प्राग्वैदिक कलेचा समृद्ध जैन वारसा

मोहोंजोदारो आणि हरप्पा संस्कृतीचा काळ हा प्रामुख्याने प्राग्वैदिक व अनार्य म्हणून इतिहासात परिचित आहे. जैन तत्त्वज्ञान व धर्मपरंपरा प्राग्वैदिक व अनार्य म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे मोहोंजोदारो आणि हरप्पा संस्कृतीचा जैन संस्कृतीशी असलेला अनुबंध जैन कलेतून स्पष्टपणे जाणवतो. भारतीय शिल्पकला,चित्रकला व संगीत नृत्यादी कलांवर जैन कलापरंपरेचा प्रभाव पडलेला दिसून येतो. आज भारतात येणा-या परदेशी पर्यटकांचे एक मुख्य आकर्षण म्हणजे आपली लेणी आणि त्यातील शिल्पकला. जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मांनी हा कलेचा समृद्ध वारसा भारतीय संस्कृतीला प्रदान केलेला आहे. भारतात विविध ठिकाणी बौद्ध व जैन लेणी एकाच ठिकाणी अस्तित्वात असलेली दिसतात. इ.स.पूर्व पाचव्या शतकापासून जैन शिल्पकला लेण्यांच्या माध्यमातून विकसित होत गेलेली दिसते. बौद्ध लेण्यांमध्ये भगवान बुद्ध,त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग व बौद्ध कथा कोरण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जैन लेण्यांमध्ये २४ तीर्थंकर आणि धर्मकथा आकारण्यात आलेल्या दिसतात. संपूर्ण भारताचा विचार करता आपल्या महाराष्ट्राला बौद्ध-जैन लेण्यांचा सगळयात मोठा वारसा लाभलेला आहे. लेणी खोदण्यासाठी सहयाद्रीचा कणखर पाषाण अनुकुल होता,तसेच महाराष्ट्रातील जनमानस ही निश्चितच अनुकुल असेल. एखाद्या धर्माचा प्रचंड प्रभाव आणि त्याच्याविषयी सर्वमान्य आस्था असेल तरच त्या धर्माशी निगडित अशा कालजयी कलाकृती निर्माण होऊ शकतात. बौद्ध-जैन हे धर्म इसवीसनापूर्व काळात सहयाद्रीच्या कातळांवरच नव्हे तर त्याच्या कुशीत वसणा-या समाजाच्या मनावर कोरलेले होते. असे प्रतिपादन करणे वावगे ठरणार नाही. भारताच्या विविध भगात जैन-बौद्ध कलेचा समृद्ध वारसा विखुरलेला दिसतो. मौर्य साम्राज्याच्या काळातील दोन प्रस्तर मूर्ती पाटण जिल्हयातील लोहाणीपुरा या गावी सापडल्या आहेत. त्या मूर्तींचा आकार,मुखावरील भाव आणि मूर्तींचा चकचकीतपणा या सर्वात एक असामान्य सौंदर्यदृष्टी असलेली जाणवते. कलेच्या अभयासकांच्या मते भाव प्रकटीकरण करणा-या भारतातील या सर्वात प्राचीन मूर्ती असाव्यात. मोहोंजोदारो आणि हरप्पा येथील उत्खननांत सांपडलेल्या मूर्तीत आणि या मूर्तींमध्ये कलात्मक दृष्टया कमालीचे साधर्म्य दिसून येते. हरप्पा येथील नग्न मूर्ती व या नग्नमूर्ती एकाच काळातल्या असाव्यात,असा काही कलाभयासकांचा कयास आहे. कायोत्सर्ग मुद्रेतील साधकाचे सिद्धावस्थेत परिवर्तन व्यक्त करणा-या या मूर्ती शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. इसवीसन पूर्व एक हजार वर्षांपासून ते इसवीसनाच्या पंधराव्या शतकापर्यंत भारतीय मूर्तीकलेचा झालेल्या विकासाचा आलेख जैन शिल्पकलेच्या माध्यमातून स्पष्ट होतो. मात्र जैनेतर शिल्पकलेचा विकास मात्र यातून कळून येणार नाही. भारतीय शिल्पकलेत जैनशिल्पकला एक स्वतंत्र अस्तित्व दाखवते हे यातून स्पष्ट होते. बौद्ध आणि जैन अनुयायांनी खोदलेली लेणी,इ.स.पूर्व चौथ्या व दुस-या शकतकात प्रामुख्याने बिहार प्रातांत आढळून येतात. त्यानंतर ओरिसा,गुजरात आणि महाराष्ट्र इत्यादी प्रातांत लेणी निर्माण करण्यात आली. भारताच्या विविध भागात विखुरलेली ही लेणी म्हणजे भारतीय शिल्पकलेच्या प्रगतीचा विकास दाखवतात. ओरिसा प्रांतातील उदयगिरी व खांडगिरी पर्वतावरील गुंफेत अनेकमुखी सर्प,स्वस्तिक,जैन कथांतील प्रसंग इत्यादी कोरलेले आढळतात. शिल्पकलेचा वारसा प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत पोचविण्याचे महान कार्य या लेण्यांच्या माध्यमातून जैनांनी व बौद्धांनी केले. लेण्यातील गुंफा,राहण्याच्या खोल्या,सभामंडप अत्यंत थंड व उष्ण वा-यापासून संरक्षण देण्यास योग्य असल्यामुळेच प्रचंड प्रमाणांत हे खोदकाम होत गेले. प्राचीन काळी लेण्यातून राहाण्याची व धर्मोपदेश देण्याची पद्धत असल्यामुळे मंदिरे कमी बांधली गेली. त्याचप्रमाणे प्राचीन भारताचा व्यापार आणि लेणी यांचा संबंध देखील दिसून येतो. महाराष्ट्रातील लेण्यांचाच जरी आपण विचार केला,तरी ही गोष्ट लक्षात येऊ शकते. महाराष्ट्रातील जैन-बौद्ध लेणी जवळपास सोबतच खोदलेली दिसतात. तसेच ही लेणी प्रामुख्याने प्राचीन व्यापारी मार्गांवर खोदण्यात आली आहेत. प्रत्येक धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी आर्थिक पाठबळ अत्यंत महत्वाचे असते. जैन-बौद्ध धर्मांच्या प्रभावकालात व्यापारी वर्गाने या धर्मांना आर्थिक रसद पुरवली होती. त्यामुळे ही लेणी धार्मिक केंद्र तर होतीच मात्र व्यापारी मार्गावर व्यापारी सार्थांसाठी (व्यापारी तांडे) निवारा-विश्रांतीची ठिकाणं देखील होती. धर्म आणि व्यापार अशा दुहेरी हेतूने लेण्यांची उपयुक्तता सिद्ध झाल्यानंतर लेण्यांतील गुंफा,राहण्याच्या खोल्या,सभामंडप यांची निर्मिती मोठया प्रमाणात होऊ लागली. साधकांना आणि व्यापा-यांना थंडी-उष्णता-पाऊस यांच्यापासून संरक्षण देण्यास योग्य सोयी लेण्यांमध्ये निर्माण करण्यात आल्या. प्राचीन काळी जैन मुनी लेण्यांमध्ये राहत आणि धर्मोपदेश करीत असत. त्यामुळे याकाळात मंदिर हा प्रकार जैन धर्मात निर्माण होऊ शकला नाही. लेण्यांमध्ये वास्वव्य करणारे मुनी श्रावकांच्या घरी जाऊन उपदेश देत. आजही ही प्रथा रूढ आहे. मात्र मध्यकाळात जैन धर्मात लेण्यांऐवजी मंदिरे बांधण्याचे प्रमाण वाढले. बौद्ध स्तूपांप्रमाणे जैनांनी देखील स्तूपांची निर्मिती केलेली दिसते. चौकोनी स्तूपावर जिन