामान्य माणसांच सर्वच वर्तन चूकीचे आहे,हे ठरविण्याचा असतो. याचा अर्थ विवाहसंस्था व कुटुंबसंस्था यांचे निर्वाहण करणारे सर्वच लोक असे आहेत. असा होत नाही. दुस-या बाजूला विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था म्हणजे गुलामी,जोखड,निरर्थक गोष्ट,माणसाने मुक्त राहावे,लिव्ह इन रिलेशनशीप म्हणजे खरे स्त्री-पुरूषांचे स्वातंत्र्य इत्यादीचा आग्रह धरणारे अतिरेकी पुरोगामी. टोळयांमध्ये जगणारा आदिमानव देखील नकळतपणे कुटुंबसंस्थेचे आणि त्यातील जबाबदारीचे पालन करत होता. याचे भान त्यांना राहत नाही. जग चालण्यासाठी कोणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागते आणि तडजोड करावीच लागते. जीवनात तडजोडीशिवाय माणूस जगूच शकत नाही. मी आयुष्यात तडजोडच केली नाही,असे कोणी सांगत असेल तर ते धांदात खोटे असते. मानवी समाज एकमेकाशी तडजोड करूनच जगत आलेला आहे. विवाहसंस्थेत किंवा कुटुंबव्यवस्थेत निर्माण झालेल्या विकृती अथवा असमानता दुर करता येतात. मात्र या संस्थांचे त्रिकालाबाधित महत्व नाकारता येत नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी विवाहसंस्था व कुटुंबसंस्था यांचा स्वीकार केल्याने भारताला पहिल्या महिला शिक्षका मिळाल्या आणि ज्योतिबांच्या रूपाने भारतीय सामाजिक क्रांतीचा अग्रदूत महात्मा मिळाला. आदर्श कुटुंबसंस्थेचे प्रारूप त्यांना समाजाला देता आले. आज बहुसंख्य समाज त्यांच्या प्रारूपावरच मार्गक्रमण करू लागला आहे. गुरू नानकदेव यांनी निकोप व निर्मळ विवाहसंस्थेचे व कुटुंबव्यवस्थेचे महत्व आपल्या अशाप्रकारच्या कवनातच नव्हे, तर संपूर्ण जीवनसंदेशात अधोरेखित केले आहे. विवाहानंतर देखील नानकदेवांनी आपली आध्यात्मिक साधनेत खंड पडू दिला नव्हता. सुलतानपूर ज्या वेई नावाच्या नदीच्या किना-यावर वसले होते,त्या नदीचा प्रवाह आणि किनारा त्यांचे साधनास्थळं ठरली. प्रातःकाली नानकदेव वेईच्या प्रवाहात स्नान करत आणि तिच्या किना-यावर ध्यान लावत. जवळपास दिवसातील पाच-सहा तास त्यांची समाधी लागलेली असायची. त्यानंतर आपली नोकरी आणि प्रपंच यांची कर्तव्ये पार पाडण्यात त्यांचा वेळ व्यतित होत असे. नोकरीतील त्यांची उदारता-मानवता आणि त्यांची साधना यामुळे एक साधु-महात्मा म्हणून त्यांची एक नवी ओळख जगाला होऊ लागली. दैनंदिन जीवनात प्रत्येकाची अडचण सोडविणे हा देखील त्यांचा धर्म होऊन बसला. नोकरीचा पगार गरजेपुरता संसारासाठी वापरून अतिरिक्त भाग ते समाजासाठी खर्च करत होते. तळवंडीत रावीच्या काठावर जन्मलेल्या-घडलेल्या नानकदेवांचे असामान्य महात्म्याचा सूर्योदय सुलतानपूरच्या वेई नदीच्या काठावर समाजाने अनुभवला. सुलतानपूरच्या वास्तव्याने नानकदेवांच्या जीवनध्येयाला आणि जीवनकार्याला एक मोठा अवकाश प्राप्त झाला होता. त्यांचे सुलातानपूरचे वास्तव्य,तेथील नोकरी आणि विवाह यांच्यामुळे नानकदेवांच्या जीवन प्रवासाचे एक नवे पर्व सुरू झाले होते. साधना,सहचरणी,सहकारी इत्यादी दृष्टीने त्यांचा जीवनप्रवास एका नव्या वळणावर पोहचला होता. त्यांच्या जीवनाचे हे नवे वळण एका नव्या धर्मपरंपरेला जगाच्या दृष्टिपथात आणणार होते.  
प्रा.डॉ.राहुल हांडे,            भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !