'मिनिटमन' मावळे
बोस्टन शहराची कोंडीकरून त्याला वठणीवर आणण्यासाठी ब्रिटिश सत्तेने सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्याचा उलटा परिणाम असा झाला की अमेरिकन स्वातंत्र्यलढयाला प्रारंभ झाला. बोस्टनजवळील लेक्झिंगटन आणि कॉंकार्ड या दोन शहरातून स्वातंत्र्य लढयाचा बिगुल वाजला. लेक्झिंगटन आणि कॉंकार्ड ही शहरे बोस्टन व सध्याच्या आर्लिंगटन शहराजवळ आहेत. या दोन शहरात ब्रिटिश फौजांविरूद्ध सशस्त्र उठाव झाला आणि अमेरिकन स्वातंत्र्यलढयाला आरंभ झाला. अमेरिकन स्वातंत्र्यढयात एक अभिनव कल्पना समोर आली. ती म्हणजे मिनिटमन. स्वातंत्र्यलढयातील क्रांतीकारकांनी मिनिटमन ही संकल्पना निर्माण केली. स्वातंत्र्ययोद्धांनी एक गट स्थापन केला ज्याला मिनिटमन असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणा-या क्रांतीकारकांपैकी २५% लोक मिनिटमन झाले होते. संदेशवहनाचे एक अत्यंत प्रभावी व जलद जाळे मिनिटमनांनी निर्माण केले. ब्रिटिश फौजांच्या प्रत्येक हालचालीची आणि योजनांची माहिती अत्यंत वेगाने क्रांतीकारकांपर्यंत पोहचविण्याचे काम मिनिटमन करत होते. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जगाने दखल घेतलेल्या आणि विविध देशांमधील क्रांतीमध्ये वापरण्यात आलेल्या गनिमीकावा तंत्राचा अमेरिकन अवतार म्हणजे मिनिटमन. जवळपास जगावर राज्य करणा-या ब्रिटिशांविरूद्ध लढा देणे अमेरिकन जनतेला सोपे नव्हते. अमेरिकेच्या धरतीवर उतरेलेली ब्रिटिश सेना साधन-संपत्ती-सामर्थ्य यांनी अफाट होती. मोगल सत्ता व सैन्य यांच्यासमोर स्वराज्याचे संरक्षण-संगोपन-संवर्धन अवघड असतांना शिवाजी महाराजांनी आपल्या मावळयांसमवेत गनिमीकावा तंत्राचा शोध लावला. सहयाद्रीच्या रांगा,त्याच्या डोंगर-द-या आणि जंगले यांचा वापर मोगलांना धूळ चारण्यासाठी अत्यंत कल्पकतेने करत शिवाजी महाराजांनी गनिमीकाव्याचे तंत्र विकसित केले. त्याचबरोबर त्यांनी गुप्तहेरांचे एक अत्यंत भक्कम आणि प्रभावी जाळे तयार केले होते. अगदी तसेच अमेरिकेत घडले. कारण स्वराज्यासाठी लढणारे मावळे आणि अमेरिकन क्रांतीकारक यांच्यात एक समान धागा होता. तो म्हणजे स्वदेश व स्वराज्य यांच्याबद्दल असणारे अत्यंत प्रेम आणि स्वातंत्र्याची आस. मोगलांप्रमाणे ब्रिटिश सैन्याला अमेरिकेची भूमी नवीन होती. तेथील भौगोलिक वैशिष्टयांची त्यांना काहीच कल्पना नव्हती. तसेच समोरासमोर युद्धांचेच तंत्र त्यांना माहित होते. त्यांच्या याच अज्ञानाचा व कमजोरीचा लाभ शिवाजी महाराजांप्रमाणे अमेरिकन स्वातंत्र्ययोद्धांनी करून घेतला. एका अहवालानुसार २६ ऑक्टोबर १७७४ या दिवशी मिनिटमेन क्रांतीकारकांची संख्या १७००० होती. ब्रिटिश सैन्यासमोर हे आव्हान काहीच नव्हते. अमेरिकेची भूमी आणि घनटदाट जंगले ब्रिटिशांना माहित नव्हते. त्यामुळे सतरा हजार मिनिटमन त्यांना जड ठरले. अठराव्या शतकाच्या अखेरच्या पर्वात संदेशवहनाचे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. अशावेळी मिनिटमनांनी संदेशवहनाची अत्यंत वेगवान यंत्रणा उभी केली होती. मिनिटमनांना युद्धाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. दारू ठासण्याच्या बंदूकांचा हा काळ होता. ठासणीच्या बंदूकांचा गतीमान वापर करण्याचे प्रशिक्षण मिनिटमनांना देण्यात आले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही आणिबाणीच्या प्रसंगात अवघ्या ६० सेकंदात म्हणजे १ मिनिटात हे योद्धे सज्ज होऊ शकत. त्यामुळेच त्यांना मिनिटमन संबोधण्यात आले. मावळे आणि मिनिटमन यांच्यात अनेक साम्यस्थळे आपल्याला आढळतात. संख्येत अत्यंत कमी आणि शस्त्र-साधनांची कमतरता ही समस्या दोन्हीकडे होती. मात्र देशाभिमान आणि स्वातंत्र्याची तीव्र ओढ यांची प्रचंड उर्जा हेच दोघांचे खरे सामर्थ्य होते. यांच्या जोडीला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अविचल निष्ठा दोघांकडे होती. यामुळेच लढणा-यांची संख्या व शस्त्रासामर्थ्य यांच्यापेक्षा त्यांची अढळ निष्ठा विजय निश्चित करत असते. याचे वर्णन अखेरचा मोगल बादशहा आणि शायर बहादुरशहा जफर यांनी अत्यंत समर्पकपणे केले आहे. बहादुरशहा म्हणतात,' गाजियों में जब तलक बू रहेगी ईमान की,तख्ते- लंदन तक चलेगी शमशीर हिन्दुस्तान की।' आपल्या भौगोलिक वैशिष्टयाला सामर्थ्यात रूपांतरीत करण्याची कौशल्य मावळयांनी शिवाजी महाराजांच्या आणि मिनिटमनांनी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या समर्थ नेतृत्वात अवगत केले होते. त्यामुळेच भारताच्या इतिहासात मावळे आणि अमेरिकेच्या इतिहासात मिनिटमन यांना अनन्यसाधारण महत्व आहे. मिनिटमनांच्या क्रांतीतील योगदानाचा आणि बलिदानाचा इतिहास अमेरिका आजही दिमाखाने जतन करतांना दिसतो. मिनिटमेनांच्या सन्मानार्थ ॲमहर्स्ट येथील मॅसेच्युसेटस् विद्यापीठाच्या ॲथलेटिक पुरुष संघाला 'मिनिटमेन'आणि महिला संघाला 'मिनिटवुमेन' असे संबोधले जाते. १९६० साली अमेरिकेने निर्माण केलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांना 'मिनिटमेन' हे नाव दिले आहे. अमेरिकन स्वातंत्र्यलढा समजण्यासाठी मिनिटमनांची कामगिरी माहित असणे अत्यंत आवश्यक ठरते.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment