रावीच्या काठावर...
लाहोरपासून तीस मैल अंतरावर वसलेले एक छोटे गाव तलवंडी रायन्नोयी. गावाच्या जवळून वाहणा-या विस्तीर्ण रावी नदीचे हिरवे काठ तलवंडीच्या सौंदर्याची कल्पना करण्यास पुरसे. तसे हे जमिनदाराचे गाव होते. बारा गावाची जमिनदारी असणारे रायबुलार धर्मांतरीत मुसलमान,असले तरी अत्यंत सहिष्णू. त्यामुळे त्याच्या जमिनदारीत प्रजा त्याकाळाच्या तुलनेत सुखात होती. १५ एप्रिल १४६९ ला तलवंडीवासी आपल्या दैनंदिन व्यवहारात व्यस्त होते. जमिनदार रायबुलार यांचे कुळकर्णी होते,मेहता कल्याणदास. ते काळूराम नावाने तलवंडी परिसरात प्रसिद्ध होते. काळूराम रायबुलारांकडे कुळकर्णी असले,तरी एक सधन शेतकरी म्हणूनही त्यांचा लौकिक होता. त्यांची पत्नी त्रिपताका उर्फ तृत्पादेवी. आपल्या नावाप्रमाणेच एक प्रसन्न व गृहकर्तव्यदक्ष गृहिणी. त्यांना नानकी नावाची मुलगी. तिचा जन्म आपल्या आजोळी म्हणजे नानांच्या घरी झाला. आजोबांची म्हणजे नानांची लाडकी म्हणून तिचे नाव नानकी ठेवण्यात आले. काळूराम व तृप्तादेवी हे अत्यंत धर्मपरायण दांपत्य होते. त्यांच्या जीवनातील व तलवंडी गावातील वैशाख शु.३ विक्रम संवत् १५२६ अर्थात १५ एप्रिल १४६९ हा एक सामान्य दिवस. भविष्यात असामान्य दिवस म्हणून इतिहासात नोंदवला जाणार होता. याची जाणिव काळूरामांचे कुटुंबच नव्हे ,तर कोणत्याही तलवंडीवासीयाला नव्हती. या दिवशी तृप्तादेवींनी एका मुलाला जन्म दिला. 'शांती-सेवा-समता-बंधूता' यांचा सूर्योदय त्याच्या रूपाने रावीच्या काठावर झाला होता. हे बाळ आपल्या मोठया बहिणीप्रमाणेच त्याच्या नानांच्या घरी जन्मले आणि त्यांचे लाडके. म्हणून त्याचे नाव ठेवण्यात आले नानक. नानकीचा भाऊ नानक असाही संदर्भ यामागे असावा. नानक या शब्दाचा अर्थ 'अन्य कुणासारखा नाही' असाही सांगितला जातो. तलवंडीच्या मातीत जन्मलेले हे बाळ सामान्य बाळ नव्हते. ते तलवंडीला जगाच्या नकाशात आणि इतिहासात विशेष स्थान देणार होते. मध्ययुगातील अंधाराला प्रकाशमान करणारे गुरूनानकदेवांची जन्मभूमी म्हणून तलवंडी गाव चिरंतन पावित्र्याचे धनी झाले. आज तलवंडी रायन्नोयीचा उल्लेख जगभरात 'नानकानासाहिब' म्हणून अत्यंत आदराने केला जातो. नानकदेवांच्या जन्मापर्यंत पंजाब मुसलमान आक्रमणांनी अक्षरशः तुडवला गेला होता. इ.स.१३९८ मध्ये तैमूरलंगच्या आक्रमणाने दिल्लीच्या तुर्क सत्तेला जबरदस्त हादरा दिला. तैमूरचा एक नातू पीर मोहम्मद सर्वप्रथम भारतावर आक्रमण करण्यासाठी निघाला होता. त्याने मुलतानला सहा महिने वेढा दिला आणि अखेर मुलतान काबीज केले. एप्रिल १३९८ मध्ये तैमूर स्वतः समरकंद येथून मोठे सैन्य घेऊन भारतावर आक्रमणासाठी निघाला. सप्टेंबरमध्ये त्याने सिंधू,झेलम व रावी यांना पार करत तो मुलतानजवळील तुलुंबा येथे पोहचला. त्यानंतर भटनेरहून पुढे निघाला. त्यावेळी तुघलक घराण्याचा राज्यकारभार दोन सुलतानांकडून व दोन ठिकाणांहून सुरू होता. मेहमूद तुघलक हा दिल्ली येथून आणि नुसरत शाह तुगलक फिरोजाबाद येथून राज्यकारभार करत होते. तुघलक घराण खिळखिळे झाले होते. असे असतांना पानीपतजवळ मेहमूद तुघलक याच्या सैन्याशी तैमूरच्या सैन्याची गाठ पडली. तैमूरने मेहमूदचा पराभव केला. मेहमूद आणि त्याचा वजीर मल्लू इकबाल यांनी पळ काढला. त्याने गुजरातमध्ये तळ ठोकला. तैमूरलंगने युद्धाच्या दुस-या दिवशीच दिल्लीत प्रवेश केला. तो डिसेंबरचा महिना होता. पाच दिवस दिल्लीची येथेच्छ लूट करून,पंधरा दिवसांनी तो समरकंदला परतण्यासाठी निघाला. त्याला भारतात राहण्यात रस नव्हता. परततांना तो मेरठ,हरिद्वार,कांगडा व जम्मूमार्गे लूट करत गेला. अखेर १९ मार्च १३९९ ला त्याने रावी पार केली आणि भारताची भूमी सोडली. तैमूरलंगच्या स्वारीने तुघलक घराण्याची सत्ता अखेरच्या घटका मोजू लागली. तैमूरलंगच्या परतल्यानंतर त्याने नेमलेल्या राज्यपालाने खंडणी पाठवणे बंद केले. मेहमूद तुघलक याने वजीर मल्लू इकबाल याच्या सहाय्याने दिल्लीवर परत कब्जा मिळवला. मात्र तुघलकांचे राज्य आता केवळ पालमपर्यंत सीमित झाले होते. १४१२ मध्ये मेहमूद तुघलकचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेच १४१३ मध्ये तैमूरलंगने नियुक्त केलेला पंजाबचा प्रांतपाल खिज्र खान आणि दौलतखान लोदी यांच्यात सत्तासंघर्ष झाला. खिज्र खानपासून सय्यद घराण्याची व दौलतखानपासून लोदी घरण्याची स्थापना झाली. दौलतखानने काही काळ दिल्लीची सत्ता काबीज केली. मात्र १४१४ मध्ये लगेच खिज्र खानने दौलतखान लोदीकडून दिल्लीची सत्ता मिळवली. यानंतर सुमारे ३७ वर्षे खिज्र खानच्या सय्यद घराण्याने दिल्लीवर राज्य केले. सय्यद घराण्याचा अखेरचा सुलतान अल्लाउद्दीन आलम शाह याने १९ एप्रिल १४५१ ला लोदी घराण्याचा बहलोलखान लोदी याच्याकडे स्वतःहून दिल्लीची गादी सोपवली आणि तो कायमचा बदायू येथे वास्तव्यास निघून गेला. हे रक्तहीन सत्तापरिवर्तन होते. १४५१ पासून लोदी घराण्याची सत्ता दिल्लीवर स्थापन झाली. लोदी हे दिल्लीवर राज्य करणारे पहिले अफगाण घराणे होते. १४८९ मध्ये बहलोल लोदीच्या मृत्यूनंतर त्याचा मृत्यूनंतर त्याचा मुलगा निजामखान दिल्लीच्या गादीवर आला. बहलोलखान आणि त्याची हिंदू सुवर्णकार समाजातील पत्नी हेमा यांचा हा पुत्र होता. दिल्लीच्या तख्तावर बसल्यावर निजामखानने स्वतःला सुलतान सिकंदर शाह अशी उपाधी लावली. पुढे तोच सिंकदर लोदी म्हणून ओळखला गेला. सिंकदर लोदी कर्तबगार निघाला,त्याने त्याच्या राज्याच्या सीमा प्रचंड विस्तारल्या,मात्र तो आपल्या पित्याप्रमाणे लोकप्रिय शासक होऊ शकला नाही. १५१७ ला सिंकदर लोदीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे दोन मुले इब्राहीम आणि जलाल यांच्यात सत्तासंघर्ष झाला. सत्तासंघर्षात इब्राहीम लोदीची सरशी झाली. त्याने आपला भाऊ जलाल याला ठार केले आणि १५१८ ला तो लोधी साम्राज्याचा सुलतान झाला. इब्राहीम लोदीचा काळ अत्यंत अल्प ठरला. त्याच्या राज्याला अंतरविरोधांनी पोखरले होते. याचा लाभ तैमूरलंगच्या नातवाला घेता आला. तैमूरलंगचा नातू जहीरूद्दीन मोहम्मद बाबर याने २१ एप्रिल १५२६ ला पानीपतच्या रणांगणावर इब्राहीमखान लोदीचा पराभव केला आणि त्याल ठार केला. इब्राहीम लोदीच्या मृत्यूमुळे भारतातील अफगाण सत्ता संपुष्टात आली. बाबराच्या रूपाने भारतात मोगल साम्राज्याची स्थापना झाली. अफगाण लोदी घराण्यात तीनच सुलतान झाले असले ,तरी मोगलांनंतर भारतावर सर्वाधिक राज्य करणारे घराणे म्हणून लोदी घराणे इतिहासात ओळखल जाते. लोदी घराण्याचे काही वैशिष्टये लक्षात घेण्यासारखी आहेत. त्यांच्यापूर्वीच्या तुर्क राज्यकर्त्यांचीच शासन व्यवस्था त्यांनी स्वीकारली होती. असे असले तरी हिंदू-मुस्लिम समन्वयाला त्यांच्या काळात प्रारंभ झाला होता. ते आपल्या पूर्वीच्या मुसलमान राजकर्त्यांच्या तुलनेत अधिक उदार होते. राजकारणात धर्माला महत्व देण्याऐवजी राजकारणाला धर्म मानण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे बहुसंख्य हिंदू प्रजेशी धर्माच्या नावाखाली अन्याय वागणूक करण्याऐवजी त्यांच्या सहकार्याने आपली सत्ता भक्कम ठेवण्यावर लोदी राज्यकर्त्यानी लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे लोदी घराण्याच्या सत्तेची पाळमुळं भारताच्या मातीत खोलवर रूजली. काही इतिहासकारांनी लोदी देखील धर्मांध होते,असे वर्णन केलेले आहे. त्यांनी अनंत अन्याय-अत्याचार केले,यासाठी आपली लेखणी झिजवली आहे. असे असेल तर ते प्रदीर्घकाळ सत्तेवर कसे राहिले? हा प्रश्न उभाच राहतो. निरपेक्ष इतिहासकारांनी मात्र लोदी घराण्याचा इतिहास वेगळा लिहिला आहे. त्यांच्या मते लोदी घराण्याच्या काळात हिंदू-मुस्लिम सद्भावाचे एका अर्थाने बीजारोपण झाले. ज्याचा विकास मोगलकाळात झाला. असे असले तरी बाबर-हूमायून यांच्या काळात राजकीय दृष्टया भारत पुन्हा एकदा ढवळून निघाला. कारण अफगाण राज्यकर्ते जाऊन तुर्क मोगल राज्यकर्त्ये भारतात येण्याचा व स्थिरावण्याचा हा कालखंड होता. मुसलमान राज्यकर्त्यांचा या कालखंडाची पार्श्वभूमी समजल्यावरच आपल्याला नानकदेवांच्या महान कार्याची प्रचीती येऊ शकते. लोदी घराण्याच्या कालखंडात बालपण व तारूण्य व्यतीत केलेल्या नानकदेवांनी आयुष्याच्या उत्तरार्धात मोगल घराण्याचा उदयकाल बाबराच्या रूपाने अनुभवला. लोदी घराण्याच्या कालखंडात हिंदू-मुस्लिम समन्वय साधणा-या सुफी संप्रदायाचा विस्तार झाला आणि त्याचबरोबर मध्ययुगिन भारत हा भक्ती आंदोलनांचा सुर्वणकाळ अनुभवत होता. शैव परंपरेतील नाथ संप्रदाय आणि सुफी संप्रदाय यांच्यात तत्त्वज्ञानात्मक आदान-प्रदान नानकदेवांच्या पूर्वी सुमारे २५० वर्षे सुरू झालेले होते. तसेच १४ व्या शतकापासून वैष्णव संप्रदाय आणि सुफी यांचा समन्वय प्रारंभ झाला होता. अशी राजकीय,धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावरच आपल्या नानकदेवांच्या महान जीवनकार्याचा यथायोग्य परिचय करून घेता येतो. अन्यथा इतिहासाचा विपर्यास प्रत्येक काळातील प्रत्येक धर्माच्या इतिहासकारांनी आपल्या सोयी व स्वार्थासाठी केलेलाच आहे. अशा इतिहासकारांच्या सोयीस्कर इतिहासाचे मूल्य सदैव केवळ सामान्य जनतेलाच चूकवावे लागते. मग ही सामान्य जनता कोणत्याही धर्माची असो. भगवान बुद्ध,भगवान महावीर,गोरक्षनाथ,कबीर,चकधर स्वामी,महात्मा बसवेश्वर,ज्ञानेश्वर-नामदेव-तुकोबा आणि नानकदेवांसारखे महापुरुष कोणत्याही काळाचे,सत्तेचे,स्वार्थाचे,समाजाचे नसतात,तर ते अखिल मानव जातीचे चिरंतन संचित असतात. नानकदेवांचे व्यक्तीमत्व आणि तत्त्वज्ञान जेंव्हा आपण पाहतो तेंव्हा तो एक महासागर आहे. अशीच प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. जगातील जे सर्व काही चांगले आहे,त्याचे दर्शन नानकदेवांमध्ये होते. रावीच्या प्रवाहाने इतिहासाचे जे-जे पर्व पाहिले-पचवले त्या सर्व इतिहासाचा सार नानकदेवांच्या विचारधारेत सामावलेला आहे. ज्या रावीच्या पाण्यावरून आक्रमणांच्या लाटा भारताच्या भूमीवर आल्या,त्या रावीच्या काठावरच नानकदेवांसारखा कल्पवृक्ष बहरला आणि विसावला आहे.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment