भारताच्या प्रवेशद्वारावर अरब आक्रमणे
इसवीसनाच्या ६ व्या
शतकात अरबस्थानात निर्माण झालेला इस्लाम,अल्पावधीतच अरबस्थानातून बाहेर पडला.
जगातील इतर कोणत्याही धर्मापेक्षा राजकीय व धार्मिक महत्वकांक्षा यांचे बेमालूम
मिश्रण करण्यात ईस्लामला सर्वाधिक यश संपादन झाले.
असे असले तरी इ.स.६७०
ते ७१० याकाळात म्हणजे इस्लामच्या उदयानंतर लगेचच पश्चिम आशियातून अरब
धर्मप्रसारासाठी बाहेर पडले. अवघ्या चाळीस
वर्षात त्यांनी जवळपास अर्ध्या जगावर आपला प्रभाव पाडला.
युरोपात स्पेन-पोर्तुगाल यांच्यावर इस्लामने प्रभाव पाडला होता.
मात्र लवकरच या देशातील जनतेने त्यांना नाकारले.
कारण इस्लामच्यापूर्वी जन्माला आलेल्या ख्रिश्चन धर्माने युरोपची भूमी व्यापलेली
होती. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारामुळे
युरोपातील लोक एकटवलेले होते. एकसंध धर्म म्हणून
ते एका क्षत्राखाली एकजूट होण्यास कोणतीही अडचण नव्हती. त्यामुळे
इस्लामला पश्चिमेकडे विस्तारण्यास फारसा वाव नव्हता. पूर्वेकडे जगातील सर्वात प्राचीन धर्म होते.
त्यांच्यामधील संघर्षात तलवारीपेक्षा तत्त्वज्ञानाला अधिक महत्व होते.
याचा अर्थ धर्माच्या नावाखाली पूर्वेत रक्त सांडलेच नव्हते असेही नाही.
एवढेच की त्याचे स्वरूप व पद्धती वेगळी
होती. भौगोलिक सलगता,एकसंध धर्म व संस्कृती यांचा अभाव,आपसात
लढणा-या राजसत्ता इत्यादी कारणांनी पौर्वात्य जगात प्रवेश करणे शक्य होते.
इस्लामच्या उदयानंतर भारतीय उपखंडात आक्रमणांचे एक नवे पर्व
प्रारंभ झाले. इस्लामने तोपर्यंत पर्शिया,तुर्कस्थान,मंगोलिया
काबीज केला होता. जेंव्हा अफगाणिस्तानापर्यत
इस्लाम पोहचला तेंव्हा भारताकडे त्याचा प्रवास सुरू झाला.
पर्शियन,मंगोल,तुर्क,अफगाण
हे सर्व लोक वंश,भाषा आणि संस्कृतीच्या बाबतीत
एकमेकांपासून तेवढेच भिन्न होते जेवढे त्यांचे पूर्वज होते.
मात्र इस्लाम स्वीकारल्यानंतर त्याच्यावरील निष्ठा हा त्यांच्यातील समान दुवा ठरला.
पर्शिया म्हणजे आजचा ईराण सोडला तर इतरांना धर्मपरंपरेचा स्पर्श झालेला नव्हता.
पर्शियात जगातील सर्वात प्राचीन संस्थात्मक धर्म झरतुष्ट्राने स्थापन केलेला होता;परंतु
त्याच्या स्वीकार तुर्क,अफगाण
टोळयांनी केलेला नव्हता. त्यामुळे इस्लामने
पर्शिया काबीज केला तेंव्हा झरतुष्ट्राच्या धर्माला विरोध करणारे हे लोक 'शत्रुचा
शत्रु तो आपला मित्र' या प्रवृत्तीनुसार
त्याला अनुकुल होण्यास अडचण आली नाही. त्यांना स्वतःचा
म्हणून काही धर्म नसल्याने इस्लाम हा त्यांना धर्म म्हणून स्वीकारण्यात कोणतीही
धार्मिक अस्मिता आडवी आली नाही. आपला धर्म आणि
दुस-याचा धर्म हा भेद या लोकांच्या डोक्यात नव्हता.
त्यांच्यासाठी धर्माच्या चौकटीतील ईश्वर संकल्पना एकदम नवी कोरी होती.
त्यामुळे त्यांनी तिचा सहज अंगीकार केला.
धर्माच्या बाबतीत कोरी पाटी असलेल्या या लोकांची नव्या धर्मावर त्यांची निष्ठा
लवकरच दृढ झाली. तसेच इस्लाममधील समानतेच्या तत्त्वामुळे
धर्म म्हणून एक होण्यास त्यांना अवधी लागला नाही.
इ.स.७८०
पासून इस्लामी आक्रमणे भारताच्या सीमेवर पोहचली.
नेहमीप्रमाणे त्यांचा पहिला सामना करावा लागला तो पंजाबला.
पंजाबला आणि नंतर उर्वरित भारताला तोपर्यंत ज्या आक्रमणांना
सामोरे जावे लागले होते,त्यापेक्षा हे आक्रमण
अत्यंत वेगळे होते. यापूर्वीची आक्रमणांचा
भारतीय धर्म,संस्कृती,भाषा,जीवनशैली इत्यादींशी संबंध नव्हता.
इथे आलेल्या प्रत्येकाची अशी सर्व वैशिष्टये एकमेकात विरघळून गेली होती.
शस्त्राच्या आधारावर विजय प्राप्त केलेले विविध आक्रमक धर्म,संस्कृती,भाषा,जीवनशैली इत्यादी विषयी आग्रही नव्हते.
राजकीय सत्ता संपादन हा त्यांचा प्रमुख उद्देश होता.
यामुळे एक बहुपेडी संस्कृती भारतात आकाराला आली होती.
याचा अर्थ ही संस्कृती देखील निकोप होती असेही म्हणता येत नाही.
समाजात निर्माण झालेली विषमता हा भारतीय संस्कृतीचा सर्वात
महत्वाचा दोष होता. मात्र सामावून घेण्याची सहनशिलता तिच्यात
निश्चितच होती. इस्लामपूर्व आक्रमकांनी
आपले लादण्याचा प्रयत्न केला नाही आणि भारतीय समाजानेही त्यांना सामावून घेण्यास
विरोध केला नाही. तडजोड,स्वीकार व समन्वय यांचा अवलंब दोन्ही
बाजूंनी झाला. इस्लामला मात्र कोणतीच तडजोड,स्वीकार
व समन्वय मान्य नव्हता. हेच पूर्वीच्या आक्रमकांपेक्षा
त्याचे व्यवच्छेदक लक्षण होते. भारताच्या भूमीवर
असणारे विविध धर्म व पंथ यांचे अनुसरण करण्याची मुभा देण्यास इस्लाम तयार नव्हता.
प्रारंभीचे अरब मुसलमान ते बाबर हा सुमारे ७५० वर्षाचा कालखंड इस्लामी आक्रमणांचा
कालखंड आहे. स्पेन-पोर्तुगालवर विजयानंतर अरब
टोळयांनी आशियाकडे मोर्चा वळवला. पर्शिया,तुर्कस्थान,मंगोलिया,अफगाणीस्थान
पश्चात भारतीय उपखंडावरील सिंध प्रांतापर्यंत अरबांचे आक्रमण
पोहचले. अरबांचे प्रथम हल्ले सिंधनरेश दाहिर याने
परतविले. पण अखेर तो असमर्थ ठरला.
त्याला कोणत्याही हिंदू राजांनी मदत केली नाही.
अखेर सिंधमध्ये अरबांनी बस्तान बसवले. येथे अन्य हिंदू
राजांनी दाहिरला मदत का केली नाही? हा प्रश्न सहजपणे
उपस्थित होतो. यानंतर सुमारे साडे-तिनशे वर्ष अरब सिंध
प्रातांत होते. मात्र त्यांना सिंध प्रांताच्या पुढे
सरकता आले नाही. अरबांचे सिंधमधील वास्तव्याचे फार
मोठे जागतिक परिणाम घडले,असे काही अभ्यासकांचे
मत आहे. प्राचीन भारतीय ज्ञानविज्ञान अरबांमाफर्त
युरोपला परिचित झाले. शून्य आणि दशमान
पद्धती,अंक इत्यादी गणिताचे ज्ञान मूळ भारतीय आहे.
त्याचा लाभ युरोपला झाला आणि आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीला
वेग मिळाला. असे या अभ्यासकांचे
मत मान्य केल्यास अरबांना हे सर्व ज्ञान कोणत्या भारतीयांनी दिले ? युरोपला
हे ज्ञान मिळाल्यावर त्याची प्रगती झाली,तर भारतीयांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग करुन
त्यापूर्वीच प्रगती का साधली नाही? असे
प्रश्न कोणत्याही सामान्य बुद्धीच्या भारतीयाच्या मनात निर्माण होऊ शकतात.
विस्तारभयास्तव अशा प्रश्नांची चर्चा करणे येथे शक्य नाही.
सारेच अरब मुसलमान आक्रमक नव्हते.
काही ज्ञानलालसाही त्यांच्यापाशी होती. असे मत अनेक
भारतीय इतिहासकारांनी मान्य केले आहे. याकाळात काशीला
येऊन बरीच वर्षे अध्ययन करणारे अबू माशर,इस्माईल,अहमद रफी यांसारखे
अरबी पंडित आढळतात. ज्यांनी सिंध प्रांतात ज्ञानसंस्था
स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. परत त्यांना काशीत
अध्ययनास कोणी मार्गदर्शन-सहकार्य केले? हा
प्रश्न साहाजिकच निर्माण होतो. यासाठी इतिहासाची तटस्थ
मांडणी व अवलोकन करणे आवश्यक असाते. तरच
असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे सापडू शकतात. कारण
टाळी कधीही एका हाताने वाजत नसते. मुसलामान आक्रमक
कडवे,तडजोड न करणारे,हिंसक,क्रुर होते,हे
वास्तव कोणीही अमान्य करू शकत नाही.
मात्र ज्याला आज आपण इतिहास म्हणतो तो कधी तरी वर्तमान होता.
त्या वर्तमानातील दोन्ही बाजूचे सत्ताधारी,धर्ममार्तंड व व्यापारी या समाजधुरिणांचे
हितसंबंध व स्वार्थ येथे लक्षात घ्यावे
लागतात. सामान्य जनता कायम अशा हितसंबंधांविषयी
अनभिज्ञ असते. हाच वर्तमान भविष्यात जेंव्हा इतिहास
बनतो,तेंव्हा भविष्यातील वर्तमानाच्या सोयीनुसार व
हितसंबंधांनुसार त्याचा अर्थ लावला जातो.
यातून सामान्यांना भावनिक केले जाते. आपले हित साधले
जाते. हे जगात कायम घडत आले आहे.
याला कोणताही देश अपवाद नाही. एक मात्र खरे की
देश कोणताही असो सामान्य जनता कायम याविषयी अनभिज्ञच असते.
त्यामुळे हितसंबंध जोपासणारे व स्वार्थ साधणारे इतिहासाचा अत्यंत सुनियोजित वापर करुन
घेत असतात. आक्रमणांमध्ये
ही सामान्य जनताच भरडल्या जाते. इतिहासाच्या भावनिक
लाटेत ही सामान्य जनताच वाहत जाते आणि स्वतःचा वर्तमान व भविष्य भरडवून घेते.
हिटलरच्या नाझी भस्मासुराने जर्मन जनतेलाच भस्मसात केले होते.
हे एकच उदाहरण यासाठी पुरेसे ठरते. नाझी जर्मनीत
देखील सत्ताधारी,धर्ममार्तंड व व्यापारी हे सुपात राहिले आणि जनता
नेहमीप्रमाणे जात्यातच होती. त्यामुळेच
कोणत्याही देशातील जनतेला स्वतःचे हित साधायचे असेल,तर जनतेच्या दृष्टिकोनातून अथवा नजरेतून इतिहास
लेखन करणा-या इतिहासकारांची नितांत आवश्यकता असते.
कारण इतिहासातील घटनांचा तटस्थपणे शोध घेऊन,त्यांमध्ये सत्ताधारी,धर्ममार्तंड
व व्यापारी यांच्या गुप्त-सुप्त संबंधांची उकल तो करू शकतो.
१९ व्या शतकापासून अशा तटस्थ इतिहासकारांची एक परंपरा जगात
निर्माण होत गेली. तिची दखल जाणिवपूर्वक घेण्यात आली नाही.
भावना पेटवणारे त्याच्यात काही नसल्यामुळे सामान्य जनतेला,तिच्यासाठीच लिहिलेला हा इतिहास आपलासा
वाटला नाही. लिओ हयूबरमानसारख्या सर्वसामान्यांच्या
इतिहासकारांनी हे वास्तव प्रकट केले आहे.
ख्रिश्चन-मुसलमान यांच्या वैराचा इतिहास अत्यंत अमानुष,रक्तरंजित व प्रदीर्घ आहे.
हे सर्वज्ञात आहे. त्यांच्यातील युद्धे ही 'धर्मयुद्धे'
म्हणजे धर्मासाठी लढल्या गेली अशी सर्वसाधारण माहिती सर्वसामान्य माणसाला इतिहास
देतो. प्रारंभी धर्माच्या कडवेपणातून ही युद्धे
झाली,नंतर त्यांचा लाभ लक्षात आल्यावर व्यापाऱवृद्धीसाठी दोन्ही बाजूने जाणिवपूर्वक
ही राजे-व्यापारी यांच्याद्वारे प्रायोजित करण्यात
आली. हे हयूबरमानसारख्यांनी सिद्ध केले आहे,तरी
देखील आजही सामान्य ख्रिश्चन व मुसलमान यांना धर्मायुद्धेच
समजतात. त्यांच्या या अज्ञातच सत्ताधारी,धर्ममार्तंड
व व्यापारी यांचे सुख सामावलेले आहे, महाराष्ट्राचा
विचार करता छत्रपती शिवरायांना जेरबंद करण्यासाठी औरंगजेबाकडून मिर्झा राजे जयसिंग
येतो. अशावेळी त्यांना सहकार्य करण्यास एकही
हिंदू सत्ताधारी पुढे येत नाही. यामधून आपण योग्य
तो अर्थ लावू शकतो. शिवरायांच्याच बाबतीत
राजकीय,धार्मिक,सामाजिक इत्यादी स्तरांवर स्वकियांच्या अशा वर्तनाची अनेक उदाहरणे सांगता
येतील. असो अरबांना भारताच्या
प्रवेशद्वारापर्यंतच पोहचता आले. अरब-भारतीयांचा फारसा
मिलाफ होऊ शकला नाही.
त्यांच्यामुळे भारताची मोठी क्षती देखील झाली नाही.
मात्र इ.स.१०
व्या शतकापासून सुरू होणारी मुस्लिम आक्रमणे,त्यांची
परिमाणे आणि परिणाम शीख धर्माच्या उदयाला कारणीभूत ठरणार होती.
डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी
– ८३०८१५५०८६

Comments
Post a Comment