तळवंडीची तपोभूमी..
तळवंडी गावात नानकदेवांचे बालपण निसर्गाच्या सहवासात व्यतीत होत होते. तळवंडीचा निसर्ग त्यांच्या साधनेला अत्यंत अनुकुल ठरला. मुंजेच्या प्रसंगाने नानकदेवांचे असामान्यत्व जवळपासच्या लोकांनी अनुभवले होते. त्यांची ज्ञानसंपन्नता एव्हाना तळवंडीच्या लोकांच्या लक्षात आलेली होती. सत्वगुण अंगी बाणूवन विमल आचरण करणं हे जानवं धारण करण्यासारखंच आहे. परमेश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवणे,त्याचे नित्य स्मरण ठेवून त्याचा आदेश पालन करणं हे एक प्रकारचं जानवंच होय. हेच आपल्या शाश्वत उपयोगाचे आणि इहलोक-परलोकात सुखी असण्याचं साधन आहे. अशा जानव्यानं कोणाही साधकाला अलौकिक आनंदाचा ठेवाच मिळतो. म्हणून तेच मी धारण केलेलं आहे. हे नानकदेवांनी बाहय जगात माळा-मुद्रांचे भूषणे मिरवणा-या,त्याचे स्तोम माजवणा-या आणि त्याच्या जीवावर विनासायास पोट भरणा-या लोकांना दिलेले सणसणीत उत्तर तळवंडी परिसराला अंचबित करून गेले होते. जन्मजात ज्ञानसंपन्न नानकदेवांचा करारीपणा देखील लोक अनुभवत होते. मुंजेच्या प्रसंगानंतर त्यांनी लोकांचा काहीसा विरोध देखील अनुभवला. सामान्य लोक असे प्रसंग लवकर विसरतात,कारण त्यांचा कोणताही स्वार्थ कर्मकांडांच्या मागे दडलेला नसतो. मात्र ज्यांचे संपूर्ण अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे. जनसामान्यांच्या मनात त्यांनी निर्माण केलेल्या त्याच्याविषयक भावनांना व भयाला छेद देणारे वर्तन व विचार त्यांना खपत नसते. अशांचा विरोध व अपप्रचार नानकदेवांना बराच काळ सोसावा लागला. पंडित हरदयाल नानकदेवांसमोर हतबल झाला आणि त्यांच्यासमोर नतमस्तक झाला. याचा अर्थ धर्माच्या नावाखाली हजारो वर्षे चालत आलेली शोषणकारी व दमनकारी व्यवस्था त्यांना शरण आलेली नव्हती. ही व्यवस्था खरा धर्ममार्ग सांगणा-या,कर्मकांडाच्या स्तोमाच्या ठिक-या-ठिक-या उडवणा-या आणि समाजाच्या उच्च-निच भाव,वर्णश्रेष्ठत्व असल्या कृत्रिम तटबंदयांना उद्ध्वस्त करणा-या महापुरुषांना तीन प्रकारे संपविण्याचा प्रयत्न करत असते. पहिला म्हणजे त्यांचा विचारांचा-वर्तनांचा-चारित्र्याचा अपप्रचार करणे, यानंतर त्या महापुरुषाला कायमचा संपविण्याचा प्रयत्न करणे वा संपवणे. पहिले दोन प्रकार यशस्वी झाले नाही आणि हे महापुरुष त्यांना आकळले नाही,तर त्यांना शरण जाऊन त्यांच्या जीवनकार्याला उद्ध्वस्त करणे. यातला पहिला प्रकार म्हणजे अप्रचारचा प्रयोग नानकदेवांबाबत अशा प्रवृत्तींनी करून पाहिला. नानकदेवांसारखे महापुरुष असल्या गोष्टींना भीक घालत नसतात. नानकांची त्यांनी उपेक्षा आरंभली. पुढे निंदा सुरू केली. ते म्हणू लागले,' नानक विक्षिप्त आहे. त्याच्यापाशी काही शक्ती असतीलही,पण तो पूर्वपुण्याईचा भाग आहे. त्याने वडीलधा-यांचा मान राखायला हवा. शास्त्रांचे अनुसरण करायला हवे. नवेच पायंडे पाडले,तर समाजात अनाचार माजेल. वेळीच त्याला आवरले पाहिजे.' समाजाची सूत्र स्वतःच्या हातात घेऊन बसलेल्या लोकांनी आपल्या मुलाविषयी अशा प्रतिक्रिया दयाव्या ही गोष्ट पिता काळूराम आणि माता तृप्तादेवी यांना अस्वस्थ करणारी होती. असे असले तरी काळूराम मेहता हे स्वतः एक प्रतिष्ठित आसामी होते. तसेच तळवंडीसह बारा गावांचे मुसलमान जमिनदार रायबुलार यांचा नानकदेवांवर असलेला विशेष लोभ. ही सामाजिक जीवनात नानकदेवांची बलस्थाने होती. त्यामुळे समाजातील धेंड त्यांचा अप्रचार करू शकत होते,मात्र त्यांना ईजा पोहचवू शकत नव्हते. तळवंडी परिसरातील निसर्गरम्य परिसर नानकदेवांची तपोभूमी होती. निसर्गाशी केलेल्या संवादातून नानकदेवांमधील जन्मजात निर्मलता व महानता आकाशाला कवेत घेण्याचा सामर्थ्य प्रकट करू लागली. त्याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. वनात साधना करतांना कधी देवदूत त्यांना संदेश देतात,असा भास त्यांना होई. कधी मोठा नागराज त्यांच्यावर फणा धरून त्यांना सावली करी. अशा अनेक कथा सांगता येतात. नानकदेवांच्या कथांचा शब्दशः अर्थ घेण्याऐवजी त्याच्यातील संदेश अत्यंत महत्वाचा आहे. नानकदेवांचा निसर्गरम्य एकांतात देवदूतांशी संवाद म्हणजे तुकाराम महाराजांच्या शब्दात 'होय मनाशी संवाद,आपुलाच वाद आपणाशी.' नानकदेवांशी संवाद साधणारे देवदूत म्हणजे त्यांच्या मनातीलच पवित्र विचार आणि त्यांनी स्वतःशी साधलेला संवाद व स्वचा घेतलेला शोध होय. त्यांच्यावर आपला फणा धरून त्यांना सावली देणारा नागराज म्हणजे कधी काळी राजवंश असलेले मूलनिवासी नागवंशीय लोक. आर्यांकडून पराभूत झाल्यानंतर प्रस्थापित धर्मपरंपरेने त्यांना शुद्र ठरवले. नागराजाच्या फण्याची सावली याचा अर्थ शुद्रातिशुद्र नानकदेवांमध्ये आधार शोधू लागले आणि त्यांचे अनुसरण करू लागले. असा देखील होऊ शकतो. अशाच कथा भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांच्याविषयी त्या-त्या धर्मपरंपरेत असलेल्या आढळतात. त्यांचा देखील अर्थ असाच होतो. महापुरुषांच्या जीवनातील अशा कथा शक्याशक्यतेच्या विवेकवादी कसोटीवर तपासून पाहण्याऐवजी त्याचातील संदेश पाहण्यात आणि सर्वसामान्यांना तो समजावून सांगण्यात बुद्धी खर्च केल्यास बुद्धिप्रामाण्यवादयांना किंवा विवेकवादयांनाही सर्वसामान्य समाज स्वीकारू शकतो. केवळ नकारात्मकता म्हणजे विवेकवादी दृष्टीकोन नव्हे. तळवंडी परिसरातील जनसामान्यांना नानकदेव नकळतपणे आपले वाटू लागले होते. काळ-वेळेचे भान हरपून नानकदेवांची चालेली साधना आणि समाधी यांनी लोक अंचबित होऊ लागले. त्यांच्या रूपाने सर्वसामान्य लोकांना दिव्यत्वाचा व ख-या धर्माचा मार्ग प्रकाशमान होऊ लागला. असे काही लोक त्यांना शरण जाऊन,त्यांचे शिष्यत्व स्वीकारू लागले. निसर्गाच्या सानिध्यात त्यांची अंर्तमुखता अधिक सखोल व प्रगल्भ होत होती. चराचरात परमेश्वराची अनुभूती त्यांना होऊ लागली. त्यांची समक्य दृष्टी अखिल विश्वाला व्यापून टाकू लागली. तहान-भूकेचे भान नानकदेवांना राहिले नव्हते. एकदा तर काही दिवस ते निपचित पडूनच राहिले. त्यांना कशाचेच भान राहिले नव्हते. अशा विदेही अवस्थेतील नानकांना पाहून,माता-पित्यांना आणि त्यांच्यावर प्रेम करणा-या प्रत्येकाला चिंता वाटू लागली. त्यांना काही तरी व्याधी झाली असावी,असा समज झाल्याने वैद्याला पाचारण करण्यात आले. हा प्रसंग स्वतः नानकदेवांनी त्यांच्या शब्दात व्यक्त करतांना सांगितले,' वैदु बुलाइआ वैदगी पकडि ढंढोले बाँह। भोला वैदु न जाणई करक कलजे माहिं।' अर्थात वैद्याला वैद्यकीसाठी पाचारण्यात आले. नानकदेवांनी वैद्याला सांगितले की.' वैद्य महाराज माझ्या आजाराचे निदान करणे तुम्हला शक्य नाही. आपण खुशाल घरी जावे.' यावर वैद्याने त्यांना विचारले की ,'मग तुम्हीच ते सांगा आणि त्यावरील उपाययोजना सांगा.' यावर नानकदेवांनी वैद्याला सांगितले की ,'माझा रोग हा परमेश्वराच्या वियोगाचा रोग आहे. चंदन व सुगंध हे जसे अलग राहू शकत नाहीत. तसेच अद्वैत माझ्यात व ईश्वरात आहे. माझा रोग म्हणजे त्याचा वियोग आहे. हा शारीरिक रोग नव्हे,तर आत्म्याचा परत्म्याच्या भेटीचा ध्यास आहे. त्यामुळे तुमच्या शास्त्रानुसार असलेला रोग मला नाही. कारण हरिभक्तीत व हरिनामात देहभान हरपलेला व्यक्ती लौकिकदृष्टया आजारी असूच शकत नाही. त्यामुळे तुमच्या ज्ञानाचा मला काही एक उपयोग नाही.' नानकदेवांच्या उत्तराने वैद्यच हादरला आणि त्याच्या सर्वांगाला कंप सुटला. आपणच रोगी आहोत असे त्याला वाटू लागले. कारण उत्तराने डोळे विस्फारून पाहत असलेल्या त्याच्या नजरेला नजर भिडवून नानकांनी जणू त्याच्या शरीरातच प्रवेश केला होता. आता वैद्यालाच औषध देण्याची आवश्यकता निर्माण झाली. नानकांनीच त्याला आपले विचाररुपी औषध दिले. प्रत्येकाने आपले शरीर आपल्या आत्म्याला साक्षी ठेवून विशुद्ध ठेवायला हवे. बाहयौषधीपेक्षा आंतरिक शुद्धी हीच खरी. म्हणून वैद्याने नानकदेवांना प्रणिपात केला आणि त्यांनी काळूरामांना सांगितले की ,'तुमचा मुलगा नानक मुळीच आजारी नाही. त्याला विश्वाचे दुःख निवारण करायाचे आहे. तोच जगासाठी औषध ठरणार आहे. त्याच्या व्यक्तिमत्वात आणि चिंतनात तशी दिव्य शक्ती आहे.' अशा अनेक वैद्यांनी,पंडितांनी,मुल्ला-मौलवींनी,मांत्रिकांनी नानकदेवांसमोर शरणागती पत्कारली होती. नेमके काय केले पाहिजे हे कुणालाच कळत नव्हते. नानकांच्या भविष्याची चिंता त्यांच्यावर प्रेम करणा-या प्रत्येकाला वाटत होती. आपण भविष्यात एक युगपुरुष महात्मा म्हणून जगाच्या क्षितीजावर चिंरतंन तळपणा-या सूर्याच्या जडणघडणीचे साक्षाीदार ठरणार आहोत. याची या सर्वसामान्य लोकांना कल्पना देखील नव्हती. अशी जाणीव होणे त्यांच्या आकलनाच्या पलिकडचे होते. काही मोजक्या लोकांना म्हणजे माता-पिता किंवा जमिनदार रायबूलार यांना काही तरी वेगळे जाणवत होते. मात्र नेमकेपणाने आकळत नव्हते. निसर्गाच्या सहवासात अखंडपणे स्वतःचा शोध नानकदेव घेत होते. त्यांचे जन्मजात अलौकिक ज्ञान आणि जगात मिळवलेले लौकिक ज्ञान यांचा मेळ घालत विश्वाचे कोडे उलगडण्यात नानकदेव रममाण होते. रावीच्या काठावर त्यांना लागलेली समाधी एका नव्या विश्वाचे सर्जन करत होती. तळवंडी गाव आणि त्याचा निसर्गसंपन्न परिसर त्यांची तपोभूमी ठरू शकत होता. मात्र त्यांची कर्मभूमी म्हणून अखिल विश्व देखील अपुरे पडणार होते. तळवंडीचे आकाश साधक नानकांना कवेत घेऊ शकत होते. मात्र जगाच्या आकाशाला कवेत घेणा-या गुरू नानकदेवांना नाही. तळवंडी परिसर नानकदेवांच्या प्रज्ञा,उपदेश व लीलांनी स्तिमित झाला होता. कारण त्याचा आवाकाच सीमित होता. साधक नानकांनी अशा सर्व परिस्थितीत बाल्यावस्था पार करून,युवावस्थेकडे वाटचाल केली होती. त्यांनी वयाची सोळा वर्ष पूर्ण केली आणि त्याकाळाच्या रीवाजानुसार आता ते विवाहयोग्य झाले होते. गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून,आपल्या कर्तव्याचे निर्वहन त्यांनी करावे. ही तत्कालिन सर्वसामान्य समाजमान्यतेची अपेक्षा होती. नानकदेवांच्या जीवनातील एका नव्या पर्वाचा प्रारंभ आता होणार होता.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment