जगातील सर्वात तरुण धर्माची जन्मभूमी


हजारो वर्षांपासून भारतीय भूमीचा एक भूभाग सदैव रक्ताळलेला आहे. आाज ही या भूमीवर रक्त ओघळतच आहे. द्रविड,आर्य,ग्रीक,शक,पार्थियन्स,आयोनियन्स,बॅक्टि्रयन्स,हूण,मुसलमान आणि इतर अनेक लहान-सहान आक्रमणांना सर्वप्रथम छातीवर घेणारी ही मातीच काय,तर या भूमीवरून वाहणा-या रावी,चिनाब,सतलज,बियास आणि झेलम या  पाच नदयांचे पाणी देखील लाल झाले होते. सिंधू आणि यमुना या नदयांच्या मधल्या भागातून वाहणा-या पाच नदयांनी वेढलेला हा भाग म्हणजे पंजाब. चिरंतन संघर्ष हा पंजाबचा स्थायी भावच झालेला दिसतो.  याला कारण भारताच्या नकाशात त्याचे असलेले स्थान. पंजाबच्या उत्तर व पश्चिम दिशेला हिमालयाच्या रांगा दिमाखाने भारताचे संरक्षण करतात. हिमालयाच्या रांगांनी भारताचे संरक्षण जेवढे केले आहे,तेवढेच त्याच्यातील खिंडीनी आक्रमकांना भारताच्या भूमीवर येण्यासाठी वाट देखील दिली आहे. हिमालयातील काही खिंडी प्रागऐतिहासिक काळापासून यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत. खैबर खिंड तर भारताच्या इतिहासातील सर्वज्ञात खिंड म्हणता येते. हिमालयाच्या दुर्गम पर्वतराजींमधून येणारा प्रत्येक आक्रमक पहिल्यांदा ज्या सखल भागात पोहचला तो म्हणजे पंजाब. त्यामुळे विरोध,संघर्ष,अशांतता,अस्वस्थतता, अस्थिरता,लढा इत्यादी पंजाबी धरतीचे व्यवच्छेदक लक्षणे ठरली. भारताच्या इतिहासात सर्वाधिक मोल चुकवलेली ही धरती, हिमालयाच्या भिंतीच्या अलिकडे सिंधू आणि यमुना या दोन मोठया नदयांच्या मधल्या भागात पसरलेली आहे. रावी,चिनाब,सतलज,बियास आणि झेलम या पाच नदयांनी या भूमीला सुजलाम-सुफलाम केले. अशा भौगोलिक वैशिष्टयांमुळे पंजाब देशाच्या सुमारे ९०% जनतेचा पोशिंदा आहे आणि भारतीय सैन्याचा कणा आहे. शेतकरी व सैनिक यांना जन्म देणारी ही भूमी म्हणता येते. पंजाबच्या उत्तर आणि पश्चिम सीमा हिमालयाने निश्चित केल्या आहेत,तर दक्षिण - पूर्वेला अनुक्रमे सिंध आणि राजपुताना ही राज्ये व पंजाब यांच्यामध्ये मैलोन मैल पसरलेली कोरडवाहू जमीन आहे. सिंध व राजस्थान यांची कोरडवाहू जमीन आणि वाळवंट हे पंजाब त्यांच्यापासून भाषा,संस्कृती आणि जीवनदृष्टी याबातीत वेगळा ठरतो. हा फरक दोन्हीकडच्या लोकांमध्ये तीव्रतेने जाणवतो. पंजाबचे त्याच्या पूर्वेकडील भागाशी एवढे वेगळेपण जाणवत नाही. हे वेगळेपण असलेच तर भाषा आणि पंजाबी असल्याची वा नसल्याची जाणीव ऐवढयापुरतेच मर्यादित दिसते. असा आहे भूगोलाने घडवलेला वर्तमानातील पंजाब. पुरातत्त्व,मानववंशशास्त्र,समाजशास्त्र इत्यादींच्या दृष्टीकोनातून पंजाबचा शोध घेणे देखील तेवढेच महत्वाचे ठरते. अतिप्राचीन-प्राचीन भारताच्याबाबतीत कोण कुठला मूळ रहिवासी? तो कोणत्या वंशांचा? भारतात कधी आला? तो कधी राज्य करत होता? अशा प्रश्नांचा शोध घेणे आजही सुरूच आहे. पंजाबच्या बाबतीत तर असे प्रश्न ऐतिहासिकदृष्टया आणखीच गुंतागुंतीचे आहेत. सिंधू नदीच्या जवळ असल्याने मोहंजोदारो-हडप्पा यांच्यापासून हा शोध सुरू होतो. पुरातत्व शास्त्राच्या अनुमानानुसार मोहंजोदरो-हडप्पा संस्कृती ख्रिस्तपूर्व ३००० वर्षे जुनी आहे. हडप्पा तर पंजाबमध्येच आहे. द्रविडांनी ही समृद्ध संस्कृती निर्माण केली. त्यामुळे या दोन शहारातील लोक द्रविड होते. द्रविड देखील उत्तरेकडून आलेले होते. त्यांच्यानंतर सुमारे एक हजार वर्षांनी आलेल्या आर्यांनी त्यांचा पराभव करत,त्यांना भारताच्या पूर्व व दक्षिण दिशांना लोटले. त्यानंतर उत्तर भारत आर्यांचा झाला. त्यात द्रविडांचा पंजाब देखील आर्यांचा झाला. आर्यांनंतर सिंकदराची स्वारी आली. त्यामुळे ग्रीक पंजाबच्या सिमेपर्यत म्हणजे सिंधू पर्यंत पोहचले. मग शक,पार्थियन्स,आयोनियन्स,बॅक्टि्रयन्स,हूण इत्यादी इत्यादी आले. भारतीय भूमीवर त्यांचा पहिला मुक्काम पंजाबातच घडला. आक्रमकांच्या प्रत्येक लाटेसोबत त्यांचा वंश,धर्म,भाषा आणि चालीरीती देखील पंजाबच्या भूमीवर वाहत आल्या. त्यातील काही पुढे वाहत गेल्या,तर काही पंजाबातच अडल्या. पंजाबाने अशा सर्व लाटा सोसल्या. अशा अनेक आक्रमक लाटांच्या भरतीत पंजाबची माती वाहून गेली नाही,तर ती अधिक दमदार-कसदार झाली. या मातीनेच पंजाबची निधडी छाती देखील घडवली. सदैव संकटांचा सामाना करून माणसांची छाती कितीही निधडी झाली असली,तरी जगण्याची वा अस्तित्वाची भीतीही कायम त्यांची सोबत करत असते. कवींना कवनांसाठी,चित्रपटवाल्यांना कथांसाठी आणि इतर देशवासीयांना स्फुरण येण्यासाठी त्यांचे जीवन सदैव आकर्षित करत असते. हे आकर्षण वेगळे आणि रोजच्या जगण्याचे प्रश्न-समस्या वेगळया असतात. अशा भागात जगतांना एक प्रकारची काळजी व अस्वस्थता कायम अंर्तमनाला पोखरतच असते. हिमालयाच्या खिंडींनी आक्रमकांना पंजाबच्या आंगणात आणून सोडल्या इतिहासा प्रदीर्घ आहे. आपल्या डोळयांसमोर घरदार,जमीन व गाव यांची मनमुराद लूट करणारे आक्रमक आणि पंजाबकडे पाठ करुन बसलेले स्वकीय त्यांनी सदैव अनुभवले. आपण देशाच्या सरहद्दीवर राहत असल्याची भावना पंजाबी समाजात कायमची दृढ झाली. दर काही वर्षांनी खिंडींमधून येणा-या विनाशकारी वादळाचा अंदाज घेण्यासाठी पंजाबची दृष्टी सतत खिंडीवर खिळलेली राहिलेली होती. सुपीक जमीन,मुबलक पाणी व आरोग्यदायक पर्यावरण अशी अनुकुल परिस्थिती सदैव हात जोडून उभी असली,तरी हे सुख सलग व प्रदीर्घ काळ पंजाबला कधीच उपभोगता आले नाही. निसर्ग काळया मातीचे सोने पिकांच्या रूपाने दोन्ही हातांनी येथे उधळत आलेला आहे. मात्र सततची  अशांतता व संघर्ष याच्यांमुळे पंजाबची मानसिकता अस्थिर होत गेली. परंतु त्याबरोबरच देशाच्या संरक्षणाचा भार आपल्या शिरावरच आहे,ही भावना प्रबळ झाली. देशाच्या संरक्षणाची प्रमुख जबाबदारी असणारा पंजाब अशी सखोल जाणिव पंजाबी समाजाच्या नेणिवेत कायमची घर करून बसली. स्वदेशाभिमान व मातृभूमीचे संरक्षण याच्यासाठी सदैव सर्वस्वाचे मोल चुकवलेल्या पंजाबच्या मनात आक्रमकांविषयी कडवटपणा तर होताच,परंतु ज्यांच्यासाठी आपण छातीची ढाल करून सतत उभे राहत आलो त्या स्वकियांबद्दलही आपुलकी शिल्लक राहिली नव्हती. याचे महत्वाचे कारण उर्वरित देशाने पंजाबविषयी दाखवलेली उदासिनता व तटस्थता हे होते. आपल्या तलवारीवर देशाचे नशीब व भवितव्य जपणा-या-तोलणा-या पंजाबची कदर व साहय्यता याची काळजी इतरांनी केली नाही. त्याच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता कोणाला वाटली नाही. स्वकियांच्या अशा फटकून व बेफिकीर वागण्याने नकळतपणे त्याचे स्वकियांविषयी प्रेम आटत गेले. पंजाबच्या बळावलेल्या अशा मानसिकतेला खतपाणी घालून स्वतःची पोळी भाजणा-यांनी पंजाबला भरकटवण्यात यश मिळवले. त्याची रक्तरंजित अनुभूती १९८० पासून सुमारे दोन दशक देशासह जगाला आली. भारताच्या शहिद-ए-आझम भगतसिंगांचा पंजाब वेगळा प्रपंच थाटण्याची भाषा करू लागला. त्यावेळी पंजाबच्या बलिदानाचा देशात नव्याने विचार होण्यास प्रारंभ झाला.हळुहळू परिस्थिती सावरली. तो इतिहास आणि त्याची कारणमिमांसा हा वेगळा भाग आहे. स्वतःच्या हिंमतीवर व शौर्यावर स्वतः समवेत स्वदेशाचा जतन करणारा पंजाबी समाज कोणत्याही संघर्षात डगमगला नाही. याचा प्रत्यय आपल्याला  इंग्रंजांच्या काळापासून ते आजपर्यंत जगण्यासाठी देशाच्याच नव्हे,तर जगाच्या विविध भागात पोहचलेल्या या समाजाच्या प्रगतीवरून येतो. आज अमेरिका-कॅऩडामधील जवळपास ६०% जमीन पंजाब कसत आहे. मोहंजोदारो-हडप्पाच्या काळापासून आक्रमणांबरोबरच व्यापाराचा परिचय पंजाबला झालेला होता. त्यामुळे पंजाबमध्ये जुन्या काळापासून अनेक व्यापारी शहरे निर्माण झाली. ज्या व्यापारी व व्यावसायीक वृत्तीचा लाभ पंजाबी समाजाला मिळालेला आहे. पंजाब जसा योद्धयांच्या तलवारीने जगला,शेतक-यांच्या तिफणीने बहरला,तसाच तो संत-माहात्म्यांच्या एकतारीवर घडला. जगातल्या सर्वात तरुण असणा-या शीख धर्माची जन्मभूमी ठरला. अनेक आक्रमणे पचवलेल्या पंजाबला ईस्लामी आक्रमणाने मात्र ढवळून काढले. यापूर्वी झालेल्या आक्रमणांपेक्षा हे आक्रमण वेगळे होते. राजकीय महत्त्वकांक्षेसोबतच धर्मप्रसाराचा हेतू त्यामागे होता. अशावेळी दोन पुर्णपणे भिन्न धर्मपरंपरा आणि संस्कृती यांच्या संघर्षात  सर्वप्रथम व प्रदीर्घ काळ पंजाब होरपळून निघाला. अशावेळी गुरू नानकादेवांच्या स्पर्शाने पंजाबच्या रक्ताळलेल्या भूमीची वेदना क्षमली. रावी-सतलज-चिनाब-बियास-झेलम यांच्या प्रवाहांमधून पुन्हा पाणी वाहू लागले. प्रेम व सेवा यांच्या आधारे नानकदेवांनी शीख धर्माची पायाभरणी केली. समन्वयाचा एक जगावेगळा आदर्श त्यांनी जगासमोर उभा केला. निगुर्ण-निराकार एकेश्वराच्या साधनेचा सुलभ-सुगम मार्ग दिला. गुरू गोविंदसिंगानी पंजाबच्या क्षात्रतेजाला शीख धर्माचे कोंदण दिले. ग्रंथालाच गुरू आणि पूजनीय मानणारा हा जगातील एकमेव धर्म ठरला. मध्ययुगीन भारताच्या भक्ती आंदोलनातील सर्व प्रवाहांचा महासमन्वय म्हणजे गुरूग्रंथ साहेब,असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मराठी मातीतील भागवत धर्माचे समन्वयक संतश्रेष्ठ नामदेवांच्या दोहयांचा समावेश असलेल्या गुरूग्रंथ साहेब म्हणजे सिंधू आणि चंद्रभागेचा संगमच म्हणावा लागतो. भौगोलिकदृष्टया शक्यतेच्या पल्याड वाटणा-या हया संगमाचा उगम रावी नदीच्या काठावर अवतरलेल्या नानकदेवांच्या विशाल हृदयात असलेला  दिसतो.
डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी - 8308155086

Comments

  1. आर्य म्हणजे सध्याचे कोण ? द्रविड म्हणजे नेमके कोण ?हेही स्पष्ट झाले असते तर अधिक चांगले होईल.तसेच मनुस्मृती नुसार सप्तबंदीच्या कायद्यांनी विषमता वाढत गेली.ही विषमता नष्ट करण्यासाठी उदा.शस्त्र हाती घेण्यास बंदी होती म्हणून कायमच शस्त्रासह राहणे (कृपाण धारण करणे)हे नियम शीख धर्मात केले गेले.व विषमता रसातळाला गाडली.

    ReplyDelete
  2. शिख धर्म स्थापना हा भक्ती मार्ग नसून क्रांती मार्ग आहे. जाती व्यवस्था उद्ध्वस्त करुन मानवता व्यवस्था निर्माण करणे हाच मुख्य उद्देश शिख धर्म स्थापनेचा दिसतो. वैदिक धर्म व्यवस्था नाकारणे हाच शिख धर्म स्थापनेचे मुख्य लक्ष आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !