भेदाभेद - भ्रम अमंगळ..


आगम ग्रंथांची निर्मिती ही जैन धर्मातील दिगंबर व श्वेतांबर भेदाची नांदी ठरली. दिगंबर व श्वेतांबर यांचे आगम ग्रंथ खरे पाहिले तर समानच आहेत. तथापि दिगंबरपंथीयांचे म्हणणे असे की,पूर्वीचे मूळ आगमग्रंथ नष्ट झाले असून सध्या उपलब्ध असलेल ग्रंथ श्वेतांबरपंथी विद्वांनांनी तयार केले आहेत. सूक्ष्म अवलोकान केल्यास दोन्ही पंथांच्या तत्त्वज्ञानात मुळीच भेद दिसत नाही;परंतु दोन्ही पंथीयांनी आपापले स्वतंत्र तत्त्वज्ञानाचे ग्रंथ लिहिले आहेत. तथापि ग्रंथांची नावे (हरिवंशपुराण,पद्मचरित्र इ।) सारखीच असून त्यांतील विषयही बहुतांशी सारखेच आहेत. श्वेतांबर पंथात स्त्रियांना दीक्षा घेण्याचा अधिकार असून त्यांना कैवल्यप्राप्ती होते असे मानण्यात येते. दिगंबर पंथास मात्र हे मान्य नाही. श्वेतांबर साधू वस्त्रे नेसतात व त्यांच्या देवतांनाही वस्त्रे नेसवतात. दिगंबर साधू व देवता विवस्त्र असतात. दिगंबर व श्वेतांबर यांच्यातील स्त्री विषय दृष्टीकोन पाहण्यासाठी १९ वे तीर्थंकर मल्लीनाथ यांची कथा अत्यंत उपयुक्त ठरते. दिगंबर पंथीयांच्या मते मल्लीनाथ पुरुष होते. श्वेतांबर मात्र मल्लीनाथ म्हणजे मल्ली नावाची राजकुमारी होती. म्हणजेच स्त्री होती असे मानतात. दिगंबर पंथातील कठीण नियमांमुळे त्यामध्ये मुनींची अथवा साधूंची संख्या कमी दिसते. श्वेतांबर पंथात मुनींची संख्या अधिक असते. दिगंबर जैनांमध्ये ५३ अवस्थांतून किंवा ५३ संस्कारातून आत्म्याने प्रगत व्हावे असा नियम आहे. मृत्युनंतर स्वर्गप्राप्ती व जन्मकाळी सृष्टीत होणारे सुंदर परिणाम इत्यादी गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. या अवस्थांमधून प्रगत होत गेलेला आत्मा तीर्थंकर अवस्थाही प्राप्त करू शकतो. यात हळुहळु अर्हंत अवस्था प्राप्त होत व शेवटी मोक्ष प्राप्त होतो अशी कल्पना आहे. श्वेतांबर जैनांमध्ये या अवस्था १६ मानल्या आहेत. सोळाव्या शताकांतील 'आचारदिनकर' इत्यादी श्वेतांबरी जैनधर्मात याचे वर्णन सापडते. श्वेतांबर व दिगंबर दोन्ही पंथांतील लोक मृत शरीर जाळतात. अस्थि आणि रक्षा तीर्थांच्या ठिकाणी पाण्यात विसर्जित केल्या जातात. दहनासंदर्भात हिंदू व जैन संस्कारात विशेष अंतर दिसत नाही. दहा दिवसांचे सुतक पाळण्याची पद्धतसुद्धा सारखीच आहे. दिगंबरामध्ये मुनींचे तीन वर्ग आहेत. त्यांना अणुव्रत,महाव्रत आणि निर्वाण असे संबोधतात. अणुव्रत धारण करण्याऱ्या मुनीने घरदार सोडून देवळात राहिले पाहिजे. उपविताचा त्याग,केशमोचन आणि साधी राहाणी त्यांनी स्वीकारली पाहिजे. केशरी रंगाची वस्त्रे परिधान करुन जवळ मातीचे भिक्षापात्र ठेवले पाहिजे. जवळ असलेल्या मोरपिसाच्या पंखांनी चालताना पुढचा रस्ता झाडला पाहिजे. पायाखाली एखादा जीव चुकूनही सांपडू नये अशी दक्षता त्याने घेतली पाहिजे. महाव्रत मुनींनी केवळ लज्जारक्षणा पुरते वस्त्र धारण करावे. त्याचे केशलोचन शिष्यांकडून एकेक केस मूळासकट उपटून केले जाते. तळहातावर राहिल एवढाच भात दिवसातून एकदा खाऊन महाव्रतांनी राहावयाचे असते; परंतु निर्वाण मुनींनी फक्त दिगंबर अवस्थेतच राहिले पाहिजे. दिगंबर मुनींनी दिवसातून एकदा,कोणीतरी हातावर दिलेला भात खाऊन दिवस काढावयाचे असतात. सूर्यास्तानंतर त्यांनी हलूसुद्धा नये असा नियम आहे. शिष्यांकडून त्यांचे केशलोचन होते. श्वेतांबर साधू श्वेत वस्त्रे परिधार करुन तोंडाला कापडाची पट्टी बांधतात. हातात चावरी असते. चावरीने रस्ता स्वच्छ करुन ते पुढे चालतात. मुनी आणि अर्जिंकांचे केशलोचन झालेले असते. दिगंबर पंथाची पीठे (गाद्या) कोल्हापूर,लातूर,कारंजा इत्यादी ठिकाणी आहेत. श्वेतांबर पंथाची पीठे किंवा मठ कोठेही नाहीत. श्वेतांबर पंथाचा प्रचार-प्रसार हा उत्तर भारतात म्हणजेच गुजराथ,काठियावाड इत्यादी भागात अधिक झाला. तर दिगंबर संप्रदाय दक्षिण भारतात अधिक लोकप्रिय ठरला. दोन्ही संप्रदायात जातीव्यवस्था असलेली दिसते. तसेच त्यांची कुलदैवते व कुलगोत्रे परंपरेनुसार चालत आली आहेत.  श्वेतांबर आणि दिगंबर अशा प्रमुख दोन पंथाप्रमाणेच इतर काही उपपंथ जैन धर्मात कालौघात निर्माण झाले. त्यांच्यातील भेद पाहत असतांना एक गोष्ट लक्षात येते की, जैन धर्माचा प्रत्येक पंथात जातीभेदाविषयी मात्र साम्य आहे. भगवान महावीरांनी ज्या प्राग्वैदिक व अनार्य तत्त्वज्ञानाचा उद्घोष केला. वैदिक परंपरेत निर्माण झालेल्या वर्ण-जाती भेद आणि स्त्री-पुरुष विषमता यांना विरोध केला. जैन धर्मात अशा कोणत्याच भेदांना स्थान नाही,याचे वेळोवेळी प्रतिपादन केले. असे असले तरी जैन धर्म कालातंराने वैदिक परंपरेत निर्माण झालेल्या चातुर्वण्य व जात उतरंडीत अडकला. ही मोठी आश्चर्य वाटावी अशी गोष्ट आहे. जैन धर्मात निर्माण झालेले जातीभेद यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या 'डिसकव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथात केलेला दिसतो. त्यानुसार जैन धर्माचा इतिहास पाहतांना असे लक्षात येते की,कांही राजांनी जैन धर्म स्वीकारला की त्यांच्या राज्यातील प्रजाही जैन धर्माकडे वळत असे. कांही वेळा बहुसंख्य प्रजा जैन धर्माकडे वळलेली पाहून राजाही जैन धर्माचा आदर करू लागे. असे प्रसंग प्राचीन काळातील राज्यव्यवस्थेत अनेक वेळा दिसून येतात. अशा धार्मिक घडामोडीत जातीव्यवस्थेला फाटा देण,तिचे निर्मूलन करणे जैनांना शक्य झाले नाही. उलट जैन समाजातच जाती व्यवस्थेने घर केले. जैनांना मान्य झालेल्या मूळच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत इसवीसनाच्या तेराव्या ते पंधराव्या शतकांत जातीव्यवस्थेनेही मूळ धरले. व्यावसायिक जैन जातीसमूहांचेच रूपांतर जातीव्यवस्थेत झाले. वायव्य प्रांतांकडील प्रदेशांत जैन व हिंदू यांच्यात विशेष फरक दिसून येत नसे. इतकेच नव्हे तर त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार रुढ होऊ लागले. जैनांमधील कित्येक जाती वैष्णवांच्या रुढी पाळू लागल्या. जैन व वैष्णवांचे विवाह होऊ लागली. कित्येक जैन कुटुंबांमध्ये हिंदु आचार-विचार पाळले जाऊ लागले. एकाच आडनांवाच्या घराण्यातील परस्पर नातलग असलेल्या लोकांत कोणी जैन तर कोणी वैष्णव अशी सरभेसळ उत्तर भारतात झाली. परंतु दक्षिणेकडे कांही विशिष्ट जाती संपूर्ण जैन झाल्यामुळे त्या स्वतंत्र जैनजाती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. दक्षिणेकडील जैनजाती एकरूप झाल्या नाहीत. यावरुन दक्षिणेकडे भक्तिपंथाचा विरोध करतांना विशिष्ट जाती जैनधर्माला चिकटून राहिल्या. जातीय वैमनस्य याच्या मूळाशी असावे. तेराव्या चौदाव्या शतकापर्यंत हे वैमनस्य टिकून होते. हे तत्कालीन इतिहासावरून कळून येते. जेंव्हा विजयनगरचा राजा बुक्काराय होता तेंव्हा इ.स.१३३८ मध्ये वैष्णव व जैनांच्या विरोधात त्याने मध्यस्थी केली व दोन्ही पंथांना शांततेने आपापली धर्मतत्त्वे पाळण्याचा आदेश दिला, हे इतिहासावरून कळून येते. त्याचवेळी उत्तरेकडील जैनांमध्ये काही लोकांनी धार्मिक विधींमध्ये उपाध्यय किंवा पुरोहित म्हणून काम करण्याची पद्धती निर्माण झाली होती. त्यांनी ब्राह्मणांप्रमाणे वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. दक्षिणेत मात्र कोणत्याही जातीतील जैन व्यक्ती हे कार्य करीत व त्यांना स्वतंत्र मोठेपणा दिले जात नसे. इसवीसनाच्या नवव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत दक्षिणेकडील दिगंबर जैन लोक ''पंचम' म्हणून ओळखले जात. अर्थात जैनांना मान्य असलेल्या चातुर्वर्ण्याहून हीन हा पाचवा वर्ण होय अशी समजूत होती. तसेच  पंचम म्हणजे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारे लोक,असा ही एक अर्थ घेतला जातो. विधवा विवाहाला मान्यता देतो म्हणून जैनसमाज पंचम लोकांना हलका समाज मानत असे. परिणामतः अनेक पंचम लोक शैवपंथात सामील झाले. विशेषतः लिंगायत झाले. लिंगायतांमध्ये जातीभेद पाळला जात नसे. लिंगायतांनी देखील जैनांची अनेक तत्त्वे जशीच्या तशी उचलली व त्यांना आपल्या पंथात मान्यता दिली. लिंगायतांपैकी बरेच लोक मूळचे जैन असावेत. त्यांपैकी बरेच लोक व्यापार-उदिम करतात. यावरूनही जैनांपैकी बरेच लोक लिंगायत झाले असावेत असे म्हणता येते. भारताच्या प्रदीर्घ इतिहासात भगवान महावीर,भगवान बुद्ध,महात्मा बसवेश्वर,चकधर स्वामी,गुरू नानक,गोरक्षनाथ अशा द्रष्टया महापुरूषांनी वर्णभेद,जातीभेद,स्त्री-पुरूष विषमता,सामाजिक-धार्मिक शोषण याविरुद्ध क्रांतीचा उद्घोष केला. त्यांच्या विचारांचे व आचरांचे विस्मरण होऊन भारतीय समाज पुन्हा-पुन्हा वर्ण-जाती-लिंग भेदाच्या खुटयाला बांधण्यात आला किंवा ज्यांच्यासाठी या महापुरुषांनी आपल्या आयुष्यांची आहूती दिली, त्यांनीच स्वतःला या कृत्रिम बंधनांमध्ये बांधून घेतले. त्या न्यायानेच जैन धर्मातही जातीभेद फोफावाला जैनांमध्ये पुरोहित वर्ग निर्माण झाला. तीर्थंकरांचे तत्त्वज्ञानं-आचरण-वचने आणि मुनींनी दिलेला धार्मिक उपदेश यांच्यात उपभेद निर्माण झाले किंवा त्यांचे विस्मरण झाले. दिगंबर-श्वेतांबर या भेदापासून जैन धर्म एकसंध राहिला नाही. जैन धर्माच्या पायाभरणीत असलेली जातीपाती विरुद्ध एकतेची शिकवण मागे पडली आणि जाती भेदाचे प्रमाण वाढतच गेले. एवढेच नव्हे तर उच्चनीचतेच्या कल्पनासुद्धा जैनांनी स्वीकारल्या. आज श्वेतांबरांतील कोणत्याही जातीत पांचशेहून अधिक कुटुंबे नाहीत, तर दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही पंथात कांही जाती केवळ १० ते १२ कुटुंबांच्याच आहेत.  एके काळी बहुजनांचा असलेला हा धर्म आज अल्पसंख्याकांचा धर्म होतो. एका आधुनिक विचारांच्या धर्माची ही अवस्था निश्चितच चिंतनीय अशी आहे.  भेदाभेद - भ्रम अमंगळ या आपल्या मूलभूत संकल्पनेकडे पुन्हा वाटचाल केल्यास जैन धर्माचे क्षितीज नक्कीच विस्तारेल यात शंका नाही.
प्रा.डॉ.राहुल हांडे,                                      भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
    


Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !