शिक्षणाची मिसिसिपी...
'बोस्टन टी पार्टी' ही घटना अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची ठिणगी होती. स्वातंत्र्याची आस असणारा अमेरिकन समाज शंभर वर्षातच स्वातंत्र्याच्या युद्धापर्यंत पोहचतो. यामागची कारणं आर्थिक ,राजकिय व सामाजिक असली, तरी अमेरिकेत प्रारभं झालेल्या शिक्षणाचा प्रसार ही त्याची उर्जा होती. युरोपातील विविध देशांमधून अमेरिकेत गेलेल्या अनेकांना युरोपातील आधुनिक शिक्षणाचा वारसा लाभलेला होता. त्यातही महत्वाचे म्हणजे युरोपातील प्रबोधनाच्या काळाचे एक अपत्य म्हणजे अमेरिका होती. स्वतःच्या गुलामीची जाणिव होण्याचा सर्वात प्रमुख स्त्रोत म्हणजे शिक्षण. महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.बुकर टी.वाशिंग्टन,मार्टिन ल्यूथर किंग, डॉ.कार्वर,नेलस्न मंडेला अशा प्रत्येक महापुरूषाने गुलामीच्या बेडया तोडण्यासाठी शिक्षणरूपी घनाची आवश्यकता कायमच अधोरेखित केलीली दिसते. त्यांनी शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी स्वतः शैक्षणिक संस्थाची निर्मिती केली. अमेरिकेला आज आपण एक महासत्ता म्हणून ओळखतो. अमेरिकेच्या महासत्ता म्हणून वाटचालीत तेथील शिक्षणाची अत्यंत महत्वाची भूमिका असलेली दिसते. १६०७ मध्ये जेम्स टाऊन ही पहिली वसाहत इंग्रज अमेरिकेच्या धरतीवर स्थापन करतात. त्यानंतर अवघ्या ३५ वर्षात म्हणजे १६३६ साली जगप्रसिद्ध हार्वर्ड महाविद्यालयाची स्थापना होते. ही घटना अत्यंत विलक्षण अशी आहे. एखाद्या अनोळखी भूमीवर गेलेले लोक,पूर्वस्थापित कोणतीही व्यवस्था नसतांना, अवघ्या पस्तीस वर्षात तेथे महाविद्यालयाची स्थापना करतात. येथेच या लोकांचा द्रष्टेपणा लक्षात येतो. जेम्स टाऊन वसवणे म्हणजे निवा-यासाठी झोपडी बांधण्यापासून सुरवात होती. नव्या भूमीच्या हवामानाशी व पर्यावरणाशी सतत संघर्ष करत स्वतःचे अस्तित्व टिकवणे. एवढे मोठे दिव्य पार पाडतांना. ईतक्या कमी अवधीत महाविद्यालयाची स्थापना अमेरिकन समाजाच्या भविष्यकालीन प्रगतीचा पायाच म्हणावा लागेल. इंग्लंड व उर्वरित युरोपामधून गेलेल लोक यांचा या भूमीवर जाण्याचा प्रमुख हेतू सोन्याचा शोध,व्यापार आणि धर्म हा होता. यापैकी धर्म प्रसार व धार्मिक शिक्षण हे अमेरिकेच्या शिक्षण व्यवस्थेच्या प्रारंभाचे कारणं बनले. शिक्षणाचा प्रसार आणि धर्मगुरुंचे प्रशिक्षण हे दोन प्रमुख हेतू महाविद्यालयं व विद्यापीठ यांच्या स्थापनेसाठी कारणीभूत ठरले. अशा शैक्षणिक संस्थामधून निर्माण झालेले प्रज्ञावंत धर्मगुरू भावी पिढयांना सुयोग्य मार्गदर्शन करतील. जेणेकरून सामान्य जनता भरकटणार नाही. जे हार्वर्ड आज विद्यापीठ म्हणून जगात आपल्या अत्युच्च शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखले जाते. त्याच्या स्थापनेत हाच हेतू होता. अमेरिकेची उभारणी करण्यासाठी हार्डवर्क करणा-या पहिल्या अमेरिकन पिढीने हार्वर्ड स्थापन केले. कारण शारिरीक हार्डवर्क माणसाला जगवू शकते, मात्र हार्वर्डमध्ये मिळणारे शिक्षण त्याला विकासाच्या शिखरावर पोहचवू शकते. याची जाणीव या द्रष्टया पिढीला होती. हॉवर्डनंतर १७०१ मध्ये येल,१७४६ मध्ये प्रिंसटन आणि १७६४ मध्ये ब्राउन महाविद्यालयांची स्थापना झाली. एलिझर व्हिललॉक येथील आदिवासींना शिक्षित करणे आणि त्यांना ख्रिश्चन धर्मानुयायी बनवणे या हेतूने न्यू हॅम्पशायरमध्ये १७६१ साली डर्टमाऊथ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. पहिली वसाहत असणा-या व्हर्जिनिया प्रातांत १६९३ मध्ये विल्यम व मेरी महाविद्यालय स्थापन झाले. डॉ.जेम्स ब्लेयर या धर्मगुरूने या महाविद्यालयाची स्थापना केली. स्कॉच-ऐंग्लिकन चर्चचा हा पाद्री महाविद्यालयाची परवानगी व त्याच्यासाठी अनुदान मिळविण्यासाठी इंग्लंडला जाऊन आला. यातून त्याची तळमळ लक्षात येते. १७५४ साली आजच्या कोलंबिया प्रांतातील किंग्ज महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. १७५१ मध्ये स्थापन झालेले पेनसिल्वेनिया विद्यापीठ धार्मिक हस्तक्षेपापासून संपूर्णपणे मुक्त राहिले. बेंजामिन फ्रँकलिन याच्या प्रभावामुळे या विद्यापीठात त्याच्या स्थापनेपासूनच विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रभावी ठरले. अमेरिकेतील महाविद्यालयं आणि विद्यापीठं यांच्या स्थापनेसंदर्भात एखादा आज असे म्हणू शकतो की धार्मिक शिक्षण आणि धर्म प्रसार यांच्यासाठी त्यांची स्थापना करण्यात आली होती. सार्वजनिक शिक्षण हा त्यांचा हेतू नव्हता. अमेरिकेत गेलेल्या मुठभर अप्रवासी युरोपियन लोकांची त्यामुळे शिक्षणाची सोय झाली. सतत असल्या संकुचित दृष्टीकोनातून भूतकाळाचा अर्थ लावणे,आपल्या आजच्या प्रगतीला मारक ठरू शकतो. अठराव्या शतकात ज्या-ज्या लोकांनी अमेरिकेला भेट दिली,त्यांनी आपल्या प्रवासवर्णनात अमेरिकन समाजात शिक्षणविषयक निर्माण झालेल्या आवडीचा आर्वजून उल्लेख केलेला दिसतो. विदर्भातील कापूस मुबंई बंदरात पोहचविण्यासाठी मुंबई-नागपूर लोहमार्ग इंग्रजांनी निर्माण केला. अशी बोंब मारणारा आजही त्याच मार्गावरून प्रवास करतांना दिसतो. त्यामुळेच शिक्षण असो वा दळण-वळण असो यांच्या व्यवस्थेतील प्रारंभीक हेतूऐवजी त्याची आजची उपयुक्तता महत्वाची ठरते. अमेरिकेतील प्रोटेस्टेंट संप्रदायाने त्यांचे बायबल (इंजील) पठणाचा अधिकार प्रत्येकाला दिलेला होता. धार्मिक मूल्यांचे ज्ञान आणि मुक्ती यासाठी लोक या पवित्र ग्रंथांचे वाचन करत. याचाच अर्थ शैक्षणिक संस्थांच्या निर्मितीत धार्मिक हेतू असला तरी समानता व उदारता होती. दुस-या बाजूला बॅप्टिस्ट,क्वेकर्स,प्रेसबिटेरियन,लूथेरियन इत्यादी संप्रदायांनी शाळा सुरू केल्या होत्या. त्यांच्या शाळांमध्ये मुलांना लिहिण्या वाचण्यासोबतच गणिताचे शिक्षण देण्यात येत असे. प्राथमिक अवस्थेत अमेरिकेत ज्या माध्यमिक शाळा सुरू झाल्या त्या दोन प्रकारच्या होत्या. पहिल्या प्रकारच्या शाळांमध्ये ग्रीक,लॅटिन भाषा,इंग्रजी साहित्य व गणित हा अभ्यासक्रम प्रामुख्याने शिकवला जात असे. तसेच काही शाळांमध्ये फ्रेंच साहित्य देखील शिकवले जात होते. मुलांना एक सभ्य नागरिक म्हणून घडवणे आणि उच्च शिक्षणासाठी सक्षम करणे,हा या पहिल्या प्रकारच्या शाळांचा उद्देश होता. दुस-या प्रकारामध्ये अमेरिकेच्या मध्यवर्ती वसाहतींमध्ये संख्येने अधिक असलेल्या शाळा होत्या. श्रमप्रतिष्ठेचे संस्कार करणे हा या शाळांचा प्रमुख उद्देश होता. जीवन जगण्यासाठी उपयुक्त सर्व साधन-सुविधांची प्राप्ती स्वपरिश्रमातून करण्यास प्रत्येक मुल सक्षम बनेल. असे शिक्षण या शाळांमध्ये देण्यात येत असे. माध्यमिक शाळेचा एक तिसरा प्रकार देखील होता. तो म्हणजे कुलीन-श्रीमंत मुलांसाठी याच वर्गातील पैशांवर चालवल्या जाणा-या खासगी शाळा. अशाप्रकारे शाळा-महाविद्यालयांचे जाळे अमेरिकेत निर्माण होत गेले. यातील काही महाविद्यालय भविष्यातील जागतिक दर्जाची विद्यापीठे झाली. असे असतांनाही दुर्गम भागात शाळा-महाविद्यालयांची सोय नसल्याने स्वयंअध्ययनचा मार्ग अनेक ठिकाणी अवलंबण्यात आला. यामध्ये लहान मुलेच नाही,तर प्रौढ स्त्री-पुरूष,वृद्ध अशा सर्व वयोगटातील लोकांनी विद्यार्जनाचे विविध प्रकार शोधून काढले. विशेष म्हणजे ज्ञानार्जनाच्या अशा प्रयत्नांमध्ये मुली-स्त्रिया यांची संख्या अधिक होती. कारण त्यांच्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाची दारं बंद होती. शिक्षणासाठी धडपडणा-या मुलींचे उदाहरण म्हणून एबिगाएल ॲडम्स यांचा विचार करता येतो. बुद्धिमत्ता व पात्रता असतांनाही या मुलीला हार्वर्डमध्ये प्रवेश घेता आला नाही. स्वयंअध्ययनाच्या बळावर या मुलीने मिळेल त्या पद्धतीने ज्ञानार्जन केलेच. हीच मुलगी भविष्यात अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम यांची पत्नी म्हणून अमेरिकेची प्रथम महिला झाली. मात्र जॉन ॲडम यांची पत्नी एवढीच त्यांची ओळख नाही. महिला हक्कांच्या अमेरिकेतील प्रथम पुरस्कर्त्या आणि गुलामी प्रथेच्या विरोधक म्हणून त्यांची जगात स्वतंत्र ओळख आहे. प्रसिद्ध अमेरिकन कवयित्री आणि अमेरिकन राजकारणाची प्रथम महिला भाष्यकार मर्सी ओटिस वॉरेन,यांनी आपल्या भावाच्या शिक्षकांकडून विद्यार्जन केले. अशा अनेकांच्या भगिरथ प्रयत्नांमधून शिक्षणाची 'मिसिसिपी' (आपल्या भाषेत शिक्षणाची गंगा) अमेरिकेच्या धरतीवर अवतरली. अमेरिकेच्या कानाकोप-यात शिक्षणासाठी धडपडणारे स्त्री-पुरूष होते. तसेच अतिदुर्गम भागातही आपल्या मुलांना शिक्षण मिळावे आणि ज्यामुळे एक चांगले जीवन त्यांच्या वाटयाला यावे यासाठी रक्ताचे पाणी करणारे आई-बाप होते. याचा परिणाम अमेरिकन समाजावर जाणवायला लागला. साक्षर-सुशिक्षितांची संख्या वाढू लागली. त्यामुळे वाचनसंस्कृतीची पाळमुळं अमेरिकन भूमीत खोलवर गेली. वृत्तपत्रे-नियतकालिके आणि पुस्तके वाचण्यात हा समाज समरसून गेला. वाचन समृद्ध लोक सार्वजनिक जीवनातील प्रत्येक विषयावर चिंतन व वाद-विवाद करू लागले आणि त्यांना प्रश्न पडू लागले. युरोपच्या प्रत्येक देशातून आपापले वांशिक,ऐतिहासिक,सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक इत्यादी प्रकारचे संचित घेऊन अमेरिकेत आलेला,हा जनसमूह आता अमेरिकन समाज म्हणून आकार घेऊ लागला. शिक्षणाचा प्रसारामुळे त्यांच्यातील हे भेद विरत गेले आणि आपण अमेरिकन नागरिक आहोत,ही एकजिनसी भावना निर्माण होऊ लागली. त्यांची अमेरिकन म्हणून भावना जशी-जशी तीव्र होत गेली,तस-तशी संपूर्ण स्वातंत्र्यासाठी अस्वस्थता वाढत गेली.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
Comments
Post a Comment