आक्रमकांसोबत आलेले सुफी...

३५० वर्षे सिंध प्रांतात म्हणजेच पंजाबजवळ अरब लोक राहिले. अखेर ते अरबस्थानाकडे परतले. इसवीसनाच्या दहाव्या शतकात अरबांपेक्षा वेगळया स्वरूपाच्या इस्लामी आक्रमणांचे पर्व प्रारंभ झाले. इस्लामवरील बगदादच्या खलिफांची पकड सैल झाली. त्यामुळे इस्लामच्या प्रचार-प्रसारातील त्यांचा उत्साह मावळला. अरबस्थानातील अरबांच्या विविध टोळया इस्लामच्या नावाने एका छत्राखाली आल्या होत्या. त्यांच्यात परत फुट पडली. अरबस्थानाच्या बाहेर अरबांनी ज्या प्रदेशात इस्लाम पोहचवला होता,त्या भागातील मुसलमान मात्र अधिक कडवे होत गेले. अरब पुन्हा अरबस्थानाच्या सीमांमध्ये आक्रसले गेले. नव्याने मुसलमान झालेल्या अफगाण तुर्कांनी इस्लामचा उपयोग करून आपला समाज संघटीत केला. इस्लामबद्दल कडवेपण आणि अभिमान याचा वापर करून अफगाणी तुर्कांनी गजनी येथे एक बळकट इस्लामी राज्याची स्थापना केली. अफगाण तुर्कांच्या गजनी राजसत्तेचा संस्थापक पहिला महमूद सुलतान होता. आज ज्याला अफगाणिस्थान संबोधले जाते,त्याचा उल्लेख महाभारतात गांधार म्हणून आलेला आहे. शकुनी मामा हा गांधार नरेश होता. पहिला महमूद सुलतानच्या काळात गांधारवर ब्राह्मण राजसत्ता होती. महमूदने ती उलथवून टाकली. संपूर्ण अफगाणिस्थानवर सत्ता स्थापन झाल्यावर,महमूद पंजाबच्या उत्तर-पश्चिम भागावर वर्चस्व मिळवण्यात यशस्वी झाला. आजच्या संदर्भात सांगायचे झाल्यास महमूदने आजच्या अफगाणिस्थान व पाकिस्तान यांच्यावर आपली सत्ता स्थापन केली. पंजाबचा उत्तर-दक्षिण भाग काबीज केल्याने त्याला पर्वतीय भागांवर कब्जा करता आला. पर्वतीय भागावर कब्जा मिळवल्याने या तुर्की राजसत्तेला भारताच्या मैदानी प्रदेशात उतरणे सुकर झाले. इ.स.९९८ मध्ये गजनीच्या सुलतान महमूदने भारतावर पहिली स्वारी केली. गजनीच्या महमूदच्या सोळा स्वा-यांच्या इतिहास प्रसिद्ध आहे. त्यासोबत अनेक कथा-दंतकथा जोडण्यात आलेल्या आहेत. विविध इतिहासकारांनी आपापलल्या सोयीने महमूदच्या स्वा-यांचे वर्णन केलेले दिसते. त्याने केलेली प्रचंड लूट हया भागाला कायम अधोरेखित करण्यात येते. तटस्थपणे विचार केल्यास येथे काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पाच-सहा हजार तुर्क मुसलमान ज्यांना सैन्य म्हणण्याऐवजी टोळी संबोधणे अधिक उचित ठरेल,ते भारतात सोळा वेळा येतात आणि यथेच्छ लूट करतात. त्यासोबत हिंदुची मंदिरे उदध्वस्त करतात. हे सर्व मान्य केले,तरी काही प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळत नाहीत. इसवीसनाच्या आठव्या-नवव्या शतकात आदि शंकराचार्यांमुळे वैदिक हिंदू धर्माचे पुनरूज्जीवन झालेले होते. प्राग्वैदिक व अनार्य जैन धर्माचा संकोच झालेला होते. त्यांचा राजकिय व धार्मिक प्रभाव ओसरला होता. हा धर्म केवळ तग धरून होता,एवढेच त्याचे महत्व शिल्लक राहिले होत. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दुस-या अनार्य धर्माचे म्हणजेच बौद्ध धर्माचे भारतातून संपूर्ण उच्चाटन करण्यात आले होते. हे दोन्ही धर्म अहिंसा व समता यांना प्राधान्य देणारे होते. त्यांच्यामुळे भारताच्या क्षात्रतेजाला ग्रहण लागले होते व सामाजिक व्यवस्था बिघडली होती. यासाठीच आदि शंकराचार्यांनी वैदिक हिंदू धर्माची पुनरस्थापना केली. असे सांगितले जाते. भारतातील गुप्त साम्राज्याने वैदिक हिंदू धर्माचा पुरस्कार केला होता. त्यामुळे इतर बहुतेक राजसत्तांनी त्यांचे अनुकरण केले होते. याचाच अर्थ हिंदू हाच भारताचा राजधर्म झालेला होता. असे असतांना इसवीसनाच्या दहाव्या शतकात गजनीच्या महमूदची छोटी लूटारू टोळी सोळा वेळा भारताची लूट करून जाते. हे कोडयात टाकणारे आहे. महमूदची टोळी भारताच्या गुजरात प्रांतात पोहचते,सोरटी सोमनाथ मंदिर लूटते, त्याचे विडंबन करते आणि सर्व लूट घेऊन सुखरूप गजनीला पोहचते. ते देखील एकदा नाही,तर सोळा वेळा. हे मोठे अचंबित करणारे आहे. इस्लामचा कडवेपणा त्यांच्याकडे होता,तर खंडप्राय भारतातील एकाही राजाकडे हिंदूत्वाचा कडवेपणा नव्हता का ? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला अस्वस्थ करतो. अन्यथा हा हिंदू-मुसलमान संघर्षच नव्हता,तो केवळ राजसत्तांच्या वर्चस्वाचा लढा होता. प्रथम मुसलमानांकडून आणि नंतर हिंदूकडून त्याला धार्मिक रंग देण्यात आला. यामध्ये मुसलमान व हिंदू  म्हणजे त्या-त्या राजसत्ता,धर्ममार्तंड,इतिहासकार इत्यादी अभिप्रेत आहेत. परधर्माचे आक्रमण होत असतांना भारताची सामान्य जनतेची हिंदू म्हणून या संघर्षात काय भूमिका होती? हिंदू म्हणून ही जनता एकवटलेली नव्हती का ? मुठभर मुसलमान एकवटून एवढया मोठया हिंदू लोकसंख्येचा पराभव करतात,तर हिंदू लोक हिंदू म्हणून एकवटू का शकले नाही? इस्लाममधील समानता आणि हिंदूमधील विषमता याचा या पराभवात काही संबंध आहे का ? इतिहासाचे असे अनेक प्रश्न गोंधळात टाकणारे आहेत. गजनीच्या महमूदनंतर इ.स.११५० मध्ये महम्मद घोरी या सुलतानाने भारतावर आक्रमणांची मालिका सुरू केली. सुरवातीच्या काही आक्रमणांमध्ये अधिक यश प्राप्त करु न शकलेला घोरी,अखेर दिल्लीचे भारतीय साम्राज्य संपवण्यात यशस्वी झाला. भारतेंद्रु पृथ्वीराज चौहाण याचा पराभव म्हणजे भारतातील मुसलमान राजसत्तेची पायाभरणी ठरते. पृथ्वीराजाचा सासरा जयचंद महम्मद घोरीला पृथ्वीराजाच्या पराभवासाठी सहकार्य करतो. ही एक घटना खंडप्राय भारत सदैव विविध परकीयांच्या गुलामीत का राहिला? हे समजण्यासाठी पर्याप्त आहे. सन १२०६ मध्ये महम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्याचा गुलाम कुतुबउद्दीन एबक याने बंडे केले आणि तो सुलतान झाला. हा गुलाम सुलतान म्हणून  दिल्लीच्या तख्तावर बसला. पुढे सुमारे सव्वातीनशे वर्षे त्याच्या गुलाम घराण्याची सत्ता कायम राहिली. अखेर कुतुबउद्दीन एबकने स्थापन केलेल्या राजवटीत बंडाळी झाली आणि खिलजी वंश सत्ताधीश बनला. ते १३ वे शतक होते. अल्लाउद्दीन खिलजी दक्षिणेत महाराष्ट्रापर्यत आला. त्याने देवगिरीचे यादव राज्य संपुष्टात आणले. त्याच्यामुळे इस्लामचा प्रवेश महाराष्ट्रात झाला आणि तो दक्षिण भारतात पसरण्याची शक्यता निर्माण झाली. खिलजीच्या आक्रमणामुळे महाराष्ट्रातील राजकिय,धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात प्रचंड वादळच निर्माण झाले. असे आक्रमक महाराष्ट्र पहिल्यांदाच अनुभवत होता. पंजाबाला इ.स.७८० पासून त्याचा अनुभव आला होता. म्हणजे सुमारे ६५० वर्षानी महाराष्ट्राला इस्लामी आक्रमणाला सामोरे जावे लागले. ज्याची किंमत महानुभाव पंथ आणि वारकरी पंथाला मोठया प्रमाणत चुकवावी लागली. संतशिरोमणी नामदेव महाराजांना महाराष्ट्रातून स्थलांतर करून भागवत पंथाची पताका पंजाबात न्यावी लागली. पंजाबात राजवट मुस्लिमच असली,तरी हिंदू-मुस्लिम हे दोन धर्म याकाळात संघर्षाकडून समन्वयाकडे वाटचाल करू लागले होते. तिथले मुसलमान काही प्रमाणात नरम झाले होते. हिंदू धर्मियांना सततच चिरडण्याचा प्रयत्न त्यांना महागात पडू शकतो,याची जाणिव एव्हाना त्यांना होऊ लागली होती. पंजाबातील हिंदूना अरबांपासून मुसलमानांना अनुभवता आले होते. त्यामुळे महाराष्ट्रात अल्लाउद्दीन खिलजीच्या रूपाने आलेल्या इस्लामी वादळाला इथल्या जनतेच्या मनात दहशत बसवणे आणि आपल्या धर्माचा प्रचार-प्रसार करायाचा होता. त्यामुळे पंजाब पूर्णपणे मुसलमान राजवटीखाली असला,तरी त्यांना सरावलेला होता. त्यामुळेच नामदेव महाराजांना पंजाब सुरक्षित वाटला असावा. गजनी,एबक,घोरी व खिलजी या चारही तुर्क वंशाच्या आक्रमणांसोबत सुफी संप्रदायाचा प्रवेश नकळतपणे पंजाबसह उत्तर भारतात झालेला होता. याचा अर्थ मुसलमान संपूर्ण सहिष्णू झाले होते असा नाही,तर इतरांबाबत थोडे सहनशील झाले होते इतकाच. एवढया मोठया हिंदू लोकसंख्येवर अल्पसंख्यक असणा-या मुसलमानांना राज्य करायचे होते. त्यामुळे सहनशिलता वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच अरबस्थान किंवा त्याच्या आसपास असलेल्या बऱ्याच मोठ्या प्रदेशात धर्म नावाची संकल्पना नसल्याने तेथील समाजाला इस्लाम कबूल करण्यात फार गैर वाटण्याचे कारण नव्हते. भारताला मात्र हजारो वर्षांची स्वतःची देदीप्यमान परंपरा होती. जैन-बौद्ध प्राग्वैदिक-अनार्य धर्मपरंपरा असो की वैदिक परंपरा असो यांच्यात टोकाचे विरोध होते व आहेत. हे नाकारण्यात काही अर्थ नाही. असे असले तरी हे सर्व याच मातीत घडलेले होते. ते घरातले भांडण अशा स्वरूपाचे होते. या तिघांनी एकमेकांकडून काही ना काही स्वीकारले देखील होते. अरब ते अकबर हा मुस्लिम राज्यकर्त्यांचा काळ सुमारे आठशे वर्षाचा होता. हा कालखंड प्रचंड उलथापालथीचा ठरला. महंमद पैगंबरांच्या मृत्युनंतर इस्लामच्या प्रसारासाठी बाहेर पडलेल्या अरब टोळयांनी इराक,तुर्कस्थान,पर्शिया आणि अफगाणिस्थान असे देश व्यापले. त्यांच्यावर आपला धर्म लादला आणि काहिंनी तो आपणहून स्वीकारला. पैगंबरांच्या काळातच अरबस्थानात ख्रिश्चन,ज्यू हे धर्म पोहचलेले होते. तसेच पर्शिया म्हणजे ईराण मध्ये झोराष्ट्रीयन आणि अफगाणिस्थानात बौद्ध धर्म अस्तित्वात होते. तसेच या अरब टोळयांचा निओ-प्लेटॉनिक ग्रीक तत्त्वज्ञानाशी देखील संपर्क आला. ज्या विविध वंशानी आणि धर्मपरंपरांनी इस्लामचा स्वीकार केला,ते येताना आपापल्या धार्मिक शिकवणुकी आणि चालीरीती घेऊन आले. त्यांचे तत्त्वज्ञान हे पैगंबरांनी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा वेगळया होत्या. इस्लाम आणि त्यांच्या संकरातून एक वेगळी परंपरा परंपरा जन्माला आली. ती म्हणजे सुफी. अरबानंतर आलेल्या इस्लामी आक्रमणांसोबत सुफी संप्रदाय भारताच्या भूमीवर पोहचला. हिंदू व सुफी तत्त्वज्ञान यांचा सुर्वणमध्य शीख धर्माच्या रूपाने अवतरला.
डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी – ८३०८१५५०८६ 

  

Comments

  1. लेख सुंदर आहे पण राजपूत व आर्यांची भुमीका स्पष्ट नाही झाली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !