बोस्टन पेटले आणि अमेरिका एकवटला..

 

रिव्हेर कॉपर आणि ब्रास ही आज अमेरिकेतील एक विशालकाय कंपनी म्हणून ओळखली जाते. पॉल रिव्हेरे नावाचा क्रांतीकारक उद्योजक हा या कंपनीचा संस्थापक. डर्डमाऊथ जहाजावरील १७ लाख पौंड निकृष्ट चहाला  बोस्टनवासीयांनी जलसमाधी दिल्यानंतर ब्रिटिश राजसत्तेविरोधात अमेरिकन असंतोषाला एका अर्थान निर्णायक तोंड फुटले. अशा वेळी सराफीचा व्यवसाय करणारा उदयोन्मुख उद्योजक पॉल रिव्हेरे याने क्रांतीला बाळसे धरण्यासाठी अत्यंत महत्वाचे योगदान दिले. चांदीच्या वस्तू-दागिने विकण्याचा पलचा व्यवसाय अत्यंत तेजीत होता. क्रांतीच्या जन्मकाळात पॉलने 'गन पावडर' बनविण्याची प्रक्रिया स्वतः शिकून घेतली. त्याने बनवलेल्या अनेक टन गन पावडरने ब्रिटिश फौजांची वाताहत करण्यात क्रांतीकारकांना सहकार्य केले. पॉलने गन पावडरचे उत्पादन व पुरवठा ऐवढेच काम केले नाही. त्याने इंग्रज फौजांच्या योजना व हालचाली यांची माहिती क्रांतीसेनेला पुरविण्याचे अत्यंत महत्वाचे काम देखील केले. अमेरिकेतील असंतोष आपण सहजपणे चिरडून टाकू असा फाजिल आत्मविश्वास ब्रिटिश सत्तेला होता. सत्तेच्या जोरावर निर्माण झालेला आत्मविश्वास 'हम करे सो कायदा'अशा अतिरेकी उन्मादात रूपांतरित होतो,तेंव्हा ती सत्ताधा-यांच्या पतनाची नांदी असते. असला उन्माद नेपोलिअन बोनापार्टपासून कर्नल गडाफीपर्यंतच्या प्रत्येक निरंकुश सत्ताधा-याला भोवल्याचा इतिहास याला साक्ष आहे. बोस्टनपासून चहाच्या माध्यमातून अमेरिकन स्वातंत्र्य लढयाची ठिणगी पडली. असंतोषाला समजण्याऐवजी इंग्लंडच्या संसदेने १७७४ ला 'दुरस्ती कायदा' (Corrective Act) अमेरिकेवर लादला. बोस्टन शहर ज्या मॅसेच्युसेटस् प्रांतात येते त्या मॅसेच्युसेटस् प्रांतावरच त्याचा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला. हा कायदा म्हणजे आपल्या अमेरिका नावाच्या वसाहतीतील लोकांना वठणीवर आणण्यासाठी उगारलेला बडगा होता. कायदयाच्या नावाखाली जनतेला आपण सुतासारखे सरळ करू,त्यांचा विरोध अमान्य करू आणि अशा बंडखोरांना चांगली अद्दल घडवून जरब बसवू अशी ब्रिटिश सरकारची धारणा होती. मॅसेच्युसेटस् प्रांतात अंसतोषाचा उडालेला भडका कायदयाचा धाक दाखवून विझवला म्हणजे इतर प्रांतात आपोआप शांतता प्रस्थापित होईल,असा लंडनमध्ये बसलेल्या सत्ताधा-यांचा होरा होता. न्यायाची मागणी करणा-यांचा बंदोबस्त करण्यासाठी सैन्य बलाचा वापर करणे हा उन्मत्त झालेल्या सताधा-यांचा पहिला डाव असतो. सैन्य बलाचा वापर करून त्यांना चिरडण्यात यश आले की पुढचे पाऊल उचलण्याची आवश्यकता पडत नाही. त्यानुसार बोस्टनमध्ये सैन्याची कुमक वाढवण्यात आली. सुमारे ३००० हजार सैनिक बोस्टन शहरात पेरण्यात आले. सैनिक पेरणीचा विपरित परिणाम म्हणजे बोस्टनच्या गवतालाही भाले फुटले. सत्ताधा-यांनी सैनिकी दमनाला बंडखोर भीक घालत नाही पाहिल्यानंतर ठेवणीतले दुसरे अस्त्र काढले. ते म्हणजे बोस्टनची रसद बंद करणे. बोस्टनचे बंदर यासाठी लष्कराने ताब्यात घेतले. अमेरिकन वसाहतीत याकाळी जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी जलमार्गाचा वापर प्रामुख्याने केला जात होता. त्याकाळाचा  विचार करता जलवाहतूकच सर्वात जलद व मोठया प्रमाणात मालवाहतूक करण्यासाठी उपयुक्त दळण-वळण व्यवस्था होती. 'ईस्ट इंडिया' कंपनीच्या समुद्रात फेकण्यात आलेल्या चहाची नुकसान भरपाई जोपर्यत बोस्टनवासी देणार नाहीत तोपर्यंत बंदरातील आयात-निर्यात बंद करण्यात आली. यामुळे बोस्टन शहराची कोंडी होणार होती.जीवनावश्यक गोष्टी मिळणे बंद झाल्यावर बोस्टनवासी वठणीवर येतील अशी ब्रिटिशांची समजूत होती. त्यांची ही समजूत देखील फोल ठरली. बंदरावर बंदी आणून बोस्टनवासीयांची गळचेपी करण्याचे धोरण इंग्रंजांच्या अंगलट आले. असंतोषाच्या ठिणगीने अमेरिकेत वणवा पेटवला. एक राष्ट्र म्हणून अमेरिकन जनतेची भावना प्रबळ होत गेली. अमेरिकेतील विविध प्रांत बोस्टनच्या मदतीला धावले. त्यांनी जमिनीवरून रसद व मदत पाठवण्यास सुरवात केली. कॅरोलिना हा प्रांत मॅसेच्युसेटस् प्रांतापासून अत्यंत दूरवर आहे. तेथून देखील रसद व मदत पोहचवण्यात आली. बाहेरच्यांना बोस्टन शहरात मज्जाव करण्यात आला होता. बोस्टनवासी शहरात राहून आपली अस्मिता टोकदार करत होते,तर विविध प्रांतांचे प्रतिनिधी बोस्टनच्या सीमेवर जमले होते. सर्व १३ वसाहतींचे प्रतिनिधी बोस्टनच्या सीमेवर जमले आणि त्यांच्यातील वसाहतींच्या सीमा नष्ट झाल्या. अमेरिका एक राष्ट्र अशी राष्ट्रभावना जन्माला आली. आता अमेरिकेचे कोणतेही राज्य अथवा प्रांत ईस्ट इंडिया कंपनीचा निकृष्ट चहा विकत घेणार नाही आणि इंग्लंडला कोणताही जुलमी कर देणार नाही. अशी घोषण त्यांनी सर्वानुमते केली. डबघाईला आलेली ईस्ट इंडिया कंपनी वाचवण्यासाठी ब्रिटिश सत्ताधा-यांचा आटापिटा चालू होता. अखेरच्या घटका मोजत असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीकडे विक्री अभावी पडून असलेला १७ लाख पौंड चहा विकण्याचा विडा ब्रिटिश सरकारने उचलला होता. ईस्ट इंडिया कंपनीला जीवदान मिळवून देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग होता. ब्रिटनच्या सत्ताधा-यांना ईस्ट इंडिया कंपनीचे मालक असणा-या भांडवलदारांचे ऋण फेडायचे होते. प्रत्येक सरकार आपल्याला सत्तेत येण्यासाठी भांडवल पुरविणा-या उपकारकर्त्या भांडवलदारांचा फायदा करून देण्यासाठी आणि अडचणीत आल्यावर त्यांची सुटका करण्यासाठी कटीबद्ध असते. सरकार आणि त्यांचे साहयकर्ते भांडवलदार यांचे ऋणानुबंध सामान्य जनतेला ज्ञात नसतात. त्यामुळे सरकारमध्ये असलेले लोक कधी राष्ट्रवादाच्या नावाखाली जनतेला भावनिक करू,कधी आपण करत असलेले उपाय कल्याणकारी आहेत असे भासवून तर कधी कायदयाच्या बडग्याखाली चिरडून आपल्या लाडक्या भांडवलदारांचे भले करूदेतात. ब्रिटिश सरकाराने त्यातील कायदयाच्या बडग्याचा वापर करण्याचे ठरवले होते. त्यानुसार अमेरिकेने ईस्ट इंडिया कंपनीचाच चहा प्यावा असा ठराव इंग्लंडच्या संसदेत करण्यात आला. अमेरिकेला ईस्ट इंडिया कंपनीचाच चहा विकत घ्यावा लागेल,अशी सक्ती करण्यात आली. ब्रिटिश सरकार व ईस्ट इंडिया कंपनी यांनी स्वहितासाठी हे केले होते. आजही जगातल्या प्रत्येक देशात इंग्लंडमध्ये २४० वर्षांपूर्वी करण्यात आलेला हा प्रयोग सर्रासपणे करण्यात येतो. यात संमोहन किंवा नजरबंदी यांचा वापर सर्वप्रथम करण्यात येतो. हे उपाय सल्यावर दबाव-दमन तंत्राचा वापर होतो. देशातील एखाद्या छोटया समुहावर हे प्रयोग शंभर टक्के रामबाण उपाय ठरतात. मात्र देशातील मोठया लोकसंख्येवर असे प्रयोग अयशस्वी ठरतात. ते अंगलटच येत नाहीत,तर सत्ता उलथण्यापर्यंत भोवतात. अमेरिकन जनतेने राज्यकर्त्या इंग्लंडला या प्रयोगाची पावती त्यांची सत्ता उलथावून दिली. बोस्टन पेटले आणि अमेरिका एकटला. पॉल रिव्हेरेसारखा राष्ट्रवादी उदयोन्मुख उद्योजक जेथे स्वातंत्र्यलढयात सर्वस्व पणाला लावून उडी घेतो. अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढयातील एक महत्वाचा स्वातंत्र्ययोद्धा म्हणून अमेरिकेच्या इतिहासात अजरामर होतो. यावरून ज्यांच्याकडे गमवण्यासारखे काहीच नव्हते अशा सर्वसामान्यांची काही बातच नाही. ल रिव्हेरेचा जीवनप्रवास हा राखेतून उठणा-या फिनिक्ससारखाच आहे. आपले सर्वस्व स्वातंत्र्य लढयात लावल्यानंतर याच पल रिव्हेरेनी स्वातंत्र्ययुद्धाच्या समाप्तीनंतर पुन्हा आपला उद्योग उभा केला. चांदीच्या व्यवसायातील नफा त्याने लोखंडाचे ओतीव काम,ब्रांझ धातूच्या वस्तू आणि तोफा बनवण्यात गुंतवला.ल रिव्हेरे १८०० साली धातूचे पत्रे बनवणारा पहिला अमेरिकन ठरला. वयाच्या ८३ व्या वर्षी बोस्टन शहरातच त्याने अखेरचा श्वास घेतला. आज त्याचे राहते घर अमेरिकेतील एका स्वातंत्र्ययोद्धाचे स्मारक म्हणून संग्रहालय म्हणून दिमाखाने जतन करण्यात आले आहे.  रिव्हेरे कपर आणि ब्रास ही त्याची कंपनी आजही जगातील एक मोठा उदयोग समुह म्हणून उदयोग जगतात आपले स्थान टिकवून आहे. अमेरिकेत येऊन स्वकर्तृत्वावर मोठा झालेला रिव्हेरे देशासाठी सर्वस्व गमवायला तयार होतो. यावरून उन्मत्त ब्रिटिश सरकारला धडा घेता आला नाही. कारण  इंग्लंडला एका गोष्टीचा विसर पडला होता,तो म्हणजे अमेरिकेत आलेल्या लोकांनी शून्यातून त्यांचे जग निर्माण केले होते. अनेकांनी दिलेल्या बलिदानावर अमेरिका  उभा राहिला होता. हे सर्व स्वातंत्र्यप्रेमी लोक होते. आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आयुष्याच्या मशाली पेटवल्या होत्या. 

प्रा.डॉ.राहुल हांडे,                      भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !