जानवे नव्हे जाणावे...
तलवंडी रायन्नोयी गावात एक मुंज विधी आयोजित करण्यात आला होता. नऊ वर्षाचा एका मुलाचा हा उपनयन संस्कार होता. यजमान कुंटुंबाचे सर्व नातलग,गावकरी आणि प्रतिष्ठित नागरिक मुंजीसाठी उपस्थित होते. कारण तलवंडीमधील प्रतिष्ठित काळूराम मेहता यांच्या घरचा कार्यक्रम असल्याने कार्यक्रमाचा दिमाखच और होता. तलवंडी परिसरातील प्रसिद्ध पंडित हरदयाल नावाचा ब्राहमण मुंज विधीचे पौरोहित्य करत होता. मुंजेचे सर्व विधी यथासांग पार पडले. शेवटचा विधी होता,मुलाच्या गळयात यज्ञोपवित म्हणजे जानव घालण्याचा. पंडित हरदयाल मुलाच्या गळयात जानव घालू लागला,तसे एक अघटित घडले. ज्याची मुंज होत होती,त्या नऊ वर्षाच्या मुलाने जानव घालण्यास नकार दिला. त्याचबरोबर त्याने हरदयालच्या हातातून जानव हिसाकावून घेतले आणि त्याला प्रश्न केला,"पंडितजी,जानवे कशासाठी घालायचे? याचा उपयोग काय?" लहानग्याच्या प्रश्नाने हरदयाल अवाक झाला. आजवर त्याने असंख्य उपनयन संस्कार म्हणजेच मुंज विधी केले होते. परंतु असा प्रश्न आजवर कोणी विचारला नव्हता किंवा कोणाला पडला ही नव्हता. गडबडलेला हरदयाल म्हणाला," या जानव्याच्या सूत्रात सर्व हिंदुधर्म साठवलेला आहे. यज्ञोपवित धारण केल्याने वर्णश्रेष्ठत्व लाभते,नाहीतर तू हलक्या जातीचा म्हणून गणला जाशील." हरदयालच्या उत्तराने मुलाचे समाधान झाले नाही. हरदयाल हरत-हेने त्या लहानग्याला धार्मिक विधींचे महत्व व सनातनत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. याप्रसंगी उपस्थित अन्य लोकांच्या अधिकाराच्या व आवाक्याबाहेरचा हा सर्व सवाल-जवाब होता. परिसरातील नावाजलेल्या पंडित हरदयालने आता नऊ वर्षाच्या या लहान मुलासमोर हात टेकले. लहानग्याचे प्रश्न हे बाळबोध नव्हते,भल्या-भल्या पंडितांच्या विवेकशक्तीला आव्हान देणारे होते. धार्मिक विधी व कर्मकांड आणि त्यांचे स्तोम माजवणा-यांचे थेट वस्त्रहरण करणारे हे प्रश्न होते. अखेर पंडित हरदयाल नऊ वर्षाच्या या मुलाला शरण गेला. तेंव्हा त्या मुलाने हरदयालला सांगितले," उच्चवर्णिय हिंदू म्हणून जानवे घातल्याने किंवा मुसलमान म्हणून बकरी कापून जेवण दिल्याने मनुष्य कसा पवित्र होणार? करूणेच्या कापसातून संतोषाचे सूत काढले पाहिजे. त्याला सत्याचा पीळ देऊन संयमाची गाठ मारली पाहीजे. असल्या प्रकारचे यज्ञोपवित अथवा जानवे आत्म्याकरता हवे असते. पंडितजी अशा प्रकारचे यज्ञोपवित तुमच्याजवळ असेल तर ते कधी तुटणार नाही किंवा खराबही होणार नाही. तसेच कधी हरवणार नाही किंवा जळणारही नाही." लहानग्याच्या तर्कशुद्ध विश्लेषणाने पंडित हरदयालसह सर्वच उपस्थित हादरले. पंडित हरदयाल आज ज्या लहानग्यासमोर निरुत्तर झाला होता आणि मनातून हादरला होता. तो लहानगा एक दिवस धर्मातील कृत्रिम,निरूपयोगी कर्मकांडे,कर्मठता,सनातनीपणा,भेदाभेद आणि वर्णाधिष्ठित उच्च-निचता यांच्या तटबंदीला हादवणारच नव्हे, तर उद्धवस्त करणार होता. जो 'जानवे' नव्हे, तर 'जाणावे' याचे महत्व अधोरेखित करणार होता. भविष्यात गुरू नानकदेव म्हणून जगाच्या क्षितिजावर चिरंतन तळपणार होता. तलवंडीच्या धरतीवर नानकदेवांचा हा पहिलाच सार्वजनिक संदेश होता. मुंजीचा प्रसंग म्हणजे काळूराम मेहता आणि तृप्तादेवी यांच्या पोटी जन्माला आलेल्या असामान्य बालकाचा त्याचे माता-पिताच नव्हे,तर जगाला झालेला प्रथम साक्षात्कार होता. नानकदेवांचे बालपण जेंव्हा आपण पाहतो,तेंव्हा महापुरुष हे महापुरुष म्हणूनच जन्माला आलेले असतात. याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. बाल नानक हा मुलगा दिसायला चारचौघांसारखा,पण वागायला दुनियेवेगळा. ज्या वयात खेळावं,बागडावं,हुंदडाव त्या वयात हा पोरगा रानावनात जाऊन एकांतात बसायचा. तेथे ईश्वराचे नामस्मरण,चिंतन-मनन,ध्यानधारणा हेच त्याचे खेळ. नानकांच्या जन्मप्रसंगी एका ज्योतिष्यानं,"हा मुलगा मोठा साधू होणार !" असे भाकित वर्तविले होते. येथे ज्योतिष्याच्या भविष्यवाणीला फारसे महत्व देण्याचे कारण नाही. ज्योतिष्यांचे ऐकले तर जगात जन्माला येणारे प्रत्येक मुल मोठेपणी 'गुणाढय-धनाढय-बलाढय' होणार असते. ऐवढेच नव्हे तर दीर्घायुषी देखील असते. महापुरुषांसाठी मात्र असल्या कोणत्याच ज्योतिष्यांची आवश्यकता नसते. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच बालक नानकांची असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रतिभा लक्षात येऊ लागली होती. सातव्या वर्षी नानक शाळेत जाऊ लागले. शाळेच्या पहिल्या दिवशी नानकांनी शिक्षकांना विचारले की,"मला शिकवावे असे आपण काय शिकला आहात?" त्यांच्या प्रश्नाने शिक्षक अचंबित झाले. कारण शाळेत प्रवेश घेण्यापर्यंत नानकांनी हिंदू धर्मग्रंथांचे ज्ञान अवगत केले होते. गोंधळात पडलेल्या शिक्षकाने सांगितले," मी अनेक त-हेचे ज्ञान मिळविले आहे. शास्त्र आणि वेद शिकलो आहे. गणित आणि हिशोबही मला येतात." पिता काळूराम मेहता यांना,तर लिहिता-वाचता येणे,गणित आणि हिशोब एवढेच शिक्षण नानकांना मिळाले तरी पुरसे होते. शिक्षकाच्या उत्तरावर नानक म्हणाले,"हे ज्ञान अगदी निरूपयोगी आहे." शिक्षकाने विचारले,"मग तुला कसले ज्ञान हवे आहे?" नानकांनी सांगितले,"विषयाधीन प्रेमाचा यज्ञ करा आणि त्याची राख कोळून त्याची शाई बनवा. श्रद्धा हा उत्कृष्ट कागद समजून अंतःकरणाची लेखणी बनवून बुद्धीला लेखक बनवा. गुरूचा उपदेश घ्या व ईश्वराचे नाव आणि त्याचीच प्रशंसा याविषयी लिहा. ज्याला आदि व अंत नाही ते लिहिण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचे ज्ञान मला हवे आहे." हे ऐकून शिक्षक चकित झाले. नानक शाळेत शिकायला गेले की शिकवायला गेले असा प्रश्न निर्माण झाला. कारण शिक्षकांना पडणा-या प्रश्नांचे निराकारण ते करू लागले. त्यांच्या शिक्षकाने त्यांना एकदा विचारले,"त्या परमात्म्याला आपण कसे पाहू शकू?" यावर नानकांनी सांगितले," मनाचे चक्षू उघडल्याने." शिक्षकांचे यावर समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा विचारले," ईश्वर जर आपला पिता आहे,तर या जगात एवढे दुःख कशासाठी?" नानकांचे उत्तर अत्यंत मार्मिक होते. ते म्हणाले," आपण जेंव्हा प्रेमपथापासून विचलित होतो,तेंव्हा बंधनात पडतो व त्यामुळेच दुःख भोगावे लागते. अहंकार हाच प्रेमाचा शत्रू आहे. द्वैत आणि अहंकार टाकून सर्वांवर प्रेम करणे हाच दुःख निवृत्तीचा एकमात्र उपास आहे." भविष्यात नानकदेव ज्या प्रेमपथाचे दर्शन सर्वसामान्य लोकांना करून देणार होते. त्याची ही अत्यंत प्राथमिक झलकच होती. नानकांचे हे असामान्यपण मातापित्यांसाठी मात्र अत्यंत काळजीचा विषय झाला होता. हा मुलगा जीवनात यशस्वी होईल का नाही? जगाचे व्यवहार याला कळतील का नाही ? इत्यादी प्रश्न त्यांना चिंताग्रस्त करत होते. नानकांच्या वडिलांना एव्हाना लक्षात आले होते की नानकाचे लक्ष उद्योगधंदयात नाही. त्याच्या मनाची ओढ वेगळीच आहे. एखादे बालक असामान्य असते,म्हणून पिता ते असामान्यत्व ओळखूच शकतो असे नव्हे. तसे पाहिले कोणतेच मातापिता आपल्या मुलांचा भावी प्रवास कसा असेल? याविषयी अनभिज्ञ-साशंक असतात. आपल्या मुलांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी धडपड करत असतात. अशा धडपडीत त्यांना जन्माला येणारे प्रत्येक मुल स्वतःचा म्हणून एक पिंड घेऊन जन्माला आले आहे. ते आपल्या पोटी जन्माला आले असले,तरी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. याचाच विसर त्यांना पडतो. जगात यशस्वी ठरण्याचा प्रत्येक काळात एक साचा ठरलेला असतो. त्या साच्यात आपल्या मुलाला कोंबण्याचा प्रयत्न काही अत्याल्प अपवाद वगळता मातापित्यांकडून होत असतो. नानकांचे पिता सर्वसामान्य पित्याप्रमाणेच होते. त्यांनी नानकांना जगरहाटीत यशस्वी होण्यासाठी आवश्यक शिक्षण व प्रशिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नानकांचे असामान्यत्व लक्षात आल्यानंतर ही काळूराम मेहतांनी त्यांना तत्कालिन जगाच्या यशस्वी साच्यात बसवण्याचे विविध प्रयोग करून पाहिले. त्याकाळात प्रचलित शिक्षणाचा प्रयोग झाल्यावर,काळूरामांनी नानकांना शेतीच्या कामात तरबेज करण्याचा प्रयत्न केला. एकदा त्यांनी नानकांना आपल्याला शेती कामात मदत करण्यासा सांगितले. यावर नानकांनी त्यांना सांगितले," आपल्या शरीरालाच क्षेत्र म्हणजे शेत बनवा. चांगली कृत्ये बीज समजा. ईश्वराच्या नावानेच पाणी द्या आणि अंतःकरणालाच शेतकरी बनवा. असे कराल तर तुम्हाला मोक्ष मिळेल." शेतीचा प्रयोग फसला. त्यानंतर त्यांनी नानकांना दुकान टाकून देण्याचे ठरवले. नानकांनी दुकानदारी तरी करावी अशी त्यांची तळमळ होती. यावर नानकांनी वडिलांना सांगितले," हे जीवित क्षणभंगुर आहे हे ज्ञान,यासच दुकान बनवा. ईश्वराचे नाव हाच आपल्या मालाचे मचवे समजून त्यात ख-या ईश्वराच्या नावाचा साठा करा." शेती झाली दुकानदारी झाली पित्याला नानकांना आकळाता आले नाही. एवढया लवकर हार मानून आपल्या मुलाचे असामान्यत्व अथवा वेगळेपण मान्य करेल तो पिता कसला. काळूराम मेहतांनी आपले प्रयोग अखंड सुरु ठेवले. त्यांनी एकदा नानकांना घोडयांचा व्यापार करण्याचे सुचवले. यावर नानकांनी सांगितले," सत्य हेच आपले घोडे बनवा आणि सद्गुणांचा साठा हाच आपला प्रवास समजा." पित्याचे नानकांना जगाच्या रस्त्यावर आणण्याचे प्रयत्न थांबत नव्हते आणि नानकांचा दिव्यमार्गावरचा प्रवास थांबत नव्हता. एक मात्र खरे की दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते. पिता-पुत्रातील हा आदिम संघर्षाचा प्रवास आणखी रंजक वळणे घेत पुढे जाणार होता.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
.
Comments
Post a Comment