प्रतिमांचे शिल्प असते. अशा काही प्लेटसुद्धा सापडल्या आहेत. त्यावर पाया घालणे,खांब उभे करणे,प्रतिमांसाठी मध्य राखून ठेवणे इत्यादी गोष्टींचे अचूक मार्गदर्शन केलेले दिसून येते. तक्षशिला,बिहार आणि मध्यप्रदेशात असे स्तूप आढळतात. बौद्ध धर्मांच्या स्तूपांची संख्या मात्र अधिक आहे. जैन लेणी भारताच्या विविध प्रातांत असली,तरी बदामी,ऐखोल,नाशिक इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. जैन मंदिरांच्या बांधकामात द्रविडियन वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. पर्वतांवर व त्यांच्या उतरणीवर बांधलेल्या देवळांच्या बांधकामात हा प्रभाव प्रामुख्याने जाणवतो. सुंदर शिल्पांनी नटलेल्या भिंती,स्तंभ व शिखरांतून शिखर अशा प्रकारची ही शिल्पं अत्यंत प्रेक्षणीय वाटतात. दक्षिण भारतातील जैन मंदिरे वैशिष्टयपूर्ण अशी आहेत. म्हैसूर प्रांतातील जैन मंदिरांचा विचार येथे त्यांच्यावरील अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रामुख्याने करता येतो. दक्षिण भारतातील जैन मंदिरात मूर्तीसाठी गर्भमंदिरांची रचना केलेली दिसते. तसेच भव्य मूर्ती देखील खोदलेल्या दिसतात. शिल्पांचा विचार केला असता गोमतेश्वराचे शिल्प भव्यतेत सर्वश्रेष्ठ आणि खजूराहो येथील शिल्प त्यांच्या सूक्ष्म खोदकामाच्या दृष्टीने आकर्षक आहेत. इसवीसनाच्या बाराव्या तेराव्या शतकापासून उत्तर भारताच्या पश्मिच विभागात जैन मंदिरांचा विकास होत गेला. अबु आणि राजस्थानातील काही मंदिरे मध्युयुगातील वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखली जातात. पंधराव्या शतकात ग्वाल्हेर येथे बांधलेले जैन मंदिर जैन वास्तूकलेचा मध्ययुगातील एक उत्कृष्ट नमुना सांगता येतो. याचकाळात गुजरातमध्ये काही चांगल्या जैन मंदिरांच निर्माण करण्यात आले. काही कलाभ्यासकांच्या मते जैन वास्तुकला भारतातील इतर धर्माच्या तुलनेने अत्यंत प्रगत अशी आहे. जैन मंदिरांमध्ये तीर्थंकरांच्या मूर्ती प्रामुख्याने असतात,तरी पद्मा,अंबा इत्यादी देवींच्या देखील मूर्ती आढळतात. विजयस्तंभ हा प्रकार देखील जैन धर्मात बांधलेला दिसतो. अशा स्तंभावर उत्तम शिल्प आणि तीर्थंकरांच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. गंगा व यमुना या पवित्र नद्यांना स्त्रीरूप देऊन त्यांच्याशी संबंधित कथा जैनमंदिरात काही ठिकाणी खोदलेल्या दिसतात.जैन वास्तुकलेचे एक वेगळेपण आणखी नजरेत भरते,ते म्हणजे चोवीस तीर्थंकरांच्या पुढील चिन्हांची त्यांच्या बैठकीखाली अथवा बाजूला प्रतिकृती केलेली असते. त्यांच्या मूर्तींचे  रंगही निश्चित असतात. ऋषभदेव व अजित यांच्या मूर्तीचा रंग पिवळा आणि चिन्ह हत्ती असते. याचप्रमाणे संभव(पिवळा-घोडा,अभिनंदन(पिवळा-मर्कट),सुमती(पिवळा-पक्षी),पद्मनाथ(तांबडा-कमळ),सुपार्श्व(सोनेरी-स्वस्तिक),चंद्रप्रभा(पांढरा-अर्धचंद्र), पुष्पदंत(पांढरा-मकर),शीतल(सोनेरी-श्वेतकळया),श्रेयान(सोनेरी-गरŠड),वासुपुज्य(तांबडा-रेडा),विमल(सोनेरी-रानटी पशू),अनंत(पिवळा-हरीण),धर्म(पिवळा-वज्र),शांती(पिवळा-सारंग),कुंथू(पिवळा-बकरा),अर(पिवळा-स्वस्तिक व मत्स),मल्ली(निळा-पात्र),मुनिसुव्रत(काळा-कासव),आदिनाथ(पिवळा-नीलकमल),नेमिनाथ(तांबडी किनार मध्ये काळा रंग-शंख),पार्श्व(निळा-साप) आणि महावीर(सोनेरी-सिंह). तीर्थंकरांचे चिन्हे आणि त्यांच्या मूर्तीचे रंग यांतील संबंध स्पष्ट करणे आज कठिण आहे. तसेच चिन्ह व रंग यांचा तीर्थंकरांच्या कार्याशी काही संबंध असल्यास तो ही आज सिद्ध करता येत नाही. परंतु प्राग्वैदिक व अनार्य परंपरेचा प्रभाव चिन्हांमध्ये आणि रंगांमध्ये आहे,असे प्रतिपादन अनेक अभ्यासकांनी केलेले दिसते. तीर्थंकरांच्या बैठकीजवळ अनेक देवतांची चित्र असतात. अनेक मोठया सिद्धांच्या प्रतिमा मोकळया जागेत ठेवून अनेक लोक त्यांना शरण जात आहेत असे चित्र काढणे,या सर्वांतून ही गोष्ट स्पष्ट दिसून येते की,त्यागाने मोक्षमार्गाची वाटचाल करण्याची शिकवण देण्याचाच हा एक प्रकार आहे. तसेच जैन धर्माचा प्रभाव निर्माण करण्याचा तो एक मार्ग देखील आहे. श्वेतांबर जैन मंदिरामध्ये धर्मचक्र काढलेले असते,त्याला सिद्धचक्र असे संबोधतात. यात पवित्र मंत्र व पांच बोटे चित्रित केलेली असतात. ही पांच बोटे म्हणजे  मोक्ष प्राप्तीच्या मार्गातील पांच अवस्था होत. या चकाचे खोदकाम अत्यंत कलात्मक असते. धातुशिल्प व चित्रकला या दृष्टीने ही जैनांनी प्रगती केलेली दिसून येते. भांडारगृहात संरक्षित करण्यात आलेल्या अनेक प्राचीन दुर्मिळ चित्रांमधून भारतीय चित्रकलेचा एक वैशिष्टपूर्ण पैलू दिसून येतो. पशु्-पक्षी,कमळे,तलाव,वनश्री यांची नयनरम्य चित्रे व त्यातून केलेला धर्मबोध मानवी कल्पनांच्या भरारीचा प्रभाव दाखवून देणारा आहे. धातूंच्या वस्तू बनविण्यातसुद्धा जैनांची स्वतंत्र शैली दिसून येते. जैन मंदिरांतून ठेवलेली भांडी मुख्यतः उत्सवप्रसंगी जेवणावळी घालण्यासाठी उपयोगांत आणली जातात. दागदागिन्यांच्या कलेतही जैन कारागिर आपली वेगळी ओळख कायम टिकवून ठेवतात. दागिने निर्मितीत असलेले हे कौशल्य आणि वेगळेपण यामुळे सोने-चांदी,हिरे-मोती इत्यादींचा व्यापार जैन समाजाच्या हातात राहिलेला दिसतो. यामुळेच जसे जैनांचे वाङ्मय भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे,तसेच जैन कला देखील भारतीय कलाविश्वाला समृद्ध करणारे दालन ठरते. 
डॉ.राहुल हांडे,
भ्रमणध्वनी - ८३०८१५५०८६

Comments

Popular posts from this blog

अखेरचा हिंदू सम्राट...

आणि बुद्ध हसत आहे.

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !