जब नाश मनुज पर छाता है...
मॅसेच्युसेटस् प्रांतातील परिस्थिती गंभीर बनत गेली. बोस्टनची कोंडी विद्रोहाला कारण ठरणार होती. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात अंसतोष शिगेला पोहचला होता. या दरम्यान अमेरिकेतील सर्व १३वसाहतींचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले. जॉर्जिया प्रांत वगळता उर्वरित १२ प्रांतातील वसाहत प्रतिनिधी पहिल्या महाद्विपीय कॉग्रेसमध्ये सहभागी झाले. १७७४ च्या सप्टेंबर महिन्यात मॅसेच्युसेटस् प्रांतातील फिलोडेलफिया शहरात First Continental Congress चे आयोजन करण्यात आले होते. सत्ताधं ब्रिटिश सरकार आपल्या लाभाची धोरणे व कायदे अमेरिकन जनतेवर लादत होते. ब्रिटिशांच्या शोषणाला व दमनाला सडेतोड उत्तर देण्यासाठी अमेरिकन समाजाने आता कंबर कसली होती. अमेरिकन जनतेला वठणीवर आणण्यासाठी बेदरकार ब्रिटिश राजसत्तेने ५ नवीन कायदे संमत केले होते. ज्यांना एकत्रितपणे 'असहनीय अधिनियम' असे संबोधले जाते. 'बोस्टन पोर्टल बील' या त्यातील पहिल्या कायदयानुसार बोस्टन बंदरातील बाहय व्यापारावर बंदी घालण्यात आली. मॅसेच्युसेटस् गर्व्हमेंट अùक्ट नावाच्या दुस-या कायदयाने प्रत्येक वसाहतीतील कांउसिलर्स म्हणजे सल्लागारांची निवड इंग्लंडचा राजा करेल,वसाहतीचा गर्व्हनर न्यायाधिशांची नेमणूक करेल आणि गर्व्हनरच्या अनुमतीशिवाय विधानसभेची बैठक घेता येणार नाही. याचाच अर्थ राज्यपालाला अमर्याद सत्ता देण्यात आली. लोकशाहीत केद्रिंय सत्तेला राज्य सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्याची अडवणूक करण्यासाठी राज्यपाल नावाच्या पदाचा उपयोग कसा करता येऊ शकतो. याचे हे प्राथमिक अवस्थेतील उदाहरण म्हणता येईल. कारण जगात इंग्लंडमध्ये सर्वप्रथम संसदीय लोकशाहीचा प्रयोग झालेला आहे. तिस-या कायदयानुसार हत्येसंदर्भातील सर्व गुन्हे इंग्लंड किंवा अन्य वसाहतींमधील न्यायालयात वर्ग करण्यात यावेत. ज्याला मिलिटरी कॅम्प असे संबोधले जाते. तो सैन्याचा स्थायी तळ असतो. चौथ्या कायदयानुसार मॅसेच्युसेटस्मध्ये असल्या मिलटरी कॅम्पला संविधानिक करण्यात आले. क्यूबेक ॲक्ट नावाच्या पाचव्या कायदयानुसार कॅनडातील क्यूबेक प्रांताची सीमा ओहियो नदीपर्यंत वाढविण्यात आली. तसेच शासन व्यवस्थेसाठी व्हाईसरायची नियुक्ती करण्यात आली. याचबरोबर या प्रांतील कॅथोलिक ख्रिश्चनांना विशेष सवलती व त्यांच्याबाबत अधिक सहिष्णू धोरण स्वीकारण्यात आले. म्हणजेच असंतोष चिरडण्यासाठी धर्माचे कार्ड देखील खेळण्यात आले. अशाप्रकारे हे पाच कायदे म्हणजे लोकशाहीच्या नावाखाली ठोकशाहीचा वापर करण्याची मुभा देणारे कायदे होते. आजवर जगातील प्रत्येक लोकशाहीत हा दशावतारी खेळ चालू असलेला दिसतो. विशेष म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणारे हे कायदे अत्यंत तत्परतेने वा द्रुत गतीने ब्रिटनच्या संसदेत मंजूर करण्यात आले. जनतेला फसवणारे आणि तिचे दमन करणारे कायदे अशाच प्रकारे द्रुत गतीने संमंत करून घेणे लोकशाहीच्या बुरख्याखाली दडलेल्या हुकूमशाहीचे आवडते शस्त्र असते. इंग्लंडच्या तत्कालिन संसदेत बर्कसारखे काही जिंवत लोक होते. त्यांनी अशा कायदयांना कठोर विरोध करण्याचा प्रयत्न केला. गुन्हेगारांसाठी संन्याशाला फाशी देणारा कायदा असू शकत नाही. अशा शब्दात बर्कने या कायदयांचा विरोध केला. यामुळे अमेरिकन वसाहती आणि आपल्यातील वाद मिटण्याऐवजी टोकाला जाईल अशी भविष्यवाणी त्याने केली होती. आसुरी बहूमत आणि सम्राटाची मान्यता यांच्यासमोर बर्कसारख्या नेत्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. 'विनाशकाले विपरित बुद्धी'' चे वर्णन राष्ट्रकवी रामधारीसिंह
'दिनकर' यांनी केल्याप्रमाणे-
'दो न्याय अगर तो आधा दो,
पर,इसमें भी यदि बाधा हो,
तो दे दो केवल पांच ग्राम,
रक्खो अपनी धरती तमाम।
हम वहीं खुशी से खायेंगे,
परिजन पर असि न उठायेंगे।
दुर्योधन वह भी दे ना सका,
आशीष समाज की ले न सका,
उलटे,हरी को बांधने चला,
जब नाश मनुज पर छाता है,
पहले विवेक मर जाता है ।'
ब्रिटिश राजसत्तेला नेमके जनताजनार्दनाच्या शक्तीचे विस्मरण झाले. ज्याची किंमत त्यांना भविष्यात चूकवावी लागली. मॅसेच्युसेटस्ला चिरडले तर संपूर्ण अमेरिका वठणीवर येईल,असा सत्तेचा आलेला उन्माद ब्रिटिशांना महागात पडला. संसदेत कायदे संमत झाले,याचा अर्थ मंत्रीमंडळाचा व सरकारचा विजय झाला. हा भ्रम अमेरिकन जनतेने लवकरच दूर केला. धृतराष्ट्राच्या राजसभेत भगवान श्रीकृष्णाने जो शिष्टाईचा प्रयत्न केला. तेंव्हा त्याला त्याची व पांडवांची दुर्बलता समजण्याची घोडचूक दुर्योधनाने केली. हरिने आपले विराटरूप दाखवले,तरी सत्तेमुळे उन्मत्त झालेल्या दुर्योधनाला भविष्यातील विनाशाची जाणिव झाली नाही. अखेर कुरूक्षेत्रावर त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच राहिले नाही. अशीच अवस्था ब्रिटिशांची झाली. ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य मावळत नव्हता,त्या इंग्रंजांना स्वतः निर्माण केलेला देशच गमवावा लागला. आपल्या कायदयाने अमेरिकन जनता भयभीत होईल आणि त्यांचा विद्रोह कायमचा गाडता येईल. हा ब्रिटिशांचा कयास सपशेल फसला. कॅथोलिक ख्रिश्चनांना सवलती देऊन,अमेरिकन जनतेच्या न्याय लढयाला ब्रिटिशांनी धार्मिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्याच्याही उपयोग झाला नाही. कारण अमेरिकन जनता सुज्ञ होती. स्वकष्टाने उभारलेला अमेरिका त्यांच्यासाठी महत्वाचा होता. वंश,धर्म,भाषा,संस्कृती असल्या आभासी अभिमानापेक्षा सर्वांचे सुख-कल्याण यांना अमेरिकन जनतेने प्राधान्य दिले. कारण त्यांचे पूर्वज सुख-समृद्धीच्या शोधात तेथे आले होते. त्याच्यासाठी खूप मोठे बलिदान त्यांनी केलेले होते. ब्रिटिशांचे गुलाम म्हणून जगण्यात तथ्य नाही,याचे पुरते भान त्यांना होते. ब्रिटन अमेरिकेला कच्चा माल पुरविणारा देश आणि पक्क्या मालाची बाजारपेठ समजत होता. अमेरिकन जनतेच्या कष्टावर ब्रिटन समृद्ध होत होता. ब्रिटिश संसदेने मॅसेच्युसेटस्ला नमविण्यासाठी केलेल्या कायदयांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सैनिक बळाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंग्लंडचा सम्राट जॉर्जला बंडखोर अमेरिकन जनतेला चांगलाच धडा शिकवायचा होता. याची जबाबदारी अमेरिकेतील इंग्रंज फौजांचा सेनापती असलेला जनरल गेज याच्यावर सोपवण्यात आली. जनरल गेज याला मॅसेच्युसेटस् प्रांताचा गर्व्हनर नियुक्त करण्यात आले. शस्त्रांच्या जोरावर ब्रिटिश सत्तेला अमेरिकेत दृढ करण्यासाठी जनरल गेजला प्रयत्न करायचे होते. तो देखील आपल्या स्वामीभक्तीत अत्यंत कर्मठ होता. त्याने मॅसेच्युसेटस् प्रांतात अत्यंत सक्तीने नवीन कायदयांची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला. त्याच्या मदतीसाठी इतर प्रांतांमधील सैन्य देण्यात आले. जनरल गेज हा एका अर्थाने अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धासाठी पोषक ठरला. त्याने जितकी कठोरता दाखवली तितकी अमेरिकन जनता पेटून उठली. न्याय मागणीसाठी मॅसेच्युसेटस् प्रांताने जो कायदेभंग केला,त्यापेक्षा त्याच्या जनतेला अधिक यातना दिल्या जात आहेत. हे जेंव्हा अमेरिकन जनतेला जाणवले,तेंव्हा ब्रिटिशांविरूद्धातील लढा हा केवळ मॅसेच्युसेटस्चा राहिला नाही. तो संपूर्ण अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा झाला. व्हर्जिनियाच्या हाऊस ऑफ वर्गसेजमध्ये १ जून हा दिवस बोस्टन पोर्ट अॅक्टच्या विरोधात प्रदर्शन करण्याचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. यामुळे मॅसेच्युसेटस्च्या जनतेच्या प्रती सहानुभूती व सहकार्य भावना प्रकट करण्यात येणार होती. १ जूनला व्हर्जिनियाची जनता एक दिवसाचा उपवास व प्रार्थना करणार होती. व्हर्जिनियाचा गर्व्हनर डनमोर याला ही कृती ब्रिटिश सत्तेला आव्हान वाटले. त्याने व्हर्जिनियाची विधानसभा विर्सजित केली. यामुळे जनतेला जणू काही चेवच आला. फिलाडेल्फियाच्या चौकात जमून नागरिकांनी प्रदर्शन केले. तसेच अमेरिकेतील इतर वसाहतींमधील नागरिकांना Continental Congress मध्ये सहभागी होण्याचे आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढयाची संयुक्त योजना बनवण्यासाठी प्रतिनिधी पाठवण्याचे आव्हान केले. हा अमेरिकेच्या एका रोमहर्षक पर्वाचा प्रारंभ होता.
प्रा.डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment