अमेरिकेचा खबरनामा...

 ज्या बोस्टन शहराने अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाला जन्म दिला, त्याच बोस्टनमध्ये अमेरिकेतील पहिल्या वृत्तपत्राचा जन्म झाला.१४३९ साली जर्मनीतील योहानेस गुटेनबर्ग याने सरकत्या छपाई यत्रांचा म्हणजेच आजच्या भाषेत प्रिटिंग प्रेसचा शोध लावला. त्याच्या शोधाने जग बदलवले असे म्हणण्यात काहीही वावगे नाही. गुटेनबर्ग हा एका अर्थाने आजच्या आधुनिक जगातील प्रसार माध्यमांचा जनक ठरतो. त्याच्या शोधाने छपाईला जो वेग दिला,त्यामुळे जगाला वेग मिळाला. त्याने निर्माण केलेल्या प्रिटिंग प्रेसवर त्याने सर्वप्रथम बायबलच्या २०० प्रती छापल्या,जे बायबल आज गुटेनबर्ग बायबल म्हणून जगात ओळखेले जाते. त्याच्या या पहिल्या छपाईने ख्रिश्चन धर्माच्या जागतिक प्रचार-प्रसाराला पंधराव्या शतकाचा विचार करता प्रचंड वेग मिळाला. गुटेनबर्ग बायबल घेऊन ख्रिश्चन धर्मगुरू जगाच्या विविध भागात पोहचले,म्हणजे ख्रिश्चन धर्म त्या भागांमध्ये पोहचला. हस्तलिखित तयार करण्याच्या काळापर्यंत हे शक्य नव्हते. गुटेनबर्गला आज कोणी गॅलिलीओ,न्यूटन,आईनस्टाइन इत्यादी महान शास्त्रज्ञांच्या मांदियाळीत फारसे महत्व देत नाही. असे असले तरी जगातील सर्व क्षेत्रातील महान लोकांना ग्रंथरूपाने जगापर्यंत पोहचविण्याचे काम सर्वप्रथम गुटनेबर्गच्या शोधाने केले. यामुळेच हिस्टरी चॅनलने मागील एक हजार वर्षात जगावर सर्वाधिक प्रभाव टाकणा-या शंभर व्यक्तींमध्ये प्रथम स्थानावर योहासेन गुटेनबर्गला स्थान दिले. गुटेनबर्गच्या प्रिटिंग प्रेसच्या शोधानंतर ग्रंथछपाईला वेग तर आलाच,तसेच आधुनिक जगातील पहिल्या प्रसार माध्यमाच्या  म्हणजेच वृत्तपत्रांच्या जन्माचे बीजं देखील रूजले. गुटेनबर्गच्या जर्मनीतच १६०५ मध्ये जोहान कॅरोलसने 'रिलेशन एलआर फॅरनेममेन उंड गेडेन्कवार्डिग हिस्टोरियन' (सर्व विख्यात आणि संस्मरणीय बातम्यांचा लेखाजोखा) नावाचे पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले. येथूनच जगातील वृत्तपत्रांचा जन्म झाला. या घटनेनंतर बरोबर शंभर वर्षांनी नव्याने जन्माला आलेल्या अमेरिकेतील बोस्टन शहरात अमेरिकेचे पहिले वृत्तपत्र प्रसिद्ध झाले. The Boston News-Letter (द बोस्टन न्यूज लेटर) हे वसाहतकालीन अमेरिकेचे पहिले वृत्तपत्र ठरले. २७ एप्रिल १७०४ ला जॉन कॅम्पबेल यांनी हे वृत्तपत्र काढले होते. प्रारंभी हे वृत्तपत्र साप्ताहिक होते. अर्ध्या पानावर दोन्ही बाजूने छपाई असे त्याचे स्वरूप होते. ब्रिटिश सरकारच्या आर्थिक  साहयाने कॅम्पबेल यांनी हे वृत्तपत्र सुरू केले होते. यापूर्वी अमेरिकन वसाहतीत २५ सप्टेंबर १६९० ला Publick Occurrences Both Forreign and Domestick नावाचे एक वृत्तपत्र सुरू झाले होते. त्यादिवशीचा एकमेव अंक काढून ते कायमचे बंद झाले. आपण त्याला एका दिवसाचे वृत्तपत्र देखील संबोधू शकतो. काही अभ्यासक त्याचाच पहिले अमेरिकन वृत्तपत्र म्हणून उल्लेख करतात. प्राथमिक अवस्थेत द बोस्टन न्यूज लेटर एका अर्थाने सरकारी वृत्तपत्र होते. प्रसिद्धीपूर्वी त्याच्या सर्व प्रतिंना गर्व्हनरची मान्यता घ्यावी लागत असे. हे वृत्तपत्र १७०४ पासून १७४१ पर्यत सुरू होते. द बोस्टन न्यूज लेटर हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले वृत्तपत्र तर ठरलेच तसेच सुमारे ४० वर्षे यशस्वीपणे चालले वृत्तपत्र देखील ठरले. द बोस्टन न्यूज लेटरचे एक अत्यंत महत्वाचे वैशिष्ट म्हणजे राजाश्रयाने जन्मास आलेले  हे वृत्तपत्र सदैव राजसत्तेचे गुलाम राहिले नाही. पत्रकारिता आणि वृत्तपत्र यांचा मूलभूत गाभा असलेल्या  तटस्थ सत्यान्वेषण,निर्भीडता,निर्भीकता आणि पारदर्शकता अशा गुणांचे दर्शन कालातंराने या वृत्तपत्राने घडवले. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रारंभापर्यंत सुरू असलेल्या या वृत्तपत्राने क्रांतीची भूमी निर्माण करण्यात नकळतपणे योगदान दिले. १७३२ मध्ये जॉन ड्रापर याच्याकडे या वृत्तपत्राची सूत्रे आली. त्याने हे वृत्तपत्र चार पानाचे केले आणि अमेरिकेतील सर्व वसाहतींमधील घडामोडी देण्यापर्यंत त्याची व्याप्ती वाढवली. १७७२ मध्ये ड्रापरचे निधन झाले. त्यामुळे ब्रिटिश सरकारधार्जिण असलेला त्याचा मुलगा रीचर्ड हा वृत्तपत्राचा प्रमुख झाला. १७७० च्या अत्यंत वादळी काळात त्यांने आपल्या मातृभूमीची बाजू घेणारी भूमिका आपल्या वृत्तपत्रामधून घेतली. १७७४ ला रीर्चडच्या निधनानंतर त्याची पत्नी मार्गारेट ग्रीन ड्रापर द बोस्टन न्यूज लेटरची मालक झाली. मार्गारेट ही अमेरिकेतील मुद्रण क्षेत्राचा जनक सॅम्युअल ग्रीन याची पणती होती. अमेरिकेतील मुद्रण क्षेत्रात ग्रीन घराण्याचे खूप मोठे व मौलिक योगदान राहिले आहे. अशा ग्रीन घराण्यातील मार्गरेटला अमेरिकेतील बदलेले वारे लक्षात घेता आले नाही. त्यामुळे ती देखील आपल्या पतीप्रमाणे ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ राहिली. १७ मार्च १७७६ ला इंग्रंजांना  बोस्टन सोडावे लागले. त्यावेळी मार्गारेटही त्यांच्यासोबत इंग्लंडला गेली आणि तिथेच तिने  अखेरचा श्वास घेतला. द बोस्टन न्यूज लेटर अमेरिकन सरकारकडून कायमचा बंद करण्यात आला. यामुळेच प्रसार माध्यमे आणि पत्रकार यांनी कायम जनतेचा आवाज म्हणून काम करणे हा या क्षेत्राचा धर्म सांगितला जातो. प्रत्येक क्षेत्राप्रमाणे अधर्म करणा-यांना याची किंमत चूकवावीच लागते. द बोस्टन न्यूज लेटर नंतर अॅन्ड्रयू ब्रेडफोर्ड याने १७१९ साली अमेरिकन मर्क्यूरी(American Mercury) हे वृत्तपत्र सुरू केले. १७२५ ला न्यूयॉर्क गॅजेट हे वृत्तपत्र सुरू झाले. यानंतर अमेरिकेतील विविध वसाहतींमध्ये वृत्तपत्रांचा प्रसार होऊ लागला. सुरवातीच्या काळातील साधनांची कमतरता,व्यावसायिक स्पर्धा आणि युरोप-अमेरिकेतील वेगवान घडामोडी यामुळे यातील अनेक वृत्तपत्रे बंद झाली. असे असले तरी वृत्तपत्र आणि पत्रकारिता यांच्यावरचा अमेरिकन जनतेचा विश्वास दृढ होत गेला. १७१८ मध्ये द बोस्टन न्यूज लेटर न्यूजने एक बातमी दिली. ती म्हणजे कुप्रसिद्ध इंग्रंज समुद्री चाचा ब्लॅकबर्ड चकमकीत मारला गेला. आजच्या भाषेत ही एनकांऊटरची बातमी होती. ही अमेरिकेतील पहिली सनसनाटी निर्माण करणारी बातमी ठरली. ब्लॅकबर्ड चकमकीत मारला जाणे,हे काही विशेष नव्हते,कारण कायमच गुन्हेगारी प्रवृत्तीचे  लोक त्या-त्या काळातील सुरक्षा यंत्रणांकडून मारले गेलेले आहेत. ब्लॅकबर्ड चकमकीत मारला जाणे,ही वृत्तपत्रामुळे बातमी बनली हे विशेष होते. जिवंतपणीच दंतकथा झालेल्या  ब्लॅकबर्डच्या  चकमकीत झालेल्या हत्येचे वृत्तांकन हे वृत्तपत्राला सनसनाटीचे परिमाण देणारे ठरले. या बातमीमुळे वृत्तपत्रांचा चाहता वर्ग निर्माण होण्यात निश्चितच योगदान दिले असणार,हे नाकारता येणार नाही. सनसनाटीची उत्सुकता हा देखील सामान्य माणसाचा आवडता विषय असतो. त्याकाळात सामान्य माणसाला अशी बातमी घर बसल्या वाचायला मिळणे,याचे अप्रुप आज आपण अनभवूच शकत नाही. वृत्तपत्रात छापल्या जाणाऱ्या इंग्लंड व युरोपातील अन्य देशांतील बातम्या, सार्वजनिक विषयांवर विचार विर्मश करणारे लेख,सदाचार-रितीरिवाज-नैतिक मूल्यं यांवर असलेले लेख यामुळे सामान्य माणसांवर वाचनाचे संस्कार होत गेले. सुरवातीपासूनच  अमेरिकेतील वृत्तपत्रात विविध वस्तूंच्या जाहिराती केल्या जात होत्या. यामुळे अमेरिकन भांडवलशाही बळकट होण्यास सहकार्य झाले.  ब्रिटिश राजसत्तेच्या सर्वकष अधिपात्याच्या कालखंडात जन्माला आलेल्या सर्व वृत्तपत्रांना वसाहतींचे गर्व्हनर,ब्रिटनचे राजे, राजकीय पुढारी इत्यांदींची खफा मर्जी होणार नाही,याची काटेकोर दक्षता घ्यावी लागत होती. अमेरिकन पत्रकारिता व वृत्तपत्रे  जसजसे अनुभवी व प्रगल्भ होत गेले,तसतसे वास्तवाला कायद्याच्या किंवा सत्ताधा-यांच्या कचाटयात सापडू न देता आविष्कृत करण्याचे भाषिक कौशल्य त्यांनी आत्मसात केले. विल्यम कॉस्बी नावाचा एका गर्व्हनर होता. त्याला बोचणारे किंवा अडचणीत आणणारे वृत्तांकन केल्याबद्दल त्याने संबंधीत पत्रकारावर खटला दाखल केला. त्यावेळी जनताच नव्हे तर ज्यूरी देखील पत्रकाराच्या पाठीशी उभी राहिली. जनता आणि न्यायव्यवस्थेने सत्याला-वास्तवाला प्रकट करणा-या पत्रकाराला साथ दिल्याने गव्हर्नर महाशयांना चांगलेच तोंडघशी पडावे लागले. वास्तवाला निर्भीडपणे व्यक्त करणारे प्रसार माध्यमे आणि जनता-न्याय व्यवस्था यांचा त्यांना असलेला खंबीर पाठिंबा ही परंपरा आजही अमेरिकेत अबाधित आहे. यामुळेच अमेरिकेच्या महासत्ता म्हणून प्रवासात आणि वर्तमानात लोकशाहीचा हा चौथा स्तंभ दिमाखाने उभा आहे. अमेरिकन प्रसार माध्यमे खरोखरच खबरदार आहेत,म्हणूनच अमेरिकेची वाटचाल दमदार आहे.


 

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !